सौ. प्रांजली लाळे

? जीवनरंग ?

☆ मलाही वारीला जायचं… ☆ सौ. प्रांजली लाळे

भुमी आज खुप घाईत होती. पटापट सर्व कामे हातावेगळी करत होती. आज बॉसही थक्क झाला होता तिला एवढे सिरियसली काम करताना पाहून.

ऑफिस ते घर एवढंच विश्व असलेली भूमिका विश्वास पाटील. आधी खुप वेगळ्या वातावरणात वाढलेली मुलगी. दहावीपर्यंत पुण्याजवळच्या खेडेगावात वाढलेली.. आई-बाबा तर लहानपणी गेलेले. आजी आजोबांच्या अंगा-खांद्यावर बागडून मोठी झालेली भुमी. आजोबा अतिशय सात्विक व्यक्तिमत्वाचे.. कपाळी बुक्का.. चेहऱ्यावर सतत हास्य..

आजीच्या उबदार मायेच्या वर्षावात न्हाऊन निघालेली भूमी. तिला आईची कमतरता कधी भासलीच नाही.

घरात विठोबा-रखुमाई असताना देवळात कशाला जायचं असा भाबडा प्रश्न तिला पडे. तिचे आजोबा भजन किर्तनात तल्लीन झालेले तिने अनेकदा पाहिले होते. आजीही जात्यावरच्या ओव्या सुंदर आवाजात गायची. भुमीला कधी कधी फोटोतल्या आई-बाबांची आठवण यायची. तिला वाटे काय केले देवाने आपल्यासाठी?  कुठे हरवले माझे आई-बाबा?

जेव्हा शाळेत पालक सभा असायची, सर्व मैत्रिणी त्यांच्या आई-बाबांबरोबर शाळेत यायच्या. तेव्हा मात्र भुमी सैरभैर होई.. पण आजी आजोबांचे तिच्यासाठी भक्कमपणे उभं राहणं तिचं मन शांत करी..

आजोबा दरवर्षी न चुकता वारीला जात. एकही वारी चुकलेली तिला आठवत नव्हती. आबा जेव्हा वारीला निघत. तेव्हा एक प्रकारचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसे. कपाळावर अष्टगंध आणि बुक्का आवर्जून लावत.. मोजकं सामान.. भरपूर विठ्ठलभक्त मित्र परिवारासोबत आबा निघत असत. महिनाभर आबा दिसणार नाहीत ह्या भावनेने तिचा कंठ दाटून येई.. “आबा, मी नाही बोलनाल तुमच्याशी, ” गाल फुगवून भुमी बोबडे बोले.. आबा पटकन उचलून घेत तिला.. “भुमी सरकार, आम्ही हे गेलो.. आणि हे आलो बघ.. तो विटेवरी उभा राहून वाट बघतोय बघ.. “

“कुठेय कुठेय आबा? ” भुमीचा निरागस प्रश्नं हसून परतवत आजोबा.. आजीकडे मंद हसत पहात.. पुढच्या प्रवासाला निघत.. विठू नामाचा गजर होई.. गावातून दिंड्या निघत. बरीच पुरुष माणसं दिंडीत जात.. मग काय गावातील बायकांचं आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांचच राज्य! मजाच मज्जा.

दिवस सरत होते.. दरवर्षी आषाढीची वारी सुरु असे भुमीच्या आबांची.. त्याही वर्षी आबा वारीला गेलेले. दिड महिना झाला तरी परतले नाहीत. सोबतची सगळी माणसं परतली पण “आबा”…. नाही आले घरी परत..

भुमी पंधरा वर्षांची होती.. समजती झालेली. आजीला कुशीत घेऊन धाय मोकलून रडली.. “बस्स् आता नाही पहायचं विठ्ठलाकडे!! माझ्या आबांना हिरावलंय या वारीनं.. आजी आपण ह्या गावात नाही रहायचं गं.. काही नाही केलं ह्या देवानं आपल्यासाठी.. “

आजीही आजारी पडली ह्या धक्क्याने.. पण तिला भुमीसाठी सावरावंच लागलं.. पण घरात ओव्या, विठूचं नाव घेणं बंद झालं.. एक दिवस भुमीचा मामा आला.. आणि या आजी-नातीला घेऊन शहराकडे परतला..

तिथून सुरु झाला भुमीचा एक वेगळा प्रवास. मामाच्या आधाराने दोघींचीही आयुष्यं बदलली. भुमी मोठी इंजिनिअर झाली.. पण भगवंताची पुजा, नमस्कार एकदम बंद.. मामानंही कधी आग्रह नाही केला तिला..

भुमीचं यथावकाश लग्न झालं. आजी एकटी पडली.. पण पर्याय नव्हता.. हम्म्.. तिला परदेशात जाण्याची संधी मिळाली. भारत सोडून जाताना सर्व आठवणी सोबत घेऊन गेली..

नवरा आणि तीच अमेरिकेत.. दोघेही कामाला जुंपलेले.. ज्या अपार्टमेंटमधे रहात तिथे बरेच जणं मराठी होते. त्यामुळे मराठी सणवार धडाक्यात साजरे होत. भुमीला ह्यात काहीही रस नव्हता. फक्त औपचारिकता!! मनावर उमटलेले चरे खुप वेदना द्यायचे..

तिचा नवरा अतिशय मायाळू आणि समजूतदार होता. बक्कळ पैसा असला आणि अमेरिकेत रहात असला तरी देवपूजा केल्याशिवाय बाहेर पडत नसे.. भुमीला प्रचंड चिड यायची.. एकदा दोनदा देवाच्या मुर्ती कपाटात ठेऊन दिल्या तिने.. डोळ्यासमोरही नको होत्या त्या.

ऑफिसला जाताना अचानक मोबाईल किणकिणला.. आकाश, तिचा नवरा बोलत होता.. “मी दुसऱ्या शहरात अर्जंट जात आहे. उद्यापर्यंत परत येईल. “

प्रथमच ती घरात एकटी राहणार होती. एक अनामिक भिती वाटत होती तिला आज. काही तरी हुरहूर लागली होती मनाला.. ऑफिसमध्ये जाऊन आली तशी मटकन बसली.. कारण लिफ्टमध्ये चर्चा होती की यु. स. बोईंग विमान वातावरणात खराबी आल्याने कुठंतरी दूरच्या दाट जंगलात उतरवण्यात आलंय.. भितीने पोटात गोळा आला भुमीच्या.. कारण त्या विमानाने आकाश कामासाठी दुसऱ्या शहरात जाणार होता.. त्याला फोन लावला. पण तोही लागेना.

मग मात्र तिला ब्रम्हांड आठवले. आज ती कोणाला साकडं घालणार होती?  भगवंताने आज जर साथ दिली नाही तर ती जगातील कोणत्याही शक्तीवर विश्वास ठेवणार नव्हती.

हतबल होऊन मटकन खाली बसली. तिने गच्च डोळे मिटले. ‘शांत हो बाळा येईल आकाश परत. तु काळजी करु नकोस. माऊली त्याला सुखरूप आणतील.. ‘ मागे वळून पाहिले तर तिचे आबा तिच्या डोक्यावरुन हात फिरवत होते.. “आबा कुठे होते इतके दिवस तुम्ही?  मी खुप शोधले तुम्हाला. ” 

“बाळा मी तुझ्याबरोबरच आहे की.. “

“नाही आबा, त्या विठोबाने तुम्हाला नेलं.. मला परत पोरके केलं. आता माझ्या आकाशलाही…. ” भुमीला रडू आवरेना..

“नाही गं पोरी, तो विठूच आहे बघ, तो तुझ्या आकाशला परत घेऊन येईल सुखरूप.. माझं जाणं विधिलिखित होते.. मी जवळच होतो तुझ्या.. तुला फक्त जाणवलं नाही.. जप स्वतःला, आकाशला.” 

भुमीला कपाळावर हातांचा उबदार स्पर्श जाणवला. खाडकन जागी झाली.. पाहिले तर आकाश मायेने डोक्यावरून हात फिरवत होता.

“आकाश… तु कसा काय…. ” तिच्या तोंडून शब्दही फुटेनात..

आकाश फक्त थोपटत राहिला.. “अगं तुला फोन केला आणि एअरपोर्टवर जाण्यासाठी वळालो.. तर समोर महाराष्ट्रीयन मंडळाची दिंडी निघालेली. तुला तर माहिती आहे.. देवाची सेवा करायला मला प्रचंड आवडते.. मी लगेच माझ्या सहकाऱ्यांना फोन करून पुढील अपॉईंटमेंट घेण्याची सूचना दिली आणि दिंडीत सामील झालो.. विठ्ठल नामात इतका तल्लीन होतो की तुला फोन करण्याचं भानच उरलं नाही.. आषाढी एकादशी जरी परवा असली तरी आजच दिंडी निघाली.. तिथेच देवळात मुक्काम आहे भक्तांचा.. मी देखील जाणार आहे.. “

भुमी थक्क होऊन बघत राहिली.. “अरे तुला कळाले का, तु ज्या विमानाने जाणार होता. ते कुठेतरी हरवलंय.. “

आकाश आश्चर्याने जवळ जवळ किंचाळलाच.. आज विठ्ठलाने त्याला वाचवलं होतं.. यापेक्षा दुसरा दृष्टांत तो काय असेल?

दुसऱ्या दिवशी सकाळीच भूमीनं मनात ठरवलं.. वारीला जायचं.. भगवंताला डोळे भरून बघायचं.. पटकन आवरलं.. ऑफिसला उद्याची लिव्ह टाकून तिची पावलं विठ्ठल-रखुमाईंच्या देऊळाकडे वळाली.. भगवंताच्या नामस्मरणात, टाळ गजरात तीही तल्लीन होऊन नाचू लागली.. ‘विठ्ठल विठ्ठल!! ‘

© सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments