श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
वणवण बळीराजाची…
श्री आशिष बिवलकर ☆
☆
बरसू लागलेत काळे ढग,
बरसू लागलेत डोळ्यातून अश्रू |
जणू दोघांत लागलीय स्पर्धा,
बळीराजा म्हणे कुठं दुःख विसरू |
*
उभी पीकं झोपली शेतात,
दाण्यादाण्याला फुटला अंकुर |
फुटलं नशीबच सारं आता,
निसर्गा एवढा कसा झालास क्रूर |
*
हताश झालाय रे बळीराजा,
अस्मानी सुलताना आता घे आवर |
पीक नाही आलं हाताशी,
भकास झालाय शेतीतला वावर |
*
ऐन सणावाराला ऐन दिवाळीत,
बळीराजाचं तोंड झालंय कडू |
हुंदक्यात जगण्याची भैरवी गातो,
शेतकऱ्यांना कोसळू लागलंय रडू |
*
फाटकच लुगडं कारभारणीला,
फाटकीच लाज झाकाया लंगोटी |
लेकरंबाळं उघडी फिरती गावात,
पिकाविना शेतीच झाली वांझोटी |
*
मायबाप सरकार झालं बहिरं,
बळीराजाचा आक्रोश ऐकूच येईना |
बळीराजाची जगायची वणवण,
दाही दिशा काही केल्या संपेना |
©️ वास्तवरंग
☆
(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर)
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






