डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ देशी विदेशी… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
माझा मुक्काम होता अमेरिकेत. आता जायची वेळ जवळ आली होती आपल्या घरी भारतात.
अचानक मुलगी म्हणाली, “ आई एका अगदी जवळच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे. तू इथे आलेली माहीत आहे तिला. तिने खूप आग्रहाने बोलावलंय तुला. पुढच्या शनिवारी लग्न आहे. आपल्याला जायचंय बरं का. नेहमीसारखं म्हणू नको, माझी ओळख नाही मी येत नाही, तुम्ही जा. तू रुपल शहालाओळखतेस ना? तिच्याच मुलीचं आहे लग्न. बघ तरी, अमेरिकेत आपले लोक लग्न कसं करतात ते. ”
पुढच्या आठवड्यात निमूट तयार झाले छान साडी नेसून. आणि गेले त्या भव्य पंचतारांकित हॉटेलात लेकीबरोबर.
दारात स्वागताला उभ्या असलेल्या रुपलने मला मिठी मारली आणि म्हणाली, ” आलात आंटी? कित्ती छान वाटलं मला तुम्ही आलात म्हणून. ”
रुपल गुजराथमधून आलेली मुलगी. खूप खूप पूर्वी तिचे आईवडील इकडे आले आणि खूप झगडून इकडे सेटल झाले. रुपल आणि तिचा भाऊ इथेच जन्मले शिकले. उत्तम गुजराथी मराठी हिंदी बोलतात… रुपलची मुलगी चारू बिझनेसमध्ये होती आणि चांगली नोकरी होती तिला.
तिने तिचा नवराही शोधला, सुदैवाने तोही गुजराथी होता. रुपल, तिचे व्याही अगदी हौसेने सगळे लग्नविधी अगदी परंपरागत करत होते.
इकडे आता विधिवत लग्न लावणारे मराठी, गुजराथी गुरुजीही उपलब्ध असतात. मला हे सगळं बघून मजा वाटत होती. एरवी बिझनेस सूट घालणारे वधूवर आता पारंपरिक घागरा चोळी आणि शेरवानीत नटून मिरवत होते. पुन्हा वधूला हे एवढे ढीगभर दागिने.
.. लग्न लागलं आणि मग जेवायची व्यवस्था शेजारीच मोठ्या हॉलमध्ये केली होती. केवढा तो थाटमाट. पाच प्रकारची पक्वान्ने, आणि हे एवढे पदार्थ. निरनिराळे काउंटर्स नुसते ओसंडून वहात होते.
निरनिराळ्या जातीधर्माचे काळे गोरे, मराठी, सगळ्या प्रकारचे लोक तिथे हजर होते आणि सगळा समारंभ आनंदाने एन्जॉय करत होते.
मी मुलीशी मराठीत बोलत असताना अचानक एक साधारण पन्नासच्या दरम्यान वय असलेला गृहस्थ माझ्याजवळ आला.
“काकू, तुम्ही मराठीआहात ना? “
त्याने मला विचारलं.
“हो हो. मी पुण्याहून आले. या माझ्या मुलगी जावई आणि नातीला भेटायला. आता मी पुढच्या आठवड्यात परत जाणार भारतात. ”
तो म्हणाला, “ मी बसू का इथे? ”
“अहो बसा ना. विचारता काय? ” आपली प्लेट घेऊन तो आमच्याशेजारी आला.
” काकू मी डॉ सारंग करकरे. मी न्यूरोसर्जन आहे. इथल्या अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये मी काम करतो. ”
– – हे ऐकून जावई मुलगी उठून उभेच राहिले.
“अहो सर, तुमचं नाव चांगलंच ऐकलंय आम्ही. पण प्रत्यक्ष बघितलं नव्हतं कधी तुम्हाला. सॉरी हं. खूप प्रसिद्ध आहात सर तुम्ही. आमच्या ओळखीच्या एका काकांची सर्जरी तुम्हीच केलीय. खूप छान बरे आहेत आता. खूप आनंद झाला तुमची ओळख झाली म्हणून ”… जावई मुलगी अगदी भारावून जाऊन म्हणाले.
सारंग हसून म्हणाले, ”ते सगळं असू दे हो. या मिसेस रुपल शहाच्या काकूंच्या ब्रेन ट्यूमरची मी सर्जरी केली ना म्हणून मी इथे आलो. नाहीतर सहसा मी लग्न कार्य अशा समारंभाला जात नाही. वेळच नसतो हो मला. ”
मुलगी जावई रुपलला भेटायला गेले हे बघून डॉ सारंग म्हणाले, ” काकू, मुद्दाम तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी आलो. बोलू का? तुम्ही अगदी माझ्या आईसारख्या दिसता हो. अगदी जणू सख्ख्या बहिणी वाटाव्या इतकं साम्य आहे तुमच्यात. मी मगाचपासून बघतोय तुम्हाला. न राहवून आलो मग बोलायला. ”
मी म्हटलं ”अहो छानच की मग. खुशाल बोला की माझ्याशी. आई नाही पण मावशी म्हणून तर बोलता येईल ना आपल्याला? ”
सारंगच्या डोळ्यात पाणी चमकलं. “मला प्लीज अरे सारंग म्हणा मावशी तुम्ही. आता तर मावशीच म्हणेन तुम्हाला मी….. तर सांगायची कथा अशी या एका भेटीत संपणार नाही. तुम्ही पुढच्याच आठवड्यात जाताय ना? “.. त्यांनी आपल्या भारी अँपल वॉचमध्ये तारखा बघितल्या, कामाचे शेड्यूल बघितलं… “ परवा. परवा मी संध्याकाळी एकदम फ्री आहे. “
माझ्या जावयाला त्यांनी विचारलं, “परवा तुम्ही दोघे माझ्या घरी मावशींना घेऊन याल का? डिनर करूनच मग घरी जा. प्लीज प्लीज. ” सारंग अगदी मनापासून कळकळीने म्हणाले. मी लोकेशन मॅप पाठवतो. मावशींना घेऊन नक्की याल ना? “
“नक्की येऊ सर. ” जावई म्हणाले.
लग्न समारंभ संपल्यावर आम्ही घरी आलो. तेवढ्यात डॉ सारंगचा लोकेशन मॅप आला.
तो बघून लेक म्हणाली. ”बाप रे. या कम्युनिटीत अतिशय श्रीमंत लोक रहातात. चार गराज, स्वीमिंग पूल, आणि अगदी राजवाड्यासारखी असतात इथली घरं. आणि अतिशय महाग सुद्धा. अर्थात इथले डॉक्टर्स तुफान पैसा कमावतात म्हणून त्यांना शक्य होतं हे. कौतुक आहे ना? आपला एक मराठी डॉक्टर याठिकाणी घर घेऊ शकतो याचं. आई तुझ्यामुळे आमची या डॉ करकरेंशी ओळख होतेय. नक्की जाऊया आपण. ”
मी भारतातून अशीच कोणाकोणाला भेट द्यायला होईल, म्हणून नेलेली श्रीकृष्णाची पितळी मूर्ती आणि खाऊ घेऊन आम्ही ठरलेल्या दिवशी त्यांच्या घरी गेलो.
स्वतः डॉ सारंग अगदी साध्या कपड्यात स्वागताला उभे होते. किती साधे आणि हसतमुख.
“या.. या ना मावशी. ” वाकून नमस्कार करत त्यांनी मनापासून आमचं स्वागत केलं.
मी उत्सुकतेने आत बघितलं. त्यांनी हाक मारली, ” सिल्व्ही, मुलांना घेऊन बाहेर ये ना. ”
– – आतून आली ती कृष्णवर्णीय स्त्री आणि अगदी पूर्ण तिच्याच सारखी दिसणारी दोन मुलं. असतील तेरा आणि पंधरा वर्षांची, पण ती पूर्ण काळी नव्हती. तर काळा पण तांबूस काळा रंग आणि घारे डोळे होते तिचे. पण केस मात्र अगदी अफ्रोसारखे, कुरळे. मुलांचेही केस तसेच आणि डोळे मात्र पिंगे.
सिल्व्ही इकडे दिसतात तशी मिक्स आफ्रो अमेरिकन असणार. काळे वडील गोरी आई. पण अतिशय बांधेसूद आणि मुलंही अगदी तिच्याचसारखी दिसायला.
“हा मुलगा श्याम आणि ही मुलगी मीरा. ” डॉक्टरानी ओळख करून दिली. ’नमस्ते आजी’ म्हणत अस्खलित मराठीत बोलत दोन्ही मुलांनी आम्हाला वाकून नमस्कार केला.
सिल्व्ही म्हणाली, ”बसा ना. कशा आहात तुम्ही? ”
मी तिच्या तोंडून मराठी ऐकून स्तंभित झाले.
ती हसून म्हणाली, “सारंगने मला मराठी शिकवलं आणि इथे दर रविवारी मराठी शाळा भरते तिथे आमची मुलं जातात. त्यांनाही छान येतं मराठी बोलता”. मुलं आत निघून गेली.
सिल्व्ही म्हणाली “ मावशी, जरा कुकिंगचं बघते हं. ” ती आत गेली.
आम्ही या धक्क्यातून अजून सावरले नव्हतो. अर्थात चेहऱ्यावर तसं आम्ही दाखवलं नाही. तिने दिलेलं सरबत आम्ही घेत होतो.
डॉ सारंग म्हणाले “आरामात बसा. घाई नाही ना जायची? मावशी, मुद्दाम तुम्हाला बोलावलं माझं घर
दाखवायला आणि माझी कहाणी सांगायला. आम्ही एरव्ही असं कोणात फारसे मिक्स होत नाही. वेळच नसतो हो आम्हाला कामातून. ”
“या सिल्व्ही पण तुमच्यासारख्या डॉक्टर आहेत का? ” मी विचारलं
” हो. ती पण नावाजलेली न्यूरोसर्जन आहे. आम्ही दोघेही एकाच हॉस्पिटलमध्ये काम करतो. ”
आणि डॉ सारंग सांगू लागले… …
अतिशय हेक्टिक दिवस होता तो. मला आधीचे दिवस अतिशय काम होतेच. त्या दिवशी तर जवळजवळ बारा तास मी उभा होतो. अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करताना थकून गेलो अगदी. ते ऑपरेशन संपलं आणि मी अगदी थकून घरी आलो. पुन्हा पुढचे दोन दिवस मला अशीच प्लॅन केलेली ऑपरेशन्स होती. मी तरुण होतो. झाली त्यालाही आता पंधरा वीस वर्षं. असेन तिशीत मी तेव्हा. खूप उत्साह आणि भारतातून आल्याने स्वतःला सिद्ध करण्याची धडपड. माझे बॉस डॉ स्टीफन यांचा मी आवडता शिष्य झालो. खूप शिकलो मी त्यांच्याकडून.
…. मी खरं तर कोकणातला. करकरे कुटुंबाच्या निदान चार पिढ्या तरी पेंढे गावच्या..
रत्नागिरीजवळचं अगदी लहान गाव. शाळा होती ती आधी फक्त सातवीपर्यंत पण नंतर झाली दहावी पर्यंत.. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. माझे वडील दशग्रंथी ब्राम्हण. थोडीशी शेती, आणि उपाध्येपण हाच उदरनिर्वाहाचा मार्ग. माझे आजोबा सांगायचे की.. माधव.. माझे वडील, अतिशय बुद्धिमान. पण आजोबांना अर्धांग वायूचा झटका आल्याने बिचाऱ्या माधवला सगळी संसाराची जबाबदारी अकाली घ्यावी लागली. आणि नाईलाजाने त्याने घरी असलेले गुरुजीपण स्वीकारले. केवळ नाईलाज. त्याला ही खंत कायम राहिली. आजोबा सांगत, ’ माझ्या आजारामुळे फार नुकसान झालं माधवचं. म्हणून तर त्याने सगळं लक्ष तुझ्यावर केंद्रित केलं बरं सारंग. तू खूप शिकावंस, घराण्याचं नाव पुढे न्यावंस हे ध्येय होतं त्याचं. त्याने फार सोसलंय रे पोरा. त्याला यश दे.’
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





