श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “गजरा स्कॉलरशीप” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
बहुसंख्य विद्यार्थी मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गातले असलेली शहरातील मराठी-सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये सुप्रसिद्ध उद्योगपती अनिलराव यांचा सत्कार व मुलाखतीचा कार्यक्रम होता.मुलं,पालकांच्या उपस्थितीनं हॉल खचाखच भरलेला.शाळेचे माजी विद्यार्थी असलेले अनिलराव आता करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या कंपनीचे मालक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेलं दानशूर व्यक्तिमत्व.त्यांनी सुरु केलेल्या ‘गजरा’ या जरा हटके नावाच्या स्कॉलरशीप विषयी सर्वाना फार आकर्षण होतं.फक्त गरीब,गरजू पण हुशार मुलांना ही स्कॉलरशीप मिळायची. गेल्या पाच वर्षात शाळेतील १०० विद्यार्थ्यांनी स्कॉलरशीपचा लाभ घेतलेला. म्हणूनच अनिलरावांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले.मुलाखत घ्यायचं काम माझ्याकडं होतं.सत्कारानंतर मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झाला.
“नमस्कार सर,आपल्या शाळेतर्फे सत्कार स्वीकारताना कसं वाटलं.”प्रश्न ऐकून अनिलराव हसले.माइक हातात घेतला पण काही वेळ तोंडातून शब्द फुटले नाहीत.थोडा वेळानं अनिलरावांनी सुरवात केली.
“माफ करा.हा क्षण माझ्यासाठी खूप भावनिक आहे म्हणून जरा..”
“सर,तुम्ही जे अफाट यश मिळवलं त्यात खारीचा वाटा या शाळेचासुद्धा आहे.”
“खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे.पुढील आयुष्याचा पाया या वास्तूतच घातला गेला.”
“प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मेहनत,हुशारी,अंगी असलेलं कौशल्य यामुळे तुम्ही अफाट यश मिळवलंत.एवढा मोठा व्यवसाय असूनही सामाजिक जबाबदारी विसरला नाहीत.हे कसं काय?”
“आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच थोडंफार यश मिळवू शकलो.सामाजिक जबाबदारी विषयी बोलायचं तर अनेक गुणी विद्यार्थी केवळ आर्थिक कारणामुळे शिक्षण घेऊ शकत नाही.अशांसाठी आम्ही स्कॉलरशीप सुरू केली.त्यामध्ये आठवी ते बारावीपर्यंत शिक्षणाचा खर्च केला जातो अर्थातच त्यासाठी अट ती म्हणजे दरवर्षी गेल्या वेळेपेक्षा जास्त मार्क मिळवायचे.”टाळ्यांचा कडकडाट झाला.अनिलरावांनी पुढे म्हणाले “तेव्हा आणि आता कार्यरत असणारे शाळेचे सर्व आदरणीय शिक्षक,कर्मचारी यांचे मन:पूर्वक आभार आणि बापुकाकांचे तर विशेष आभार!!”
“बापुकाका कोण??”मी विचारलं.
“ज्यांच्यामुळे मी घडलो.इथं येऊन पोचलो ती व्यक्ती म्हणजे बापुकाका.असामान्य काम करणारा एक सामान्य माणूस.”
“त्यांचं अन तुमचं नातं?”
“माणुसकीचं”
“म्हणजे”
“आमची साधी ओळख पण नव्हती.माझं बालपण फार म्हणजे फारच गरिबीत गेलं.दुष्काळात तेरावा म्हणतात ना तसं काहीसं म्हणजे आधीच घरात दोन वेळचं खायला मिळणं मुश्किल.मजूरी करणारे वडील अचानक अपघातात गेल्यावर आमची अवस्था अजूनच बिकट झाली.आम्ही तीन भावंड,घर चालवण्यासाठी आईनं धुण्या-भांड्याची काम करायला सुरवात केली.थोरला असल्यानं आईची ओढाताण लक्षात आली.आईला मदत म्हणून शाळा सुटल्यावर मी गजरे विकायला सुरवात केली.मित्राकडून सायकल घेतली अन टेकडीच्या रस्त्यावर सगळे फिरायला जातात तिथं “गजरा,गजरा” ओरडत चकरा सुरू झाल्या.मित्र हसायचे.लोकसुद्धा चमत्कारिक नजरेनं बघायचे.सुरवातीला कसंतरी वाटलं पण नंतर सवय झाली.पाच दिवसानंतर पहिला गजरा विकला गेला.एक रुपयाचा फायदा झाला.पहिल्या कमाईचा आनंद काही औरच.”
“तिथचं बापुकाकांची भेट झाली का?”
