श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३४३
☆ साक्षर केली… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
मेघाने या काल पालथी घागर केली
काळी माती त्याची हिरवी चादर केली
*
वाघावाणी वागायाची काल लेक ही
वाघीणीची या लोकांनी मांजर केली
*
घर सावरण्या मीही थोडा दिलाय टेकू
छिलून माझ्या देहाची मी पाचर केली
*
पीठ घ्यायला खिशात नव्हते पैसे माझ्या
पोरांसाठी मग कोंड्याची भाकर केली
*
सावित्रीने काल सोसल्या हाल अपेष्टा
नवी पिढी ही या मातेने साक्षर केली
*
वयोपरत्वे किती बदलला सूर तुझा रे
गाताना तू कटु शब्दांची साखर केली
*
तुझ्याकृपेने मला मिळाले वैभव देवा
एक विनवणी जगतासाठी सादर केली
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





