सौ. अर्चना गादीकर निकारंगे
जीवनरंग
☆ पाचशे पावलं… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆
☆
अपूर्वा रोजच्याप्रमाणे बागेत गेली. आज बागेत बरीच गर्दी दिसत होती. वाॅकिंग ट्रॅक वरून चालत असताना एका बाजूला सूर्य कलताना दिसत होता. डोक्यावरून एक दोन पक्ष्यांच्या माळा पण उडत गेल्या होत्या. आज घरातले आवरून बाहेर पडेपर्यंत तिला रोजच्यापेक्षा जरा उशीरच झाला होता, अंगवळणी पडलेल्या सवयीनुसार तिचे मन बाहेर फिरण्यास उत्सुक होते. आज रोजच्यापेक्षा कमी फिरावे असा विचार करून तिने हातातल्या घड्याळात बघितले. हातावरचे घड्याळ सात वाजून दहा मिनिटांची वेळ दाखवित होते. घरी परत जाताना तिला थोडी फळ व भाज्या खरेदी करायच्या होत्या. तिने अजून एक फेरी मारु असा विचार केला. बागेतल्या त्या शेडखालच्या बाकांवर अजून पेठे काका, शिरसाट काका, वगळ काका व हल्ली हल्ली त्यांना जाॅइन झालेले कुळकर्णी काका मोठमोठ्याने हसत बोलताना तिने पाहीले, हल्ली शिरसाट काका फार दिवसांनी बागेत आल्याचे तिच्या लक्षात आले. तस पाहता ते बागेच्या गेटच्या बाहेर पडल्यावर समोरच्याच टाँवरमध्ये राहत होते. नवीनच झालेला टाँवर तीस मजली होता. त्यांना भेटून ” कुठे होतात बरेच दिवस आला नाहीत तुम्ही? ” असे विचारावे का हा विचार अपूर्वाच्या मनात आला. अपूर्वा बरेच वर्ष त्या बागेत येत होती. वेळ मिळेल तसा ती कमी जास्त वेळ बागेत चालायला यायची. त्यामुळे तिची या सर्वांशी चांगलीच ओळख होती. बरेच वेळा त्यांच्याशी बोलून ती आणखीन घट्ट झाली होती.
बागेतून बाहेर पडण्याच्या विचाराने गेटजवळ गेलेली अपूर्वा परत मागे फिरली. जाऊ दे. होऊ दे पाच मिनिटे उशिर. पण बोलूया सर्वांशी तिथे जाऊन. असा विचार करून ती सर्व बसले होते त्या बाकांजवळ आली. तेव्हा तिने पाहिले की ते सर्वजण पण उठून एकमेकांचा निरोप घेत होते. वगळ काका शिरसाट काकांना म्हणाले, ” अरे शिर्या, येत जा दोस्ता. एवढ्या जवळ तर राहतोस. मित्रांना भेटायला येत जा जरा सवड काढून. ” वगळ काका आणि शिरसाट काका लहानपणापासूनचे मित्र होते. दोघांच्या वयात फार अंतर नव्हते. पेठे आणि कुळकर्णी हे मात्र त्यांच्यापेक्षा वयाने लहान होते. तेवढ्यात पेठे काका बोलले “अहो शिरसाट येत जा अधूनमधून. तुम्हाला भेटून बर वाटत.” अपूर्वा दुरूनच हे संभाषण ऐकत होती. त्यांच्या त्या मैत्रीच्या चौकोनात शिरसाट काका वयाने इतर तिघांपेक्षा मोठे होते. शांत, गंभीर, मितभाषी होते. तरीपण सगळ्यांशी त्यांचे छान जमत असे. शांत राहून, कमी बोलूनसुदधा ते इतरांशी मिळून मिसळून राहत असत. बाहेर फिरताना त्यांची एक जीवाभावाची मैत्रीण त्यांच्या सोबतीला सतत राहत असे. ती म्हणजे त्यांंना सतत आधार देणारी त्यांची काठी. शांत, विचारी असे व्यक्तिमत्व लाभलेले ते मित्रांच्या चाललेल्या चेष्टा मस्करीत सक्रियपणे भाग घेत नसत. हलकेच हसून, शांत राहून एखाद वाक्य बोलून जात. फिरायला जाण्याच्या उद्देश्याने बाकी तिघांच्या राहणीमानात बदल घडला होता. कोणी टी शर्ट पँट घालत असे, तर कोणी टी शर्ट आणि ट्रॅक पँट घालून येई. तर कधी हाफ पँट व टी शर्टपण घालत असे. पण शिरसाट काका मात्र आपण त्यांना बघतोय तेव्हापासून झब्बा व लेंगा या वेशातच दिसत आले आहेत हे मात्र खरे. अपूर्वाने विचार केला. अपूर्वाला ते त्यांच्यात वेगळे जाणवायचे.
कुळकर्णी बोलल्यावर शिरसाट काका शांतपणे म्हणाले, ” अहो कुळकर्णी यावेसे फार वाटते हो. तुम्हाला तिघांना भेटायची फार इच्छा असते पण हल्ली प्रकृतीच्या कुरबुरी चालू असतात त्याच्यामुळे इच्छा असूनही शरीर साथ देत नाही. मग घरी बसण भाग होत. मग बसतो सोडवित पेपरमधील शब्दकोडी व आवड म्हणून लिहीतो १/२ पानं तेवढाच आपला विरंगुळा. कधी कधी शरीराने हो म्हटले तर बाल्कनीत उभा राहून दुरूनच तुम्हाला पाहतो. तेवढच आपल समाधान. ” आणि ते हसले.
अपूर्वाला दोन तीन वर्षांअगोदरचे ते आठवले काठीविना चालणारे. पण नंतर वयापरत्वे काठी त्यांच्याजवळ येऊन त्यांना साथ देऊ लागली होती. असे जरी असले तरी पूर्वी इतकेच शांत कुठेही त्रागा नाही की लाभलेल्या परिस्थितीसाठी कुरबूर नाही. आलेल्या परिस्थितीशी मिळतेजुळतेपणा अंगिकारुन पुढे जाणारे ते खरच किती वेगळे होते. ऐकू न येणे ह्या त्यांच्या समस्येलापण त्यांनी समस्या न ठेवता एक रोजच्या जीवनातील गोष्ट म्हणून स्विकारली होती. अपूर्वाने विचार केला, ” खरच कशी वेगवेगळ्या स्वभावाची माणस भेटत असतात. “
अपूर्वा पटकन पुढे होऊन शिरसाट काकांना म्हणाली, ” कसे आहात काका? तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. ” त्यावर ते पण बोलले, ” बरा आहे मी. तू कशी आहेस? आता पाय थकले आहेत. पूर्वीसारखे साथ देत नाहीत. म्हणून हल्ली बाहेर पडणे कमी झाले आहे. तू रोज येतेस ना? ” अपूर्वा बोलली. ” हो काका. मी सहसा चुकवत नाही. फिरल्यावर बर वाटत. मनाला आनंद मिळतो. ” अपूर्वाने त्यांना म्हटले, ” काका, तुम्ही मग टेरेसवर तरी जाता का फिरायला मोकळ्या हवेत? ” ” नाही ग. एवढा अट्टाहास करायचे दिवस आता राहीले नाहीत. खर सांगू तुला माझी रोजची गरजेची कामं करण्यापुरत जरी मी चालू शकलो तरी खूप झाले. अजून किती अपेक्षा बाळगायच्या आता पायांकडून? माझ्या त्या नित्याच्या कामांसाठी मला वाटते पाचशे पावले चालता आली तरी त्या परमेश्वराचा मी आभारी राहीन. ” आणि ते काठीच्या आधाराने पुढे चालू लागले. पाचशे पावल खरच किती माफक अपेक्षा आहे नाही ह्यांची? अपूर्वाने विचार केला असच जर का प्रत्येक वृदध व्यक्ती विचार करेल तर जीवनातली वाट्याला येणारी संध्याकाळ किती आनंदी होईल.”
☆
© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे
मुम्बई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





