☆ पावसाची रात्र… ☆ श्री मयुरेश देशपांडे ☆
रखमेच्या वेदना कमी होत नव्हत्या, तिचे विव्हळणे विठोबाला सहन होत नव्हते आणि इकडे पाऊस मात्र बेदकारपणे वेडावाकडा उभा आडवा कसाही कोसळत होता. समोर रस्त्यावर साचलेले तळे स्पष्ट दिसत होते. अमावस्या जवळ आली होती, अंधार अधिक गडद झाला होता. अश्यातच विठोबाने दोनदा मुख्य रस्त्यापर्यंत जाऊन पाहिले काही मदत मिळते का? पण त्याला हताश होऊन माघारी फिरावे लागत होते. दोघेही एकदा बाहेरच्या पावसाकडे एकदा देव्हाऱ्यात लावलेल्या नंदादीपाकडे पहात होते.
“मालक तुम्हाला लवकर घराकडे बोलावलया”, धावत आलेला गणप्या धापा टाकत बोलत होता. त्याचे अस्पष्ट बोलणे ऐकून शेतातली कामे तशीच टाकून विठोबा घराकडे धावला. रखमा बिछान्यावर झोपली होती. पायाशी गणप्याची बायको बसली होती. विठोबाची आई भिंतीला मान खाली घालून बसली होती. “मालक, ताईसाहेब आजारी आहेत. “, गणप्याची बायको पदर सावरत खालच्या आवाजात बोलली.
“अग मग वैदुला बोलावणे धाडायचे ना. “
“बोलावले. तो येऊनबी गेला आणि म्हणूनच तुम्हाला एवढ्या घाईने बोलावणे धाडले. “
सर्वांचे उतरलेले चेहरे, रखमेचे असे दिवसा ढवळ्या बिछान्यावर झोपणे आणि गणप्याच्या बायकोचे दबक्या आवाजात बोलणे, विठोबाची चिंता आणखीनच वाढवित होते. विठोबाच्या लग्नाला आत्ता कुठे दोन एक वर्षे झाली होती. त्याचे रखमेवर जीवापाड प्रेम होते. आणि त्या रखमेला काहीतरी झाले या जाणीवेने त्याला त्रास होत होता.
“काय म्हणाला वैदू? “
“लई मोठ्ठा आजार आहे म्हणे. नऊ महिने काळजी घ्यावी लागेल, म्हणत होता. ” शक्य तेवढे हसू आवरण्याचा प्रयत्न करून गणप्याची बायको बोलली.
“नऊ महिने काळजी घ्यायला लागेल, असा आणिक कोणता आजार आहे? “
“आरं तु चार इयत्ता शिकला, पण खूळा ते खूळाच राहिला. ” विठोबाची आई हसत बोलली. “आर मी आजी नी तू बाप होणार हायीस. “
खरे काय ते कळले आणि विठोबा लाजला. त्याने प्रेमाने रखमेकडे बघितले आणि तिने पण लाजेने मान फिरवली.
“चल गं, बाहेर केवढी काम पडलीयेती. आता शेतातली कामं बी आपल्यालाच सांभाळावी लागतील वाटतं. “, त्या दोघांना घरात एकटं सोडत विठोबाची आई गणप्याच्या बायकोला घेऊन बाहेर पडली. “गावच्या देवाला साखर ठेवायला हवी. ” विठोबाची आई मनातल्या मनात विचार करत होती.
विठोबा रखमेच्या शेजारी जाऊन बसला. अजूनही तिने मान इकडे फिरवली नव्हती. “अवकाळी पाऊस आपल्याला पावला तर”, तिच्या खांद्यावर हात ठेवत विठोबा बोलला.
आता मात्र हळूच मान फिरवत रखमेने त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा मान फिरवली.
दिवसामागून दिवस जात होते. विठोबा घर आणि शेती दोन्हीकडे सारखाच वेळ देत होता. रात्रीच्या राखणीची जबाबदारी आता गणप्यावरच येऊन पडली होती. तर गणप्याची बायको रखमेला काय हव नको सारं बघत होती. वैदुने सांगितल्याप्रमाणे विठोबाने रखमेला तालुक्याच्या डाक्टरणीकडे दाखवून आणले होते. सर्वकाही ठिक चालले होते. रखमेचे डोहाळे शेतात काम करायचे होते पण विठोबा मात्र तिला फारवेळ शेतात थांबून देत नव्हता.
रखमेचे दिवस भरत आले तसे विठोबा अधिकच काळजी घेऊ लागला. पावसाची नक्षत्र जवळ आली होती. पावसा आधीच्या कामांनी वेग धरला होता. इच्छा असूनही विठोबाला घरी जास्तवेळ थांबता येत नव्हते. पण आई आणि गणप्याची बायको रखमेजवळ असल्याने काळजीचे फारसे कारण नव्हते. बाकीचा भार ग्रामदेवतेवर सोडला होता. पहिला पाऊस आला, अंगण ओले झाले तशी रखमा अधिकच खूलली. जसजसा तो दिवस जवळ येत होता तसतसे रखमेच्या चेहऱ्यावरचे तेज वाढत होते आणि इतरांच्या चेहऱ्यावरची काळजी. गणप्याने तर बायकोला बजावून ठेवले होते, ताई साहेबांच्या पाठीमागे सावली सारखे रहायचे. तो स्वतःसुद्धा येता जाता रखमेची ख्याली खुशाली विचारत होता. त्याची मालकीणबाई असली तरी सख्ख्या बहिणीचे प्रेम होते तिच्यावर.
पेरणी झाली, फवारणी झाली, आता यशापयश ईश्वराच्या पायी ठेवून विठोबा घरात थांबू लागला. त्याच्या शाळकरी मित्राची रंग्याची जीप त्याने सांगून ठेवली होती. कधीबी तालुक्याला जाव लागल, तयार रहा.
त्या दिवशी सकाळपासूनच पाऊस सुरू झाला. रखमेला पाऊस प्रचंड आवडायचा. पावसाबरोबर येणारा मातीचा गंध तिची कळी खूलवायचा.
शेजारच्या गावातल्या नातेवाईकाकडे पूजा होती. विठोबा घरी होता आणि सकाळी जाऊन दुपार पर्यंत परतायचे म्हणून विठोबाची आई आणि गणप्याची बायको पूजेला गेले. त्यांना सोबत म्हणून विठोबानेच गणप्याला पाठविले. एरवी तो गेलाच नसता, पण पावसाचे दिवस, आईचे वय असा सगळा विचार करून तो तयार झाला.
अंगणात कोसळणाऱ्या पावसाला पहात दिवस कसा सरला कळालेच नाही. अंधार पडू लागला तसे विठोबाने देवघरात दिवा लावला. अजून आई कशी आली नाही या काळजीने त्याला ग्रासले होते. पाऊस कमी व्हायचे नाव घेत नव्हता. रखमेशी बोलत बोलत मग त्यानेच काहीबाही बनविले व रखमेला जेवायला दिले. हळूहळू रखमेची तब्येत बदलू लागली. तिला कळा यायला लागल्या.
विठोबाच्या लक्षात आले की आता हिला तालुक्याच्या दवाखान्यात न्यायला हवे. तश्या पावसातच अंधारात चाचपडत तो रंग्याच्या घरी गेला. तेव्हा त्याला कळाले की सकाळची फेरी घेऊन तालुक्याला गेलेला रंग्या परतलाच नाहीये. आता त्याच्या लक्षात आले की, या पावसामुळेच त्याची आई दुसऱ्या गावी अडकली असावी. आता काय करावे त्याला सुचत नव्हते. गावात तशी गाडी कोणाकडच नव्हती. एवढ्या पावसात आणि अश्या अवस्थेत बैलगाडीतला प्रवास रखमेला घातक ठरला असता. विठोबाच्या घरापासून मुख्य रस्ता जवळ असल्याने त्याने तिथून एखादे वाहन थांबते का बघितले, काही मदत मिळते का बघितले, पण सगळे प्रयत्न विफल ठरले.
आता मात्र त्याने वैदुचे घर गाठले. विठोबाची परिस्थिती पाहून वैदू मदतीला धावला. रंग्याची आई व बायको, तसेच इकड तिकडच्या चार बायका वैदूच्या मदतीला धावल्या. आणि तास दिड तासांच्या वेदनांनंतर रखमा-विठोबाचे बाळ जन्माला आले. इकडे बाळ जन्माला आले आणि इकडे पाऊस ओसरला. कृष्णाचा अवतारच जणू. वैदूने त्याच्याकडची औषधै दिली. सकाळ होताच रखमेला व बाळाला तालुक्याला घेऊन जायला सांगितले.
उरली रात्र विठोबा रखमेच्या जवळ बसून होता. तिच्या वेदना कमी झाल्या असल्या तरी संपल्या नव्हत्या. शेजारी बाळ झोपले होते. त्या ग्लानीमध्येच रखमेला झोप लागली तर विठोबाचे डोळे अधूनमधून उघडझाप करत होते.
सकाळ झाली. पाऊस ओसरला. तसा रंग्या तालुक्यावरून परतला. त्याला घरी आल्यावर घडला प्रकार बायकोकडून व आईकडून कळाला. त्याला फार अपराध्यासारखे वाटले. पण काय करणार? निसर्गा पुढे तोही हतबल होता. त्याने तडक विठोबाचे घर गाठले. घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली तर उलट विठोबाने त्याच्या आईचे व पत्नीचे आभार मानले. त्याने लगेच विठोबा, रखमा व बाळ यांना तालुक्याला नेले. इकडे विठोबाची आई, गणप्या व त्याची बायको घराकडे परतले. बाळ बाळंतीण सुखरूप असल्याचे त्यांना कळाले. विठोबाच्या आईने तिथूनच ग्रामदेवतेला नमस्कार केला व संकटातून वाचविल्या बद्दल आभार मानले.
विठोबाचे बाळ आता अंगणात खेळत आहे. रखमेला दुसऱ्यांदा दिवस गेले आहेत. गणप्याच्या संसारवेलीवरही एव्हाना एक फूल फुलले आहे. गणप्या आणि विठोबा मोठ्या आनंदाने शेतात राबत आहेत तर आपल्या मुलाचा सुखी संसार पाहून विठोबाची आईही समाधानी आहे.
आणि हो, सगळेजण मिळून पुढच्या पावसाची वाट पहात आहेत.
लेखक : म. ना. दे. (होरापंडीत मयुरेश देशपांडे)
C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७
+९१ ८९७५३ १२०५९ https://www.facebook.com/majhyaoli/
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





