सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ शेपूट बहाद्दरांचे शेपूट – भाग – १ – मूळ हिन्दी लेखक : श्री सुशांत सुप्रिय ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
आज मी आपल्याला एका जगप्रसिद्ध शेपटाची कहाणी ऐकवतोय. ही कहाणी कुणा ऐर्या- गैर्याची नाही. ही कहाणी शेपूटबहाद्दरांची आहे. शेपूटबहाद्दरांचे खरे नाव कुणालाच माहीत नाही. लहानपणापासूनच ते अफाट प्रतिभेचे धनी होते. चमचेगिरी, स्वार्थासाठी कुणाची अफाट स्तुती करणे, मस्का मारणे याबाबत त्यांची बरोबरी करू शकेल, असा दुसरा कुणीच नव्हता.
सगळ्यात हैराण करण्यासारखी गोष्ट अशी, की त्यांचे वडील अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ शाळामास्तर होते. शेपूट हलवणं, ते पाप समजत होते. आशा परिवारात जन्म घेऊनसुद्धा शेपूटबहाद्दरांची हिम्मत हरली नाही. शेपूट हलवण्याची कला त्यांना वारशात मिळाली नव्हती. हे कला त्यांच्या ‘जीन्स’मध्ये नव्हती. त्यांची आनुवंशिकता यापासून वंचित होती. पण ही अडचण त्यांनी आपल्या सफलतेच्या मार्गातील अडचण होऊ दिली नाही. आपला भावताल आणि समाज यांच्यापासून निरंतर ज्ञान ग्रहण करत, ते इतके शेपूटबाज झाले, की लोकांनी त्यांचं नाव शेपूटबहाद्दर ठेवलं. या दृष्टीने शेपूटबाजीबाबत ते एक ‘सेल्फ मेड’ व्यक्ती होते.
प्रागैतिहासिक काळात पूर्वजांच्या जवळ असलेली आणि आता विलुप्त झालेली शेपूट हलवण्यात शेपूटबहाद्दर कुशल होते. शेपूट हलवण्याच्या गावंढळ सडक छाप, रस्त्यावरील तुच्छ स्तरावरून उचलून, तिला ललित कलेच्या स्तरावर पोचावण्याबाबत शेपूटबहाद्दरांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही.
अखिल भारतीय शेपूटवाल्यांच्या महासभेच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी केलेले ऐतिहासिक भाषण मैलाचा दगड ठरले. ‘विश्वातील सगळ्या शेपूटवाल्यांनो एक व्हा. ’ ‘दूम नही तो दम नाही. ’ यासारख्या त्यांच्या उक्ती लोकप्रिय सुभाषिते झाल्या. ‘यशस्वीरीत्या शेपूट कशी हलवावी? ’ हे शीर्षक असलेले त्यांचे पुस्तक इतकं लोकप्रिय झालं, की ते ‘नॅशनल बेस्ट सेलर’ मानलं गेलं. या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या. डझनभर भाषांमधून त्यांचा अनुवाद होऊन, त्यांच्या करोडो प्रती विकल्या गेल्या. पण ही नंतरची गोष्ट. याची सुरुवात कशी झाली, हे बघणंही एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
एका रात्री शेपूटवाले रात्री झोपायला गेले होते. सकाळी उठून त्यांनी पाहीलं, तर त्यांना दिसलं की त्यांना शेपटी फुटलीय. ही बातमी शेपूटवाल्यांच्या मधे, हलणार्या शेपटीसारखी पसरली. याला निसर्गाचा चमत्कार आणि भगवंताचे वरदान मानलं गेलं. या महान शेपटीच्या दर्शनासाठी अफाट जनसागर लोटला. लोकं आपापसात म्हणू लागले, ‘ जरूर शेपूटवाल्यांनी पूर्वजन्मात शेपूटबाजीची चांगली कर्मे केली असणार. त्यामुळे भगवान शेपूटश्री महाराजांनी त्यांना हे फळ दिलय. अशा तर्हेने बघता बघता शेपूटवाले, शेपूटबहाद्दर झाले आणि जगप्रसिद्धही झाले. त्यांची कीर्ती पसरली. सन्मान नि धनही त्यांना प्राप्त झाले. शेपूटबहाद्दरांचे दिवस फिरले.
इतिहासात असा कुठे उल्लेख मिळत नाही, की माणसाला शेपूट फुटलीय. त्यामुळे अब्जावधीत एक असल्याने शेपूटबहाद्दर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकीर्त झाले. त्यांच्या महान शेपटीला, ‘राष्ट्रीय वारसा’ मानण्यात आले. त्यांना अनेक सन्मानांनी अलंकृत करण्यात आले. प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून भाषण करताना शेपूटबहाद्दरांना, ‘शेपूट- विभूषण’ पदवी देण्याची घोषणा केली. मग विरोधी पक्षाचे लोक तरी मागे कशाला रहातील? त्यांनी आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात, शेपूटबहाद्दरांना, ’ शेपूट केसरी’ या उपाधीने नावाजले. राष्ट्रपतींनीदेखील, राष्ट्रपतीभावनाच्या प्रांगणात, एका भव्य समारंभात, महामाहीम शेपूटबहाद्दरांना देशातील सर्वोच्च सन्मान ‘शेपूटरत्न’ ने अलंकृत केले.
‘शेपूटरत्न’ शेपूटबहाद्दर अमर रहे, अमर रहे, अमर रहे, ’ या घोषणांनी आकाश दुमदुमून गेले. शेपूटबहाद्दरांच्या हलत्या शेपटाची ख्याती दिवसेंदिवस वाढतच चालली. सरकारी खर्चाने त्यांच्या शेपटीचा करोडो रूपयांचा विमा उतरवला गेला. त्यांच्या शेपटीच्या सुरक्षेसाठी नॅशनल सिक्युरिटीचे साहसी कमांडोज नियुक्त केले गेले. ‘युनिसेफ’ने त्यांना आपला ‘गुडविल अॅंम्बॅसेडर’ बनवले. शेपूटबहाद्दरांची शेपूट जगातील आठवं आश्चर्य मानलं गेलं. विदेशी शिष्टमंडळे भारतभेटीला येत, तेव्हा शेपूटबहाद्दरांना भेटणे, हा त्यांच्या कार्यक्रमाचा अभिन्न भाग बनला.
अर्थात काही लोक दबक्या आवाजात शेपूटबहाद्दरांची शेपूट ‘ईश्वराचा दंड’ किंवा ‘दैवी प्रकोप’ म्हणत, पण असे लोक केवळ मूठभर होते. त्यांना विदेशी एजंट किंवा राष्ट्रद्रोही म्हंटलं जाई.
एकदा शेपूटबहाद्दरांच्या महान शेपटीला दुखापत झाली. सगळा देश हतप्रभ झाला. लोक स्तब्ध आणि शोकाकूल झाले. ते शेपूटबहाद्दरांच्या विरोधकांचे कट-कारस्थान मानले गेले. मंदीर, मशीद, चर्च, गुरुद्वारांमधून तिच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रार्थना-सभा आयोजित केल्या गेल्या. नमाज पठण झाले. जागोजागी यज्ञ केले गेले. हवन झाले. करोडो लोक शेपूटबहाद्दरांच्या शेपटाच्या सुरक्षिततेची बातमी ऐकण्यासाठी चोवीस तास रेडिओ आणि टी. व्ही. ला चिकटून बसले. फेसबुक आणि ट्विटरवर लोकांनी या बाबतीत चिंता व्यक्त केली. शेपूटबहाद्दरांच्या शेपटाच्या सुरक्षिततेची बातमी येताच जनतेत हास्याची लाट उसळली. जागोजागी मिठाई वाटण्यात आली. फटाके फोडले. त्या रात्री झालेल्या आतषबाजीपुढे, दिवाळीच्या वेळी होणारी आतषबाजीही फिकी वाटू लागली.
‘लिम्का – बुकवाल्यांनी प्रथमच शेपूटबहाद्दरांच्या महान शेपटीचा उल्लेख आपल्या रेकॉर्ड बुकमध्ये केला होता. ‘गिनीज- बुक’वाल्यांनीही शेपूटबहाद्दरांचे नाव रेकॉर्ड बुकमध्ये घातले. बघता बघता शेपूटबहाद्दर सगळ्या राष्ट्रासाठी आदर्श, अनुकरणीय, श्रद्धेय प्रतिमा बनले. सगळं राष्ट्र प्रगैतिहासिक काळातील पूर्वजांच्या जवळ असलेली आणि आता विलुप्त झालेली शेपटे हलवू लागलं. जे शेपूटविहीन होते, ते मिसफीट होते. समाजात शेपूट हलवणे ही यशाची किल्ली होती. साधन होते. किंवा असंही म्हणता येईल, की शेपूट हलवणे, हा आमचा राष्ट्रीय खेळ झाला होता. जर शेपूट हलवणे, या स्पर्धेचा अंतर्भाव ऑलेंपिकमध्ये झाला असता, तर आम्ही या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं असतं. उद्योग, व्यापार, शिक्षण, क्रीडा प्रत्येक ठिकाणी शेपूटबाजीचा बोलबाला होता. जी व्यक्ती विलुप्त शेपटी हलवणं जाणत नव्हती, ती सफलतेच्या शर्यतीत, सगळ्यात मागे पडत होती. हा शेपटी हलवणार्या चमच्यांचा, खुशमतखोरांचा चापलूसांचा आणि लोणी लावणार्यांचा कल होता. कुणी बॉसची कृपादृष्टी पावावी, म्हणून शेपूट हलवत होता, कुणी पदोन्नतीसाठी शेपूट हलवत होता. कोणी सहकार्यांची मुळे कापण्यासाठी शेपूट हलवत होता. कुणी सत्तेच्या शीर्षस्थानी बसण्यासाठी शेपूट हलवत होता. कुणीही दुसर्यांच्या पुढे जाण्यासाठी थुंकी चाटत होते. कुणे बापाला गाढव आणि गाढवाला बाप म्हणत होते. हलणार्या शेपट्या ऑफीस आणि व्यापार चालवत होत्या. लोक इतक्या वेगाने शेपूट हलवत होते, की भर जवानीत बिचारे वाकत चालले होते.
एके काळी शेपूटबहाद्दर माझे सहकारी होते. तेव्हा ते, महान शेपूटबहाद्दर म्हणून जनमानसात प्रतिष्ठीत झाले नव्हते. सतत माझ्या पुढे-मागे शेपूट हलवत राहायचे. कारण त्यांची अनेक कामे माझ्याजवळ राहिलेली असायची. बॉसशी माझे संबंध चांगले होते, त्यामुळे शेपूटवाले माझी खुशामत करण्यात गुंतलेले असायचे. काळ बदलला. बॉसची बदली झाली. शेपूटवाल्यांची माझ्याकडे असलेली कामे झाली. मग तू कोण आणि मी कोण? शेपूटवाल्यांनी माझ्याकडे बघणेसुद्धा सोडून दिले. त्यांच्या अशा वागण्याने मी दुखावलो. एक -दोघांशी याबद्दल बोललो. त्यावर ते हसून म्हणाले, ‘आपण ना अगदी बिनशेपटीचे आहात. अरे, शेपुटबहाद्दरांनी आपल्याबाबत जे केलं, त्यालाच ‘शेपूटबाजी’ म्हणतात. ‘
अशा वातावरणात सरकारने शेपूटबहाद्दरांच्या महान शेपटीच्या सन्मानार्थ पाच, दहा आणि पंधरा रुपयांची सुगंधित टपाल तिकिटे काढली. त्यात शेपूटबहाद्दरांच्या शेपटीला वेगवेगळ्या मुद्रेत दाखवले होते. त्याचप्रमाणे शेपूटबद्दरांच्या महान शेपटाच्या सन्मानार्थ विशेष नाणीदेखील काढण्यात आली. त्यावर त्यांच्या शेपटीची मनोहर प्रतिमा अंकित करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेच्या नोटांवरदेखील या सन्मानित शेपटाचे चित्र अंकित करण्यात आले.
शेपटीबहाद्दरांच्या चमच्यांनी त्यांच्या सन्मानार्थ विश्वातील सगळ्यात विशाल मंदिर बनवले. त्यात लाखो लोकांच्या उपस्थितीत शेपूटबहाद्दरांची एक शेपटीच्या आकाराची प्रतिमा स्थापन केली गेली. तिथे रोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा आणि आरती होऊ लागली. बघता बघता त्या मंदिरात करोडो रुपये अर्पण केले जाऊ लागले. काही काळातच, ‘शेपूटबहाद्दर-स्वामी मंदिरा’मध्ये अर्पण केलेल्या पैशांनी तिरुपतीच्या मंदिरालाही मागे टाकले.
शेपटीबहाद्दरांच्या शिष्यांनी त्यांच्या महान शेपटीच्या सन्मानार्थ ‘शेपूट चालीसा’, ‘शेपूट पचासा’ लिहून टाकली. देशातील सगळे कवी, कथाकार, गीतकार, संगीतकार आणि चित्रकार, शेपटीबहाद्दरांच्या महान शेपटाच्या महिमामय नदीत स्नान करू लागले. ‘शेपूट हो माता, शेपूट हो पिता, शेपूट हो बंधू, शेपूट सखा हो’ अशा तऱ्हेने सगळं राष्ट्र शेपूट-मय झालं. प्रत्येक व्यक्ती शेपूट-छल्ला (दागिना) बनून फिरू लागली.
शेपूटबहाद्दरांची महान शेपूट शाळा-कॉलेजच्या पाठयक्रमाचा विषय बनले. परीक्षेमधे त्यांच्या महान शेपटीबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले.
‘शेपूटबहाद्दर शेपूट हलवायला प्रथम केव्हा शिकले? ’
‘शेपूट हलवण्याचे काय फायदे आहेत? उदा. सहित सांगा. ’
‘शेपूट चालीसा’ आणि शेपूट पचासा’च्या लेखकांची नावे सांगा आणि या पुस्तकातील काही ओळी उद्धृत करा. ’
‘शेपूटबहाद्दर एक सेल्फ – मेड व्यक्ती आहेत, यावर एक टिपणी लिहा. ’
शेपूटबहाद्दरांनी शेपूट हलवण्याची कला, सडक छाप हीन पातळीवरून उचलून, ललित कलेच्या पातळीवर पोहोचवली, या विषयावर एक लेख लिहा. ’ वगैरे….
– क्रमश: भाग १
मूळ हिंदी लेखक : श्री सुशांत सुप्रिय
मो: 8512070086
मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







शेपुटबहाद्दुर, रोचक. लेख!