सुश्री स्वप्नजा घाटगे

लेखिका आणि संपादक – सखीसंपदा दिवाळी अंक, अध्यक्ष – सखीसंपदा महिला मंच, सामाजिक कार्यकर्त्या

? जीवनरंग ?

☆ निरोप… भाग १ ☆ सुश्री स्वप्नजा घाटगे

उत्तराच्या मुलाचा जन्म झाला. श्रीकृष्णाने त्याला सुखरुप पाहिले, द्रौपदीला, पांडवाना नवसाम्राज्याच्या शुभेच्छा देऊन ते द्वारकेला परत जायला निघाले.

“कान्हा, परत कधी भेट होईल आपली? खूप कांही गमावून हे साम्राज्य मिळवले आहे… पण आनंद कुठे गेला जगण्यातला तेच कळत नाही… ” द्रौपदीला अश्रु अनावर झाले होते.

श्रीकृष्णांने तिचा खांदा थोपटला,

“पार्था, तुलाच ह्या सा-यांची काळजी घ्यायची आहे. विशेषतः उत्तरा आणि परीक्षिताची…! मला निघायला हवं, द्वारकेचेही बघायला हवचं ना? “

“कान्हा, सांभाळ हो स्वतःला, सत्याला न्याय देण्यासाठी वाईटपण पदरी घेत गेलास… विनाकारण शाप नशिबी आले तुझ्या… ” कुंती भरल्या गळ्याने बोलली.

“आत्या, नियती हीच असते, घडून गेलेल्या गोष्टींचा विचार सोडून द्यायचा.. वानप्रथाश्रमाची तयारी केलीय ना… शांत मनाने जा… बदल हा निसर्गाचा नियम आहे. आता इथला विचार अजिबात नको. “

सा-यांना एक नवी उर्जा देऊन श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेले.

द्वारकेत पोहचताच राज्यात वर्षभर नसल्याने द्वारकाधीश कामात गुंग झाले. दोनच दिवस झाले असतील,

गोकुळमधून निरोप आलाय असं उध्दवकाका सांगायला आले,

दूत आला आणि म्हणाला,

“महाराज, यशोदामाईंनी आठवण काढलीय आपली…! “

“काय झालय मैय्याला? “

अस द्वारकाधीशांनी हळुवार स्वरात विचारलं… पण त्याचं मन बालपणात हरवून गेलं.

कान्हा… कान्हा करत दहीभाताचं ताट घेऊन माग फिरणारी… नदीवर फिरायला खेळायला गेल्यावर कासावीस होणारी, क्षणाक्षणाला कान्हा बरोबरच मन असणारी… मैय्या अशी मैय्याची अनेक रुप द्वारकाधीशांसमोर तरळत होती… गोकुळ सोडून वीस वर्ष झाली सा-यां जबाबदा-यातून गोकुळात जाणं झालंच नव्हतं…

“मैय्या, तुझ्या कान्हाला क्षमा कर..! “

अस द्वारकाधीश रोज मनोमन म्हणत… आपण एवढे व्यस्त कसे झालो मैय्याला आपण कस तोंड दाखवणार?

द्वारकाधीशांचे मन व्याकूळ झाले होते..

द्वारकाधीश गोकुळात पोहचले…

गोकुळबनात रथ पोहचला…

तुता-या वाजू लागल्या,

“द्वारकाधीशांचे आगमन होत आहे,

सुस्वागत… महाराज..!!! “

“द्वारकाधीशांचा विजय असो…! “

द्वारकाधीशांच्या हृदयात कळ उठली, कान्हा, किसना, कृष्णा असं हाका मारणारं गोकुळ अस परक्यासारखं का हाका मारतयं मला….!!!

श्रीकृष्णांने वाड्याच्या दारात पाऊल ठेवले. समोर राधा उभी होती…

कान्हा राधेकडे पहात राहिला..

वीस वर्षांनंतर दिसत होती राधा… प्रौढ, शांत.. डोळ्यांभोवती दाट काळी वर्तुळं तोच व्याकूळ भाव..

“राधे, मैय्या कशी आहे ग? “

“यावं, द्वारकाधीश..!! मैय्या आत आहे. “

राधेनं कान्हाला हाताला धरुन आत नेल.

कान्हा आतल्या आत हलला… राधे मी तुझा कान्हा आहे ग… जन्मजन्मांतरीचे नात आपलं.. जगासाठी मी द्वारकाधीश…! तुझ्यासाठी मी कान्हाचं आहे ग..!!

कान्हाने यशोदेच्या दालनात पाऊल ठेवलं आणि पळतच यशोदेच्या बिछान्याजवळ जाऊन उभा राहिला…

इतक्या वर्षानंतर मैय्याला पहाताना कान्हा ला भरुन आलं, नेहमी साजशृंगार केलेली मैय्या… अव्याहत कान्हाच्या मागे पळणारी, उत्साहाने बडबड करणारी… उध्दवाबरोबर श्रीकृष्ण मथुरेला जाताना रथांमागे रडत रडत येणारी मैय्या, रडतच तिला सावरणारी राधा…

“मैय्या, मी आलोय ग कान्हा, डोळे उघड मैय्या…! “

यशोदेने हळुवारपणे डोळे उघडले, जणू त्यात नव्याने कुणीतरी प्राण फुंकावेत तशी उत्साहाने यशोदा उठली..!!!

मैय्या, अस म्हणतं कान्हाने त्या अशक्त कुडीला आपल्या कुशीत घेतलं, बांध फुटल्यासारखे दोघही गदगदून आपल्या आसवांनी जणू मधली विरहाची सारी वर्ष धुऊन काढत होते.

यशोदेच्या पायाशी बसलेली राधाही हुंदके देत होती… म्हातारे नंदबाबा वाहत्या डोळ्यांनी आपल्या कान्हाच्या खांद्यावर थोपटत होते.

“कान्हाला दहीपोहे दे गं राधे..!”

“मैय्या, द्वारकाधीशांना चालणार का दहीपोहे?” असं हळूच किंचित हसत राधेने विचारल

“मैय्या, बघ ना सारखचं द्वारकाधीश म्हणतेय मला, मी कान्हा चं आहे नं तुझा..?”

“राधे, नको ग असेल तो द्वारकेत द्वारकाधीश..! पण आपल्यासाठी तो कान्हाचं आहे. ” मैय्या क्षीण स्वरात म्हणाली…

“मैय्या आधीच कळवायचं ना ग, आलो असतो मी.. “आपल हे बोलण फोल आहे हे माहित असूनही श्रीकृष्ण म्हणाले.

“एवढं मोठं युध्द चाललेलं, तू पार्थाचं सारथ्य करत होतास.. सारं सांगितले बरं तुझ्या नंदबाबांनी… भरुन पावले मी, आता कांहीच इच्छा नाही, कान्हा! “

“मैय्या तु अन बाबा, राधा, अनयभाऊ सारेच चला द्वारकेला, सारे तिथचं रहाल माझ्याजवळ..! “

कान्हाला राधेनं मैय्याला जेवणं भरवायला लावलं, कान्हाला अशक्त झालेल्या यशोदेनं दहीपोह्याचे चार घास भरवले.. गोकुळात आनंद पसरला होता. नंदवाड्यात अशा पंक्ति कितीतरी दिवसांनी पडल्या होत्या.

श्रीकृष्ण क्षणभरही यशोदेला सोडून हलले नव्हते. सा-यांची जेवणं झाली…

यशोदा म्लान झाली होती. आपल्या हातात कान्हाचा शेला घट्ट पकडून तिने डोळे मिटले होते.

“कान्हा, आज बांसरी वाजवशील का रे? मी अन् राधा सतत आठवण काढत असतो त्या बासरीच्यां सूरांची..!

ही वेडी पोर तर सतत ती बासरी हातात धरुन एकटक पहात बसते…”

“कान्हा, वाजव ना रे मीही वाट पहातेय त्या अलवार सुरांची..! “राधा अधोवदनानेच बोलली.

“मैय्या, बांसरी कुठाय माझ्याकडे?”

“कान्हा, जाताना मला देऊन गेला होतास ना तुझी बांसरी.. “

अस म्हणत राधेन ती कान्हाच्या रेशमी शेल्यात निगुतीने जपून ठेवलेली बासरी बाहेर काढली. अन कान्हाच्या हातात ठेवली,

“हं, सुरु कर आता… “अस म्हणत राधा यशोदेच्या पायाशी जाऊन बसली.

श्रीकृष्णांने हातात बांसरी घेतली.. मन हळुवार झालं, यमुनेचा कांठ, गायी, गोपगोपिका सवंगडी, तो सर्वांनीच एकत्र खाल्लेला गोपाळकाला आठवून श्रीकृष्णांच्या काळजात उगाचच कासाविशी वाढली.

त्यानं मैय्याला नीट उशीला टेकून बसवलं, पाथथ्याशी बसलेल्या राधेकडे पहात त्यानं डोळे मिटले, अन् बांसरी वाजवायला सुरु केली.

अन् सारा नंदवाडा, गोकुळ त्या मधुर स्वरावर डोलू लागलं… त्या शांततेत ते खूप वर्षांनी वाजणारे मधुर स्वर… सर्वांना स्वर्गिय सुखाची अनुभूती देत होते….

तिन्हीसांज झाली अन् श्रीकृष्ण वाजवता वाजवता थांबले.

यशोदेकडे पाहिले यशोदेचे डोळे मिटलेले होते. चेहरा खूप हसरा, शांत होता.

“मैय्या झोपलीस का ग? “

अस म्हणत श्रीकृष्णांने मैय्याच्या कपाळावरुन हात फिरवला.

यशोदेची मान कलंडली,

” मैय्या, ” या कान्हाच्या आक्रोशाने गोकुळ दुःखात बुडालं,

श्रीकृष्णांनी यशोदेच्या पायाशी बसलेल्या राधेला हाक मारली,

राधा एवढ्या आवाजात कशी शांत झोपलीय त्यांनी राधेला हलवलं… राधा बांसरीच्या सुरांबरोबर कायमची शांत झाली होती…

श्रीकृष्ण आसनावर बसले होते. डोळ्यातून आसवं वहात होती. एकाच वेळी दोन्हीही प्रिय व्यक्ति आयुष्यातून शांतपणे निघून गेल्या होत्या.

कान्हाचे काळीज तीळतीळ तुटत होते.. हीच आपली नियती होती हे कान्हाला माहित होतं… पण भावना उचंबळून येत होत्या.

निरोपाची तयारी झाली. फुलांनी सजवलेल्या दोन डोल्या तयार झाल्या होत्या. मैय्या आणि राधेचा शेवटचा प्रवास सुरु झाला होता.

कान्हा यमुनेकडे या दोघींना घेऊन निघाला होता. शेवटचा निरोप देण्यासाठी…

कान्हाच्या हृदयात मात्र कालवाकालव होत होती 

तिन्हीसांज झाली अन् श्रीकृष्ण वाजवता वाजवता थांबले.

यशोदेकडे पाहिले यशोदेचे डोळे मिटलेले होते. चेहरा खूप हसरा, शांत होता.

“मैय्या झोपलीस का ग? “

अस म्हणत श्रीकृष्णांने मैय्याच्या कपाळावरुन हात फिरवला.

यशोदेची मान कलंडली,

” मैय्या, ” या कान्हाच्या आक्रोशाने गोकुळ दुःखात बुडालं,

श्रीकृष्णांनी यशोदेच्या पायाशी बसलेल्या राधेला हाक मारली,

राधा एवढ्या आवाजात कशी शांत झोपलीय त्यांनी राधेला हलवलं.. राधेची मान वर केली अन् कान्हाचं काळीज चर्र झाल, डोळे अधोन्मिलीत, डोळ्यांच्या कडांवर पाणी साचलेलं. वेळीअवेळी ‘कान्हा वाजवं ना रे बांसरी असा लाडिक आणि एकच हट्ट करणारी राधा बांसरीच्या सुरांबरोबर कायमची शांत झाली होती…

उध्दवाबरोबर मथुरेला जाताना श्रीकृष्ण राधेला भेटायला गेले होते. यमुनेच्या काठावर कदंब वृक्षाखाली राधा झाडाला टेकून बसली होती. गोरापान चेहरा रडून रडून लाल झाला होता.

“कान्हा, जायलाच हवं का रे,…! “

अश्रुभरल्या डोळ्यांनी आणि जड गळ्याने राधेनं त्या पंधरा वर्षाच्या सावळ्या युवकाला विचारलं होतं.

“हे होणारच होतं राधे, तु दुःख करुन नको घेऊ मी येत राहिन ना… ग..! “

“नक्की येशील ना रे… मी वाट पाहिन, “

अस म्हणणारी राधा कायमची शांत झाली होती..

ते अर्धवट उघडे असलेले काळेभोर डोळे कान्हाला या वचनांचा आठव देऊन कासावीस करत होते.

माझे नेत्र राहतील उघडे,

तुझी वाट पहाताना…

माझे प्राण गेले तरी…

श्रीकृष्ण आसनावर बसले होते. डोळ्यातून आसवं वहात होती. एकाच वेळी दोन्हीही प्रिय व्यक्ति आयुष्यातून शांतपणे निघून गेल्या होत्या.

कान्हाचे काळीज तीळतीळ तुटत होते.. हीच आपली नियती होती हे कान्हाला माहित होतं… पण भावना उचंबळून येत होत्या.

निरोपाची तयारी झाली. फुलांनी सजवलेल्या दोन डोल्या तयार झाल्या होत्या. मैय्या आणि राधेचा शेवटचा प्रवास सुरु झाला होता.

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री स्वप्नजा घाटगे

लेखिका आणि संपादक – सखीसंपदा दिवाळी अंक, अध्यक्ष – सखीसंपदा महिला मंच, सामाजिक कार्यकर्त्या

कोल्हापूर

मो 8888033332

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments