डाॅ. मीना श्रीवास्तव
जीवनरंग
☆ कान – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
डॉ. हंसा दीप
(हास्यविनोद करतांना घरात एकच हास्यकल्लोळ उडायचा. बाबांना काही एक समजत नसे. त्यांना वाटायचे की त्यांच्या घरातली माणसे देखील त्यांची खिल्ली उडवण्यात मागे पुढे पाहत नाहीत.)
इथून पुढे – – –
उजव्या कानाच्या मागे हात ठेऊन ते त्याला पुढे ओढण्याचा प्रयत्न करायचे. जणू कांही आपल्या कानालाच ते बजावत, -” जा रे बाबा, कांही ऐकू येत असेल तर बघ. ” पण अडेलतट्टू आणि नालायक मुलासारखा त्यांचा कान वळून बघत परत सरळ व्हायचा, जणू एखादे रंगहीन आणि अर्थहीन बिना पत्त्याचे पत्र उलट टपाली घरी परत यावे. डावा कान देखील उजव्या कानाचे अनुकरण करायचा. कुठल्याही आवाजाशी देणे घेणे नसलेला तो कुठलाच संदेश पोहोचवायचा नाही. वैतागून जणू त्यांना शिक्षा देण्यासाठी बाबा आपल्या दोन्ही कानांना ओढत बसायचे. पण खरे तर ती शिक्षा त्यांच्यासाठीच होती.
कित्येकदा तर समोर बसलेल्या माणसाला बघून बाबा हसण्याचा अभिनय देखील करत, इतके पोकळ हास्य की त्यामुळे ते स्वतःच आतून पूर्णपणे कोलमडून पडत. समोरच्या माणसाशी ते इतक्या जोराने बोलत की तो घाबरून जाई. ते अजून काय करू शकत होते? त्यांना वाटायचे की ते हळू बोलले तर समोरचा माणूस ते ऐकू शकणार नाही. त्यांचे पौरुष वैतागून चिडचिड करायचे. घरातील सदस्य त्यांच्यापासून नजर चोरायचे. ह्या लहान लहान गोष्टी असूनही त्यांना खूप तीव्रतेने टोचायच्या, त्यांना मनातल्या मनात सतत सलत राहायच्या. या मानसिक यातना सतत झेलत राहिल्याने त्यांच्या स्वभावात बदल झाला तो कायमचाच! पांढरेसफेद कडक इस्त्रीचे कपडे बाबांच्या मनातील सुरकुत्यांना मात्र वाचवू शकत नव्हते. मनावर पडलेल्या त्या मोडक्या तोडक्या अढ्या आणि सुरकुत्या कधी कधी बाहेर येऊन त्यांच्या वैयक्तिक जीवनाला आपल्या आडव्या तिडव्या रेषांमध्ये गुंतवून ठेवीत.
बाबा जिवंत असतांना त्यांच्या या असहायतेबाबत कुणी कधीच विचार केला नव्हता, ना शीनाने, ना तिची लहान बहीण बीनाने. शैलू तर तसाही बाबांबद्दल कधीच विचार करीत नसे. बाबाच काय, कुणाचाही विचार करणे त्याच्या स्वभावातच नव्हते. उरली ती आई, ती सदासर्वदा घरकामांत अडकून बसलेली असे. बाबांच्या या नैराश्याला त्यांच्या स्वभावाचेच एक अंग मानून ती गप्प असे. आपल्या लाडक्या मुलाला, शैलूला तर ती कधीच नाराज करीत नसे. उलट त्याला समजावत ती म्हणे, “बेटा, तू आपल्या बाबांना तर ओळखतोस ना! त्यांना रागवायची सवयच आहे. ”
