श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “ नवरात्रीचा सण…” ☆ श्री सुधीर करंदीकर

आज नवरात्र सुरू होतय्. मी एकदम खुश होते. आधीच ठरवलं होतं, की रोज सकाळी ऑफीसला जाण्यापूर्वी, देवीच्या देवळात जाऊन यायचं. मुलगी यायला तयार झाली, तर तिला पण घेऊन जायचं. ह्यांना विचारण्यात काहीच पॉईंट नव्हता. एकदम नास्तिक माणूस आहे. माझ्या जाण्यात पण त्यांनी खो घातला असता.

आज मुद्दामच सकाळी लवकरच उठले. सगळ्या चपला, सॅन्ड्ल्स उचलून मोठया बॅगेत भरून ठेवल्या. उगीच घालायचा मोह व्हायला नको. आता ‘नो फूट् वेअर फॉर नाईन डेज्’. नो स्लीपर्स ऑलसो’.

आजचा रंग निळा होता. निळ्या रंगाची साडी /मॅचिंग ब्लाउज /मॅचिंग पर्स / मॅचिंग गळ्यातले-कानातले घालून तयार झाले. इतर वेळ असती, तर मॅचिंग सॅन्डल्स पण असते, असो. मुलीला येते कां? विचारले, तर चक्क ‘हो’ म्हणाली.

मुलगी : आई, मी येतेय्, पण, साडी बीडी – नो वे, रंगाचे बंधंन – नो वे, आणि मी पायात बुट घालणार. कबूल असेल, तर बोल?

मी : अग, मनू, ९ दिवसांचा तर प्रश्न आहे! इतर वेळा आम्ही तुला काही म्हणतो कां?

मी : (मनात) आणि म्हणूनहि, ही कुणाचं ऐकते कां? ह्यांचे आणि सासूबाईंचे, तिचे नेहेमी अतिच लाड असतात!

मुलगी : अगं, साडीचं फार ओझं होतं. पॅन्ट आणि टी शर्ट नी मोकळं वाटतं. आणि पायात काही नाही, ही तर कल्पनाच करवत नाही. एकतर चालायला सगळीकडे फूटपाथ नाहीत, फुटपाथवरच्या फरश्या बरेच ठिकाणी उखडलेल्या असतात. कुत्री फिरवणाऱ्यांच्या कुत्र्यांनी ठिकठिकाणी शी केलेली असते. परदेशात लोक कुत्री फिरवतात, ते बघून इथे पण लोक कुत्री फिरवायला लागले. ते लोक शी गोळा करायला प्लॅस्टीक पिशवी बरोबर नेतात, पण आपल्याला ते कमीपणाचे वाटते. रस्त्यावर अधे-मधे दारूच्या फुटक्या बाटल्या पडलेल्या असतात. पायात काच गेली म्हणजे संपलेच. आई, अनवाणी चालण्याचं, तू पण जरा जास्तच करते आहेस!

मी विचार केला, मुलगी देवीला यायला तयार झाली, हेच खूप झाले. आम्ही दोघी तयार झालो. निघतांना यांना ‘आम्ही जाऊन येतो’ असे सांगितले. तर, हे म्हणाले, ‘देवीला जाताय, का, फॅशन शो ला जाताय’? मी स्वत:कडे बघितले आणि लक्षात आलं, की गळा आणि पाठ जरा जास्तच मॉडर्न आहेत आणि स्लीव्हलेस प्रकार देवीला आवडेल ना? असा पण विचार मनात डोकाऊन गेला. बाय करून, दोघी बाहेर पडलो. बरेच स्त्री-पुरूष माझ्यासारखेच अनवाणी चालतांना पाहून छान वाटले. दर्शन घेऊन घरी आले. कपाटातली दुसरी निळी साडी काढली आणि ऑफीसला गेले. ऑफीसमधे ८-१० जणी निळ्या साडीत होत्या. अनवाणी मात्र मी एकटीच होते. बॉसनी आणि सगळ्यांनीच त्याबद्दल माझं कौतुक केलं.

सगळ्या म्हणाल्या, सकाळी देवीला अनवाणी जाऊन आलो. बाहेर फारच घाण असते. आता इतर ठिकाणी पायात घातलय, का नाही, हे बघायला देवी कशाला येतेय. त्यामुळे इतर वेळेला आम्ही पायात घालणार.

दिवसभर उपास असल्यामुळे, दुपार नंतर पोटात कावळे काव-काव करायला लागले होते, पण रात्रीपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. संध्याकाळी भाजी आणायला साडी बदलून बाहेर पडले. आज या-ना-त्या कारणानी निळ्या ५ साडयांना बाहेरची हवा लागली. रात्री दिवसांच्या रंगाप्रमाणे, रोज नेसायच्या साडयांचे गठ्ठे करून ठेवले. रोज ५-६ साडया नक्कीच नेसता येतील. अशा रितीनी नवरात्राची सुरूवात छान सुरू झाली.

रोज सकाळी देवी दर्शन, दिवसाच्या रंगाप्रमाणे साडी, अनवाणी बाहेर पडणे, आणि दिवसभर उपास, असे रूटीन सुरू होते. जरा हटके, म्हणून २-३ दिवस छान वाटले. नंतर नंतर, उपास आणि अनवाणी चालणे, याचा त्रास व्हायला लागला. पण आता रेटण्याशिवाय पर्यायच नव्हता.

म्हणता म्हणता नवमी उजाडली. आज गुलाबी रंग होता. आज सुटी घेतली होती. त्यामुळे माझ्या सगळ्या गुलाबी साडया नेसायला, आज भरपूर चान्स होता. सकाळी जरा लवकरच तयार होऊन, देवळात जायला बाहेर पडले. आज मुलीला वेळ नव्हता, त्यामुळे एकटीच होते. देवळात बऱ्याच स्त्रिया दर्शन घेऊन, गाभाऱ्याच्या बाहेर हात जोडून बसल्या होत्या. मी पण पाठ टेकता येईल, अशी जागा बघून, हात जोडून, डोळे मिटून बसले. केव्हा तंद्री लागली समजलेच नाही ~ ~ ~

कोणीतरी डोक्यावर प्रेमानी हात फिरवतय, असा भास झाला. डोळे उघडून बघितलं, तर समोर साक्षात देवी. मी स्वत:ला चिमटा काढायला हात वर उचलला, तर देवी म्हणाली, चिमटा काढून खात्री करण्याची गरज नाही. देवीच तुझ्यासमोर आहे.

देवी : ८ दिवस उपास करून, अनवाणी चालून, खूप दमलेली दिसतेय.

मी : दिवसभर ऑफीसचे काम, नंतर घरचे काम आणि पोटात काही नाही, यामुळे अशक्तपणा वाटतोय आणि अनवाणी चालल्यामुळे टाचा आणि तळवा पण दुखतोय.

देवी : अगं, पण हे सगळं केल्यामुळे मी प्रसन्न होते, असं तुम्हाला कुणी सांगितलं?

मी : देवीमाते, सगळेच सांगतात. पुर्वीपासूनची तशी प्रथा आहे. हे व्रत केल्यामुळे देवी प्रसन्न होते आणि आपले इच्छित प्राप्त होते, असे पण सगळे सांगतात.

देवी : जगामधे असे असंख्य लोक आहेत, की, जे स्वत: करता चप्पल विकत घेऊ शकत नाहीत. महिनों-महिने ते अनवाणी चालत असतात, नवरात्रात पण ते अनवाणीच असतात. नवरात्रात अनवाणी चालण्यामुळे, जर मी प्रसन्न होत असते, तर त्यांच्यावर प्रसन्न झाले नसते कां? कित्येक लोकांना, अनेक दिवस एक वेळचे जेवणच नशीब असते, त्यांचे कायमच उपास घडत असतात, त्यांच्यावर मी प्रसन्न झाले नसते कां? तुम्ही लोक जुन्या परंपरा-रूढी आचरणात आणण्यापूर्वी, त्यावर थोडा विचार का करत नाही?

मी : देवीमाते, मग अशा परंपरा तयार कां झाल्या?

देवी : निरनिराळ्या काळांमध्ये, तेव्हाचा संदर्भ लक्षात घेऊन, लोकांचे त्रास दूर करण्याकरता, लोकांना आनंदात ठेवण्याकरता, तेव्हाच्या संतांनी / ज्ञानी लोकांनी उपदेश केलेले असतात. कांही वेळा असे उपदेश, ज्ञानी लोक मुद्दामच देवतांशी / धार्मिक विधिंशी जोडतात, जेणेकरून लोक उपदेशांचे पालन करतील. काळ पुढे पुढे जात जातो आणि संदर्भ मागेच राहतात. काळाप्रमाणे उपदेशांचे भाषांतर बदलत जाते, त्यातले शब्द बदलतात आणि पुढे काय येते तर — नवरात्रात अनवाणी चाला, रोज उपवास करा, रोज निरनिराळ्या रंगाच्या साडया नेसा, आणि अशा परंपरा-रुढी तयार होतात. आणि हे कां करा, तर देवीला प्रसन्न करण्याकरता.

नवरात्रात अनवाणी चालण्याऐवजी, जो चप्पल विकत घेऊ शकत नाही, अशा कुणाला, तुम्ही चप्पल देऊन, त्याला अनवाणी चे वाणी (अनवाणी च्या विरूध्द वाणी) केले, तर ते मला आवडेल. नवरात्रात उपवास करण्याऐवजी, एखाद्या उपाशी व्यक्तीला अन्न देऊन, त्याचा उपवास बंद करायला मदत केली, तर ते मला खूपच आवडेल. अशा गोष्टी नवरात्रात करा, दिवाळीत करा, गणपति उत्सवात करा, आणि शक्य असेल तर नेहेमीच करत जा. हीच माझी खरी पुजा समजा, हीच मला नेसवलेली साडी समजा, हाच मला चढवलेला भोग समजा.

नवरात्रात तुम्ही रोज निरनिराळ्या रंगाच्या साडया नेसता, हे छानच आहे. नेहेमीच असे कलरफूल रहायला पाहिजे. स्त्री ही प्रेमाचे आणि सौंदर्याचे प्रतिक आहे. निसर्ग जसा रंगांनी भरलेला असतो, तसे मन रंगीबेरंगी ठेवा. जिथे जाल, तिथे आनंद पसरवा, प्रेम पसरवा. तुमचे सौंदर्य तुमच्या कृतिमधून दाखवा, चेहऱ्यावर हास्य ठेऊन दाखवा. त्याकरता अंगप्रदर्शन करण्याची किंवा तू घातले आहेस तसे लो-नेक आणि हाय-बॅक कपडे घालण्याची गरज नाही. स्त्रीयांवरचे अत्याचार वाढत आहेत, त्याचे एक कारण आहे, तुमचे वाढते अंगप्रदर्शन! आजपासून आंधळेपणाचे कोणतेहि अनुकरण थांबवा. रूढी-परंपरा-धार्मिकविधि यामधे दडलेला अर्थ शोधा. जे मनाला पटेल, ज्यानी मन आनंदित होईल, ज्यानी इतरांना आनंद मिळेल, अशाच गोष्टी करा. आणि मग अनुभव घ्या, की परमानंद ही काय चीज असते. आणि परमानंद म्हणजेच ईश्वरप्राप्ति.

असे म्हणून देवीनी माझ्या डोक्यावर हात ठेवला ~ ~ ~ ~

कोणीतरी मला हलवत होते. त्यामुळे माझी तंद्री मोडली. घंटांचा आवाज येत होता. आरतीची वेळ झाली होती. आरती झाली. प्रसाद घेतला. देवीला नमस्कार करतांना असं जाणवलं, की, देवी मंद स्मित करत मला आशिर्वाद देते आहे. देवीनी आज ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवला होता.

उद्यापासून कसे वागायचे, कसे रहायचे, याची मनात उजळणी करत, आणि आपल्याला ईश्वर प्राप्ति झालीच आहे, अशा आनंदात घराकडे निघाले.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments