डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ मौनातील आकांत… ☆ डॉ. शैलजा करोडे

“सोहम ऊठ बेटा. बघ सकाळचे पाच वाजलेत. मोबाईलचा हा अलार्म दुसर्‍यांदा होतोय बेटा. ऊठ आता. आळस करून कसा चालेल. ऊठ, फ्रेश हो, आणि थोडावेळ कर अभ्यास. सकाळी सकाळी अभ्यास केला तर माईंड फ्रेश असतं, सकाळची शांत वेळ असते, गडबड, गोंधळ, गजबज, विशेष म्हणजे ध्वनी प्रदूषण नसतं. अशा शांतवेळी अभ्यास केला तर लक्षातही राहातो बेटा. हे सगळं तुझ्या भल्यासाठीच सांगतेय राजा. यंदा तुझं दहावीचं वर्ष. यातील तुझी शैक्षणिक प्रगती, गुणसंख्येवर तुझं भविष्य अवलंबून आहे. थोडक्यात काय तर आयुष्याला कलाटणी देणारं हे वर्ष आहे. तुझ्या जीवनाला दिशा देणारं हे वर्ष आहे. बेटा आजकालच्या परीक्षा या गळेकापू स्पर्धेसारख्या आहे. मेडिकल, इंजिनिअरिंगला किती हाय परसेंटवर कटआँफ होतोय, पाहातोय आपण. दहावी हा बारावीचा पाया आहे बाळा. चल ऊठ बरं आता. आळस हा वाटणारच. थोडावेळ होईल तसं. मस्त स्नान कर. बघ निंबाची पानं टाकली आहेत पाण्यात. चांगला सुगंधी साबण ठेवलाय. स्नान केल्यानं सगळा आळस दूर होईल तुझा. तोपर्यंत मी मखाणे, काजू, बदाम मिश्रीत दूध तयार करते “

आईचं एवढं मोठं लेक्चर ऐकल्यानंतर सोहमला उठणं भाग होतंच, तरीही त्याने आपली नाराजी व्यक्त केली. ” काय माॅम झोपू देत जा ना मला थोडावेळ. रात्री अभ्यास केलाय मी. अभ्यासाचं वेळापत्रक बनवलं आहे मी. मलाही काळजी आहे परीक्षेची. “

” बरं बरं, चल आता. चर्चा नको. मलाही घरातली सगळी कामं उरकून ऑफिसला जायचंय. तुझे पप्पाही उठतीलच एवढ्यात. बाळ माझा शहाणा ” म्हणत मी सोहमची पप्पी घेतली.

सोहमला बाथरूमला पाठवून मी किचनकडे वळले. गॅसवर एकीकडे सोहमचं दूध, दुसर्‍या शेगडीवर आमचा चहा, तिसर्‍या शेगडीवर फोडणीला टाकलेली भाजी. माझा सर्कसचा रोजचा शो सुरू झाला. सर्कसही तीच, प्रेक्षकही तेच, कलाकारही मीच, पण रोज नवनवीन आयटेम सादर करावे लागायचे, सणवार, व्रतवैकल्य, पावणा रावळा, दुखणी खुपणी, सगळेच गेम करावे लागतात. जीवनाच्या नवनवीन वाटेवरुन चालतांना जुनेही सोडता येत नाहीत. मग काय सर्कशीत कपबशीचा खेळ असतो. तसा दोरीवर ताल धरत संसाराचा बॅलन्स साधायचा.

“ मनाली, चहा झालाय का? “ राकेश किचनमध्ये डोकावत बोलले. ” होय, हा घ्या. ” मी राकेशच्या हाती चहा सोपवून सोहमला दूध देण्यासाठी वळले, ” आण दे मला मनाली. मी नेऊन देतो. “

” सोहम, हे घे दूध. अभ्यास कसा काय चालू आहे बेटा. तुला काही नवनवीन पुस्तकं, संदर्भ ग्रंथ पाहिजेत काय? काही शैक्षणिक साहित्य पाहिजे काय? काही आता सुरु असलेल्या क्लासेस व्यतिरिक्त आणखी दुसरी काही मदत हवी काय? हवं ते माग? मी कशाला नाही म्हणणार नाही. पण तू चांगला अभ्यास कर. गुणवत्ता यादीत नाव झळकू दे. मेडीकलला प्रवेश मिळू दे. जी स्वप्न मी पाहिली होती, ती तू पूर्ण कर. कारण मला अशा शैक्षणिक सुविधा मिळाल्या नाहीत. मिळणारही नव्हत्या. कारण घरची परिस्थितीच गरीबीची. बाबा एकटे कमावणारे, खाणारी चार तोंडे, आम्ही भावंडही शाळा सुटल्यावर छोटी मोठी कामं करत होतो, तरीही सगळा पैसा पोटभरी पुरताच असायचा. मग इतर खर्च कसा करणार, सगळा आनंदी आनंद, होय आनंदच. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे ” असू दे. पण मी तुला कमी नाही पडू देणार.

 सोहमने एक बारकासा कटाक्ष पप्पांकडे टाकला. मान हलवूनच होकार दिला. काही बोलू मात्र शकला नाही. कारण त्याचं कोण ऐकून घेणार. त्याला तर मम्मी व पप्पांची स्वप्न पूर्ण करायची होती. डाॅक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचं होतं. मेरीटमध्ये यायचं होतं, स्पर्धेत पुढे जायचं होतं, धाव धाव धावायचं होतं.

 त्याला मात्र वकील व्हायचं होतं, समाजातील अन्यायाविरूद्ध लढायचं होतं. न्याय देवतेची कास धरून, न्याय हक्कांसाठी लढून सामाजिक समता साधत एका निकोप प्रगत समाज निर्मितीला हातभार लावायचा होता. आणि यासाठी काही त्याला मेरीटमध्ये यावं लागणार नव्हतं. साधी कला शाखेतील पदवी घेऊन पुढे लाॅ ग्रॅज्युएशन तो करू शकणार होता. पण नाही त्याला मम्मी पप्पांचं ऐकावचं लागणार होतं. त्याचं मन काही सांगत होतं तर प्रत्यक्षात वेगळ्या वाटेवर चालायचं होतं, त्याचा हा आकांत मौनातच दाबल्या जात होता.

धावपळ करत मी आँफिस गाठलं आणि फाईलींच्या डोंगरात स्वतःला झोकून दिलं. विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु होतं. कामाचा प्रचंड ताण होता. पाहिजे ती माहिती तत्क्षणी पुरवावी लागत होती. सगळं हाताशी तयार ठेवावं लागत होतं. ” मनाली मॅडम उद्या सर हाऊसमध्ये लक्षवेधी मांडणार आहेत. सगळी तयारी चोख आहेना. ” ” होय सर” ‘ गुड ‘

सायंकाळी धावतच स्टेशन गाठलं. प्लॅटफाॅर्मवर येताक्षणीच लोकलने हाॅर्न दिला. अगदी फ्रॅक्शन आँफ सेकंदचा फरक पडला असता तर मी खालीच पडले असते. माझ्या मैत्रिणींनी मला वर खेचले होते. ‘ जाऊ द्यायची होती ना ही ट्रेन मनाली. ” ” अग, सोहमचं हे महत्वाचं वर्ष. ही ट्रेन चुकली असती तर आणखी अर्धा तास लेट झालं असतं ” ” काय ग दिपाली तुझ्या मनोजचा कसा काय चालू आहे अभ्यास ” ” अग प्रकाश इंस्टीट्यूशन हा नामांकीत संस्था. चांगली तयारी करवून घेतात. सराव परीक्षाही वारंवार घेतल्या जातात, त्यामुळे मुलांच्या प्रगतीचा आलेखही कळतो. “

‘ माझ्या मोहनला तर या युनिट टेस्टला सर्वाधिक गुण मिळाले ‘ चैताली सांगत होती. मग एकेक जणी आपल्या मुलांचा अभ्यास, त्याचं नियोजन, टि. व्ही पाहण्यावर बंदी, काहींनी तर केबलचं काढून ठेवल्या होत्या. तब्येत चांगली राहावी म्हणून खाण्यावरही कसं बंधन ठेवलं जातंय इ इ इ

मी लॅचकीने दरवाजा उघडला. सोहमच्या रुममध्ये डोकावले. ” मम्मी आलीस, ये ना, जरा बस माझ्याजवळ ” ” होय राजा, जरा फ्रेश होऊन येते ” मी फ्रेश झाले. ” सोहम असं कर ना बेटा, तुच किचनमध्ये ये, म्हणजे माझा स्वयंपाकही होईल आणि तुझ्याशी बोलताही येईल. ” ” ठीक आहे मम्मी ” सोहम किचनमध्ये आला. तो बोलणारही तेवढ्यात डोअरबेल वाजली. दूधवाला आला होता. मी दूध घेऊन किचनमध्ये आले तोपर्यंत कढईत फोडणीसाठी टाकलेले तेल बरेच तापले होते. साहजिकच माझे लक्ष त्यात लागले. भाजी फोडणी घालत नाही तोच पुन्हा डोअरबेल वाजली. समोरच्या फ्लॅटमधील स्वामीनाथन आंटी नात झाली म्हणून मिठाई घेऊन आल्या होत्या. सोहमचं बोलणं राहूनच गेलं, तो आपल्या रूममध्ये निघून आला.

” सोहम बाळ, आज मी तुझ्या रूममध्ये झोपेन तेव्हा बोलू आपण “

सोहमच्या रूममध्ये मी झोपले, सोहमने बोलायला सुरूवातही केली पण झोपेने माझ्यावर अंथरूणावर पाठ टेकताक्षणीच विजय मिळवला.

