सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ बदल – – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर बसून डॉक्टर प्रभाकर हलकासा झोका काढत होते. झोक्याबरोबर झोपाळ्याच्या कड्यांमधले चकचकीत राघू मैना मोर झुलत होते. त्यांच्या हातातलं वर्तमानपत्र उघडं असलं तरी नजर समोर लागली होती. मनात विचार झोका घेत होते. पूर्वी या झोपाळ्यावर बसलं की चौपाटीपर्यंतचा रस्ता दिसत असे. आता या सगळ्या उंच आणि वेड्यावाकड्या उगवलेल्या इमारतींनी पश्चिमेचा वारा आणि संध्याकाळचा आकाशातला नजारा सारंच गिळून टाकलं आहे. बऱ्याच वेळा पूर्वेकडचे सूर्यकिरण या उंच इमारतींच्या काचांवरून परावर्तित होतात आणि इथे व्हरांड्यात डोळे दिपवणारा प्रकाश पडतो. ऑपेरा हाऊसचा हा आपला भाड्याचा ब्लॉक जुना असला तरी भक्कम आहे. इथेही टॉवर करण्याच्या गोष्टी कानावर येत आहेत. किती भराभर बदलत चाललंय सारं!

तेवढ्यात नाश्ता, कॉफीचे मग आणि दोघांची रोजची औषधं घेऊन धनश्री आली आणि डॉक्टरांचे विचार थांबले. मोतिया रंगाची, जरीच्या जांभळ्या काठांची साडी, मोत्याचे मोजके दागिने आणि मोगऱ्याचा गजरा माळलेली धनश्री पासष्टी उलटून गेली तरी अगदी प्रसन्न टवटवीत दिसत होती.

“अरे वा! छान दिसताय अगदी! आज काय बुवा सगळं माहेर भेटणार तुम्हाला. मजा आहे. ” खुशीत आले की डॉक्टर धनश्रीला- पत्नीला- कौतुकानं ‘अहो-जाहो’ म्हणत. छान हसून प्रतिसाद देत धनश्री म्हणाली “बरं, बरं! आटपा आता लवकर. ”

“आवरतो तर! उगाच माझ्यामुळे माहेरच्या गोतावळ्यात जायला उशीर नको. ”

आज 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधन एकत्र आलं होतं. रमाच्या म्हणजे धनश्रीच्या मोठ्या भावाच्या नातीच्या साखरपुड्याला जायचं होतं. त्यांची बेंगळुरूला राहणारी मुलगी केतकी आणि दिल्लीला असलेला मुलगा सुरेंद्र या समारंभाला येऊ शकणार नव्हते.

कॅबमध्ये बसता बसता डॉक्टरांच्या मनात आलं, ‘ठाण्याला जायचं म्हणजे लांब वाटतं आताशा. या कॅबसेवेमुळे बरीच सोय झालीये आपल्यासारख्यांची. ’

गाडीतल्या गार हवेने थोड्याच वेळात डॉक्टरांना डुलकी आली. बाहेरचा रंगीबेरंगी, उत्साहाने नटलेला सणाचा माहोल बघताना धनश्रीला वाटलं, ‘दरवेळी इथून जाताना बघावं तर नव्या इमारती, मॉल्स उभे राहिलेले दिसतात. मेट्रोचं बांधकामही जोरात सुरू आहे. त्यातच अरुंद रस्त्यांवरून, गर्दीतून मार्ग काढत दोन चाकी गाड्यांवरची अख्खी कुटुंबं नटून- सजून पळत आहेत. धन्य आहेत हे मुंबईकर!

पावसाळ्यामुळे पलीकडच्या निळसर डोंगररांगांवरची झाडं आणि रस्ते स्वच्छ दिसत होते. डोंगराला वळसा घालून जाणाऱ्या खाडीचं पाणी चकाकत होतं हिरवं आणि प्रसन्न वातावरण होतं.

हॉलमध्ये नवरा- नवरी, फोटोग्राफर आणि गुरुजी यांचंच स्टेजवर राज्य होतं. बाकी सारे सेल्फी आणि ग्रुप फोटो काढण्यात रमले होते.. लहान मुलांनी स्टेजपासून सगळा हॉल खेळण्यासाठी काबीज केला होता. सगळ्या भाच्या आणि भाचेसुना उगाचच लगबग करत मिरवत होत्या. कुणीतरी नाश्तापाण्याची चौकशी करून गेलं. दोघी- तिघी भाच्या आवडत्या धनश्रीआत्याला कौतुकानं सांगायला आल्या, “आत्या, आम्ही सगळ्या सासूगर्ल्सनी रमाच्या लग्नासाठी पटोला घ्यायचं ठरवलंय”.

लगेच दुसरी म्हणाली, “पण लग्नानंतर जेवायच्या वेळी मात्र सगळ्याजणी गाऊन्स घालणार आहोत बरं का. ”

अरे वा सासूगर्ल्स! आत्तासुद्धा छान दिसताय सगळ्याजणी. ”

चाळीशी होऊन गेलेल्या या भाच्या आणि सुना आता सासू होणार होत्या. थोडा चिवचिवाट करून त्या चिमण्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला. शेजारी बसलेली ताई लगेच धनश्रीला म्हणाली, “त्या गाऊन्स घालायचं म्हणताहेत आणि तू त्यांचं कौतुक कसलं करतेस?”

“ अंगभर कपडे घालणार आहेत ना, ठीक आहे. गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स आणि टी-शर्ट घालणार असं म्हणाल्या असत्या, तर काय करणार होतो आपण? आणि अगं आजकाल फॅशन आहे जमिनीवर लोळणारे गाऊन्स घालायची. फक्त त्यांच्या ब्लाऊजची मागची छोटी पट्टी बघून डोळे मात्र मोठे नाही करायचे! आत्ता येताना बाहेर पाहत होते तर रस्त्यावर चालणाऱ्या, टू व्हीलरवरच्या, बसमधल्या लहान- मोठ्या नव्वद टक्के बायकांचे ब्लाऊज म्हणजे, ‘

कुणीही पाव मीटरपेक्षा जास्त कापड ब्लाऊजसाठी वापरू नये’ अशी कुणाची तरी सक्त ऑर्डर असल्यासारखं वाटावं असे होते. त्यापेक्षा आपल्या चिमण्यांच्या पाठीवर बरीच पिसं आहेत. ”

धनश्रीचा बोलणं ऐकणाऱ्या आजूबाजूच्या सगळ्याजणी हास्यरंगात बुडून गेल्या. “आपण फार कशाचा बाऊ करायचा नाही. ” धनश्रीनं तिचं म्हणणं पूर्ण केलं.

“खरं आहे ग बाई तुझं! छान जमवून घेतेस सगळ्यांबरोबर. म्हणून तर आवडती आहेस सगळ्यांची. ” ताई कौतुकानं धनश्रीला म्हणाली.

समारंभानंतर निघताना धनश्रीनं पुढच्या महिन्यात ठरवलेल्या डॉक्टरांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या समारंभाची सर्वांना आठवण करून दिली आणि येण्याचा आग्रह केला. परतताना गाडीमध्ये धनश्रीचे डोळे मिटत होते आणि ट्रॅफिक वाढल्यामुळे वारंवार थांबणाऱ्या गाडीत बसून डॉक्टर कंटाळले होते. मुंबईच्या गर्दीत दररोज मोठी भर पडत होती. डोंगरांवरसुद्धा वस्त्या झाल्यामुळे रस्त्याकडेला पावसाळ्यात वाहणाऱ्या झऱ्यांचे नाले झाले होते. कचऱ्याचे ढीग डोंगरांशी स्पर्धा करत होते. असाहाय्यपणे बाहेरचा बदल बघताना, डॉक्टरांच्या अधूनमधून मिटणाऱ्या डोळ्यांपुढे भूतकाळ तरळू लागला.

‘बारावीनंतर मेडिसिनला जाणार नाही’ असं अगदी ठामपणे सुरेंद्रनं सांगितलं होतं, तेव्हा त्याला समजावताना आपण म्हटलं, ‘अरे, बापूंनी किती कष्टाने…. ’

‘बाबा प्लीज, बापू आजोबा कोकणातून आले अर्धपोटी राहून, खूप अभ्यास करून यशस्वी डॉक्टर झाले, तुम्हीही त्यांच्या पावलावर पाऊल टाकलंत, हे सर्व मला माहितीये. तुम्हा दोघांबद्दल, मेडिसिन प्रोफेशनबद्दल मला आदर आहे पण मला मेडिसिनला जायचं नाहीये. केतकीनं तिच्या ऑफिसमधल्या इंजिनीयर रामनाथनची जोडीदार म्हणून निवड केली, ती आपण सर्वांनी स्वीकारली. मलाही माझ्या आवडीच्या कम्प्युटर क्षेत्रात जायचय. तेव्हा प्लीज यावरून परत चर्चा नको. ’ अगदी शांत स्वरात सुरेंद्रने विषय संपवला होता.

घरातला डॉक्टरकीचा वारसा पुढे चालवला जाणार नाही, हे सत्य पचवायला आपल्याला खूप कठीण गेलं. पण झाली त्याची सवय हळूहळू. आता केतकी बेंगळुरूला नवऱ्याच्या इंजिनिअरिंग फॉर्ममध्ये साथ देते आहे आणि सुरेंद्र दिल्लीला यशस्वी उद्योजक आहे. परंपरेला बाजूला सारून मुलांनी त्यांच्या आवडीप्रमाणे आयुष्याचा मार्ग बदलला म्हणून काऽऽही बिघडलं नाही. या हल्लीच्या पिढीच्या सुस्पष्ट विचारतला मोकळेपणा कौतुक करण्यासारखा आणि थोडासा हेवा वाटण्यासारखासुद्धा आहे. स्पष्टपणे कबूल करायचं तर आता आपल्या प्रोफेशनमध्ये सुद्धा खूप बदल झाला आहे. सेवाव्रताचा बिझनेस झाला आहे. शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा ओतल्यानंतर….. आणि अलीकडे पेशंटची वृत्तीसुद्धा बदलली आहे. त्यांना उठसूट महागडे स्पेशालिस्ट लागतात. ’

धनश्रीला सगळ्या गोष्टींमध्ये सुवर्णमध्य साधायची बॅलन्सिग ट्रीक छान जमली आहे. मुलांनी वेगळ्या वाटा निवडल्या. व्यवसायानिमित्त ती दूर राहतात, ही बदलत्या काळाची गरज समजून सगळं समंजसपणे तिनं जमवून घेतलंय. मुलं आता आपल्याला प्रॅक्टिस बंद करण्याचा आग्रह करतात. धनश्रीनही तसं दोन- चारदा सुचवलं, पण आग्रह धरला नाही. तिचं भागवत मंडळ, हास्य क्लब, मैत्रिणी, टीव्ही सगळ्यात तिनं स्वतःला छान गुंतवून घेतलं आहे.

मुलांनी ठरवलेल्या डॉक्टरांच्या पंचाहत्तरीच्या समारंभाला अजून दोन दिवस होते. पण धनश्रीची मागच्या आठवड्यापासून गडबड सुरू होती. मुलं, नातवंडं येणार म्हणून तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ तयार केले जात होते. शिवाय आज संध्याकाळी तीनं तिच्या गुरुजींच्या प्रवचनाचा कार्यक्रम घरी करायचं ठरवलं होतं.

नमस्कार करते काका ॑. मधुरा म्हणजे केतकीच्या मैत्रिणीनं वाकून नमस्कार केला, तेव्हा विचारांच्या तंद्रीतून डॉक्टर बाहेर आले. बऱ्याच दिवसांनी भेटणाऱ्या मैत्रिणींच्या मनसोक्त गप्पा व्हाव्यात म्हणून धनश्रीनं मधुराला दोन दिवस राहायला बोलावलं होतं. मधुराचा योगविद्येचा विशेष अभ्यास होता. कितीतरी वर्ष ती योगविद्येचे विनामूल्य वर्ग घेतेय.

ये बैस इथे तुझ्या आवडत्या झोपाळ्यावर ॔॑. डॉक्टरांनी सरकून मधुराला झोपाळ्यावर जागा करून दिली. मधुरा आणि केतकी लहानपणापासूनच्या मैत्रिणी. त्यांचा खेळ, अभ्यास, गाणी, गोष्टी सारं या झोपाळ्यावर बसूनच चालत असे. मधुराला बघून धनश्री चहा- फराळाचं घेऊन आली. मधुरानं धनश्रीला आधी गळामिठी घालून मग वाकून नमस्कार केला आणि उत्साहाने सांगू लागली,

काका- काकू मी पुढच्या महिन्यात हेलसिंकीला म्हणजे फिनलँडला जातेय दोन महिन्यांसाठी. मागच्या वर्षी मी पुण्यातल्या एका इन्स्टिट्यूटमध्ये योगाभ्यासाचा स्पेशल कोर्स केला होता. आता त्या इन्स्टिट्यूटतर्फे मला हेलसिंकीला पाठवत आहेत. मुलंही आता मोठी झाली आहेत. एक नवा अनुभव घ्यायला घरातल्या सगळ्यांनीच प्रोत्साहन दिलं मला. माझी असाइनमेंट संपली, की मनोहर मुलांना घेऊन तिकडे येणार आहे. मग आम्ही आठ-दहा दिवस नॉर्वे, स्वीडनला फिरून यायचं ठरवलं आहे.॔

छान! जाऊन या सगळे. इतकी वर्षं तू योगाभ्यासाचे विनामूल्य वर्ग घेते आहेस, त्याचं हे बक्षीस आहे बरं का! धनश्री कौतुकानं म्हणाली.

काकू, पूर्वी मी गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे योगवर्गात शिकविण्याचे पैसे घेत नसे, पण अलीकडे मी फी घेते बरं का. तरुण पिढीला योगशास्त्र शिकण्यात इंटरेस्ट आहे, पण त्यांना योगवर्गाची जागा चांगली पॉश लागते. अशा जागेचं भाडंही बरंच असतं. शिवाय अनुभवानं माझ्या लक्षात आलंय, की अलीकडच्या काळात आपण फुकट कुणाला काही दिलं, की त्याचं महत्त्व, खरी किंमत कुणाला कळत नाही. उलट जास्त फी घेऊन एसी आणि आधुनिक सोयी देणाऱ्यांकडे जास्त गर्दी होते. या शर्यतीत टिकून राहायचं असेल तर आपल्यालाही बदलणं भागच आहे.

अगदी खरं आहे तुझं. काळाचा महिमा! दुसरं काय .॔

 मधुराचा नाश्ता झाला की दोघेही हॉलमध्ये या बरं का गुरुजी येतीलच इतक्यात.॔डॉक्टर आणि मधुरा हॉलमध्ये येऊन बसले तेव्हा प्रवचनाला सुरुवात झाली होती. प्रवचनकार एका कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर होते. ज्ञानेश्वरीचे अभ्यासक म्हणून त्यांचा लौकिक होता. ते सांगत होते,

विज्ञान क्रांतीमुळे जग फार झपाट्यानं बदलतंय. कपडे, , राहणीमान, विचार, नाती सगळं मागच्या दशकात बदलत गेलं. या नव्या जगाशी जुळवून घेतलं तरच आपला निभाव लागेल. काळाप्रमाणे आपण बदललो नाही, तर इतरांना आपलीच अडगळ वाटायला लागेल. त्यापेक्षा नव्याचं स्वागत करणं केव्हाही श्रेयस्कर. बदल हा फक्त चांगला किंवा फक्त वाईट नसतो. मुख्य म्हणजे बदल अपरिहार्य असतो. बदल नको असं म्हणायची मुभा नियतीनं आपल्याला ठेवली नाहीये. म्हणून तर आपल्या द्रष्ट्या पूर्वजांनी साठीनंतर वानप्रस्थाश्रमाचा मार्ग सांगितला. हल्लीच्या काळात निदान मनानं तरी आपण या साऱ्या व्यापातून निवृत्त व्हायला हवं.

डॉक्टरांनी नकळत धनश्रीकडे पाहिलं, तर धनश्रीही अर्थपूर्ण नजरेनं त्यांच्याकडेच बघत होती. डॉक्टरांनी हसून संमतीदर्शक मान डोलावली.

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
अभिजित टोणगांवकर

छान साधी सोपी कथा. उत्तम सादरीकरण. सगळ्यात महत्त्वाचे – स्वच्छ शुद्धलेखन चुकाविरहित …