श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ नाण्याची दुसरी बाजू…  भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

“फिफ्टीन वनSज फिफ्टीन, फिफ्टीन टूSज थर्टी…” अथर्व मोठमोठ्याने पाढे पाठ करत होता. सुभद्राबाई हातात कपडा घेऊन टीव्हीवरची धूळ साफ करत होत्या. राघव आणि जानकी ऑफिसहून थकून भागून नुकतेच घरी आले होते. राघव वैतागूनच म्हणाला, “अथर्व, शाळेतून आल्यापासून काय करत होतास रे? आता पाठ करतो आहेस ते.” अथर्व काही बोलला नाही. परंतु गेल्या चार पाच दिवसापासून हेच दृश्य दिसत असायचं. साडेसातला या किंवा आठला या, अगदी तेच दृश्य रिपीट व्हायचे. अथर्वचे पाढे म्हणणे आणि आईंच्या हातात डस्टिंगचा कपडा आणि बाबा बंद खोलीत बसलेले. 

जानकी पटकन आत जाऊन फ्रेश होऊन आली. अथर्वने अनपेक्षित गुगली टाकत विचारलं, “मम्मी, पप्पांचा पगार किती आहे ग?” 

जानकी क्षणभर गडबडून गेली परंतु ती पटकन म्हणाली, “मला नाही माहित. तुझ्या पप्पांना त्यांचा पगार किती आहे, मी हे कधी विचारलंच नाही.” 

“बघ तुलाच पप्पांचा पगार माहित नाहीये तर मला कसे माहित असेल? बरं ते असू दे. तुझा पगार किती आहे ते तरी सांग.”

अथर्वच्या त्या प्रश्नाचं उत्तर टाळत घड्याळाकडे पाहत ती म्हणाली, “बाळा, किती वाजलेत पाहिलंस का? चल आधी तुला जेवायला वाढते.” 

अथर्वचं जेवण आटोपताच तिने त्याचा गृहपाठ करवून घेतला. अथर्व अजूनही भरमसाठ स्पेलिंग मिस्टेक्स करत राहायचा. गृहपाठ संपल्यावर तिने हळूच विचारलं, “अथर्व, तू नेमके आम्ही घरी यायच्या वेळीच पाढे कसे पाठ करतोस रे?” 

अथर्व अगदी निरागसपणे म्हणाला, “अग, आजी खिडकीजवळ बसलेली असते ना, तुमची गाडी गेटमध्ये शिरताच ती मला लगेच जोरजोरात पाढे पाठ कर म्हणून सांगते. आणि मी ते करतो.” 

“काय रे, आज तू बाबांचा पगार किती म्हणून कशाला विचारलंस? शाळेतल्या मॅडमने हा प्रश्न विचारला होता का?” जानकीने सावधपणे प्रश्न टाकला. 

अथर्व हसत हसत म्हणाला, “ते होय, अग आजोबा आजीला डोळे मिचकावत म्हणत होते की, ‘अथर्वला त्याच्या बाबांचा पगार किती आहे माहीतच नसेल बघ’. त्यावर ते दोघेही खळखळून हसत होते.” 

जानकी हळुवारपणे अथर्वच्या केसांतून हात फिरवत होती, तसा अथर्व झोपून गेला. त्यानंतर तिचं जेवण, मग आवराआवरी. तिला रोजच रात्री झोपायला अकरा वाजून जायचे.

गेल्याच आठवड्यात सदाशिवरावांच्या घरी सिनियर सिटीझन्स मित्रांचे गेट-टुगेदर होते. आठ दहा लोकच होते. ते त्यांच्याबरोबर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ग्रुपचे सदस्य होते. कुटुंब सदस्यांशी ओळख परेड झाली. सदाशिवरावांच्या तोंडून अधूनमधून त्यांची नावं ऐकलेली होती. त्यात रविवारच्या दैनिकात प्रासंगिक लेख वा कथा लिहिणारे विष्णु प्रभाकरही होते. शमी कबाब, चिकन करी, रोटी आणि बिरयानी असा मस्त मांसाहारी मेनू होता. विष्णु प्रभाकर यांच्यासाठी शुद्ध शाकाहारी मेनू होता. गप्पागोष्टींना ऊत आला होता. त्या सगळ्यांनीच मस्त एंजॉय केलं.

त्या नंतरच्या दिवसापासून मात्र घरात एक प्रकारची नि:स्तब्ध उदास शांतता पसरून राहिली होती. काय कारण असेल…? तेच तर समजत नव्हतं. 

“येत्या शुक्रवारी आम्ही नागपूरला जाणार आहोत, ” असं अचानकच सुभद्राबाईंनी सांगून टाकलं. बस्स. त्या व्यतिरिक्त त्या चकार शब्दही बोलल्या नाहीत. येण्याजाण्याच्या तिकीटाच्या रिझर्व्हेशनबद्दल काही बोलले नाहीत. मग हे दोघे अचानक असे कसे नागपूरला निघाले? काय बिनसलं असावं? राघवची आणखीनच चिडचिड होत होती. सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत असताना त्यांच्याशी बोलावं म्हटलं की ते दोघेही मॉर्निंग वॉकला गेलेले असतात. संध्याकाळी थकून भागून येतो तर बाबा आपल्या बंद रूममध्ये कोंडून बसलेले असतात. त्यांच्याशी बोलायचं तरी कधी?

अखेर राघवने आईला गाठलं आणि एकदाचे सोक्षमोक्ष लावायचेच या इराद्याने त्यानं विचारलं, “आई काय झालंय ग, तुम्ही दोघे असे आमच्याशी तुटक तुटक का वागताय ते? आमचं काही चुकलं का? तसं काही असेल तर स्पष्ट सांगा. मनांत काही ठेवू नका.”

त्या प्रश्नाचं उत्तरही सरळ न देता सुभद्राबाईनी तुटक तुटकच दिलं. ते सगळं बोलणं एकत्र जोडल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की, जानकीने बाबांचा काहीतरी घोर अपमान केला होता. 

झालं काय तर, त्या पार्टीच्या दिवशी सामिष मांसाहारी भोजनाचा बेत होता. कपाटात कित्येक नवीन डिनर सेट न वापरता तसेच पडून होते. त्यातले प्लेट्स आणि बाऊल वापरायचे सोडून, त्या पार्टीत जानकीची एक फेवरिट फिकट गुलाबांची फुलं रेखाटलेली पांढरी शुभ्र प्लेट आणि बाऊल वापरले गेले.

शुद्ध शाकाहारी असलेल्या जानकीने दुसऱ्याच दिवसापासून निमूटपणे नवीन प्लेट आणि बाऊल वापरायला काढलं. तिथंच सगळं बिनसलं. समजा मांसाहारी भोजनासाठी तो बाऊल आणि ती प्लेट वापरली गेली असेल तर धुवून पुसून घेतलं की झालं ना? त्यासाठी कपाटातून नवीन प्लेट आणि बाऊल काढायची काय आवश्यकता होती? बस्स, बाबांनी त्याचा फार मोठा इश्शू केला. बाबांचा अहंकार दुखावला गेला. ते कोप-भवनात गेले आणि हुप्प करून बसले. बाबांच्यासमोर तोंड उघडायची, आईची काय बिशाद? नेहमीप्रमाणेच या वेळीही ती हो ला हो म्हणणार. 

कारण तसं अतिशय क्षुल्लक होतं. बरं जानकीनं नवीन प्लेट आणि बाऊल घेतले म्हणून काय बिघडले? त्या प्लेटस आणि बाऊल काय वर्षानुवर्षे शोकेसमध्ये ठेवून मिरवायच्या आहेत का? बरं, शुद्ध शाकाहारी असलेल्या जानकीला सामिष भोजन केलेल्या प्लेटमध्ये जेवायला आवडलं नसेल तर तिने नवीन प्लेट आणि बाऊल काढलं असेल तर त्यात एवढा मोठा इश्शू काय करायचा? तिने फार मोठी चूक केली असल्यासारखे तिनेच दरवेळेप्रमाणे या वेळीही जाऊन त्यांची माफी मागावी का? राघव विचार करीत सुन्नपणे बसला होता. 

रात्रीची जेवणं संपून सगळं आवरता आवरता अकरा वाजले होते. जानकी राघवला म्हणाली, “राघव, आज दुपारी नम्रता वन्संचा ऑफिसमध्ये फोन आला होता. “सासूबाईंच्या नांवाने बॅंकेत कसलेच डिपॉझिट नाहीये तर त्यांच्या नावाने त्या स्वत: एक रिकरिंग खाते उघडायचे म्हणत होत्या आणि त्यासाठी कुठली स्कीम चांगली आहे, हे त्या मला विचारत होत्या.” 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments