☆ हेतू – – (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघःश्याम सोनवणे ☆
आमच्या घरातला तो तपकिरी रंगाचा सोफा माझा खूपच आवडता होता… बाबांनी तो मुंबईहून मागवला होता. मी त्याच्या मऊ गादीवर उड्या मारायचो… कधीकधी मी त्यावर झोपायचोही. ताई चे, माझ्या बहिणीचे लग्न ठरले तेव्हा सोफा येऊन एक महिन्यापेक्षा कमीच वेळ झाला होता… लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती. बाबांनी लग्नासाठी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून आणि बँकेतून सर्व पैसे काढले होते. लग्न मोठ्या थाटामाटात साजरे झाले.
बाबांनी माझ्या बहिणीच्या सासरच्यांना लग्नासाठी खूप सामान पाठवले होते… मला आठवतही नाही की काय काय पाठवले होते. मी माझ्या आईला विचारले होते की माझ्या बहिणीचे लग्न झालेल्या घरात अशा वस्तू नाहीत का… आईने माझ्याकडे हसत हसत पाहिले आणि म्हणाली, “सर्व काही आहे बेटा, पण हे सर्व मुलींच्या लग्नाच्या वेळी द्यावेच लागते… “
ताई आता नवीन पलंगावर झोपेल याचा मला आनंद झाला… ताई आता नवीन खुर्चीवर बसेल…
लग्न तर पार पडले होते, पण लग्नानंतर काही दिवसांनी, जेव्हा मी शाळेतून घरी परतलो तेव्हा मला घराबाहेर एक ट्रक उभा असलेला दिसला… बाबा त्यावर आमचा तपकीरी रंगाचा सोफा ठेवत होते. मी धावत खोलीत गेलो. मी बाबांना विचारले, “आपला सोफा कुठे चालला आहे, मग आता मी कुठे बसणार?”
बाबा म्हणाले, “पुढच्या महिन्यात आपण एक नवीन सोफा घेऊया. “
आमचा सोफा ताईच्या घरी गेला होता… नंतर आमच्या घरी कधीच नवीन सोफा येऊ शकला नाही… आम्ही खोलीत लोखंडी खुर्च्या ठेवल्या होत्या, पण मला त्यावर बसण्याची अजिबात इच्छा होत नव्हती.
ताई च्या लग्नाला सहा महिने झाले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच ताई आईला भेटायला आली तेव्हा ती खूप रडत होती. आई बराच वेळ तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती… आई म्हणत होती, “आपण तरी काय करू शकतो? काही लोकांचे मन कधीच भरत नाही… पण वेळ सर्वकाही ठीक करेल. ” मला संपूर्ण गोष्ट समजली नाही, पण आई मनाच्या हेतूंचे महत्त्व समजावून सांगत राहिली.
लग्नानंतर काही महिन्यांनी, ताईचा धाकटा दिर आमच्या भाऊजींसोबत आमच्या घरी आला होता. तो माझ्याच वयाचा असावा. पण जेव्हा तो आमच्या घरी आला तेव्हा असं वाटलं की जणू काही कुणी खास महत्वाचा पाहुणा आला आहे. आई रोज सकाळी ताईच्या दिराला ग्लास भरून दूध द्यायची. त्याचं आवडतं जेवण घरी बनवलं जायचं… बाबा त्याला सतत सोबत फिरायला घेऊन जायचे…
ज्या दिवशी तो जाणार होता, त्या दिवशी त्याच्यासाठी खूप नवे कपडे खरेदी केले गेले होते. पहिल्यांदाच मला वाटले की मी कधी कुणाचा दिर बनेन… असो, ज्या दिवशी माझे भाऊजी परत जाणार होते, त्या दिवशी माझ्या ताईच्या दिराने त्याला माझा कॅरम बोर्ड पाहिजे असा आग्रह धरला.
माझा कॅरम बोर्ड… मला तो माझ्या जीवापेक्षाही जास्त आवडता होता. मी माझ्या मित्रासोबत रोज संध्याकाळी कॅरम खेळायचो. मी तो माझ्या ताईच्या दिराला का देऊ? पण बाबांनी मला समजावले, “बेटा, तू तो त्याला दे… ”
“मी देणार नाही… तो माझा आहे… ”
“मी तुला एक नवीन घेऊन देईन… ”
“तूम्ही म्हणाला होतात की आपण एक नवीन सोफा घेऊ… तो तरी कुठे आला बाबा… “
बाबा गप्प बसले, पण माझा कॅरम बोर्ड माझ्या बहिणीच्या दिराला देण्यात आला होता… त्यानंतर चाळीस वर्षे उलटून गेली आणि मी कॅरम कधीच खेळलो नव्हतो. कॅरम बोर्ड गेला होता. मी माझ्या बहिणीच्या दिराला माझा कॅरम बोर्ड दाखवल्याबद्दल मलाच वाईट वाटत होते, राग येत होता. मी बरेच दिवस दुःखी होतो. मग मी माझ्या आईला विचारले की माझ्या भाऊजींनी त्यांच्या धाकट्या भावासाठी नवीन कॅरम बोर्ड का खरेदी केला नाही. त्यांनी माझा सोफा आणि कॅरम बोर्ड का घेतला. ”
पहिल्यांदाच, माझ्या आईने मला सांगितले, “काही लोकांचे हेतू कधीच पूर्ण होत नाहीत, बेटा… माणसाचे पोट भरलेले असो वा नसो, त्यांचे हेतू मात्र पूर्ण झालेच पाहिजेत. ” असे म्हणत, माझ्या आईने तिचे डोळे पुसले आणि मला तिच्या पदरात घेतले.
बरीच वर्षे उलटून गेली. आता मला सोफा ही आवडत नाही, कॅरम बोर्डही नाही…
एके दिवशी, दिल्लीतील एका मॉलमध्ये जेवत असताना, बर्गरची जाहिरात पाहून मी थबकलो… त्यावर लिहिले होते, “पोट भरेल, पण मन नाही… मी माझी पत्नी सुधाला म्हटले की हे कंपनीचे लोक अशी चुकीची माहिती देतात. ते म्हणतात की पोट भरेल, मन नाही…. ‘पोट भरले नाही तरी मन भरेल’ असे लिहायला पाहिजे होते… पोट भरण्यापेक्षा हेतू पूर्ण करणे, मन भरणे जास्त महत्वाचे आहे. या जगात, ज्याचं मन भरलेलं नाही, त्याच्याकडे सर्व काही असूनही, ते दुसऱ्यांच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करतात, ज्यांचे मन समाधानी नसते… त्यांच्या घरात कोणाचीही बहीण आनंदी राहू शकत नाही, व स्वतः ते ही नाही.
हिंदी कथा लेखक – अनामिक
मराठी अनुवाद – श्री मेघःश्याम सोनवणे
नाशिक.
9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





