डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ कान – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

शीनाचे नवे घर असे कांही नवीन होते की जणू कांही पृथ्वीग्रहाच्या ऐवजी दुसऱ्याच एखाद्या ग्रहाच्या अंगणात पाऊल ठेवल्याचा भास होत होता. घरांच्या बाहेर माणसांच्या अस्तित्वाच्या कुठल्याच खुणा जाणवत नव्हत्या. रस्यावर मुलांच्या खेळण्याचा आवाज येत नव्हता. सडकेवर एकही प्रेमी युगल हास्य विनोद करीत रमत गमत फिरतांना दृष्टीस पडत नव्हते. रस्त्यावर ये जा करणाऱ्या माणसांनाच एखाद्या नैसर्गिक चमत्कारासारखे समजून एकही म्हातारबाबा घराबाहेरील व्हरांड्यात आरामखुर्चीवर रेलून आनंद घेतांना आढळत नव्हते.

रस्त्यांवर शांतता! घरांमध्ये शांतता! माणसांत देखील शांतता आणि फक्त शांतता!

इथला निसर्ग मात्र शांत नव्हता. वृक्षांच्या फांद्या सळसळणाऱ्या वाऱ्याचे आनंदाने स्वागत करीत त्याच्या तालावर ठेका धरीत झुलत होत्या. पुष्पसंभाराचे उमलणे आणि कोमेजणे अव्याहतपणे सुरूच होते. सुंदर फुलांची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक लहानखुऱ्या वनस्पतींच्या अंगाखांद्यांवर कोवळ्या कळ्या फुटत होत्या तर दुसरीकडे पिकलेली पिवळी पानगळ गळून पडत होती.

शीना अस्वस्थ होती. इथे जीवन असल्याची समस्त लक्षणे होती, मात्र नीरव शांततेच्या गडद धुक्यात हरवलेली! शहराचे एक टोक २४ तास गजबजलेले, तर त्याच शहराचे दुसरे टोक निर्जन आणि उजाड! एकात उत्साहाने रसरसलेल्या जिवंत माणसांची गर्दी तर दुसऱ्यात नीरव मौनाची पडछाया. इतकं असूनही एकापेक्षा एक प्रशस्त बंगले कुणाचेही मन मोहून घेत, जणू सुंदर वास्तुकलेचे कॅनव्हासवर चितारलेले आकर्षक चित्रच! या विशाल बंगल्यांतून कोणी माणूस बाहेर पडेल अशा आशेने तिचे डोळे आसपास भिरभिरत. अरे हो, माणसे नाहीत पण एखाद दुसरी गाडी गॅरेज मधून बाहेर पडतांना किंवा आत शिरतांना दिसे. या आलीशान गाड्यांचे आवाजही आलीशान होते. कधी उगाचच चिरकी फट-फट नाही, तसेच चुकूनही पों-पों हॉर्नचा आवाज ऐकू येत नसे. कुठलाही कर्णकटू ध्वनी न करता या विशाल गाड्या लागलीच गॅरेजच्या स्वयंचलित दरवाज्यांमधून सर्रकन आत घुसत.

बर्फाच्छादित वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर आलेल्या आल्हाददायी सायंकालीन वेळी या मनुष्यविहीन मार्गिका बरंच कांही सांगून जात.

बंगल्यांच्या खिडक्यांतून हलकेच बाहेर डोकावणाऱ्या मंद प्रकाशामुळे तिथे माणसे वास्तव्य करून आहेत हे कळायचे. शहराच्या किनाऱ्यावर वसलेल्या या प्रशांत आणि निवांत परिसरास शीनाने पहिली पसंती दर्शवली होती, परंतु तो इतक्या प्रमाणात शांत आणि एकाकी असेल याचे तिला खूपच आश्चर्य वाटले.