बाबांची ही तीक्ष्ण वेदना त्यांच्या स्वभावात भिनली होती. त्यामुळे त्यांच्या एकाकीपणाला आणखीनच खतपाणी मिळत होते. त्यांच्या कानाच्या या अकार्यक्षमतेने त्यांना कुठेच थारा मिळत नव्हता, अगदी घरीही. बाबा शेवटच्या श्वासापर्यंत एका विचित्र अव्यक्त कोंडमाऱ्यात जीवन कंठीत होते. फक्त मृत्यूद्वारेच या दुष्टचक्रातून त्यांची सुटका होऊ शकली. त्यांची सर्वात जीवघेणी व्यथा ही असावी की त्यांचे दुःख कोणीही समजू शकत नव्हते. त्यांचे तक्रार करणारे डोळे आईलाही म्हणायचे – “किमान तू तरी मला समजून घे! ”
आई आपल्या लाडक्या मुलाच्या चिडचिड करण्याचे यथायोग्य कारण देत बाबांच्या शांततेत भरच घालीत असे. शीनाला देखील आपल्या बाबांचे दुःख तेव्हा जाणवले जेव्हा तिला स्वतःला कमी ऐकू यायला लागले. दिवसाच्या कित्येक वेळा जेव्हा तिला नीट ऐकू येईना, तेव्हां त्या प्रत्येक क्षणी बाबांचा अगतिक चेहरा तिच्या मनाच्या आत खोलवर सामावून जात असे. तेच दुःख कित्येक पटीने वृद्धिंगत होत आतल्या आत तडफडत असे. परदेशात वास्तव्यास असतांना पहिल्या मुलाच्या जन्मानंतरच तिला हे जाणवू लागले होते. कोण काय बोलतंय हे तिला नीटसे समजत नव्हते. दुसऱ्यांचे शब्द जणू रेशमी धाग्यांसारखे एकमेकांत गुंतत जायचे. या रेशीमगाठी सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतांना त्यांची गुंतागुंत आणखीनच वाढत जाई. त्या अर्थहीन शब्दांचे अनेक असंबद्ध अर्थ निघायचे. ती कधी काहीतरी बोलत असे, तर कधी कांहीच बोलू शकत नसे. जग आपली थट्टा करेल याची तिला भीती वाटत असे. कित्येकदा कोणी कांहीही बोलले किंवा विचारले तरी ती आपली मान हलवून सहमती दर्शवायची. मग ती प्रश्नार्थक नजरेने समोरच्या माणसाकडे पाहायची जणू तिच्या कानांनी कदाचित बरोबर अंदाज लावला असावा. पहिल्यांदाच, अशाच कांही न ऐकू येण्याच्या प्रसंगावर तिच्या स्वतःच्या पतीने म्हटले होते – “तुला कामाची गोष्ट बरोब्बर ऐकायला येते. बाकीच्या गोष्टी मात्र ऐकू येत नाहीत. ”
त्या क्षणी, तिच्या अकार्यक्षमतेच्या तीव्र पीडेमुळे तिला जाणीव झाली की बाबूजींनी आयुष्यभर किती मानसिक त्रास सहन केला असेल, जेव्हा की शीनाला हे सर्व जास्त काळ सहन करावे लागले नाही. जोवर हा जनुकीय दुष्परिणाम शीना आणि बीना या दोन मुलींपर्यंत पोहोचला, तोवर वैद्यकशास्त्राची प्रगती घराघरात पोहोचली होती. शीनावर एक लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आमोरासामोर होणारे संवाद चांगल्या प्रकारे सुरु झाले होते. बस, कोण्या इतर खोलीतून आवाज आला तर ऐकायला येणे कठीण जायचे. शीनाच्या शस्त्रक्रियेनंतर बीनावर देखील असाच शल्योपचार करण्यात आला. मात्र शस्त्रक्रियेनंतरही नीट ऐकू न येण्याची भावना संपूर्णपणे कधीच नाहीशी झाली नाही. आजही असे अनेकवार असे घडते. ऐकू आल्यानंतरही असे वाटत राहते की कदाचित आपल्याला ऐकू आले नाही.
या फलकावर ‘कर्णबधिर मूल’ असे शब्द वाचताक्षणी, त्या सर्व आठवणी ताज्या होऊन एकामागून एक अखंडपणे पाझरू लागल्या. त्या मुलाच्या वेदनेशी एकाकार होऊन आत खोलवर दबलेले अतीत उकरताच त्याची टोकदार टोचणी तिला सलायला लागली. जेव्हा शरीराचा कोणताही भाग त्याच्या कर्तव्यापासून विमुख होतो तेव्हा मानवी मेंदू किती एकाकी होत असतो, असहाय्य आणि विवश! जर हे मूल जन्मापासूनच बहिरे असेल तर ते त्याचे आयुष्य कसे कंठणार कोणास ठाऊक! आता तर म्हणे ए आय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची देखील मदत मिळू शकते. या मुलाबाबत कदाचित असे झालेले नसावे. म्हणूनच तर सरकारकडून हे फलक लावण्यात आलेले आहेत. कोणाचाही आवाज न ऐकता माणूस कसा जगू शकतो! अशा परिस्थितीत तो आयुष्यभर स्वतःशीच बोलेल. स्वतःच ऐकेल आणि स्वतःच उत्तर देईल!
आवाजाशी पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या त्या निरागस मुलासाठी हा शब्द निरर्थक होता. या मार्गावरील प्रत्येक घरावरून जातांना शीनाला विचार करीत होती की, हे मूल कुठल्या घरात राहत असेल. तिला त्याला एकवार तरी बघायचे होते. तिला स्वतःचे दुःख त्याच्यापुढे व्यक्त करायचं होतं. त्याला सांगायचं होतं की येणारे दिवस त्याच्यासाठी कसे असतील? किंवा ऐकू न येताही तो पेन, ब्रश, छिन्नी-हातोडा किंवा इतर कोणत्याही कलेच्या माध्यमातून आपली क्षमता सिद्ध करू शकेल. जिथे त्याला स्वतःला बोलावे लागणार नाही, तिथे त्याच्या कलेनेच शब्द धारण करावेत, अशा शब्दांनी लोकांना मोहून घ्यावे आणि प्रशंसा करणाऱ्या कैक लोकांच्या डोळ्यांतून त्याचे कौतुक ओसंडून वाहावे. त्याला या माध्यमातून जे जे बोलायचे आहे ते ते समजून घेण्याचा त्या रसिकांनी प्रयत्न करावा.
ओठांच्या आकारावरून कितीतरी शब्द समजू शकतात! सांकेतिक भाषेचीही त्याला मदत होईल. पण हजारोंपैकी फक्त एकालाच त्या सांकेतिक भाषेचे ज्ञान असू शकते. आज, जेव्हा मुले त्यांचा बहुतेक वेळ आयपॅड आणि फोनच्या सानिध्यात घालवत असतात, तेव्हा हे मुलाचे जग त्याच्या मूक जगात बंदिस्त राहिले असावे.
आधी तर तिला त्या रस्त्यावर एकही मूल दिसले नाही, आणि तिने एखाद्याला पाहिले तरी तिचे मन अंदाजच लावीत बसायचे की कदाचित हा मुलगा तोच तर नव्हे! तिच्या विचारांच्या गुंत्यात सायकल चालवणाऱ्या, हॉर्न वाजवणाऱ्या, समोरच्या वाहनाशी टक्कर झाल्यानंतर खाली पडणाऱ्या मुलाच्या अपघाताच्या भयंकर दृश्यांची मालिकाच दृश्यमान व्हायची. वेदनेचा सूर आणि स्वराचा राग एकच होता, यदाकदा वाजत असायचा. किंबहुना असेही म्हणता येईल की त्या स्वरात कुठलाच राग समाहित नव्हता. होती ती निव्वळ नीरव शांतता, बाबांच्या, तिचीच्या स्वतःची, तिच्या धाकट्या बहिणीची बीनाची, आणि त्या अज्ञात मुलासोबत
अवचितपणे निर्माण झालेली अनुभूती, एकमेकांशी जोडलेली एक अनवरत वेदना!