“हो.काकूंसोबत रोज फिरायला यायचे.दोन-तीनदा गजरे घेण्याविषयी विचारलं पण त्यांनी नकार दिला परंतू माझी रोजची धडपड ते बघत होते. एकदिवशी त्यांनी सगळे गजरे विकत घेतले.फार आनंद झाला.त्यादिवशी रात्री घरी आम्ही खूप दिवसांनी वडापाव खाल्ला.”
“तिथून बापुकाकांची ओळख वाढली.”
“हो.संध्याकाळी भेटलो तर हसायचो.हळूहळू बोलायला लागलो.एके दिवशी बापुकाकांनी थांबवून विचारपूस केली.घरची माहिती घेतली.फी बाकी असल्यामुळे परीक्षेला बसता येणार नाही हे कळल्यावर काही बोलले नाहीत पण दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन माझी फी भरली.त्याविषयी मला शाळेतल्या सरांकडून कळलं.तेव्हा वर्ष वाया जाणार नाही याचाच खूप आनंद झाला अन भरूनही आलं. बापुकाकांना भेटण्यासाठी संध्याकाळी आईला घेऊन गेलो.फी विषयी विचारल्यावर बापुकाका फक्त हसले.आईनं हात जोडले अन रस्त्यातच मी नमस्कारासाठी वाकलो तेव्हा बापूकाका अडवत म्हणाले. नमस्कार होत राहतील.फी भरली ही मदत नाही तर स्कॉलरशीप आहे असं समज.याविषयी कुठंही बोलू नकोस.विसरून जा आता फक्त मन लावून अभ्यास कर,खूप खूप शिक.मोठा माणूस हो आणि सगळ्यात महत्वाचं हे गजरे विकणं बंद करू नकोस कारण त्यामुळे कष्टाची सवय आणि परिस्थितीची जाणीव जिवंत राहीलं.जमिनीशी नातं तुटणार नाही.ते ऐकून माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला.”
“बापुकाकांनी कमी शब्दात खूप काही सांगितलं.”
“माझी बारावीपर्यंतच्या फीची व्यवस्था बापूकाकांनी करून ठेवलेली तरीही ग्रॅज्युएट होईपर्यंत गजरे विकत होतो नंतर नोकरी करून मास्टर्स केलं नंतर स्वतंत्र व्यवसाय सुरू केला अन एकेक यशाची पायरी चढत गेलो आणि आज तुमच्यासमोर आहे.”
“आजकाल फुटकळ मदतीचा मोठा गाजावाजा केला जातो.फोटो सेशन केलं जातं.तात्पुरत्या प्रसिद्धीसाठी हपापलेल्या जमान्यात तुम्हां दोघं वेगळा विचार करता.खूप कौतुक वाटतं”
“तीसुद्धा बापुकाकांचीच कृपा!!त्यांच्या मदतीविषयी कधी,कुठं बोलणार नाही हे वचन पंचवीस वर्षांनंतर मोडतोय.आज मनापासून वाटतंय की बापुकाकांविषयी लोकांना कळायला पाहिजे कारण त्यांच्या प्रेरणेतूनच हुशार,गरजू विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशीप सुरू केली.”
“या स्कॉलरशीपचं नाव फार वेगळंयं.”
“गजरा विकण्याच्या निमित्तानं आमची भेट झाली म्हणून ‘गजरा स्कॉलरशीप’ असं नाव बापूकाकांनीच सुचवलं.तेच नाव मी पुढे कायम ठेवलं.”
“बापूकाकांना भेटायला आवडेल”
“समोरच बसलेत,वय वर्ष ८५ फक्त.”सर्वांच्या आग्रहावरून अनिलराव बापूकाकांना स्टेजवर घेऊन येईपर्यंत टाळ्यांचा गजर सुरू होता. उत्सवमूर्ती बापुकाका मात्र निर्विकार होते.सर्वांचे आभार मानत अनिलराव म्हणाले “बापुकाकांचे तत्व होतं की केलेली मदत विसरून जायची.जाहीर वाच्यता तर अजिबात करायची नाही.माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी मदत केलीय पण एका शब्दांनं सांगितलं नाही.आयुष्याची गंमत कशी पहा.चांगलं काम ठरवून विसरणाऱ्या बापुकाकांना विस्मरणामुळे बरंच काही आठवत नाही.आताशा फार बोलत पण नाही.ओळखी विसरत आहेत परंतु आजही गजरा पाहिला की चेहऱ्यावर ओळखीचं हसू उमटतं.”दोन गजरे अनिलरावांनी हातात देत नमस्कार केला तेव्हा बापुकाकांच्या डोळ्यात चमक आली आणि चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





सुंदर आहे गजरा स्काॅलरशीप