सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ आय लव्ह यू फ्लाय बॉय…. – मूळ हिन्दी लेखक : श्री गौतम राजर्षी ☆ मराठी भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
27 जानेवारी : जम्मू-नगरौटा दरम्यान एका ठिकाणचे सैन्याचे हेलीपॅड
दुपारचे चार वाजले आहेत. दिवसभराची धावपळ झाल्यानंतर, धुकं चिरत सूर्यदेव शेवटचं स्मितहास्य करत आहेत. आपलं हेलीकॉप्टर घेऊन, आर्मी एव्हिएशनचे दोन पायलट, एक मेजर आणि एक कॅप्टन, इथल्या हेलीपॅडवरून, मध्य काश्मीरमधील एका भागात असलेल्या आपल्या एव्हिएशन बेसकडे जाण्यासाठी आपल्या कडक, स्मार्ट युनिफॉर्ममध्ये सज्ज आहेत. इथल्या हेलीपॅडपासून ते एव्हिएशन – बेसपर्यंतचा प्रवास सव्वा तासाचा आहे. हे अॅडव्हान्स लाइट हेलीकॉप्टर ‘ध्रुव’ घेऊन, पीरपंजालची बर्फमय शिखरांची साखळी ओलांडत परवाच तर दोघे इथे आले होते. 26 जानेवारीला मिळालेल्या अनेक धमक्यांना अनुलक्षून अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी ते इथे आले होते.
हेलीकॉप्टरचे पंखे हळू हळू गती घेऊ लागले आहेत. मेजर वर्मा सगळीकडे धावती नजर टाकून कॉकपीटमध्ये येऊन बसले आणित्यांनी हलकेच मान हलवत कॅप्टनला इशारा दिला. कॅप्टनच्या उजव्या हाताचा जॉय- स्टिकवरचा दबाव त्यांनी वाढवला. फूल थ्रॉटल. धुळीची वावटळ उठली. पंखांची फिरण्याची गती, एका मिनिटाला तीनशे पंधरापर्यंत पोचली, तेव्हा ते मोठसं पाच टनी वजन असलेलं हेलीकॉप्टर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला वाकुल्या दाखवत हवेमध्ये उचललं गेलं.
थोड्याशा खालच्या बाजूला रेंगाळणारी भटक्या ढगांची टोळी, मेजर वार्मांच्या कपाळावर आधीच उठलेल्या आठयांमध्ये आणखी एक दोन आठयांची भर घालते. भटक्या ढगांशी खेळ करत हेलीकॉप्टरचे पंखे आता हेलीकॉप्टरला एका सुरक्षित उंचीवर घेऊन येतात… दूरच्या क्षितिजावर क्षणोक्षणी जवळ येणारी पीरपंजालची शुभ्रशी शिखरे दिसू लागतात. बस! एवढी शिखरं पार केली की झालं. मग पुढचं व्हॅली फ्लॉवरचं उड्डाण म्हणजे मुलांचा खेळ. तिकडे पीरपंजालवर लटकलेल्या ढगांची गर्दी जशी काही कुठल्याशा षड्यंत्रात सामील होऊन, येणार्या हेलीकॉप्टरकडे बघत हसते आहे. कॅप्टन काहीसा बेफिकीर आहे. या बाजूचं त्याचं बहुतेक पाहीलंच उड्डाण आहे.
मेजरच्या ललाटावर इथे तिथे पसरलेल्या रेषांवर उमटलेले घामाचे बिंदू वेगळंच काही तरी सांगताहेत. धुकं आणि ढग यांच्यामुळे हेलीकॉप्टरची गती अगदी कमी आहे. आदेशानुसार संध्याकाळी साडे पाचपूर्वी बेसवर पोचणं जरूरीचं आहे. या काकडणार्या थंडीत दिवसाला लवकर पळून जाण्याची घाई असते आणि रात्र तर जशी कंबर कसून बसलेली असते. सहा वाजतात न वाजतात, तोच येऊन धडकते. म्हणण्यापुरतं हे अॅडव्हान्स हेलीकॉप्टर आहे, पण रात्री उडण्याची याची क्षमता शून्याबरोबर आहे.
27 जानेवारी : पीरपंजालच्या खाली द्क्षिण काश्मीरमधील एक जंगल
सकाळचे साडे नऊ वाजले आहेत. पीरपंजालच्या घाटीमधील या जंगलाचा एक भाग अचानक गोळ्यांच्या धमाक्याने गुंजत उठलाय. आदल्या दिवशी रात्री जवळच्याच राष्ट्रीय राइफल्स बटालियनला, चार आतंकवादी जंगलात लपून बसल्याची पक्की खबर मिळाली होती. सूर्यदेवाचं पहिलं दर्शनच चकमकीचा बिगुल वाजवत होतं. दोन आतंकवादी मृत झाले आहेत आणि दोघांचा शोध सुरू आहे. ही सगळी कार्यवाही होता होता सात तास होऊन गेले आहेत. आता पाठलाग करणारी सैन्याची एक तुकडी जंगलाच्या खूप आतपर्यंत पोचलीय. उरलेल्या दोघांपैकी आणखी एक आतंकवादी मारला गेलाय. दुसर्याची मात्र कुठे चाहूल लागत नाहीये. तुकडीचा लांस नायक जखमी झालाय. त्याला पोटात गोळी लागलीय. प्राथमिक उपचारानंतर रक्त वाहणं थांबलय, परंतु त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोचवणं गरजेचं आहे. सगळ्यात जवळच्या रस्त्यापर्यंत जायचं झालं, तरी कमीत कमी चार तास लागतील. एव्हिएशन बेसला लवकरात लवकर हेलीकॉप्टर पाठवण्याविषयी वायरलेसवरून संदेश पाठवला गेलाय.
27 जानेवारी : पीरपंजालच्या बरोबर वर
संध्याकाळचे पाच वाजू लागले आहेत. हेलीकॉप्टरचं पूर्ण नियंत्रण मेजरने आपल्या ताब्यात घेतलय. थोड्या वेळापूर्वी बेफिकीर वाटणारा कॅप्टन आता उत्तेजित झालाय. धुकं आणि षड्यंत्री ढगाच्या टोळीशी झुंजत झुंजत हेलीकॉप्टर आता पीरपंजालच्या बरोबर वर आहे. मेजरला बेसकडून, त्याच्या बरोबर खाली चाललेल्या चकमकीविषयी आणि या चकमकीच्या दरम्यान घायाळ झालेल्या जवानाविषयी रेडिओ- सेटवर संदेश मिळतो. बेस अद्यापही अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. अंधारही वाढतोय. मेजरच्या मनात संभ्रम आहे. कायद्यानुसार तो आपल्या बेसच्या दिशेने उडू शकतो. त्याच्यावर कोणताही दबाव नाही. नियम आणि आदेशानुसार त्याला आपलं हेलीकॉप्टर साडे पाच वाजता बेसवर लॅंड करायला हवं. महागडं हेलीकॉप्टर आणि दोन प्रशिक्षित पायलट यांच्या सुरक्षिततेचा विचार करता ते आवश्यक आहे. संभ्रमाच्या या पराकोटीच्या अवस्थेत त्याला आपल्या मेजर दोस्ताची सक्सेनाची आठवण होते. त्यांचा जिगरी दोस्त. तो त्या राष्ट्रीय राइफल्स बटालियनमधेच आहे आणि अचानक हेलीकॉप्टरची दिशा बदलते. पीरपंजालच्या जंगलाच्या दिशेने ते वळतं. कॅप्टनच्या विरोधस्वरूप बडबणार्या ओठांकडे दुर्लक्ष करत, मेजर आपल्या कपाळावर डावा हात फिरवत त्यावर उमटलेल्या वाकड्या तिकड्या रेषा, स्लेट पाटीवर आखलेल्या वेड्या-वाकड्या रेषा पुसून टाकाव्या, तसा मिटवून टाकतो.
27 जानेवारी : पीरपंजालच्या खाली दक्षिणी काश्मीरी घाटीचा निबीड जंगलाचा एक भाग
संध्याकाळचे सव्वा पाच वाजले आहेत. जंगलातल्या या आतल्या भागात संध्याकाळ जरा लवकरच उतरून आलीय. रातकिड्यांच्या किरकिरीत विव्हळण्याचा आवाजही मिसळलाय त्या घायाळ लांस नायकाच्या अवती भवती असलेल्या त्याच्या साथीदार सैनिकांच्या नजरा वारंवार आकाशाकडे वळताहेत. घेरून येणार्या अंधारात विव्हळणार्या नायकाचा आवाज मंदावत चाललाय. रातकिड्यांच्या करकरीत मधेच एक आवाज आकाशातून येतो. झाडांच्या वर दिसणारं हेलीकॉप्टर, त्याचे मोठे फिरणारे पंख, निराश लांस नायकासाठी संजीवनी घेऊन आले आहेत. पृष्ठभागापासून थोड्या उंचीवर थांबेलेलं हेलीकॉप्टर सगळ्या जंगलाला थरथरायला लवतय. घायाळ लांस नायक आणि त्याचा एक साथीदार, हेलीकॉप्टरमध्ये बसलेले मेजर आणि कॅप्टन यांच्या साथीला येतात. झाडांना, वृक्षांना हलवत, डोलवत हेलीकॉप्टर अंधारात आपला मार्ग शोधत आपल्या बेसच्या दिशेने उडू लागतं. कॉकपिटमध्ये चमकणारं घड्याळ ठरलेल्या वेळेपेक्षा १५ मिनिटे जास्त झाल्याची चेतावणी देतं.
२८ जानेवारी: मध्य काश्मीर घाटीतील एव्हिएशन – बेसची छावणी
सकाळचे सात वाजलेत. घायाळ लांस नायक तज्ज्ञ चिकित्सकांच्या देखरेखीखाली, गेले बारा तास आय. सी. यू मध्ये सुरक्षित श्वास घेऊ लागलाय.
मेजर वर्मा आपल्या बिछान्यात गाढ झोपलेत. त्यांचा मोबाईल वाजतो. चिडून, वैतागून, अस्वस्थ होत ते मोबाईल स्क्रीनकडे टवकारून पाहतात. स्क्रीनवर त्यांचे जिगरी दोस्त मेजर सक्सेनांचा नंबर फ्लॅश होतो. अस्वस्थ होत ते मोबाईल उचलतात.
मेजर वर्मा : हा! बोल!
मेजर सक्सेना : कसा आहेस तू?
मेजर वर्मा : थँक्स म्हणायला फोन केलायस का?
मेजर सक्सेना : नाही.
मेजर वर्मा : मग?
मेजर सक्सेना : आय लव्ह यू, फ्लाय-बॉय!*
मेजर वर्मा : चल… चल…
आणि मोबाईलच्या दोन्ही बाजूंनी एकदमच गडगडाटी हसण्याचा आवाज गुंजत राहातो.
* फ्लाय-बॉय – हेलीकॉप्टर चालवणार्याला फ्लाय-बॉय म्हणतात.
मूळ हिन्दी लेखक : श्री गौतम राजर्षी
मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