इथे बरेच कांही नवीन होते. सहज फेरफटका मारतांना आता शीनाची नजर एका फलकावर पडली. तो एक असा फलक होता जो तिने यापूर्वी कधीही आणि कुठेही पाहिला नव्हता. साहजिकच चालता चालता तिचे पाय त्याच ठिकाणी खिळले. पिवळ्या रंगाच्या त्या फलकावर लिहिले होते “कर्णबधिर मूल”! त्या कोपऱ्यापासून दुसऱ्या टोकाला गेल्यावर देखील तसाच फलक उभारलेला होता. आता उत्सुकतेपोटी ती तिसऱ्या कोपऱ्यापर्यंत गेली आणि काय आश्चर्य! तिला तिथेही परत तसाच फलक आढळला. चार दिशांना जाणाऱ्या चारही रस्त्यांच्या कोपऱ्यांवर तोच फलक ठाण मांडून बसला होता. बहुदा या लांबलचक गल्लीच्या समोरासमोर असलेल्या घरांमधील कुठल्यातरी घरात असे मूल असावे ज्याला ऐकू येत नसेल. म्हणूनच त्या रस्त्यांवर ये जा करणाऱ्या वाहन चालकांसाठी हा एक संकेत सूचक फलक होता. त्यासोबतच त्यांना ताकीद असावी, की त्यांनी हे रस्ते ओलांडताना ही बाब कटाक्षाने लक्षात ठेऊन मंद गतीने वाहने चालवावीत.

… तो फलक निव्वळ एक फलक नव्हता, ना त्यावरील एक मुलाची आकृती एक निर्जीव आकृती होती! त्यामागील संदेश म्हणजे निसर्गाने दिलेला एक निर्मम आणि निर्दयी संदेश! एक नैसर्गिक विपदा, विवशतेच्या महासागराच्या कधी उसळणाऱ्या तर कधी माघारी वळणाऱ्या अजस्त्र लाटा. अशी असह्य पीडा, जिच्या संगतीनेच एका निर्व्याज बालकाला संपूर्ण आयुष्य कंठायचे आहे.

एकाएकी त्या फलकाआडून तिच्या बाबांचा चेहरा डोकावू लागला. तेच दुःख, तीच वेदना! तिच्याकडे टक लावून बघणारे विवशतेने भरलेले त्यांचे नेत्र शीनाला त्या दिवसांकडे परत घेऊन गेले. शीनाच्या बाबांनी कर्णबधिरतेचा शाप वर्षानुवर्षे भोगला. त्याच असहाय अवस्थेत ते आयुष्याचे उरलेले दिवस कंठत होते. शेवटी त्याचा शापाचे ओझे वागवीत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या आनुवांशिक व्याधीचा प्रभाव शीनापर्यंत पोहोचला होता. इतकंच काय, बीना ही तिची लहान बहीण देखील याच व्यंगाने पीडित होती. जसजसे वय वाढत होते, तसतसे कानांनी ऐकू येणे कमी कमी होत होते. तिच्या कानांनी तर जणू असहकाराच्या पुकारला होता आणि कांहीही न ऐकण्याची जणू शपथच घेतली होती. आवाज ऐकू यायचे, पण त्यांचे अर्थ मात्र अनाकलनीय असत. तिचे कान जन्मापासून होते म्हणून आपल्या जागी निमूटपणे असण्याचे इतिकर्तव्य नाईलाजाने पार पडत होते, पण ज्यांच्याद्वारे कांही ऐकायला येत नसेल ते कान म्हणजे निरूपयोगी अस्तित्व विहीन अवयवच म्हणायचे.

ज्याच्यामुळे हा फलक लावला होता ते मूल कदाचित जन्मजात कर्णबधिर असावे. अगदीच ऐकू न येणे आणि कमी ऐकू येणे या दोहोंमध्ये बराच फरक असतो. दोन वेगवेगळ्या व्यथा. एकीत कानांनी कधी आवाज ऐकलेलाच नाही. सजावटीसाठी एखाद्या प्रदर्शनात मांडलेल्या निर्जीव वस्तूसारखे ते चेहेऱ्यावर ठेवलेले असतात. बस्स, त्याहून अधिक कांहीही नाही. दुसरीत तिच्या बाबांसारखी परिस्थिती! कोणे एके काळी कानांनी व्यवस्थित ऐकू यायचं, पण वाढत्या वयानुसार कानांनी ऐकू येणे हळू हळू कमी होत गेले. जणू काम करता करता एखादा मुलगा उद्धटपणे असहकार पुकारीत काम करायचे बंद करतो, त्याने पूर्वपदावर यावे यासाठी तुम्ही लाख प्रयत्न करता, पण सारे कांही उलट्या घागरीवर पाणी! अशा अवस्थेत कित्येक प्रकारचे ध्वनी फसफसून कानांशी आदळून परत जात. जणू समोरच्या माणसाने असे कांही षडयंत्र रचले आहे की त्याचा आवाज कानाच्या पडद्यापर्यंत पोचणारच नाही, आणि तसाच त्याच्याकडे परत निघून जाईल.

