श्री दिवाकर बुरसे
☆ क्षण सृजनाचा ☆ ‘चंद्रकंस..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
अश्विन शुद्ध पौर्णिमेचं ते पूर्णाकार, काहीसं केशरी रंगाचं शशिबिंब नारळीच्या आडून डोकावताना पाहिलं की अंतःकरणात वीणा झंकारू लागते! प्रियेच्या धुंदील सहवासाच्या स्मृती पुन्हा पुन्हा उजळून उठतात, उचंबळून वर येतात. कुंजात, वाटिकेत, ठाई ठाई स्मृतींचे काजवे चमचमतात.
सरोवरात विहार करताना दिसतो एकटाच राजहंस
चंद्रतुषार पिऊन कोण गातोय हा धुंद चंद्रकंस ?
🌻 राग चंद्रकंस 🌻
चंद्रकंस हा कोण गातसे पिउनी चंद्रतुषार
आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार! ॥ ध्रु॥
अशीन होती रात्र बावरी
नभात होता चंद्र बिलोरी
तू, मी दोघे सागरतीरी
प्रेमा आपुल्या केवळ होता चंद्रच साक्षीदार !
आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ १॥
चंदेरी या रेतीवरती
कर माझा तव कटीभोवती
मनात अपुल्या फुलली होती –
असंख्य स्वप्ने, ज्यांना आपण केले गे साकार !
आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ २॥
मंत्रघोष घुमविला सागरे
बिंब इंदुचे जळीं थरारे
विसरून आपण जग हे सारे
काया, वाचा, मने जाहलो एकच – पूर्णाकार!
आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ ३॥
कातळ हा तो, हीच नारळी
मुग्ध अशी तू, आशिच लाजली
आवेगाने घेता जवळी
मेघामागे अलगद दडला त्याच क्षणी शशि पार !
आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ ४॥
🙏🏽
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




