श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ “नाईलाज!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादात होता की नाही ठाऊक नाही, पण त्यावेळी तिच्या मनात आठवांची बरसात मात्र अखंडित होत असावी… संततधार!
शरीरात चैतन्य पेरीत वाहणारं रक्तच जेव्हा मृत्यूच्या मागे खळाळत धावू लागतं ना… महापुरात एखाद्या दुथडीभरून वाहणाऱ्या नदीसारखं.. तेंव्हा जगणं खूप मागं पडत जातं आणि क्षणार्धात दृष्टीआड होऊन जातं.
तिचं असंच झालं असावं. वैद्यकशास्त्र त्याचा निवाडा देऊन नामानिराळं झालं होतं. बापानं तिला आवडतात त्या गोष्टी तिला घेऊन देण्याचा सपाटा लावला… तेंव्हाच तिलाही कळून चुकलं… आयुष्याच्या शाळा सुटण्याची घंटा कोणत्याही क्षणी घणघणू लागेल!
पण तिला ही शाळा सुटू नये असंच वाटत राहिलं.
मूल शाळेत पहिलं पाऊल ठेवतं ना तेंव्हा त्याचा पुन्हा एकदा जन्म झालेला असतो. नऊ महिने नऊ दिवस आईच्या गर्भगृहात नांदलेला जीव जगाच्या झगमगत्या प्रकाशात बुजून जातो.. आणि म्हणूनच रडू लागतो. शाळेत असंच रडू येतं पोरांना!
तिलाही शाळेतले तिचे पहिले पाऊल आठवत असेल बहुदा. हळुवार पडलेली पावलं पुढे कधी धावायला लागली हे तिला समजलेही नसेल.
शाळा हे दुसरे जग. या जगातले सर्वजण आयुष्याचा एक अवयव बनून राहतात. घरातल्या छोट्याशा कुटुंबातून मूल मोठ्या आणि विविधरंगी कुटुंबात येतं. सुरुवातीला तर घरात आई आणि शाळेत बाई असा भावनिक पदर लागत राहतो मनाच्या देहाला.
घरातलं शाळेत सांगितलं जाईलच असं नसतं… पण शाळेतलं मात्र घरात हमखास सांगितलं जातं.
वर्गातील मैत्र मनीचे गुज सांगण्याइतकं घट्ट होत जातं आणि मग आधी हवीशी वाटणारी सुट्टी थोड्याच दिवसांत नकोशी वाटू लागते.
एखाद्या स्पर्धेत मिळालेला एखादा क्रमांक आणि त्यावर वर्गात झालेला टाळ्यांचा गजर कित्येक दिवस कानांत गुंजत राहतो.
मुले शिक्षकांच्या व्यक्तिमत्वात खूप काही शोधत असतात. काहींनी आई गवसते तर काहींना वडील. आणि काहींना मित्रही दिसतात शिक्षकांत. सहली आणि त्यातून राहत्या सहली दीर्घकाळाची शिदोरी बनून जातात… पुढे आपल्याही मुलांना सहलीला सोडवायला गेल्यावर सहलीच्या बस बघून आपणही काळाच्या मागे जातो!
मुलांनी शिक्षकांचे द्वितीय नामकरण केलेले असते तर शिक्षकांनीही मुलांचे दुसरे बारसे घातलेले असते कित्येकदा.
मध्येच शाळा सोडून इतर गावांत शाळेत जावे लागणाऱ्या मुलांची अवस्था केविलवाणी होत असते. नव्या मातीत रुजायला वेळ लागतोच.
दहावीच्या वर्गाचा, निवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा, शिपाई काकांचा निरोप समारंभ इतर मुलांना आपणही असेच इथून बाहेर पडणार याची हलकीशी जाणीव करून देणारे ठरतात.
तिला मात्र शाळेचाच नव्हे तर या जगाचा असा मधूनच निरोप घ्यावा लागला. असाध्य व्याधी तिला तिच्या ध्यानीमनी जडली आणि तिचा जीवनप्रवास खंडित करून गेली.
ही मानसक्का.. म्हणजे मानसी अक्का… अक्का हे तिच्या शिक्षकांनी दिलेलं लाडाचं नाव. नाशिक मधल्या एका शाळेतील विद्यार्थिनी.
तिने तिच्या शिक्षकांना लिहिलेल्या पत्रात तिने जमेल त्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न केला जाता जाता… ती शाळेत आणि या जगात असतोवर एखादी सहल झाली असती तर बरे झाले असते, असेही ती म्हणते.
तिच्या अक्षरातील नाविलाज अर्थात नाईलाज शब्द काळजाचा ठाव घेणारा ठरला आहे.
पालक, शिक्षक आणि एकूणच सर्वांनी एकमेकांना जितेपणी किती जीव लावणे गरजेचे आहे, हेच यातून अधोरेखित होते, नाही का? कारण आयुष्याच्या शांत भासणाऱ्या समुद्रात एखादी मोठी लाट अनपेक्षितपणे उसळू शकते.. आणि गलबत तळाशी जाऊ शकते!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





