सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ कस्तुरी… – भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
जेव्हा ती जन्माला आली तेव्हा खरं म्हणजे तिचं जन्माक्षर हे काहीतरी वेगळंच होतं. क हे नव्हतंच पण तरीही तिच्या आईने तिचे नाव “कस्तुरी”च ठेवले. देवानं मला हिच्या रूपात एक कस्तुरीमृगच भेट दिलाय. स्वतःशीच एक सुगंध बाळगणारा! माझंही बाळ असंच आहे. ही माझी “कस्तुरीच” आहे.” तिच्या या बोलण्याने आजूबाजूच्या लोकांना म्हणजेच तिच्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना नेमके काय वाटले असेल कोण जाणे पण पाळण्यात झोपलेले एक गोंडस, गुलाबी, गोरंपान बाळ पाहून कुठेतरी सारेच हळहळले असावेत हे नक्कीच. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकाच अर्थाची भावाक्षरे होती. “कसं होणार हिचं? भविष्यात हिच्यासाठी कुणास ठाऊक काय काय वाढून ठेवलं असेल ?”
कस्तुरी ही जन्मापासूनच “सेरेब्रल पाल्सी”(CP) नावाच्या न्यूरोलॉजिकल असंतुलनाची शिकार होती. वेळेच्या आधी तिचा जन्म होताना किंवा गर्भातच मेंदूला पुरेसा प्राणवायू न मिळाल्यामुळे ती अशा अवस्थेत जन्माला आली. तिच्या जन्मानंतर दहा-बारा दिवसांनीच डॉक्टरांनी “सेरीब्रल पाल्सी” हे तिच्या बाबतीतलं निदान तिच्या आई-बाबांना सांगितलं. त्यानंतर ते असंही म्हणाले,” याचे परिणाम कितपत गंभीर असतील हे आत्ताच सांगता येणार नाही. जसजशी ती मोठी होईल तसतसे ते आपल्याला कळत जाईल पण घाबरू नका, धीर कायम ठेवा. तुमचीच कसोटी आहे ही पण तरीही सकारात्मक रहा. ही व्याधी बरी होणारी नसली तरी, मूळात ही व्याधी नाही हा सीन्ड्रोम, एक प्रकारची मेंदूशी संबधित अनियमितता आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे तिचं जीवन तुम्ही नक्कीच वेगळ्या प्रकारे उमलवू शकता. कधी कधी अशाही मुलांमध्ये अदृश्य रुपात काही दैविक क्षमताही असू शकतात. तुम्हाला फक्त त्या केंद्रित कराव्या लागतील.”
खरं म्हणजे ही परीक्षा कस्तुरीच्या मात्या-पित्यांचीच होती. असाध्यतेतून साध्याकडचा किंवा विकृतीतून शाश्वताकडे जाण्याचा हा एक खोल अंधारातला प्रवासच होता त्यांच्यासाठी.
कस्तुरी वाढत होती. बाल्यावस्थेतले अनेक विकासाचे टप्पे ती गाठू शकत नव्हती. अजून ती उभी राहू शकत नव्हती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, “स्नायूंवरचं मेंदूचं नियंत्रण कमी पडत असल्यामुळे असं होऊ शकतं. आपण वाट पाहूया.”
एक दिवस खिडकीत गजाला धरून कस्तुरीच्या आईने तिला आधार देऊन उभे केले. खिडकीतून दिसणारं सुंदर काळसर निळं आभाळ आणि शुभ्र पूर्ण चंद्र पाहताच कस्तुरीच्या तोंडून एक भावपूर्ण आनंदमिश्रित नवलाचा उद्गार उमटला. अचानक ती खिडकीतच नाचण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या आईला हा एक सकारात्मक संकेतच वाटला जणू! एक आशावाद प्रबळ झाला.
तेव्हापासून आई कस्तुरीला कडेवर घेऊन कधी बागेत, कधी एखाद्या तलावाच्या काठी तर कधी छोट्याशा टेकडीवर घेऊन जाऊ लागली. झाडावरची उमललेली फुलं, पाण्यात पोहणारी बदकं, उंच टेकडीवरून दिसणारी हिरवळ पाहून कस्तुरी मनापासून आनंदायची. आईच्या कडेवरून मग ती हळूच उतरायचा प्रयत्न करायची आणि जागच्या जागीच हातापायांची चमत्कारिक पण आशावादी हालचाल करायची. त्यावेळीच ती बोलण्याचाही प्रयत्न करायची. तिला फुलं, पाणी, हिरवळीवर.. खूप काहीतरी छान बोलायचं आहे हे तिच्या डोळ्यातून, नजरेतून जाणवायचं. अशा बोलक्या क्षणी प्रत्येक वेळी आईला हेच वाटायचं “हा माझा कस्तुरीमृग आहे एक सुगंध घेऊनच ती जन्माला आली आहे. हा सुगंधच मला जपायचाय.”
एक दिवस डॉक्टर म्हणाले,” सुदैवाने कस्तुरीला बौद्धिक अपंगत्व आलेलं नाही. ती शाळेत जाऊ शकते,अभ्यास करू शकते, वाचन लेखन ती नक्कीच करू शकेल.”
काही थेरेपीज्..उपचारपद्धती आई-बाबांनी डॉक्टरांच्या सांगण्यावरून तिच्यासाठी आयोजिल्या. एक दोन शस्त्रक्रियाद्वारेही तिच्या स्नायूंवरचं नियंत्रणही बऱ्याच प्रमाणात साधलं गेलं. शिवाय एका शस्त्रक्रियेत तिच्या मेंदूत “ब्रेन स्टिम्युलेटिंग डिव्हाईस” बसवलं त्यामुळे तिच्या अविकसित शारीरिक हालचाली सुधारू लागल्या. आता ती कुणाचाही हात न धरता उभी राहू शकत होती, चालू शकत होती. तिच्या तोंडातून उमटणाऱ्या अस्पष्ट उद्गारांनाही आता थोडा थोडा शाब्दिक आकार येऊ लागला होता. सुरुवातीला काही साधारण विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळेतल्या व्यवस्थापनाने तिच्यासाठी प्रवेश नाकारला. “तिला दिव्यांगासाठी असलेल्या शाळेत जाऊ द्यावे” असा अनाहूत सल्लाही दिला गेला पण आई-बाबा ठाम होते. अखेर कस्तुरीला एका मिशनरी शाळेत प्रवेश मिळाला.
तसं पाहिलं तर तिचं शारीरिक वय वर्गातल्या इतर मुलांपेक्षा जास्त होतं.तिचं दिसणं,हालचाली साधारण नव्हत्या. वर्गातली मुलं तिच्याशी मैत्री करतील का? तिला स्वीकारतील का की तिच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊन तिची अवस्था अधिकच कठीण होईल? हे भय मनात होतं पण तरीही मनात एक अदृश्य स्वरूपातला कस्तुरीमृग आई-बाबांनी जपून ठेवला होता कस्तुरीचं व्यक्तिमत्व खुलेल आणि तिच्यापाशी असलेला सुवर्ण चाफ्याचा दरवळ इतरांनाही आनंदवेल, प्रसन्न करेल याची कुठेतरी खात्री त्यांना वाटत होती.
सुरुवातीला शाळेत जरी कुणी तिच्याशी वाईट वागत नसलं तरी फारसं कोणी तिच्याजवळ जाऊन मैत्री ही करत नव्हते त्यामुळे कस्तुरीला एकटेपणा जाणवायचा आणि तिच्यात होणाऱ्या शारीरिक संप्रेरक बदलांमुळे तिलाच आता हळूहळू जाणवायला लागलं होतं की,”ती वेगळी आहे, तिच्यात त्रुटी आहेत, अभाव आहेत, ती इतरांसारखी नॉर्मल नाही.”
पण मग ती बागेत बागडणाऱ्या फुलपाखरांना बघायची आणि मनातच गुणगुणायची.
छान किती दिसते फुलपाखरू
या वेलीवर फुलांबरोबर
गोड किती हसते.. फुलपाखरू.
तिलाही खुदकन हसू यायचं. डोक्यावरचं निळं अथांग आभाळ बघताना तिला वाटायचं,
“देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर चांदणं चंद्र हा सुंदर.”
सूर्य,चंद्र तारे तिचे सवंगडी झाले होते. निसर्गात ती रमायची. त्या सुंदरतेमुळे तिच्यातल्या काही अदृश्य ऊर्जा जणू काही हलकेच जागृत व्हायच्या.
एकदा मात्र टीव्हीवर कार्टून फिल्म ती बघत होती. एक भेदरलेलं हरिण सर्व शक्ती एकवटून पळत होतं आणि एक पट्टेरी वाघ तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावत होता. ते दृश्य खूप भयानक होतं. ती किंचाळू लागली.ओरडू लागली. आईने खोलीत येऊन पटकन टीव्हीच बंद केला. कस्तुरीला छातीशी लपेटून घेतलं. शांत केलं. त्या क्षणी काही निर्णय घेण्यापूर्वी आईला हे कळत नव्हतं की,” कस्तुरीला सौंदर्यासोबत कुरूपतेचंही दर्शन घडवायला हवं की नको? याशिवाय तिच्या व्यक्तिमत्त्वात परिपूर्णता कशी येईल?शिवाय खरंच कधी भविष्यात तिच्यावरच असा प्रसंग गुदरला तर?”आई क्षणभर भयकंपित झाली अन् तिने हवेतच देवाला हात जोडले.” स्वामी माझ्या कस्तुरीचं रक्षण कर.”
– क्रमशः भाग पहिला
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