गतकाळाचे फिक्कट पिवळसर थर उलगडतांना शीनाचे विचार आता काळाच्या दरीत खूप खोलवर पोचले. त्या काळी भारतातील गावांत आवश्यक असलेल्या बऱ्याच वस्तूंचा तुटवडा जाणवत असे, मात्र शुद्ध हवा आणि स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असे. बहुतेक याच कारणामुळे आरोग्याच्या बाबतीत गाव सामान्यतः निरोगी होते. गावातील रहिवासी तंदुरुस्त, सशक्त आणि निरोगी होते.

मात्र इतके निरोगी वातावरण असूनही शीनाच्या स्वतःच्या मोठ्या घरात एक अव्यक्त व्यथा होती. कुणालाही ऐकू न येणारी वेदना, एकांतातील मुका विलाप! जर कोणी माणूस शारीरिक आजारामुळे अंथरुणाला खिळलेला असेल तर ते लगेच समजण्यासारखे आहे, मात्र जेव्हा एखादा चालताफिरता माणूस आतल्या आत आपल्या अदृश्य आजाराशी झुंजत असतो तेव्हा त्याला कोणाकडून सांत्वन कसे मिळणार? शीनाच्या बाबांचा आजारही असाच होता. त्यांचे असहाय जीवन दुःखात गेले. त्यांच्या आयुष्याचा संघर्ष विचित्रच होता, कारण त्यांना वर्षानुवर्षे ऐकू येतच नव्हते. शीनाला जेव्हांपासून समजायला लागले, तेव्हांपासून तिने त्यांना अशाच अवस्थेत पाहिले होते. बऱ्याचदा ते बोलणाऱ्याच्या हलणाऱ्या ओठांवरून अंदाज बांधायचे. तो काय बोलला, त्याने काय विचारले हे समजून घेण्याच्या आशेने ते त्याच्याकडे टकमक बघत बसायचे. वारंवार बोलणाऱ्याने आपल्या शब्दांची पुनरावृत्ती करूनही जेव्हा ती गोष्ट त्यांना ऐकू यायची नाही आणि म्हणून कळायची देखील नाही, तेव्हा ते अंदाजाने उत्तर द्यायचे. त्यांचे उत्तर बहुदा ८० टक्के चुकीचेच असायचे. पण त्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास, हिम्मत, तीव्र इच्छाशक्ती हे सर्व ढासळून पडायचे. समोर असलेला माणूस गोंधळलेल्या अवस्थेत त्यांच्याकडे बघत राहायचा. तो असंतोषाने डोके हलवत असे आणि आतल्या आत कोलमडलेले तिचे बाबा देखील निराशेने डोके हलवीत बसत.

त्या काळात कुठल्याही प्रकारचे श्रवण यंत्र गावात पोचणे शक्य झाले नव्हते. उपचारांची देखील कोणतीच व्यवस्था नव्हती. त्या जमान्यात कोणी विचारही केला नसेल की अशा कामचुकार कानांना वठणीवर आणायचा देखील उपाय असू शकतो. कधी कधी तर बाबांच्या विचित्र आणि अप्रासंगिक उत्तराने समोरच्या माणसाची हसून हसून पुरेवाट होत असे. मात्र बाबा निष्कपटपणे त्याच्या तोंडाकडे फक्त बघत बसत. हसणाऱ्याचे तर हसू थांबत असे, मात्र त्यानंतरही बाबांच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्या हसण्याचे आवाज घुमत असत. त्या तिरकृस्त क्षणांच्या टोचणीचे आवाज एखादा खिळा ठोकल्यासारखे त्यांच्या कानावर जोरजोरात आदळत असत…. ठक-ठक-ठक-ठक!

