डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ जळता निखारा… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(गौरीला फार वाईट वाटायचं. या सुंदर मुलीच्या नशिबी हे सुख लिहायला देव कसा विसरला. का असा शाप या निष्पाप जिवाला? ” गौरीच्या जिवाला घोर लागायचा.)
इथून पुढे – –
आता प्रसन्न रिटायर झाला. आजपर्यंत त्या दोघांना कुठेही ट्रीपला, बाहेर जाता आलं नाही.
यावेळी मात्र गौरी म्हणाली, “ आपण जाऊया ना हो एकदा तरी परदेशी ट्रीपला. कधीही गेलो नाही आपण दोघेच असे. आपल्या सोसायटीतल्या बर्वे गोखले फॅमिली जात आहेत दोघे दोघे. जायचं का आपण? ”
प्रसन्न म्हणाला, ”अग पण मग विभाचं काय करायचं? का तिला घेऊन जायचं? ”
“नको नको. आपणच जाऊ की हो फक्त दोघे. फक्त एकच महिन्याचा प्रश्न आहे. येताना आपण माझ्या मावस बहिणीकडे पण लंडनला जाऊन येऊ. किती वर्षे ती तिकडे आहे आणि आपल्याला बोलावतेय की. असे फक्त महिनाभर जाऊन येऊया. मी शुभाला विचारू का? विभाला महिनाभर ठेवून घेतेस का तुझ्या घरी? ती नाही म्हणायची नाही असं वाटतंय. ”
प्रसन्न म्हणाला, “ बघ विचारून. पण जमणार नसेल तिला तर मग आपल्याला जाता येणार नाही गौरी.”
शुभाचा बंगला मोठा होता. मागे पुढे अंगण, छान बाग, मागे झोपाळा. नशीब काढलं होतं शुभानं. गौरीच्या मनात आलं.
गौरी शुभाच्या घरी गेली. शुभाला सुट्टीच होती त्या दिवशी. तिच्या सासूबाईंनी स्वागत केलं शुभाचं.
”या या गौरीताई. किती दिवसानी आलात. साहिल ची आठवण येते की नाही? बघा तरी किती गुंड झालाय हल्ली.” साहिलला झोपाळ्यावर घेऊन बसत त्या हसून म्हणाल्या.
गौरी हसत म्हणाली ”नाही कशी येत या गुंडूची आठवण.. पण शुभा आणते ना दर रविवारी त्याला. रमतो अगदी तो “
गौरी आत गेली. शुभाच्या बेडरूममध्ये दोघी बसल्या.
“काय ग आई? आज अचानकच? ”
“शुभा, तुला एक विचारायचं होतं. अग आपल्या सोसायटीतली जोडपी चालली आहेत युरोप ट्रिप ला. आम्हाला आग्रह करत आहेत या म्हणून. मग तसेच लंडनला तुझ्या शशीमावशीकडे जाऊन येऊ.
तर तो महिना विभा तुमच्याकडे राहू देत का? म्हणजे मला अजिबात तिची काळजी रहायची नाही. तिला एकटीला कशी सोडू आपल्या घरी मी? ” गौरीच्या डोळ्यात पाणी आलं.
शुभा तिच्याजवळ बसली. ”आई, जरूर जा तुम्ही. मी नक्की संभाळीन विभाला. त्यात काय एवढं ग? सासूबाई पण नाही म्हणणार नाहीत. एकच महिन्याचा तर आहे ना प्रश्न? जा तुम्ही. तसेही तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही ग विभामुळे. ओळखीचे लोक जात आहेत तर जरूर जा.”
निर्धास्त होऊन गौरी घरी आली.
संध्याकाळी शुभाने समीरला सांगितलं. ” आपल्याकडे विभाला महिनाभर येऊ दे ना? आईबाबांना बिचाऱ्यांना कधीच कुठं जाता येत नाही. मी हो म्हटलं म्हणून तू रागावला नाहीस ना समीर? ”
समीर म्हणाला, “फार गुणी आहेस तू शुभा. याच तुझ्या सरळ साधेपणावर मी भाळलो ना? अग येऊ दे तिला. मी कसा रागावेन तुझ्यावर?”
आणि मग गौरी प्रसन्न निर्धास्त मनाने, विभाला शुभाकडे पोचवून ट्रीपला गेले.
शुभाच्या सासूबाईंना विभा आलेली फारसं रुचलं नाही असं वाटलं शुभाला. एरवी त्यांचं आणि शुभाचं अतिशय पटायचं. होत्याच त्या हुशार आणि मनमिळाऊ. शुभा सारखी गोड मुलगी घरात आल्यावर त्यांना आनंदच झाला. समीर एकुलता एक असल्याने त्यांची मुलीची हौस राहिलीच होती. दोघी सासू सुना खूप मजा करत. खरेदी करायला बरोबर जात. हॉटेलात दोघीच जाऊन छान एन्जॉय करत. कदाचित आपण त्यांना न विचारताच विभाला इकडे आणलं म्हणून त्यांना राग आला असेल असं म्हणून शुभाने तो विषय कानामागे टाकला.
विभा पहिल्यांदा बुजली पण मग रुळली शुभाच्या घरात. छोटा साहिल तर सतत तिच्या बरोबर असायचा. त्याला घेऊन ती झोपाळ्यावर बसली की सासूबाई काहीतरी काम काढून तिच्याजवळ बसायच्या. न जाणो, चुकून तो हिच्या हातून पडला तर?
त्या दिवशी शुभाला ऑफिस चं काम होतं म्हणून ती ऑफिसला गेली आणि समीर घरीच होता. विभा एकटीच बागेत झोपाळ्यावर बसली होती. मोठे झोके घेत असताना तिची ओढणी वाऱ्यावर उडत होती. केस मोकळे सुटून झोक्याबरोबर पंख्यासारखे पसरत होते. तिचा चेहरा आनंदाने फुलून लालबुंद झाला होता नुसता. अनिमिष डोळ्यांनी समीर तिच्याकडे बघत उभा होता. काहीतरी कामासाठी सहज बागेत आलेल्या सासूबाईंनी समीरकडे बघितलं. विभाकडे बघत असलेली त्याची नजर त्यांना वेगळंच सांगून गेली. आपल्या आईची चाहूल लागताच, तिची नजर चुकवत समीर घरात निघून गेला. सासूबाईंच्या पोटात धस्स झालं पण तरीही असं नसेल म्हणून त्यांनी आपल्या मनाची समजूत घातली. विभाचं अप्रतिम लावण्य कोणालाही भुरळ घालेल असंच होतं.
त्या दिवशी ती बागेत झाडांना पाणी घालत होती. तिचा घरातलाच गाऊन भिजून गेला होता. वर खोचलेल्या गाऊन मधून तिचे गोरेपान नितळ गुडघे आणि पोटऱ्या दिसत होत्या. पुन्हा एकदा सासूबाईंना समीर तिच्याकडे भान हरपून बघताना सापडला. पुन्हा त्यांची नजरा नजर झाल्यावर समीर आत निघून गेला. आता मात्र सासूबाई बेचैन झाल्या. चाणाक्ष आणि अनेक पावसाळे बघितलेल्या त्या बाईना हे लक्षण ठीक दिसलं नाही.
त्यांना शुभाशी एकटीला बोलायची संधी मिळत नव्हती. अचानक, त्या दिवशी समीर घरी नव्हता पण शुभा घरात एकटी होती. , साहिलला घेऊन त्याला संभाळणारी मुलगी आणि विभा बागेत गेल्या होत्या. सासूबाईंनी शुभाला हॉल मध्ये बोलावलं.
“शुभा, जरा आपला चेहरा आरशात नीट बघितला आहेस का? किती ओढलेला चेहरा, हे कळकट गाऊन, कधी केस नीट शेप देऊन कापलेले नाहीत. बघते आहेस ना?”
हसून जवळ बसत शुभा म्हणाली, “ हे काय आज सासूबाई? मी नेहमीचीच तर आहे तुमची शुभा”
सासूबाई गंभीरपणे म्हणाल्या, ”हो. पण गोष्टी बदलण्याच्या आत डोळे उघडून बघ बायो. तू विभाला घरी आणलं आहेस ते चांगलंच केलंस. ती आणि तू जुळ्या बहिणी ना? तिचा चेहरा, कांती रूप बांधा कुठेही जराही धक्का लागलेला नाहीये. आणि तू? बघ निरखून स्वतःकडे शुभा. तिची थोरली बहीण दिसतेस तू हल्ली. ”.. त्यांनी काय झालं आणि स्वतः पाळत ठेवून बघितलेलं तिला सांगितलं.
“ शुभा, माझा मुलगा लाखात एक आहेच ग. पण शेवटी तो पुरुष आहे बाळा. त्या रूपाचा त्याला मोह पडणारच. ती आहेच तशी अप्सरा. हे बघ माझ्या सुने, काही विपरीत घडायच्या आत ही जोखीम तू आईबाबांकडे नेऊन पोचवावीस हे उत्तम. दोन दिवसात ते येत आहेत ना? आता हिला अजिबात जास्त ठेवून घेऊ नकोस. तिला बुद्धी कमी आहे, समज उणी आहे हे असलं तरी तारुण्य मुसमुसतं आहे नुसतं. पुरुषाला हेच फक्त हवं असतं मुली. फक्त सुंदर शरीर. तू वेळीच शहाणी हो. विपरीत घडूच देऊ नकोस. अग बाईसारखी बाई असून मला तिच्याकडे बघावंसं वाटतं, तर समीर तर पुरुष आहे बेटा.
हा जळता निखारा घरी आणून आपल्याच सुखी संसाराला आग नको लावू शुभा. पटतंय का? आणि आत्ताच नव्हे तर पुन्हा कधीच आणून विषाची परीक्षा बघू नकोस मुली. अडचण असली तर तू माहेरी रहायला जात जा पण ही जोखीम इथे आणू नकोस. ”
.. शुभा तिथून उठून गेली.
रात्री तिने निष्पापपणे झोपलेल्या आपल्या बहिणीकडे बघितलं. झोपेत तिचा गाऊन वर गेला होता आणि मांड्या उघड्या पडल्या होत्या. केस डोळ्यावर महिरप करत होते आणि निरागस विभा झोपेत हसत होती. शुभाने तिचा गाऊन खाली केला. हळुवारपणे तिला मायेने पांघरूण घातले. अत्यंत प्रेमाने तिचा पापा घेतला. सगळ्या जगाची माया तिच्या पोटात दाटून आली. या भाबड्या जिवासाठी तिचा जीव नुसता कासावीस झाला.
दुसऱ्याच दिवशी शुभाने विभाला मार्केटमध्ये नेले. ती अगदी हरखून गेली. तिला शुभाने कितीतरी छान ड्रेस गाऊन, कायकाय तरी घेऊन दिले. नव्या लेदरच्या बॅगमध्ये हे सगळं भरलं.
“सासूबाई, आज विभाला आईबाबांकडे पोचवून येते हं. ” भरल्या डोळ्यांनी शुभा म्हणाली.
तिने त्यांना मिठी मारली. “ थँक्स थँक्स सासूबाई. माझ्या हे कधीही लक्षात आलं नसतं हो. जग माझ्या सारखं सरळ साधं आहे असंच वाटतं हो मला. पण तुम्ही किती शहाण्या आहात. थँक्स. मला सावध केल्याबद्दल. आणि वेळीच माझा संसार वाचवल्या बद्दल पण. मी आता जरा स्वतःकडे पण लक्ष देईन “.
शुभाने आपली कार काढली आणि विभाला शेजारी बसवून म्हणाली,
“ चला! जायचं ना आपल्या आईबाबांकडे?”
– – आणि वळणं घेत शुभाची कार माहेरच्या रस्त्याला लागली.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





