श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ जीर्णोद्धार…  भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

“अवं धनी, इथं बसून कशापायी काळजी करत बसलायसा? यीळभर देवळात तरी जाऊन बसा. इट्टल रखमाईकडं बघत बसचाल तर मनाला शांत वाटंल बघा. आता आरती करून भटजी निघून जात असतील बघा. ” कारभारणीनं सांगितलं की हा गडी कधी न्हाई म्हणायचा नाही. ‘तिचा शबुद म्हंजी लक्ष्मीचा शबुद असतुय’ असं म्हणायचा. गुमान पायात वहाणा सरकवून कुशाबा देवळाकडं बिगी बिगी निघाला.

कुशाबाच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. “त्या भैताडानं इचारायची हिंमत तर कशी केली आसंल? अडत्या हाय, अडीअडचणीला मदत करतुय, शेतावरला समदा माल एकलाच उचलतोय. भाव बी घालून पाडून मागत न्हाय. हे समदं जरी खरं असलं तरी बी देऊळ दहा वर्स चालवाय देतोस का म्हनून इच्यारनं हे त्येला शोभतंय का? यंदा पिकं करपल्यात, थकबाकी झालीय. मंग काय पिढ्यानपिढ्या वावरात बांधलेलं देऊळ चालवायला द्यायाचं व्हय? दोन वर्सापूर्वी कारभारणीनं दिलेले डाग बँकेत ठेवून कर्ज काढलंया. अजूनपतुर डाग सोडवता आलं न्हाई. म्या आतल्या आत किती गटांगळ्या खातोय, हे माजं मलाच ठाव हाय. अता कर्ज झालं म्हनूनशान काय देऊळ चालवायला द्यायाचं? पाच लाख देतो म्हनला. सालीना साठ हजार रूपय बी देतो म्हनला. दहा वर्ष झाल्यावं देऊळ सोडून जातो, म्हनून लिवून द्यायाला तयार हाय. त्येचा काय डाव असंल ते त्येला आनि त्या इट्टल रखमाईलाच ठाव असंल. निस्तं माज्या डोस्क्याचं खोबरं करायला निघालाय. छ्या! म्या काय एवढा नीच हाय व्हय? पुन्यांदा कंदी त्या इट्टल रखमाईकडं डोळं वर करून बघाया तरी हुईल का? ” तोवर कुशाबा मंदिरात येऊन पोहोचला.

टाळ्यांच्या गजरात आरती सुरू झाली. पाचदहा म्हातारी कोतारी आणि चार पाच पोरं आरतीला उभी होती. आरती झाल्यावर, भटजी जाताना हातावर केळीचे काप हमखास ठेवायचे. द्यायला काहीच नसलं तेव्हा बचकभर खडीसाखर उदारमनाने हातावर नक्कीच ठेवायचे. जणू काही त्यासाठीच ते लोक जमत असावेत.

आज का कुणास ठाऊक इट्ट्ल रखमाईकडे बघताच कुशाबाच्या डोळ्यांत अचानक टचकन पाणी आलं. धोतराच्या सोग्यानं हलकंच पुसत, दोन्ही कानांच्या पाळ्यांना हात लावत त्यानं माफी मागितली. आपसूकच त्यानं दोन्ही गालावर चापट्या मारून घेतल्या. विनम्र भावाने दोन्ही हात जोडले. ‘तूच मायबाप हाईस. माजी काय अडचण हाय, ते तुला समदं ठाव हाय. म्या काय येगळं सांगायाचं? ’ असं मनातल्या मनात पुटपुटला. निरंजनाच्या तबकात एका रूपयांचं नाणं टाकून नमस्कार केला. भटजीने दिलेली दोन केळी घेऊन बाहेर पडला.

कुशाबा घरी पोहोचल्याची चाहूल लागताच कारभारणी कुसुमनं आतूनच आवाज दिला. “धनी, हात पाय धुवून घ्या म्हंजे जेवून घेता यील. ” कुसुमच्या हुकुमावरून हात पाय तोंड धुवून कुशाबा पाटावर बसला. ताटात भाजी, वरणाची वाटी, एक केळं कुस्करून, तव्यावरची गरमा गरम भाकर टाकली. चार घास पोटात ढकलून कुशाबा बाहेर ओसरीवर येऊन बसला. अंगणातच पाच-दहा येरझारा टाकल्या.

आत येऊन भिंतीला पाठ टेकून घोंगडीवर बसला. ‘काय करावं? ‘ हा डोक्यात भिरभिरणारा भुंगा काही केल्या बाहेर पडायचं नावच घेत नव्हता. तितक्यात सगळं आवरून कुसुम येऊन शेजारी बसली. कुशाबाची उलघाल पाहून कुसुमच्या डोळ्यांतही पाणी दाटलं होतं. “धनी, कधी दुष्काळात पिकं करपून गेली तर कधी अति पावसानं पिकच न्हाई, तर जमीनबी वाहून गेलीया. तुमी कवाबी इतकं हवालदिल झाला न्हाईसा. तुमी किती जीवाचं रान केलंय आतापतुर, हे समदं मला ठाव हाय. या संकटात तुमी एकला न्हाई, म्या बी तुमच्या संगं हाय. समदं रान पिकू दे म्हनूनशान म्या रोज त्या पांडुरंगापुढे हात जोडते. मानसानं मनात काय आसंल ते घडाघडा बोलून टाकावं. मला सांगिटलं न्हाई तर आनि दुसऱ्या कुनाला सांगनार हायसा? पैसा वतून दोन्ही मुलग्यांना पुन्याला मोठं शिक्शान दिलं, लग्नं लावून दिली, पुण्यात फिलॅट घ्येयाला मदत केलीत. त्ये चांगल्या नोकरीत हाईत. तुमी एक शबुद टाका, सोन्यासारखी आपली दोनी पोरं धावून येत्याल. तुमी तुमच्या आईबापाला किती मायेनं जपत हुता ते त्येंनी लहानपनापास्नं बगिटलेलं हाय. पन त्येंची मदत घ्यायाला तुमचं मन धजत न्हाई. काय करायचं आता? ते आता त्या पांडुरंगालाच म्हाईत. “

