सौ राधिका भांडारकर

?  जीवनरंग ?

☆ कस्तुरी… – भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(आई क्षणभर भयकंपित झाली अन् तिने हवेतच देवाला हात जोडले. ” स्वामी माझ्या कस्तुरीचं रक्षण कर.”) इथून पुढे – – 

पण कस्तुरी उमलत होती. फुलत होती. शाळेतही ती शिक्षकांची खूप आवडती झाली होती. तिची शैक्षणिक प्रगती विलक्षण होती. पण परीक्षेत तिला वेळेत पेपर पुरा करता यायचा नाही हा मात्र समजून घेण्याचा भाग होता. मात्र तिला आता मित्र -मैत्रिणी ही मिळू लागल्या होत्या.

 एका स्नेहसंमेलनात तिने तिची एक कविता सादर केली.

*

चांदणझूल पांघरते 

राउळाच्या कळसावरती

 गाभारीचा तम सारतो 

पेटलेल्या सांजवाती 

*

तिच्या आवाजात थरथर, काहीसा घोगरेपणा होता पण अंतरीच्या गाभ्यातून सुंदर शब्दांची झालेली उधळण लोकांना स्तब्ध करून गेली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि त्या दिवसापासून कस्तुरीला एक सूर गवसला जगण्यासाठीचा. तिच्या अंतरीच्या गाभ्यातला सुगंध नकळत तिलाच गंधित करून गेला.

तिला जन्मतःच प्राप्त झालेल्या शारीरिक असंतुलनामुळे तिला पूर्णपणे सर्वसाधारण जीवन जगता येत नव्हते. कधीकधी ती संवादातही कमी पडायची. कधी तिला भोवताली घडणाऱ्या अनेक घटनांचा अर्थ लावता यायचा नाही पण घटनेतली कुरूपता, विकृती कुठेतरी आतल्या मनात तिला जाणवायची आणि तिच्या चिडण्यातून, रागवण्यातून, कधीकधी तर अनावर झालेल्या क्रोधातून ते प्रत्यक्षपणे व्यक्त व्हायचं. अशा प्रत्येक क्षणी तिची आई मात्र तिच्याजवळ कायम असायची पण कधीकधी हेच क्षण तिच्या मनात कविता फुलवायचे आणि त्यात ती झपाटल्यासारखी मग्न व्हायची.

दुर्दैवाने, ईश्वराने तिच्यावर आघात करणं सोडलं नाही. आत्ता कुठे तिला जीवन जगणं जाणवू लागलं होतं. काहीतरी गवसलं होतं. खूप काही नसण्यामधलं असणं सापडत होतं. तोच एका दुर्दैवी अपघातात तिच्या आई-वडिलांचं – दोघांचही प्राणोत्क्रमण झालं. अवाढव्य जगात ती केवळ एकटी. अनेक अभावांचं आयुष्य घेऊन अंधार डोहात उभी. जंगलात हरवलेल्या हरिणी सारखीच तिची अवस्था झाली.

तिच्या आई-वडिलांशी संबंधित असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेने तिला नंतर मिशनरी सेवा केंद्रात दाखल केले. आई-वडिलांच्या मागे त्यांच्या मालमत्तेची ती एकमेव वारस होती. त्या संपत्तीचा तिच्या विकासासाठी ट्रस्ट केला गेला. बाकी तिचे सारे भवितव्य एका अज्ञात शक्तीवरच सोपवले गेले.

कितीतरी दिवस ती इथल्या इमारतींच्या भींतीकडे, छताकडे निस्तेज नजरेने पहात राहायची. मी कोण? मी इथे का? असे प्रश्न तिला पडायचे. बालपणी कार्टून फिल्ममध्ये पाहिलेली “पळणारी हरिणी” तिला स्वप्नात दिसायची. ती भयभीत व्हायची, किंचाळून जागी व्हायची, रडायची.

सिस्टर मोना तिची काळजीवाहू..  एक केअरटेकर होती. तिने मात्र तिला आईसारखे प्रेम दिले. ती शांत झाल्यावर सिस्टर मोना तिला म्हणायची, “तुझं नाव कस्तुरी आहे ना? तुला माहीत आहे कस्तुरी म्हणजे काय? एक विशिष्ट जातीचे, वेगळेच आणि विरळा हरीण असते. कुठेतरी हिमालयात क्वचित कुणाला बघायला मिळत असेल. त्याच्या पोटाखाली असलेल्या नाभीत चिकट द्रव्यरूप स्वरूपात सुगंधी काहीतरी पाझरत असते. त्या सुगंधी द्रव्यास कस्तुरी म्हणतात. त्या हरणाला सुद्धा ते माहीत नसतं. तोही त्या वासामुळे बेचैन होऊन हा गंध कुठून येतो हे शोधण्यासाठी इकडे तिकडे पळत असतो पण त्याला कळतच नाही की सुगंध त्याच्यापाशीच आहे. तशीच तू आहेस कस्तुरी! तुझे आहे तुझ्यापाशीच. ”

हळूहळू कस्तुरीची ऊर्जा प्रेरित होत होती. केंद्रात अनेक लहान थोर माणसं होती. अपंग, अनाथ, मनोरुग्ण! मतिमंद अॅबनॉर्मल. जीवनातल्या एका भयाण कुरूपतेला ती न्याहळत होती. पाहता पाहता तिच्यातल्या अबोल अदृश्य जाणिवा उजळत होत्या. ती त्यांच्यातलीच एक होती पण तिच्यात एक गंधकोष होता. सुगंधित. तो गंधस्पर्श तिला जाणवत होता. एक शक्ती होती तिची.

केंद्रातल्या अनेक माणसांच्यातले स्थित अंश तिच्यात वाहणाऱ्या प्रवाहाशी जुळायचे त्यामुळे ती त्या सर्वांशीच एक सुंदर नाते प्रस्थापित करू शकली. जणू काही ते तिचं राज्य होतं आणि त्या राज्याची ती राणी होती. कोणी रडलं, कोणी हसलं..  सगळ्यांच्या भावभावनात ती सहजपणे सामील व्हायची. पटकन डोळ्यातून ओघळणारे कोणाचे अश्रू पुसून त्याला अशाच मजेशीर कवितांतून हसवायची.

वारा वारा गरा गरा सो सो सुम

ढोल्या ढोल्या ढगात ढूम ढूम ढूम 

सगळेच हसायचे. टाळ्या वाजवायचे आणि समोर असलेल्या फाटक्या जीवनाला झोळीत घालून जगण्याचा सोहळा करायचे. लहान थोरांसाठी कस्तुरी म्हणजे खरोखरच त्या केंद्रातला एक आनंदाचा झराच बनला. खरं म्हणजे इथूनच तिच्या प्रतिभेला अनंत धुमारे फुटले. तिच्या लेखणीतून तिचं हास्य, कारुण्य, अश्रू, एकाकीपणा, मनातली स्पंदनं, घुसमट शब्दांमधून वाहू लागली. तिच्या कवितांचं जगच निराळं होतं. अंतर्मनाचा ठाव घेणारं होतं. तिच्या कवितांना सहजच प्रसिद्धी मिळू लागली. “कवयित्री कस्तुरी” म्हणून तिची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. तिने तिच्या असाध्य नैसर्गिक अभावांवर जणू काही मात केली. जगण्यातला क्षण नि क्षण आनंदात बुडवून टाकला.

एक दिवस तिच्या “लावण्यागंधा” या कवितासंग्रहाला राष्ट्रीय वाङमय परिषदेचा मोठा पुरस्कार जाहीर झाला. रोख दहा लाख, शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र. या तिच्या यशोदीप सोहळ्यात मिशनरी सेवा केंद्रातील सर्वच उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हातून पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा ती व्यासपीठावर आली तेव्हा टाळ्यांचा गजर झाला. कवितेतून दिसणारी कस्तुरी आज तिच्या शारीरिक अपंगत्वात पाहताना इतर जनसागर थक्क झाला. तिच्या स्वरयंत्रातून अनियमितपणे ओघळणारे ते शब्दांचे लावण्य ऐकताना अनेकांचे डोळे पाणावले.

ती म्हणाली, ” मी लहान असताना आई मला कस्तुरीमृगाची गोष्ट सांगायची आणि नंतर म्हणायची प्रत्येक माणूस व्यक्ती या कस्तुरीमृगासारखीच असते. प्रत्येकापाशी एक निसर्गदत्त सुगंध असतो फक्त तो जाणून घ्यावा लागतो. समाजाने मला समजून घेतले. मी समाजाची ऋणी आहे. मला मिळालेली पुरस्काराची रक्कम मी आमच्या केंद्राला देते जेणेकरून माझ्यासारख्या अनेकांना घडवण्यासाठी त्यांना बळ मिळावं. सगळ्यांना प्रणाम! धन्यवाद! ”

प्रेक्षागृहात कमालीची शांतता होती. नंतर निवेदिकेनेच तिला संबोधित करत म्हटलं, “कस्तुरी आज तू तुझ्या नावाला सार्थ केलंस. तू स्वतःच लावण्यगंधा आहेस आणि तुझ्या अंतरातल्या या सुवासाने आम्हा सर्वांनाच सुवासिक केलेस! देव तुला उदंड आयुष्य देवो! तुझा गंध स्त्रोत सदैव असाच दरवळत राहो! ” 

– समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments