सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
जीवनरंग
☆ दुभंग… — भाग – ३ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
(नातेवाईक स्त्रियांपासून काहीशी दूर ती एकटीच एका कोपर्यात खुर्चीवर बसलेली होती. डाॅक्टरांचा चेहराही दुःखाने विदीर्ण झालेला. पण पुरूष आणि त्यातून स्वतः डाॅक्टर असल्याने ते संयम राखून होते.
‘तिच्या वेदना बघवत नव्हत्या, त्यातून तिची सुटका झाली, ‘एवढंच ते बोलले.) इथून पुढे – – –
दिवसकार्य आटोपून डाॅक्टर परत हाॅस्पिटलला येऊ लागले. दोनच दिवसांनी त्यांना एका महत्त्वाच्या काॅन्फरन्ससाठी दिल्लीला जायचं होतं. आता सुकन्या एकटीच घरी कशी राहणार, म्हणून त्यांनी त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून स्वैपाक करणाऱ्या मावशींना रात्री तिच्यासोबत थांबायला सांगितलं होतं. इतर वेळी त्या रात्री आठनंतर घरी जायच्या. पण डॉ. च्या बायकोसोबत एक नर्स कायम घरात असायची. त्या दिवशी दुपारी दोन वाजता डाॅक्टर दिल्लीला निघून गेले. रात्री नऊ वाजता नंदिनीला त्यांचा फोन आला. सुकन्याला एकदम खूप ताप भरला होता आणि त्या स्वैपाकीण मावशी घाबरून गेल्या होत्या. तर नंदिनी त्यांच्या घरी जाऊन जरा सुकन्याला बघून आणि तिला औषध देऊन येईल का? घरात औषधं आहेत पण त्या मावशींना काही इंग्रजी नीट वाचता येत नाही.
नुकतीच जेवणं झाली होती आणि नंदिनी मागची आवराआवर करत होती. मुलं टी.व्ही. बघत होती. सासूबाई तिला म्हणाल्या, ‘मी आवरते बाकीचं. तू जाऊन ये तिकडे.’ तिनं मुलांना बाय केलं. सासऱ्यांनी बरोबर येऊ का विचारलं, पण नंदिनी एकटी जाईन म्हणाली आणि स्कूटी घेऊन पोचलीसुद्धा तिकडे वीस मिनिटात!
तिनं थर्मामीटर लावून बघितला तर सुकन्याला १०३ ताप होता. डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिनं सुकन्याला गोळी दिली आणि ती तिच्याजवळ बसली. मावशींना थंड पाण्यात मीठ घालून आणि दोन रूमाल आणायला सांगितलं आणि सुकन्याच्या कपाळावर ती घड्या ठेवत राहिली. दीड तासानंतर घाम येऊन ताप १०१ पर्यंत उतरला. तापामुळे सुकन्यानं संध्याकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. मावशींनी स्वैपाक केला होता, पण त्याही जेवल्या नव्हत्या. नंदिनीनं त्यांना जेऊन घ्यायला सांगितलं, तोपर्यंत ती सुकन्या जवळ बसली. त्यांचं जेवण होईपर्यंत अकरा वाजले होते. नंदिनीला घरी परत जायचं होतं. सुकन्या कण्हत होती. पण तिला झोप लागल्यासारखं वाटत होतं. नंदिनीनं थर्मामीटर लावला तर ताप परत १०२ झाला होता. तिला तसंच सोडून कसं निघणार? नंदिनीनं घरी फोन केला, सासूबाई तिला म्हणाल्या, ‘थांब तू तिथेच. घरची काळजी नको करू. तसंही रात्री एकटी घरी येण्यापेक्षा सकाळी तिला बरं वाटलं की ये. म्हणजे आम्हाला तुझीपण चिंता नाही.
सुकन्याचा ताप वाढत होता. चार तासानंतर परत तिने सुकन्याला गोळी दिली. रात्रभर ती सुकन्याच्या कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवत राहिली. मावशी तिथेच खाली अंथरूण घालून आडव्या झाल्या होत्या. पहाटे साडेपाचनंतर ताप पूर्ण उतरला आणि सुकन्या शांत झोपली. नंदिनीचा तिथेच खुर्चीवर बसल्या बसल्या डोळ लागला. तिला जाग आली तेव्हा आठ वाजले होते. तिनं गडबडीनं घरी फोन केला. मुलं डबा घेऊन शाळेला गेली होती. मावशींनी नंदिनीला चहा आणून दिला. तोंड धुवून चहा घेतल्यावर तिला जरा फ्रेश वाटलं. मग मावशींना विचारून
स्वैपाकघरात जाऊन, तिनं तूप-मीठ घालून भाताची पेज बनवली आणि सुकन्याचं काही एक न ऐकता तिला जबरदस्तीने ती भरवली. नंतर तिला आराम करायला सांगून नंदिनी घरी गेली. मावशी तिथेच थांबणार होत्या डाॅक्टर येईपर्यंत.
नंदिनी घरी येऊन आवरून अकराच्या सुमारास पुन्हा डाॅक्टरांच्या घरी गेली. तिनं सुकन्याला हात-पाय धुवून कपडे बदलायला लावले. मग घरून नेलेलं मुगाचं सूप गरम करून तिला प्यायला लावलं. आता सुकन्या जरा फ्रेश झाली होती. तिनं नंदिनीचे आभार मानले. मावशींना तिच्या जेवणाबद्दल सूचना देऊन नंदिनी हाॅस्पिटलला कामावर गेली. पुन्हा ताप आला किंवा बरं वाटत नसेल तर फोन करायला सांगून, तिनं मावशींना आपला मोबाईल नंबर दिला. चारच्या सुमारास डाॅक्टर घरी आले. त्यांनी नंदिनीचे मनःपूर्वक आभार मानले.
सुकन्या तर नंदिनी मावशीच्या प्रेमातच पडली होती. ती अधूनमधून नंदिनीशी फोनवर बोलू लागली. नंदिनीही आईवेगळी पोर म्हणून तिला सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत राहायला बोलवू लागली. तीही कधी नंदिनीच्या हातचं इडली-सांबार, आजीच्या हातचं थालीपीठ खायला हक्कानं येऊ लागली. तिला नंदिनी, तिची मुलं आणि घरात आजी-आजोबा यामुळे नंदिनीकडचं वातावरण खूप आवडायचं. डाॅक्टर साने तिला घरी न्यायला रात्री कार घेऊन यायचे, पण ते सहसा वरती घरात येत नसत. पण घरातून काही वेळा त्यांच्यासाठी डबा भरून दिला जात असे.
नचिकेतची दहावीची परीक्षा संपली त्या दिवशी मुलांनी सिनेमा बघायचा आणि हाॅटेलमध्ये जेवायला जायचा बेत ठरवला. आजी-आजोबा नाही म्हणाले बरोबर जायला, पण मग नंदिनी आणि डाॅक्टरांना मात्र मुलं जबरदस्तीने घेऊन गेली. प्रताप कॅनडाला गेल्यापासून नंदिनीचं असं बाहेर जाणं तर बंदच झालं होतं. त्यामुळे सासू-सासऱ्यांनीही तिला जायचा आग्रह केला. सुकन्याने पण आपल्या बाबांनी आलं पाहिजे असा हट्ट धरला. डाॅक्टरांनीही आजवर स्वतःला हाॅस्पिटलच्या कामात बुडवून घेतलं होतं. बायकोच्या आजारपणामुळे असे मजेचे प्रसंग त्यांनाही दुर्मिळच होते. रात्री सिनेमा संपल्यावर नंदिनी आणि मुलांना घरी सोडून मग डाॅक्टर लेकीसोबत आपल्या घरी परतले. खूप दिवसांनी नव्हे तर वर्षांनी असा तणावरहित वेळ अनुभवायला मिळाला होता. सुकन्याचे दहावीचे क्लास सुरू होईपर्यंत मंडळी अनेकवेळा आउटिंगला जाऊन आली. नंदिनी आणि डाॅक्टर यांच्यात मुलांबाबत काही ना काही बातचीत होऊ लागली.
नचिकेतला मेडिकलला जायची इच्छा होती. त्यामुळे तो डाॅक्टर काकांशी त्याबाबत चर्चा करत असे. दोन्ही कुटुंब जवळ येत होती. हाॅस्पिटलमध्ये मात्र नंदिनी आणि डाॅक्टर कामापुरतंच बोलत असत. प्रतापचा संपर्क तर तुटलाच होता. पैसे येणंही आता बंद झालं होतं. मुलांनाही आडवळणाने का होईना हे कळून चुकलं होतं की आपले बाबा आता आपले राहिलेले नाहीत.
काळ पुढे सरकत राहिला. नचिकेत डाॅक्टर.. कार्डिओलाॅजिस्ट झाला. सुकन्या सी. ए. तर नेहा फिजिओथेरपिस्ट झाली. तिघांनी आपापले जोडीदार स्वतःच निवडले होते.
त्यानंतर नेहाने मुलांना त्यांच्या वडिलांबद्दल सत्य परिस्थिती सांगितली. दोन्ही मुलांना वडिलांचा खूप राग आला आणि आईवर ओढवलेल्या परिस्थितीचं दुःखही झालं. आपल्या भल्यासाठी ती एकटी हा भार वाहात राहिली, या जाणिवेने तिच्याबद्दल अपार कृतज्ञता वाटली. यापुढचं तिचं आयुष्य तरी सुखाचं जावं यासाठी काय करता येईल हा विचार ती दोघं करू लागली. नंदिनीचं आत्ताचं वय जेमतेम ४८ वर्षांचं होतं.
सुकन्यानेही आईच्या आजारपणामुळे वडिलांनी कोणत्या परिस्थितीला तोंड दिलं हे जवळून अनुभवलं होतं. त्यांना उर्वरित आयुष्य तरी सुख-समाधानात घालवता यावं, अशीच तिची इच्छा होती. डाॅक्टरांनी नुकतंच ५६ व्या वर्षात पदार्पण केलं होतं. तिन्ही मुलांनी आपल्या जोडीदाराबरोबर आणि मग आजी-आजोबांसोबत याविषयी चर्चा केली.
एक दिवस नंदिनीच्या सासू-सासऱ्यांनीच नंदिनी आणि डाॅक्टरांना एकत्र बोलावून असं सुचवलं, की तुम्ही दोघं कायमचं एकत्र येण्याचा विचार का करत नाही? आम्ही दोघं आता थकत चाललो आहोत. मुलं तर आपापल्या आयुष्यात पुढे जाणार होती.
प्रथम दोघांना हे रूचलं नाही. पण आपल्याला एकमेकांच्या सहवासात आनंद मिळतो आणि सुरक्षित वाटतं, हे एव्हाना दोघांच्या लक्षात आलं होतं.
विचाराअंती त्यांनी पुढील आयुष्य एकत्र काढण्याचा निर्णय घेतला होता, पण तिन्ही मुलांची लग्न झाल्यावरच! नंदिनीला सासू-सासऱ्यांचीही काळजी वाटत होती. आजवर त्यांनीच तिला भक्कम आधार दिला होता. पण त्यांनी स्वतःहून वृद्धाश्रमात राहायची तयारी दर्शविली होती. पोटचा मुलगा कायमचा अंतरला, पण सून आणि नातवंडांमुळे आपलं आत्तापर्यंतचं आयुष्य समाधानात गेलं, अशीच त्यांची भावना होती.
डाॅक्टरांनी आता कोकणात आपल्या गावी लांज्याला एक हाॅस्पिटल उभारायचं ठरवलं होतं. तिथे अल्प दरात आणि सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार रूग्णांना मिळावे, अशी सोय करण्याची त्यांची इच्छा होती. समाजाचं ऋण काही अंशी तरी फेडावं हा उद्देश होता. जुन्या घराची डागडुजी करून, शांतपणे आयुष्य घालावं असं त्या दोघांनी ठरवलं होतं. नंदिनीनं अजून प्रतापपासून घटस्फोट घेतला नव्हता. पण त्याचं त्यांना फारसं महत्त्व वाटत नव्हतं. पण आता नेहाच्या लग्नाच्यावेळी तो अचानक भारतात आल्याने, तेही शक्य होणार होतं. वकिलांशी त्या संदर्भात बोलणं चालू होतं.
नचिकेतची इच्छा असेल तर दुबई सोडून पुण्याचं त्यांचं हाॅस्पिटल त्यानं चालवावं असा प्रस्ताव. त्यांनी त्याच्यापुढं ठेवला होता. त्याची बायको रश्मी ही चाईल्ड स्पेशालिस्ट होती.
नंदिनी आजच डाॅक्टरांसोबत कोकणात जायला निघणार होती. नंतर नेहा-पराग बेंगलोरला आणि सुकन्या-सलील नाशिकला रवाना होणार होते. आजी-आजोबा एक महिनाभर आपल्या घरातच राहणार होते. शारदाबाई स्वैपाक आणि इतर कामं करणार होत्या. पुढच्या महिन्यापासून ती दोघं मुळशी जवळच्या वानप्रस्थ या वृद्धाश्रमात राहायला जाणार होती. आणि प्रताप त्यांना सांगत होता की तो आता कायमचा इथे आला आहे.
आई त्याला म्हणाली, ‘आता वेळ निघून गेली. आता इथेही तुझं कोणीच उरलं नाही, या घराच्या भिंतींशिवाय! ‘
– समाप्त –
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