कानांत अव्याहतपणे वाजणाऱ्या या अनिश्चिततेच्या फुंकणीचे कर्कश आवाज इतर ध्वनी ऐकण्याची मुळी परवानगीच नाकारत असत. “काय? काय? काय? ” हे शब्द मुखात असे कांही ठाण मांडून बसत की, त्यांच्याशिवाय एकही प्रश्न त्यांच्या मुखातून बाहेर येत नसे. व्यवसायात, कामकाजात, दुकानात वगैरे वारंवार तेच तेच प्रश्न विचारीत ते आपले काम कसेबसे उरकत असत. मात्र घरी आणि नातलगांच्या घोळक्यात असतांना गप्पा गोष्टी करणे हे त्यांच्याकरता एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नसे. कित्येकदा तर “माझी तब्येत बरी नाही” किंवा “कामासाठी बाहेर जायचंय”, असे सांगून उठून जात ते आपली सुटका करून घेत. त्या दिवशी बाबा मुद्दामच दुकानातून रात्री खूप उशीरा घरी परतत. तोंवर मुलेबाळे, इतकंच काय, आमची आई देखील झोपी गेलेली असे.

बाहरच्या लोकांना ते या ना त्या कारणाने टाळू शकत होते, मात्र त्यांना घरच्या लोकांचा सामना करावाच लगे. शैलू या त्यांच्या मोठ्या मुलाची चिडचिड त्यांना त्रस्त करीत असे, तीक्ष्ण काट्यांसारखी खोलवर रुतून जखम करीत असे. यासाठी ते स्वतःलाच अपराधी समजत. जणू त्याने सांगितलेली गोष्ट न ऐकू येणे हा त्यांचाच खूप गंभीर गुन्हा होता! बाबूजींपर्यंत आपले शब्द पोचवण्यासाठी शैलू खूप ओरडून बोलायचा. इतक्या जोरात की बाबा लगेच त्याला म्हणत, “ओरडू नकोस रे. ”

पुन्हा बोलावे लागू नये म्हणून तो आपली सर्व शक्ती एकवटून आणि आणखीनच आकांताने ओरडून त्यांना म्हणायचा, “असं जोरात ओरडल्यावरच तर तुम्हाला ऐकू येतंय”. असे आकांडतांडव करीत शैलू रागाने लाल झालेला नाकाचा शेंडा फेंदारीत फरशीवर धड धड पाय आपटत बाहेर चालला जात असे. धाडकन दरवाजा बंद केल्याचा आवाज नंतर कितीतरी वेळ खोलीत घुमत राहायचा. शैलूचे चिडचिड करणारे तरुण लालभडक डोळे बाबांच्या वयस्कर झालेल्या डोळ्यांना भिडल्यावर जणू आग ओकत असत. त्याच्या डोळ्यातले भाव बाबूजींना लगेच वाचता येत असत. झालेल्या अपमानाचा असा दारुण अनुभव आल्यावर त्यांच्या मनात क्रोध आणि निराशेसोबतच असहाय्यतेच्या गडद सावल्याही झाकोळून येत. अशा प्रकारे शैलूला दरवाजातून बाहेर जातांना बघत ते अपेक्षेने मागे वळून बघत. कदाचित आमच्या आईच्या नजरेत सहानुभूतीच्या रेषा दिसतील अशी त्यांना किमान आशा असे, कुणीतरी जखमेवर नरम कापसाचा बोळा हलकेच फिरावावा तशी! पण त्यावेळी त्यांना फक्त वळून मागे फिरणाऱ्या आईची पाठच नजरेस पडत असे.

तीन मुले आणि पत्नी, या आपल्याच कुटुंबीयांसमोर बाबा अगदी असहाय होऊन जायचे. घरातील इतर सर्वजण एकमेकांबरोबर गप्पा मारायचे. हास्यविनोद करतांना घरात एकच हास्यकल्लोळ उडायचा. बाबांना काही एक समजत नसे. त्यांना वाटायचे की त्यांच्या घरातली माणसे देखील त्यांची खिल्ली उडवण्यात मागे पुढे पाहत नाहीत.

– क्रमशः भाग पहिला 

हिन्दी कथालेखिका : सुश्री हंसा दीप 

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments