सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ कलम – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
आश्विन कार्तिक महिन्यात हलकीशी थंडी पडू लागते. पहाडांवर बर्फ पडू लागतो, त्याचा परिणाम सार्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात होतो. या दिवसात मैदानी प्रदेशात हलकासा पाऊस होताच थंडी पडू लागते. याच दिवसात, दसरा, नवरात्र, धनत्रयोदशी, दिवाळी साजरी केली जाते. रावण, कुंभकर्ण, मेघनाद यांच्या पुतळ्यांचं दहन केलं जातं. दुर्गादेवीची सुंदर मूर्ती मंडपात सजवलेली असते. नवीन भांडी, कंदील, दिवे आणि फटाके यांचा हा मौसम असतो.
… त्यावेळी मी सोळा वर्षाचा होतो आणि बाबा एकोणपन्नास वर्षाचे होते. ते आजारी होते, त्यांना दुसर्यांदा हार्ट अॅटॅक आला होता. काही दिवस हॉस्पिटलमधे राहून ते घरी परतले होते. थोड्याच दिवसात ते बाथरूममध्ये पाय घसरून पडले. कुल्ला दुखावला होता. डॉक्टर येऊन बघून गेले होते. औषधे वाढली होती. मी शेकायच्या रबरी पिशवीत गरम पाणी घालून त्यांच्या दुखर्या जागी शेकायचो, तेव्हा ते वेदनेने विव्हळत. जशा लाटा किनार्याशी येऊन कमजोर होतात, तसे बाबा अशक्त आणि कमजोर झाले होते. त्यांची मान आणि हात यावरच्या नसा फुगलेल्या स्पष्टपणे दिसत होत्या. त्यांचे हात थरथर कापायचे आणि अनेकदा त्यांना स्मृतिभ्रंश व्हायचा. त्यांना वाटायचं, आम्ही त्यांची मुले नसून, ते ज्या विश्वविद्यालयात शिकवत असत, तिथले विद्यार्थी आहोत.
आणि मी.. आपल्या जीवनात त्यांची जागा रिक्त रहाण्याच्या कल्पनेनेही घाबरतो. मला वाटतं, त्यांनी सदोदित माझ्या सोबत राहावं. त्यांचा मला आधार वाटायचा. आमच्यातील स्नेहबंध आम्हाला एक-दुसर्याकडे आकर्षित करायचे. स्नेहात चुंबकीय आकर्षण असतं. त्यांच्या नसण्याच्या कल्पनेनेही मला कापरं भरायचं. एका भयानक पोकळीचा दैत्य मला खायला उठायचा. वाहणार्या नदीत एक स्थिर असा द्वीप होते माझे बाबा आणि तो द्वीप म्हणजेच माझी दुनिया होती.
त्या दिवशी बाबांनी मला बोलावलं. त्यांच्या स्मृतीच्या कुलुपावर लागलेला गंज निघून गेला होता. त्यांच्या डोळ्यात ओळखीचा सूर्य झगमगत होता. बाहेर हलकासा पाऊस पडत होता आणि खिडकीतून पावसाचे थेंब आत येत होते. बाबा अगदी मंद आवाजात कवी ‘निराला’चे गीत गुणगुणत होते,
‘अरे वर्ष के हर्ष, बरस तू बरस–बरस रसधार,
पार ले चल तू मुझको… ‘
… आम्ही दोघे खूप मागे मागे भूतकाळात गेलो. मी तेव्हा खूप लहान होतो. पाऊसकाळात ते मला कडेवर घेऊन मुक्त स्वरात हे गीत गायचे.
… नंतर त्यांनी ‘श्री रामचंद्र कृपालु भज मन.. हरण भव भय दारुणं ‘ ही रामस्तुती ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. ही त्यांची अतिशय आवडती प्रार्थना होती. मी त्यांच्या उशाशी बसून ती म्हणू लागलो. त्यांच्या चेहर्यावर एक असीम शांती पसरली.
अचानक काय झालं, कुणास ठाऊक? एक वेदनेची गाठ त्यांना शूळाप्रमाणे टोचली. त्यांच्या गळ्यातून एक वेगळाच असा कण्हण्याचा आवाज आला. तो एक असा हृदयद्रावक आवाज होता, की क्षणभर हवा स्तब्ध झाली. बाहेर वाहणाऱ्या नदीचं पाणी थांबलं. देवघरातला दिवा विझल्या विझल्यासारखा झाला. मी घाबरलो. स्फुंदत स्फुंदत रडू लागलो. ‘बाबा, तुम्ही मला सोडून जाऊ नका. ’ असह्य वेदना होत असतानाही त्यातच ते हसून म्हणाले, ‘अरे वेड्या, मी कुठे जातोय? जा. समोरच्या भिंतीच्या कोनाड्यातून माझी लेखणी घेऊन ये. ’
लेखणी आपल्या हातात घेऊन ते तिच्याकडे प्रेमाने बघू लागले. मग त्यांनी ती लेखणी माझ्या हातात दिली आणी प्रेमाने माझे गाल कुरवाळत म्हणाले,
‘अरे वेड्या, रडतोस कशाला? जेव्हा मी नसेन, तेव्हाही मी तुझ्या लेखणीतून कथा-कविता बनून असेनच. जसे माझ्यात राहिलेले माझे वडील, आणि आपल्या मुलांच्यात तू रहाशील. तसाच मी गेल्यानंतरसुद्धा तुझ्यात राहीनच. ’ बोलता बोलता त्यांना दम लागला.
त्या रात्री मी सतत त्यांच्या छत्रछायेखाली राहिलो. त्यांचे पाय चेपत, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत राहिलो. ते गप्प बसले होते, पण त्यांचे डोळे जणू बोलत होते, ‘ बेटा, वेळच्या वेळी स्नान कर. वेळच्या वेळी जेवत जा. वेळच्या वेळी झोपत जा आणि खूप, निष्ठापूर्वक, दृढ होऊन अभ्यास कर. ’
रात्रीत थंडी वाढली. उंच पहाडांवर बहुधा हिमवृष्टी झाली. बाबांना पांघरूण घालून मी शेजारच्या खोलीत झोपायला गेलो. झोपेत मला अनेक भीतीदायक स्वप्ने पडली.
दुसर्या दिवशी पहाटेच घरातल्या लोकांच्या रडण्याचा आवाज आला. मी गडबडून उठलो. सगळे आक्रोश करत होते. बाबा रात्रीच गेले होते. जे हात मला आशीर्वाद देत होते, जे ओठ माझ्या माथ्याचं चुंबन घेत होते, ते थंड पडले होते. निष्प्राण झाले होते. बाबा गेले होते.
… पुढे त्यांनी दिलेल्या लेखणीने पुष्कळ कविता लिहिल्या. कथा लिहिल्या. ती काही केवळ लेखणी नव्हती. विद्यादान होतं. संस्कार होते. पूर्वापार चालत आलेला वारसा होता. संपत्ती होती. एका पित्याने दिलेले प्रोत्साहन होते. एका पित्याने दाखवलेला सन्मार्ग होता. मागच्या पिढीने पुढच्या पिढीकडे सोपवलेली मशाल होती ती. लेखणी स्वत: आपल्या जागी काहीच नसते. ज्या हातांनी ती आपल्या बोटात दिलेली असते, ती त्या हातांची निशाणी असते. त्यात त्यांच्या आठवणी वसतात.
… आता जेव्हा माझा मुलगा मोठा होईल, तेव्हा ही लेखणी मी त्याच्याकडे सोपवीन.
मूळ हिन्दी कथा – ‘कलम
मूळ हिंदी लेखक : श्री सुशांत सुप्रिय
मो: 8512070086
मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