पांडुरंगाचा विषय निघताच कुशाबानं अडत्या सेठ काय बोलला ते कुसुमला सांगितलं. त्यावर कुसुमनं अनवधानानं कानावर हात ठेवले. ‘अता म्या काय सांगू? त्ये प्रकरन, तुमा आनि तुमच्या इट्टल रखमाईच्या यांच्यातलं हाय. तुमीच काय ते बघूनशान घ्या’ असं म्हणत तिनं वाल्या कोळीच्या पत्नीचा पवित्रा घेतला. कुशाबाच्या डोक्यात अडत्याचाच विचार घोळत राहिला. कधी डोळा लागला ते कळलं नाही.

पहाट होत आली असावी. कुशाबाच्या स्वप्नांत साक्षात विठ्ठल उभा ठाकला. कधीतरी आषाढी एकादशीला पंढरपूरात पाहिलेला तोच विठ्ठल साक्षात समोर होता. काळाकुळीत ओबडधोबड, गुलाल बुक्क्यानं पुरता माखून गेलेला प्रसन्न चेहरा. एखाद्या निवडणुकीतल्या विजयी झालेल्या वीरासारखा! दिवसभराच्या मिरवणुकीनंतर थकून गेल्याचा भाव असला तरी त्या चेहऱ्यामागे दडलेला विजयाचा उन्माद आणि आनंद लपत नव्हता. विठ्ठलानं मिश्किलपणे हसत विचारलं, ‘काय रे, कुशाबा, काय झालंय तुला? असा चेहरा पाडल्यासारखा दिसतोस? ’ 

विठ्ठलाला पाहून कुशाबाच्या डोळ्यांत पाणी तरारलं, कृतकोपानं म्हणाला, “मला काय झालंय ते तुला म्हाईत न्हाई व्हय? उगाच येड पांघरून पेडगावला जाऊ नगंस. कधी सूर्यदेवाला भाजून काडायला सांगतोस तवा वरूणदेवाला इकडं फिरकायला देत न्हाईस. पीकं करपत न्हाईत व्हय? कधी वरूणदेवाला सांगून झोडपून काढायला लावतूस. पिकं सगळी व्हावून जात्यात. पिकं चांगली येतात तवा कीड आणि रोगराई होवून पीकं फस्त होत्यात, हे समदं तुला दिसत न्हाईत व्हय? “

विठ्ठलाच्या डोळ्यांत आईची माया दिसत होती पण तो गालातल्या गालात हसत म्हणाला, “कुशाबा, संकटाशिवाय श्रद्धा फुलत न्हाई गड्या. मी तुला कवाबी सोडलेलं न्हाई. तू एकटा न्हाईस, मी तुझ्या पाठीशी आहे. आरं, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी हे समदं सृष्टीच्या चक्राप्रमाणे घडत असतं. त्यात मी काही करू शकत नाही. पृथ्वीचं तुम्ही जे काही शोषण सुरू केलंत ना, त्याचेच परिणाम भोगत आहात. आता मोठी शेती राहिलीच कुठे? वाटण्या होऊन तुकडे तुकडे होत जाऊन सगळेच अल्पभूधारक झाला आहात. एकट्याला ट्रॅक्टर कसं परवडेल सांग? इतके शेतमजूर कुठे मिळतील? सहकार-शेती तुम्हाला पटत नाही. पाणी सिंचनाच्या सोयी नसल्यामुळे उत्पादनात घट येते. सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे मातीची गुणवत्ता वाढते आणि पिकांची वाढ सुधारते. हे तुम्हाला सांगून पटत नाही. मग शेती किफायतशीर कशी होईल? आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव ही आणखी एक मोठी समस्या आहे. कधी कधी शेतमालाच्यापेक्षा वाहतुकीचा खर्च अधिक व्हायला होतं. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही ही मोठी समस्या आहे, तेव्हा पिकवायचं तरी कसं?

दुसरं असं की सगळ्याच भूमीपुत्रांना शेती सोडून पंख्याखाली ऑफिसात बसून चाकरी करायची असेल त्याला मी तरी काय करणार सांग? महागाई भत्त्यावर डोळा ठेवून असलेल्या नोकरदारांना २००१ साली कोथिंबीरीची जुडी दहा रूपयाला मिळायची ती आजही त्यांना दहा रूपयालाच हवी असते. मॉलमध्ये हजारात खर्च करणारे, लिंबं, भाज्या विकणाऱ्या आजीकडे दोन पाच रूपयासाठी घासाघीस करताना दिसतात. शेतमालाचे भाव वाढले की ‘महागाई वाढली’ असा गळा काढणारे नेते, भाव कमी झाले की शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून काढणार, म्हणून सरकारविरुद्ध मोर्चे काढायला मोकळे असतात. ” 

“बरं ते समदं श्यानपन सोड. त्या अडत्यानं मला काय इच्यारलं, ते म्हाईत हाय का न्हाई तुला? त्येच्याबद्दल बोल, काय करायचं ते सांग? ”

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments