डॉ. निशिकांत श्रोत्री

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ वचन :: एक अनुभूती ☆ डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

 आमच्या काव्यसाधना समूहात प्रत्येक वेळेस मी एक चरण देतो आणि त्यावर पुढच्या खेपेला सर्व कवी कविता करून सादर करतात. तसा चरण लिहायला मी बसलो; पहिल्या दोन शब्दांनंतर ‘हळुच वळू दे’ हे शब्द आले आणि अचानक माझे भान हरपले. मी उन्मनी अवस्थेत गेलो. माझी लेखणी चालत होती. पण मला मी काय लिहितोय याचे भान नव्हते. कोणी तरी माझ्याकडून लिहून घेत आहे हे मला जाणवत होते.

आणि त्यातून साकारली खालील ‘वचन‘ ही कविता :

☆ वचन ☆ डॉ. निशिकान्त श्रोत्री ☆

आयुष्याच्या वळणावरती हळुच वळू दे मला

शाश्वत राहिल साथ आपुली देते वचन तुला ||ध्रु||

मार्गावरती असंख्य अगणित किती खाचखळगे

पुढचे पाउल पुढेच पडले नाही वळले मागे

ध्येयप्राप्तीचा निर्धाराने अंगिकारला वसा

उतून मातुन खचून नाही कधी सांडला पसा ||१||

वाटेवरती भुलवित होत्या किती मोहवासना

मोहापायी भुरळून जाऊन ध्येया सोडले ना

उत्कर्षाचा ध्यास मनातून निग्रह होता केला

हाती घेउन हात आपुले पंथ कंठला होता||२||

झपाटलो होतो जिद्दीने उद्दिष्टासाठी

बुद्धी आणिक जिद्दचि केवळ होते अपुल्या गाठी

हाती होते हात अपुले साथीचे विश्वासाचे

नैराश्यातून एकेमेका स्फूर्तीला द्यायचे ||३||

वाटेला या सरळ जायचे क्षितिजाला शिवण्या

यशोमन्दिराचे हे वळण आहे मजला वळण्या

कर्मपुर्ती ही कर्तव्याची नाही रेंगाळणे

मार्ग सोडूनी हा आता पुढचाची अनुसरणे ||४||

होते आहे असेन मी तर सदैव तुझ्याच संगे

दिला शब्द न कधी सांडोनी वळेन ना मी मागे

असा सरळ तू अनुसर अपुल्या विहीत मार्गाला

वास तुझ्यातच शाश्वत आहे देते वचन तुला ||५||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments