सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ वाणवसा… लेखिका : सुश्री नीता र. कुलकर्णी ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
वाणवसा…
संक्रांतीच्या सणाची अगदी धामधूम चालली होती. नव्या नव्या भारी साड्या नेसून सगळ्या बायका संक्रान्तिचे खण/सुगडं घेउन इकडे तिकडे जात होत्या. दुकाना-दुकानातून संक्रांतीला लुटण्यासाठी लहान मोठ्या वस्तू घेण्यासाठी अगदी झुंबड उडाली होती.
इकडे साठे वकिलीणबाई आणि घोडके डॉक्टरिणबाईंची चर्चा अगदी मोठ्या रंगात आली होती. चर्चेचा विषय होता संक्रांतीचे हळदीकुंकू. किती बायका बोलवायच्या, काय लुटायचे, पैठणी की शालू नेसायचा वगैरे वगैरे फारच महत्वाच्या विषयावर त्या बोलत होत्या. त्यातच मग गोरे इंजिनिअरिण बाई आणि स्वत:ला साहेबिण बाई म्हणविणाऱ्या ४-५ उच्चभ्ऱू बायका सुध्दा सामिल झाल्या त्यात त्यात सकाळी वाणवसा करायला कोण कोण आले होते याचाही उहापोह झाला. सर्वजणी मी संक्रातिचे सुगडं किती मोठं आणि महागातलं महाग घेतलं हे सांगू लागली. त्यातच त्या कॉलनीत सर्वांच्या कडे मोलकरणीची काम करणारी सीताबाई आज नेमकी सणाच्या दिवशीच आली नाही म्हणून तिच्यावर तोंडसूख घेण्यात आले. ” मेली नवऱ्याच्या आजारपणाचे निमित्त करून हल्ली फारच दांड्या मारते ” असा शेराही मारला गेला. त्यात ओघानेच विषय मालती बाईंचाही निघाला. साठे बाई म्हणाल्या ” स्वत:ला फारच शहाणी समजते ही मालतीबाई. आज वाणवसा करायला का आली नाही म्हणे तर सासूबाईंची तब्येत बरी नाही आणि नवऱ्याला सकाळी लवकर जायचंय म्हणून डबा करायचाय म्हणून येणे जमले नाही ”
मालतीबाई म्हणजे त्या हाय- फाय कॉलनीत चूकून रहायला आलेली मध्यम वर्गीय फॅमिली. मालतीबाईंचा नवरा माधव देशपांडे कचेरीत नूसता क्लार्कच आहे म्हणून तिच्या माघारी सर्वजणी तिला कमी लेखत असत. मालतीबाईच्या सासऱ्याने आपली रिटायरमेंट नंतरची सगळी पूंजी घालून हे मोठ्या नि या पॉश कॉलनीत घर घेतले होते. ही फॅमिली जरी या पॉश कॉलनीत रहायला आली असली तरी बाकीच्या खर्चासाठी ती माणसे आपले अंथरूण पाहून पाय पसरणारी होती. बाकिच्या उच्चभ्ऱू बायकांचे नखरे मालतीला परवडण्यासारखे नव्हते. म्हणून ती त्या बायकात जास्त मिसळत नव्हती. त्यामूळे दूपारच्या वेळी ती लहान मुलांच्या शिकवण्या करुन महिन्याला १-२ हजार रुपये कमावत होती. तेव्हढाच संसाराला हातभार. त्यामूळे मालती बाईला त्या बायकात जाउन चकाट्या पिटायला वेळ नव्हता तसेच ती त्यांच्या महिला मंडळाची मेंबर सुध्दा नव्हती. या सर्व कारणा मूळे बाकिच्या बायका तिला
“शिष्ट मेली” संबोधत होत्या.
या चर्चेत दामलीण बाई तर म्हणाल्या ” मी तर याना स्पष्टच सांगितले की आज मला वाणवसा करायचा करायचाय. सीताबाई सुध्दा आज येणार नाही तर तुम्ही आज बाहेरच जेवा. पोरानाही बजावून ठेवलंय जेवायला आज उशिर होईल. माझा वाणवसा झाल्यावर पोराना ब्रेड नि जाम खायला दिले. आणि ही मालतीबाई वाणवसा न करता स्वयंपाक करत बसली. सांगायचं एक दिवस नवऱ्याला जेवा बाहेर म्हणून. काय त्या म्हाताऱ्या सासूचे एव्हढे कौतूक करत बसते, तिला जेउ काय घालते, तिचे अंथरूण काय घालते, तिला औषधे काय देते!! ” अशी जोरदार चर्चा चालू होती. त्यात दोडके बाईने सागितले की सकाळी सकाळी सीताबाई आली आणि मला ५०० रुपये द्या म्हणू लागली. मी तिला स्पष्टच सांगितले की यानी मला पैसे ठेवलेत पण त्याच्या मला हळदी कुंकवाला लूटायला भारी डिश आणायच्यात म्हणून. इतरही साळकाया म्हाळकायानी सांगितले ” हो गं माझ्याकडेही मागत होती तोंड वेंगाडून सीताबाई पैसे. मी साफ सांगितले नाहीत माझ्याकडे म्हणून. ”
ठरल्या प्रमाणे संध्याकाळी सर्वांकडे हळदी कुंकू पार पडले. अत्तरे, स्प्रे यांची बरसात झाली. भारी भारी वस्तू लूटल्या गेल्या. साड्या, दागिने यांचे रसभरित वर्णन व कौतूक (वास्तविक तोंडावर कौतूक व माघारी नावे ठेवणे) झाले. संध्याकाळी सुध्दा मालती बाई कोणाकडेच हळदीकुंकवाला आली नाही म्हणून नावे ठेवली गेली.
दूसरे दिवशी सीताबाई कामाला आली म्हणून सर्वांचे जीव भांड्यात पडले. सर्वानी तिच्यावर सणादिवशी का दांडी मारलीस म्हणून तोंडसूख घेतले. तिने फक्त नवऱ्याची तब्येत बरी नव्हती एव्हढेच सांगितले. पण घोडके डॉक्टरिण बाईने विचारले सणाच्या दिवशी का दांडी मारलीस तेव्हा सीताबाई ऐवजी घोडके डॉक्टरांनीच उत्तर दिले, ” अगं तूला माहित नाही का, काल तिचा नवरा रामू अगदी मरता मरता वाचला. आपल्या शेजारच्या मालती बाई त्याला आपल्या दवाखान्यात घेउन आल्या होत्या. ” डॉक्टरांचे बोलणे ऐकून सीताबाईंचे डोळे भरून आले. सीताबाई म्हणाली ” खरच डॉक्टर साहेब म्हणतात ते अगदी ख्रं आहे काल माझा नवरा एकदम जास्तीच आजारी झाला. तापानी फणफणत होता. त्याच्या इलाजासाठी मी तुमच्या सगळ्यानकडे पैसे मागत होते. पण तुम्ही कुणीच मला पैसे दीले नाहित. पण आपल्या मालतीबाईनी मला पैसे दिले. नूसतेच पैसे दिले नाहित तर मी फारच घाबरलेली आणि गांगरलेली बघून त्या स्वत:च माझ्याबरोबर दवाखान्यात यायला तयार झाल्या. अगदी रिक्षा आणून दवाखान्यात ॲड्मिट करेपर्यंत त्यानी मदत केली. डॉक्टरसाहेब म्हणाले सुध्दा लवकर आणलेत म्हणून बरे झाले नाहितर आणखी गुंता (कोंप्लिकेशंस) वाढले असते. लवकर उपचार मिळाले म्हणून बरे झाले. मालती बाई सकाळी यायला तयार झाल्यावर मी म्हटलं सुध्दा की तुम्ही कसं काय येणार? तुमचा अजून वाणवसा व्हायचाय. संध्याकाळी हळदी कुंकवाला बायका पण बोलावल्या असतील ना. तर मला म्हणाल्या, ” अगं वाणवसा म्हणजे आनखीन दूसरे वेगळं असं काय असतं? एखादं वाण म्हणजेच दान द्यायचं असतं, दान द्यायचा वसा घ्यायचा असतो. म्हणजे दान करायचं असतं. मग जे दान द्यायचं ते सत्पात्री असावं. ज्याला द्यायचंय त्याला त्याची किती गरज आहे हे महत्वाचं आहे. ज्या सवाष्णी ला त्याची खरी गरज आहे तिला ते दान मिळणं गरजेचे आहे. भूकेलेल्याला अन्न देणं जितकं महत्वाचे आहे तितकेच गरजवंताला वेळेत मदत करणे हा फार मोठा वाणवसा आहे. पुर्वी गाडगी मडकी हिच संपत्ती होती त्यात बोरं, उस, हरभरा इत्यादी घालून त्याचं दान केलं जायचं. पण आत्ताच्या काळात गाडगी नि मडक्यांचा तसा काहिच उपयोग नाही. तरी सुध्दा बायका त्याचे स्तोम माजवतात. यात आपल्या संस्कृतिला नावे ठेवण्याचा अजिबात उद्देश नाही. कालमानानुसार त्यात जरूर ते बदल घड्वून आपली संस्कृती नक्कीच जपावी. ” त्यानी त्यांच्या नवऱ्याने दिलेले लूटायच्या वस्तू आणायचे पैसे मला दिले. डॉक्टरसाहेबानी सुध्दा मला खूप मदत केली.
हे ऐकल्यावर डॉक्टर म्हणाले ” खरंच मालती बाईंचे म्हणणे अगदी रास्त आहे. आज तुम्हा सर्वांच्या पेक्षा मालती बाईंचा खरा वाणवसा झाला असे मी म्हणेन. एका सवाष्णीच सौभाग्य वाचवण्यासाठी त्यानी जी मदत केली, जे प्रयत्न केले किंवा जी आर्थिक मदत केली तोच खरा वाणवसा. सीताबाईला मदत म्हणून त्या दिवसभर रामू पाशी थांबल्या, कुठेही हळदी कुंकवाला गेल्या नाहित. त्यांच्या मदतीमुळे रामूचे प्राण वाचलेत. त्या आधी नवऱ्याची बायको म्हणून, सासूची सून म्हणून, मुलांची आई म्हणून जी काय कर्तव्ये आहेत ती आधी पार पाडतात आणि मग देव धर्म, हळदी कुंकू, महिला मंडळ या गोष्टीना महत्व देतात. तुम्हा सर्वानी हल्लीच्या दिवसात त्यांच्यापासून हाच बोध घेतला पाहिजे. ”
एव्हाना महिला मंडळाच्या मिटींग साठी एकेक करून सर्व बायका डॉक्टरिण बाईंच्या घरी जमल्याच होत्यां त्या सर्वानी डॉक्टरांचे बोलणे ऐकले आणि त्याना ते खरोखरच पटले. सर्वानी मालती बाईना बोलावून आणले. त्याना हिणवल्या बद्दल त्यांची माफी मागितली.
सर्व जणीनी पुढच्या वर्षी पासून खऱ्या अर्थाने ” वाणवसा” करण्याचे नक्की केले.
लेखिका : सुश्री नीता र. कुलकर्णी
हैदराबाद.
प्रस्तुती : सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