आजकाल सोहमचं जेवणही कमी झालं होतं. अभ्यासात त्याचं फारसं मनही लागत नव्हतं. चेहराही निस्तेज झाला होता. ” सोहम बरं नाही वाटत काय तुला. ” ” नाही मम्मी तसं काही नाही ” ” तरी एकदा जाऊन येऊ बेटा. काही त्रास असेल तर डाॅक्टर काही औषधं देतील. तसं काही नसेल तर चांगलंच आहे आपल्यासाठी ” ” ठीक आहे मम्मी “

डाॅक्टर देशपांडेनी सोहमचं चेकअप केलं. ” व्हेरी गुड यंग बाॅय, काही झालेलं नाही तुला. खायचं, प्यायचं, मजा करायची, अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, ओ के. आता थोडावेळ बाहेर थांब. मी मम्मी पप्पांशी बोलतो ” 

” बोला डॉक्टर काय झालं सोहमला ” ” ताण. ताण आलाय परीक्षेचा. घुसमटतोय तो आतल्या आत ” ” पण कशामुळे ” ” तुम्ही काही प्रेशर दिलंय काय त्याला परिक्षेतील टक्केवारीच कि इतर आणखी काही ” ” डाक्टर, आम्हांला वाटतं त्याने डाक्टर / इंजिनियर व्हावं, मग टक्केवारी आणि त्यासाठी जीवतोड मेहनत येणारच ना. आम्ही त्याला काही कमी पडू देत नाही आहोत. पण अभ्यास तर त्यालाच करावा लागणार आहे ना ” ” तुम्हांला वाटतं त्याने डाक्टर व्हावं, त्याला काय वाटतं हे कधी विचारलं” ” त्याला काय विचारायचं. ज्या सुविधा आम्हांला मिळाल्या नाही, त्या सर्व आम्ही त्याला पुरवतोय. आणि आमची स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो नाही, ती स्वप्न आम्ही मुलात पाहिली तर चुकलं कोठे. ” ” इथेच गल्लत होतेय महाजन सर, त्याने स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून तुमची स्वप्न पूर्ण करायची. आणि त्याची स्वप्न काय पुढे त्याच्या मुलाने पूर्ण करायची. आणि ही साखळी अशीच पुढे न्यायची. नका थोपू आपली मतं मुलावर. घेऊ देत त्याला मोकळा श्वास, मग बघा अवकाशात कशी उंच भरारी घेतो ती “

” ओ के डाॅक्टर. घेऊ आम्ही ती काळजी “

रात्रीची जेवणं आटोपून मी टी. व्ही लावला. बातम्यांचं चॅनेल लावताच मोठी धक्कादायक बातमी समोर आली ” नीटच्या सराव परिक्षेत कमी गुण मिळाल्याने बापाची मुलीला बेदम मारहाण. मारहाणीत मुलीचा मृत्यू. सांगली जिल्हातील आटपाडी तालुक्यातील घटना. बातमी पाहाताच माझं व राकेशचं तर धाबचं दणाणलं.

” मनाली उद्या बोलू सोहमशी शांततेने. ” ” होय “

मोबाईलने सकाळी पाच वाजेला अलार्म देऊनही आज आईने उठवले नाही. सोहम आश्चर्यचकित झाला. तोच आता हडबडून उठला. ” साॅरी मम्मी, उठायला उशीर झाला ” 

” अरे झोप, झोप, काय घाई आहे “.

एवढ्यात पप्पाही आले. ” सोहम बाळा झाली झोप. नसेल बरं वाटत तर कर आराम ” 

” नाही, बरं वाटतंय मला. ” 

” O k. good ” 

” सोहम तुला माझ्याशी काही बोलायचं होतं ना ” 

” होय मम्मी. ” 

‘ मग बोल आता ‘ 

” मम्मी पप्पा मला डाॅक्टर / इंजिनियर नाही व्हायचं तर एक निष्णात वकील बनून अन्यायाविरूद्ध लढायचं आहे. सत्याची बूज राखायची आहे. गोर गरीबांना न्याय मिळवून देऊन एका निकोप व सुदृढ समाज निर्मितीसाठी हातभार लावायचा आहे. एक उत्तम नागरिक बनायचं आहे “

“ Then go ahead my son ” 

” खरंच पप्पा ” 

” अगदी खरं, माझी व मम्माचीही परवानगी आहे. ” 

” Oh my sweet pappa. Oh my sweet mammy. my sweet, sweet, sweet & lovely parents. thank you very much. I love you. ” 

” We both also love our sweet son “

सोहम आनंदात बाथरूममध्ये दात ब्रश करण्यासाठी गेला. एका मौनातील आकांताला आज out let मिळालं होतं … सगळा निचरा झाला होता. मनावरील मळभ जाऊन आता स्वच्छ उजाडणार होतं

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments