सौ. मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ मिळवती झाले, काय मिळवले? – भाग-१ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
‘‘ए आई SS, अहो बाबा, लवकर या ना इकडे. ओळखा बरं काय गंमत आहे माझ्याकडे? नाही ना ओळखत? अहो मला बँकेत नोकरी मिळाली. हे पहा पत्र. आई, इतकं मस्त वाटतंय् ग मला. आता मी मिळवती होणार, माझ्या पायावर उभी रहाणार… ”
… आज अचानक माझं मन एकदम २५ वर्षं मागे गेलं होतं. अचानक तरी कसं? आज नोकरीला २५ वर्षे पूर्ण झाली. बँकेत छोटासा शुभेच्छादर्शक कार्यक्रम झाला. घरी येतांना एका वेगळ्याच आनंदात मन तरंगत होतं. कसला आनंद हा? ही कोणती वेगळीच तृप्ततेची झालर आहे या आनंदाला? माझी मीच विचारात पडले. आणि मला एकदम तो नोकरी मिळाल्याचा दिवस आठवला. पाय चालत होते पण मन मात्र आठवणींच्या गोफात गुंतून गेलं.
नोकरीचा पहिला दिवस, मग पहिला पगार, त्याचा एक वेगळाच मन भरून टाकणारा आनंद, त्यातून घरातल्या सर्वांसाठी घेतलेल्या भेटवस्तू, नकळत नोकरीत रुळत गेलेलं मन, बँकेच्या परिक्षांमध्ये मिळवलेलं यश, मनाजोगत्या जोडीदाराशी लग्न, आयुष्याची सांगता झाल्याचं सांगत आलेला पहिला मुलगा, आधी मातृत्व की आधी नोकरी या कात्रीत सापडून बराच काळ कासावीस होत राहिलेला जीव… एक एक करत जणू चित्रपटच उलगडत होता मनासमोर, आणि अचानक एका विचारापाशी गचकन् ब्रेक लागावा तसं मन थांबलं… ‘ आज २५ वर्षं झाली. काय मिळवलं मी इतक्या वर्षात? नि काय गमावलं? ‘ हा विचार – विजेसारखा कल्लोळत आला नि त्याने दोन्ही मनांना जागं केलं.
‘मिळवती झाले खरी, पण काय मिळवलं? ’ – एक मन.
‘मिळवती झाले नि काय काय मिळवलं!! ’ – दुसरं मन.
— – या दोन मनांच्या हुज्जतीत, बुध्दीला न्यायनिवाड्याचं काम देऊन सुनावणी सुरू झाली…
का मला एवढा आनंद झाला होता नोकरी मिळाल्याचा? मुलींनी खूप शिकावं आणि एवढया शिकल्या म्हणून करिअर करण्याचा जोरदार विचार करावा असे ते दिवस नव्हते. स्त्री-सुधारणेची गाडी, मुलींनी लग्नाआधी कमीत कमी पदवीधर व्हावे या वळणावर येऊन बरेच दिवस थांबलेली होती. उपवधूंसाठी ‘नोकरी करते’ हा अजूनतरी सर्वात मोठा जमेचा मुद्दा झाला नव्हता. मला आनंद झाला त्याचं कारण म्हणूनच जरा वेगळं होतं.
– – शिक्षणाचा नोकरी करतांना उपयोग होतो ही माझी प्रामाणिक समजूत प्रत्यक्षात भ्रामक आहे हे माहिती नव्हतं. त्याहीपेक्षा, आई-वडिलांनी इतके पैसे खर्च केले, आता पाठच्या भावंडांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी मी हातभार लावू शकेन हे समाधान सर्वात जास्त होतं. ऐश करण्यासाठी पैसे मिळविण्याचा विचार मनात यावा असे संस्कार नव्हतेच आमचे. थोडी स्वत:ची हौस, थोडी घरातली गरज आणि स्वत:च्या कर्तव्याची नव्याने होऊ लागलेली जाणीव यामुळेच नोकरी करावीशी वाटत होती.
तर नोकरी मिळाली. चुटकीसरशी रिकामटेकडा वेळ कामाला लागला. सुस्तावलेला मेंदू अंग झडझडून जागा झाला. त्याच्या हातात बांधलेले हातापायांचे लगाम ओढले गेले तसा हातापायांचा वेग वाढला. रिकामपणी उगाचच इकडेतिकडे भिरभिरणारे डोळे घड्याळ्याच्या काट्यांवर स्थिरावले आणि या सर्वांचा परिपाक म्हणून मी चक्क वक्तशीर झाले. आणि हो, बँकेत इतरांनी नावे ठेवू नयेत म्हणून नीटनेटकेपणाने – टापटिपीने राहू लागले. आईला केवढा आनंद. जणू हा तिचाच विजय!
हळुहळू मग एक बोचरं सत्य उजेडात आलं. माझ्या रूपागुणांच्या कानामागून येऊन चांगलाच तिखट झालेला ‘माझं मिळवतेपण’ हा asset, उपवधू म्हणून असणारा माझा भाव अचानक वधारून गेला आणि सहजपणे एक उत्तम स्थळ मिळून गेलं. सुसंस्कृत सुशिक्षित मध्यमवर्गीय घर, स्मार्ट हुशार नवरा इ. इ. — पण तरीही नोकरी हा asset हातचा घालवून स्वत: एक liability बनून रहावं हे मनाला पटेना. आणि इथेच सासरच्या लोकांशी माझं चक्क एकमत झालं.
रस्ता बदलला पण माझं मिळवतेपण चालूच राहिलं. या मिळवतेपणाचं खरं रंग रूप इथूनच पुढे नीट दिसू लागणार, एवढं कळण्याएवढी विचारशक्ती, ते रूप कोणतंही असलं तरी सहज, हसतमुखाने आपण त्याच्याशी हातमिळवणी करू हा आत्मविश्वास, इतके दिवस नोकरी करता करता आपोआपच मिळाला होता.
जीवनक्रम बदलला तसं माहेरी असणारं हट्ट करण्याचं, बेजबाबदारपणे वागण्याचं स्वातंत्र्य, ‘जबाबदारी’ चं रूप घेऊन घरी मुक्कामालाच आलं आणि इथेही, आपलं काम पार पाडतांना कुठल्याही कलीगबरोबर adjust करून घेण्याची नोकरीमुळे जडलेली सवय मदतीला पदोपदी धावून येऊ लागली. घड्याळ्यासोबत पळण्याचा वेग कमालीचा वाढला होता. आपल्या नोकरीचा घरातल्यांना त्रास होऊ द्यायचा नाही हा एक नवा संस्कार हातात छडी घेऊन सतत पाठीमागे आहे असं वाटायचं. केव्हा केव्हा खूप जाचही व्हायचा त्याचा. पण इथेच एक नवा विचार मनात उगवू पहातोय हे जाणवायला लागलं… सगळ्यांचा मानमरातब अगदी मनापासून सांभाळून, त्यासाठी कुवतीपेक्षा जास्तच धावपळ करूनही कुठेतरी आपण स्वतंत्र आहोत, बहुतेक आर्थिकदृष्ट्या, हा विचार… तो मिळवतेपणाच्या खतपाण्यावर तर रुजत होता ना? हळूहळू सासरच्या अंगणात त्याला कर्तेपणाची, स्वाभिमानाची, स्वत:चा सुगंध दरवळणारी गोड मोहक फुलं येऊ लागली. नोकरी करतो म्हणजे – जगावेगळं काही करत नाही ही स्वत:च स्वत:ला दिलेली शिकवण, या फुलांचा आल्यागेल्याच्या स्वागतासाठीच उपयोग करीत होती. आणि इथे मूठभर की ओंजळभर हा निर्णय घेण्याची शक्ती, अधिकार मला मिळवतेपणानेच मिळवून दिला होता.
यथावकाश संसारवेलीवरही फूल उगवलं. दिसामासाने वाढू लागलं. हे वळण मात्र खरं परीक्षा घेणारं होतं. वाढती जबाबदारी पेलायला आवश्यक असणारा चाकरमानीचा हात, त्या बाळमुठीत आपली बोटे सोपवून त्याच्यासोबत रिकामा रहाणार का हा यक्षप्रश्न, नव्हे एक चावरा भुंगा मनात गरगर फिरू लागला. बाळ मोठा होत होता तसंतसं हे नोकरीचं जू झुगारून द्यावसं वाटायला लागलं. त्याचं ‘आई-आई’ ऐकूनही, अडखळणारं पाऊल जबरदस्तीने दाराबाहेर टाकतांना मनावर ठेवावा लागणारा दगड त्या नोकरीवरच फेकून मारावा आणि माघारी वळावं असं रोज-रोज वाटायचं. नोकरीपायी आपण बाळाकडे दुर्लक्ष करतोय का, आईच्या कर्तव्यात कमी पडतोय का ही नोकरीपायी निर्माण झालेली पहिली आणि अत्यंत दाहक व्यथा होती. काम करतांना सतत मन कुरतडत रहाणारी, मन:स्वास्थ्य पळवून नेणारी, व्याकूळ करून सोडणारी. सोडावी का नोकरी? काय करू? पण मग बाळ मोठा होईल, त्याचं स्वतंत्र विश्व निर्माण होईल आणि आपण हळुहळू रिकामं व्हायला लागू तेव्हा काय? या महागाईच्या दिवसात, हातातली चांगली नोकरी, काही वर्षांच्या मानसिक ओढाताणीसाठी सोडणं कितपत शहाणपणाचं आहे? आणि ‘ मी ‘ की घर.. मुलगा ‘ ‘ व्यवहार की भावना ‘, ‘पैसे की प्रेम’ या दोन टोकात हिंदकाळणारा मनाचा किरकिरणारा झोका एक दिवस खाडकन थांबला. तो दिवस – मुलाला शाळेत घालण्याचा. बालवाडीत प्रवेश मिळविण्यासाठी २०००रु. डोनेशन द्यावं लागणार हे कळलं. पूर्वीचे २०००रु. खूपच होते. पण ते भरून मग मुलगा मॅट्रीकपर्यंत चांगल्या शाळेत राहील असं म्हणून खुणावणारं समाधान, आणि ते समाधान कुशीत घेऊन उभं राहिलेलं माझं मिळवतेपण.
समाधानाची किंमत पैशात मोजायला लावणारा तो पहिलाच प्रसंग. पण नंतरही बरेचदा भेटला. आणि फार शिकवून गेला. फार मोठा आत्मविश्वास देऊन गेला की मुलांचे भवितव्य उजळविण्यासाठी मी देवीसारखे चार हात लावलेत. चहू दिशांनी बाळाला प्रेमाने न्हाऊ घालणारे ममतेचे दोन हात आणि त्याचे हात हातात धरून, त्याची मान उंच आणि पावले आत्मविश्वासपूर्वक पडावी म्हणून आवश्यक ते पाठबळ पुरविणारे दोन ‘अर्थ’ पूर्ण हात. मनाची खिन्नता, मन कुरतडणारी खंत मग पळूनच गेली कुठेच्या कुठे. मुलांच्या शिक्षणासाठी, भवितव्यासाठी, त्यांना कधी काही कमी पडू नये यासाठी, त्यांचे वेगवेगळे छंद सहजपणे जोपासण्यासाठी माझं मिळवतं असणं किती उपयोगी पडणारं आहे हे दिवसेंदिवस अधिकच जाणवू लागलं.
क्रमशः भाग पहिला
© सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