भूतकाळातील आणि वर्तमानातील त्या क्षणांमागे वेड्यासारखे धावण्याची कित्येक कारणे समोर आली. या घाईगडबडीत धावतां धावता ऊर भरून येतांना आणि काळीज धडधडत असतांना शीनाच्या मनात अवचितच एक विचार आला -” ऐकू न येणाऱ्यांना निसर्गाने ती कर्णक्षमता दिलेली नसते. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांना ऐकू येत असतांना देखील ते ऐकत नाहीत. ऐकणाऱ्यांना ती क्षमता दिलेली असूनही बरेच लोक आहेत जे ऐकल्यानंतरही ऐकत नाहीत. ” त्यांच्यासाठी वापरल्या जाणारे सामान्यतः शब्द असत, “नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे”. अर्थात तुम्ही कांहीही आणि कितीही सांगितले तरी कांही लोक एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात. शीनाच्या मोठ्या भावाला, शैलूला बाबांनी कांहीही सांगितले तरी तो त्याकडे कानाडोळा करून चालला जात असे. प्रत्येक ठिकाणी असे कितीतरी शैलू असतील! शासन, सत्ता, खुर्चीने माजलेले शैलू!
***
आता फिरत असतांना जाणवणारी गुलाबी थंडी ऋतूपरिवर्तनाचे संकेत देत होती. काही दिवसांतच बर्फाच्छादित उंच सखल जमिनीवर अशा प्रकारचे चालणे पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलले जाईल. शीनाच्या पायांनी ‘कर्णबधिर मूल’ च्या फलकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून कधी मार्गक्रमण करायला सुरुवात केली हे तिचे तिलाही कळले नाही. तिने वाटेवरील चार पाचच घरे ओलांडली असतील, तेव्हां तिला एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत खेळताना दिसला. त्याचे वडील त्याच्या हाताच्या बोटांनी सांकेतिक भाषेत त्याला खेळाबद्दल काहीतरी समजावून सांगत होते. ते मूलही आपल्या डोळ्यांनी त्या संकेतांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याला आपल्या वडिलांच्या संकेतांचा अर्थ समजला आहे असे तो त्यांना संकेतांनीच समजावून सांगण्याचा आणि संवाद साधण्याचा यत्न करत होता. वडिलांचे बोलणे समजून उमजून त्यांना तो प्रतिसादही देत होता. त्याक्षणीच शीनाला वाटले की कदाचित हे तेच मूल असावे जे आपल्या वडिलांशी ‘सांकेतिक भाषेत’ बोलत होते.
त्याच क्षणी, त्या खेळणाऱ्या मुलाचा चेंडू घसरत येत शीनाच्या समोर येऊन पडला. तिने खाली वाकून चेंडू उचलला आणि मुलाला परत केला. मुलाने प्रेमभराने आभार व्यक्त करण्याचा संकेत करीत स्वतःचा उजवा हात आपल्या हनुवटीवर ठेवला. शीनाच्या डोळ्यांनीही तितक्याच प्रेमाने प्रतिसाद दिला. मुलाच्या त्या आभार मानण्याच्या गोंडस संकेतात जणू हरवून जात स्मितहास्य करीत शीनापुढे जात राहिली. तोवर तिला दुसऱ्या कोपऱ्यावरील तो फलक परत दृष्टीस पडला. आज मात्र त्या फलकावरील आकृती हसत खेळत, जिवंतपणाने रसरसलेली आणि चक्क बोलतांना दिसत होती. मुलाच्या डोळ्यातील चमक कुणास ठावे कशी त्या फलकात सामावून गेली होती. अत्यंत बोलके डोळे! पाहणारे, त्या नजरेतून शिकणारे, समजून घेणारे आणि त्यासोबतच ऐकणारे भावपूर्ण डोळे. त्या मुलाचे डोळे कानांची जबाबदारी देखील अतिशय उत्तमरित्या पार पाडायला शिकलेले आहेत हे बघून शीनाला अंतरंगात आत्यंतिक समाधान वाटत होते.
– समाप्त –
हिन्दी कथालेखिका : सुश्री हंसा दीप
मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






