श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – जळो जैसा प्रेमरंग… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
☆
जळो जैसा प्रेम रंग / जया भुलोनि पतंग //१//
सासूसाठीं रडे सून / भाव अंतरीचा भिन्न //२//
मैंदा मुखीचा कोवळा / भाव अंतरी नीराळा //३ //
तैसी वृंदावनकांती / उत्तम धरूं नये हाती //४//
बक ध्यान धरी / दावी सोंग मत्स्य मारी //५ //
तुका म्हणे सर्प डुले / तैसा कथे माजी खुले // ५ //
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
पतंग दिव्याच्या प्रकाशाने नटलेल्या लोभसवण्या ज्योतीच्या बाह्य स्वरूपावर भुलतो. प्रेमाने तिच्यावर झडप घालून मरून जातो. या प्रेमाला प्रेम कसे म्हणायचे. कायम जाच करणारी सासू मेली की सून हंबराडा फोडून रडताना दिसते. पण तिच्या रडण्याचा भाव खरा नसून भिन्न विचाराचा असतो. अतिशय मधूर आणि रसाळ वाणीत बोलणा-या कपटी माणसाच्या मनात कपटी कांगावाच भरलेला असतो. वृंदावन नावाचे वरून सुंदर दिसणारे फळ मनमोहक दिसते पण ते आतून कडवट व विषारी असते त्याला आपण हातात सुध्दा धरू नये. जलाशयाच्या किंवा नदिच्या काठावर डोळे झाकून उभा असणारा बगळा पाहून तो जप तप ध्यान करतो आहे असे भासवतो पण तो तेथे मासे मारण्यासाठी उभा असतो. त्याच प्रमाणे हरीकथा किंवा किर्तन ऐकणारा नास्तिक माणूस पुंगी वाजताना ऐकून डुलणा-या सापासारखे सोंग करून दाखवत असतो. हे लक्षात घ्यावे आणि मगच तशा माणसाशी पुढील व्यवहार सावध होऊन करावेत.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






