श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ संस्कारांचे बीज… (अनुवादित) – भाग – १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

आज शनिवार होता, बस पहाटे नेहमीप्रमाणे निघाली होती. हा प्रवास किशनजींना काही नवीन नव्हता, दर शनिवारी पहाटे जयपूरहून निघायचं, आधी खाटूश्यामजींचे दर्शन घ्यायचं, मग तिथून पुष्करला ब्रह्माजींचं मंदिर आणि संध्याकाळपर्यंत जयपूरला परत. गेली चाळीस वर्षे किशन यादव शनिवारी याच रूटने ट्रॅव्हल्सची बस चालवायचे. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी. प्रत्येक जत्रेसाठी. प्रत्येक नवसासाठी.

४७ किलोमीटरचा मैलाचा दगड जवळ येत होता, आणि किशनजींना बसच्या मागच्या आरश्यात प्रखर हेडलाईट्स दिसू लागले. तीन एसयुव्ही गाड्या वेगाने बसचा पाठलाग करत होत्या. त्यांना आश्चर्य वाटले नाही, ते चलबिचल झाले नाहीत. त्यांचे हात स्टिअरिंग व्हीलवर स्थिर होते. त्यांनी मागे झोपलेल्या ६२ यात्रेकरूंना जागे केले नाही. कारण त्यांना माहित होते की ते येणार आहेत.

खरं तर, ते तीन दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते. तीन दिवसांपूर्वीच त्यांना एक निनावी फोन आला होता, “या शनिवारी, खाटूश्यामजींच्या दर्शनाला पहाटे निघणारी तुमची बस ४७ किलोमीटरच्या मैलाच्या दगडाशी थांबवली जाईल. ” एवढंच सांगून फोन कट केला गेला होता.

किशनजी पूर्ण पाच मिनिटे फोनकडे पाहत राहिले. नंतर ते फक्त गूढ हसले. त्यांनी ना आपल्या दैनंदिन व्यवहारांत बदल केला, ना आपल्या पत्नीला – ना ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाला या फोनबद्दल काही सांगितलं.

फोननंतर दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणे गाडी मेकॅनिककडे घेऊन गेले. ब्रेक, तेल पाणी वगैरे सर्व तपासून घेतलं, प्रवासात काही तांत्रिक अडचण यायला नको होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व प्रवाश्यांना फोन केले. “तुमची औषधे सोबत आहेत का? ”, “तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांगितले आहे का? ”, “तुम्हाला खात्री आहे की तुम्हाला जायचेच आहे? ” आपल्या नातवाच्या आरोग्यासाठी नवस करणाऱ्या ८४ वर्षीय शांती देवी म्हणाल्या, “बाळा, मी सहा महिन्यांपासून वाट पाहत आहे. भले माझा हा जीवनातील शेवटचा प्रवास ठरला, तरी मी जाईनच. ” 

फोनवर होकार दिलेले सर्व प्रवासी आपापल्या पिशव्या, थर्मास, जपमाळा आणि आशा घेऊन गाडीत बसलेले होते, माळा जपत असलेल्या वृद्ध स्त्रिया, संपूर्ण कुटुंबे, घोंगड्यांमध्ये गुंडाळलेली मुले – सगळे निद्रादेवीच्या अधीन झाले होते.

आरशात दिसणारा हेडलाईट्सचा प्रकाश अधिक तेजस्वी झाला. मैलाचा दगड जवळ येत होता. पुढे काय होणार हे किशनजींना ठाऊक होतं, त्यांनी ब्रेक लावायला सुरुवात केली. मैलाचा दगड आला आणि त्याच क्षणी, एसयूव्ही गाड्या बसचा मार्ग रोखत तिला आडव्या थांबवल्या गेल्या.

किशनजींनी ब्रेक दाबले. बसच्या एअरब्रेकने एक मोठा सुस्कारा सोडला. बस थांबली. साइड मिररमध्ये त्यांनी पाहिलं, एसयूव्हीमधून माणसे खाली उतरत होती. सहा – आठ – दहा. हातात वॉकी-टॉकी, फ्लॅशलाइट्स — आणि ती चाल – ज्यांना आव्हान देण्याचे धाडस कोणी करत नाही.

त्यांच्यापैकी एकजण, बहुधा त्यांचा म्होरक्या, बसच्या दरवाजाजवळ आला. बोटांनी काचेवर दोनदा थाप मारली. किशनजींनी बटन दाबून आत येणाऱ्या दरवाज्याचे दार उघडलं, बसचे इंजिन बंद केलं, आणि म्हणाले, “बोला. मी तुमची वाटच बघत होतो. तुम्ही इथे बस थांबवणार हे सांगणारा फोन आला होता मला. “

तो म्होरक्या, सुमारे ३५ वर्षांचा, धिप्पाड शरीरयष्टीचा, करारी नजरेचा— बसच्या पहिल्या पायरीवर चढला. त्याच्या टॉर्चचा प्रकाश किशनजींच्या चेहऱ्यावर पडला. “आम्ही तुम्हाला थांबवणार हे माहित होतं, आणि तरीही तुम्ही आलात? ”

किशनजींनी सरळ त्याच्या डोळ्यात पाहिले. “मी गेली ४० वर्षे या मार्गावरून प्रवास करत आहे. मी लष्करी चेकपॉईंट पाहिले आहेत. मी पोलीस अधिकारी पाहिले आहेत. तुमच्यासारखी माणसे. इतर टोळ्या. दरोडे, अपहरण, लाचखोरी—सगळं काही. आणि या सगळ्यातून एकच शिकलो, पाठ दाखवायची नाही, लपायचं नाही. लपल्याने गोष्टी नेहमीच बिघडतात. ”

तो म्होरक्या किशनजींकडे पाहत राहिला— त्यांच्या नजरेतली भीती शोधत, कमकुवतपणा शोधत, आवाजातील कंप शोधत. पण त्याला यापैकी काहीच आढळलं नाही. आणि याच गोष्टीमुळे त्याला सर्वाधिक अस्वस्थता वाटत होती.

“आम्ही कोण आहोत हे तुम्हाला माहीत आहे का? ” त्याने विचारले.

“मला माहीत आहे, ” किशन म्हणाला. “तुम्ही गेल्या आठ महिन्यांपासून या भागावर नियंत्रण ठेवले आहे. तुमच्याआधी कोणीतरी दुसरे होते. आणि कदाचित काही वर्षांनंतर कोणीतरी दुसरे असेल. ”

मग त्यांनी आपले डोके मागे वळवले— जिथे प्रवासी बसमध्ये झोपले होते. “पण ही माणसे… ती येतच राहतील. कारण श्रद्धा अमर आहे. ”

म्होरक्याचा एक साथीदार बसमध्ये चढला. तरुण. थोडा घाबरलेला, गोंधळलेला. त्याचे बोट वायरलेस रेडिओच्या बटणाजवळ होते. “सर… आता आपण काय करायचे? ” तो कुजबुजला. म्होरक्याने उत्तर दिले नाही. तो अजूनही किशनजींकडेच पाहत होता.

“तुम्ही बसमध्ये काय घेऊन जात आहात? ” त्याने विचारले.

“६२ भाविक. १७ मुले. २८ महिला. १७ पुरुष. ” किशनजींनी लगेच सांगितलं. “खाटूश्यामला जात आहेत. काहीजण आभार मानण्यासाठी. काहीजण चमत्काराची मागणी करण्यासाठी. ” 

मग त्याने हळूच मागे बोट दाखवले. “सीट नंबर २३ वर बसलेल्या शांती देवी त्यांच्या नातवासाठी प्रार्थना करायला जात आहेत. त्याला कॅन्सर आहे. रामस्वरूपजी सीट नंबर १५ वर आहेत— आपल्या मुलीच्या जगण्यासाठी घेतलेला नवस पूर्ण करण्यासाठी. आणि ८ ते १२ पर्यंत शर्मा कुटुंब आहे— गेल्या पुरात त्यांचे घर वाहून गेले. ते फक्त नव्याने सुरुवात करण्यासाठी शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करायला जात आहेत. ”

म्होरक्याने डोळे मिचकावले. “तुम्हाला जणू प्रत्येकाची कहाणी आठवते, नाही का? ”

“प्रत्येकाची, ” किशनजींनी मान डोलावली. “कारण तेच माझे काम आहे, फक्त बस चालवणे नाही—मी कोणाला घेऊन जात आहे, का घेऊन जात आहे, हे जाणून घेणे, हे माझे काम आहे. माझी बस फक्त एक बस नाही, ते एक चालतेफिरते मंदिर आहे. श्रद्धाळूंच्या आशेचे प्रतीक! ”

आणखी काही न बोलता किशनजींनी आपला थर्मास बाहेर काढला, एक कप चहा स्वतःला घेतला, दुसऱ्या कपात चहा ओतला आणि त्या म्होरक्याला देऊ केला. “चहा घ्या, थंडी आहे. “

म्होरक्याने एक घोट घेतला. चहा गरम होता—वेलची आणि गुळाच्या सुगंधाने दरवळणारा. अगदी तसाच, जसा त्याची आजी लहानपणी त्याला बनवून द्यायची. आणि त्या क्षणी— फक्त एका क्षणासाठी— तो त्या भागातला शक्तिशाली माणूस – भाई – डॉन राहिला नाही, तो फक्त एक ३५ वर्षांचा माणूस होता, जो वीस वर्षांपूर्वीच्या एका प्रेमळ स्वयंपाकघराची आठवण काढत होता. “तू घाबरत का नाहीस? ” त्याने हळूवारपणे विचारले.

किशनजी क्षणभर शांत राहिले, मग म्हणाले, “नाही. कारण मी अनेकांना भीतीने मरताना पाहिले आहे आणि अनेकांना श्रद्धेने जगताना. त्यातून मी शिकलो आहे— खरी श्रद्धा घाबरत नाही. ती सन्मानाने उभी राहते, ठाम, भीतीशिवाय. ”

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मकरंद पिंपुटकर 

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments