श्री कौस्तुभ केळकर नगरवाला
जीवनरंग
☆ “13 / 7…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆
पहिल्यांदाच… गेल्या साडेपाच वर्षांत पहिल्यांदाच.
न सांगता ?.. कधीच नाही.
रोजची सातची गाडी. कराड – चिपळूण. सात वाजता, कराडहून निघणार म्हणजे निघणारच.
अकरा वाजता चिपळूणात पोचायची… चिपळूणला जेवण… तिथनं एक वाजता परत निघायची.
पाच वाजेपर्यंत कराडला परत.
आप्पा कुलकर्णी… ड्रायव्हर. राजू खरमाळे कंडक्टर… आमची जोडी आख्ख्या कराड डेपोत फेमस.
राजूपेक्षा माझी सर्विस बरीच जास्त. जवळपास वीस वर्षे. अजूनपर्यंत एकही अपघात नाही. कृष्णामाईची कृपा….
राजू तसा ज्युनियर. बहुधा दहा बारा वर्षे सर्विस. एसटीच्या सर्विसमधे, आपल्या कामावर मनापासून प्रेम करणारी, फार कमी लोक पाहिलीयेत. त्यात राजू नं 1. खरंच प्रवाशाला देव मानणारा. एखाद्या म्हातारीला हात देवून गाडीत चढवणार. तिचं बोचकं, स्वतः गाडीत घेणार. चिल्लरला कधी नाही म्हणणार नाही. कुणाचा एक पैसा कधी बुडवणार नाही. जीभेवर साखर. सगळ्यांशी गोड बोलणार. कधी कावणार नाही.
तशी आमची ही जनता गाडी… हात दाखवा, गाडी थांबवा.. राजूनं कुठल्या प्रवाशाला, कधीही नाही म्हणलं नाही. गाडीतल्या पोरीबाळींना, पोटच्या पोरींसारखं जपायचा.
चार वर्षांपूर्वीची गोष्ट.
सोमवारचा दिवस. बाजाराचा दिवस. गाडी खचाखच भरलेली. काॅलेजातल्या पोरी. काही ईरसाल पोरं सुद्धा.
चेकाळलेली… आचकट विचकट बोलणं सुरू झालेलं. राजूनं आडवा उभा झाडला त्यांना. त्यांचा म्होरक्या.
उगाच नडायला बघत होता. म्होरक्यानं फोनाफोनी केली. पुढच्या स्टाॅपवर, त्याचे दहा बारा पंटर, हातात दंडुके घेवून ऊभे.
…. मी केबिनमधूनच ओरडलो,
” राज्या, गाडीतल्या म्होरक्याला सोडू नकोस. मी गाडी घेतो पोलीस स्टेशनला. “
.. राजूला त्या म्होरक्याचीच काळजी.
” नको नको. उगा केस झाली तर, साल बरबाद होईल त्याचं. आईबाप रोज रानात राबतात, अन् याची फी भरतात. याला काय नाही, पण आपण फिकीर करायला हवी. काय हुईल ? पाठीत दोन चार रट्टे बसतील.
बसू देत. ह्यो आणि ह्याची गँग.. समजुतीचे चार शब्द सांगून बघतो. नाहीच भागलं, तर होऊन जाऊ दे धूमशान… सरकारी कर्मचाऱ्यावर हात टाकला म्हणूनशान आत जातील पोरं. मंग आपला पण नाविलाज आहे… माझी काळजी करू नकोस. रोज तालमीत जातूया. बाप पैलवान होता माजा. माझा जीव वाचवता येतंय मला… जमलंच तर दोन चार रट्टे मीबी घालीन. “
…. म्होरक्याला अक्कल आली. शब्दांचा मार पुरला. प्रकरण मिटलं.
– – तेव्हापासून गाडीत कुठल्याही पोरीला कधीही, कसलाच त्रास झाला नाही.
.. राजूचा दराराच होता तसा. तो स्वतः रहायचाही अपटूडेट. मस्त इन केलेला शर्ट. पाॅलीश्ड बूट. केसांचा मस्त भांग. इस्त्री केलेला युनिफॉर्म.
‘ एवढ्याशा पगारात कसं काय परवडतं ?’ नाहीच परवडत….
“सौतासाठी नाही, यष्टीसाठी आपण अपटूडेट रहायला हवं. प्रवाशी खूष झालं, तर यष्टीचा इन्कम वाढणार. “
.. पदरमोड करून राजू बरंच काही करायचा. सहा वाजता गडी हजर व्हायचा. डेपो गाठून, गाडीची साफसफाई करून घेणार. स्वतःच्या खर्चाने, गाडीला पडदे लावून घेतलेले. ते वेळच्या वेळी धुवून आणायचा. सीडीप्लेयर लावलेला. चार ताजे पेपर, मासिकं. प्रवाशांना वाचण्यासाठी. गाडीत साईबाबांचा फोटो लावलेला. त्याला मस्त हार घालणार. उदबत्ती लावणार. छान भक्तीगीतांची सीडी लावणार. प्रसन्न वाटायचं. पब्लिक खूष.
त्याच्यामुळे मीही बदललो. मीही त्याच्यासारखाच अपटूडेट राहतो. पावणेसातच्या ठोक्याला गाडी फलाटावर लागते. सात म्हणजे सात… गाडी झोकात कराड स्टॅन्डहून निघते. प्रवाशांनी खचाखच भरलेली.
…. साहेब, तुम्हाला सांगतो, आमच्या गाडीची या रूटवर बुंगाट हवा आहे. लोक वाट बघत असतात आमच्या गाडीची. डेपोला सगळ्यात जास्त उत्पन्न मिळवून देते ही गाडी. निम्मे प्रवाशी आम्हाला दोघांना ओळखतात. पब्लिक जाम खुष आहे आमच्यावर.
म्हणून तर…
साडेपाच वर्ष झाली. आमची ड्युटी फिक्स आहे या गाडीवर.. राजू अन् मी. सख्खे भाऊच जणू.
तेरा मेरा साथ.. आणि आमची कराड – चिपळूण. जाऊ दे जोरात…
आजच काय झालं ? एक तर तेरा तारीख. तसा माझा विश्वास नाही. पण..
…. खूप वेळ राजूची वाट बघितली. खूप वेळा मोबाईल ट्राय केला. उचललाच नाही. शेवटी कंट्रोलरनं बदली कंडक्टर दिला. अन् निघालो..
गाडी नेहमीसारखीच झोकात चाललेली. पण गाडीत ‘जीव’ नव्हता.. नेहमीच्या प्रवाशांनी राजूची आठवण काढली.
काय सांगणार ? आम्हालाच ठावूक नाहीये.. बघता बघता पाटण जवळ येवू लागलं. अचानक माझा फोन वाजला. गाडी साईडला घेवून थांबवली.
कंट्रोलरचा फोन.
” आरं, राजूचा एक्सीडेंट झालाय. ड्यूटीवर येताना गाडी स्लीप झाली. डोक्याला मार लागला. अजून बेसुध आहे. काॅटेजला हलवलाय. “
– – मी हादरलो. थांबून चालणार नव्हतं. डोकं बाजूला काढून ठेवलं. उघड्या डोळ्यांनी, गाडी चालवू लागलो. नेहमीसारखा कुंभार्ली ओलांडला. गाडी चिपळूणात शिरली. अकरा वाजलेले. गाडी फलाटावर लावली. भानावर आलो…
…. ड्रायव्हरचा ‘माणूस’ झालो. नवीन जोडीदारास म्हणलं,
” तू घे जेवून. मी आलो डेपोत जावून. “
चिपळूण डेपोत गेलो. दत्तमंदिरात शिरलो.
” दत्तगुरू, सांभाळून घ्या.
आमच्या राजूला बाहेर काढा या संकटातून. “
*
अर्धा पाऊण तास झाला असेल. मला वेळेचं भानच नव्हतं. तसाच दत्तगुरूंपुढे बसलेलो. हातात डबा होता.
हिनं राजूभाऊजींसाठी, खास मटकी डब्यात दिलेली. अन् त्याचाच पत्ता नाही.
फोनची रिंग वाजली. दत्तगुरूंचं स्मरण करत, फोन उचलला.
राजूचा भाऊ फोनवर…
” सुद्धीवर आले हाईती. शीटीस्कॅन केलं. रिपोर्ट चांगले हाईती. धा टाकं पडलं कानामागं. मगाधरनं मागं लागल्याती. आप्पाला फून लावून द्या म्हणूनशान. घ्या बोला त्याच्यासंगट. “
…. माझे डोळे कुंभार्लीतला धबधबा झालेले. बदाबदा वाहू लागले.
राजू खोल आवाजात बोलू लागला.
” आप्पा करमतंय काय ? आज तारीख काय ?”
“ तेरा सात “.
“ आरं, तेरा साथ असा सोडीन काय ? टाकं काढलं की येतू ड्यूटीवर. तोवर सांभाळून घे. “
…. मला पुढे बोलताच येईना. फोन कट केला. आजची तेरा तारीख मला एकदम ‘शुभ’ वाटू लागली.
पुन्हा एकदा दत्तगुरूंचे आभार मानले. जेवून घेतलं. एक वाजता जोडीदारानं, डबल बेल मारली.
” चिपळूण – कराड” निघाली.
.. कधी एकदा कराडला पोचेन असं झालेलं. हायवेला लागलो.
पुढचा ट्रक… त्याच्या पाठीमागे लिहलेलं.
13 मेरा 7
मी मनात म्हणलं…
” हमेशा रहेगा. राजू आलोच रे मी. “
तुम्हालाही… 13/7…. Have a good day!
(कथा काल्पनिक)
© कौस्तुभ केळकर नगरवाला
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






