श्री मोहन निमोणकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ “अपरिचिताचा शेवटचा प्रवास…” (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात – कन्नड अनुवादक : अज्ञात – मराठी अनुवादक : डॉ. सुभाष भोसले ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
(‘अपरिचिताचा शेवटचा प्रवास’ ही एक सोशल मीडियावर लोकप्रिय झालेली हृदयस्पर्शी कथा आहे. या कथेत एका टॅक्सी चालकाचा आणि एका वृद्ध प्रवाशाचा अनुभव मांडला आहे. या कथेचे मूळ लेखक केंट नर्बर्न (Kent Nerburn) आहेत. ही कथा त्यांच्या “Make Me an Instrument: The Humble Journeys of a Everyman“ या पुस्तकातील एका भागावर आधारित आहे, ज्याला “The Taxi Ride“ या नावाने ओळखले जाते. या कथेचा कोणताही एक अधिकृत ‘एकुलता एक’ अनुवादक नाही. ही कथा प्रामुख्याने सोशल मीडिया (फेसबुक आणि व्हॉट्सॲप) आणि ब्लॉग्स द्वारे मराठीत लोकप्रिय झाली.- AI आधारीत जानकारी)
मी एक टॅक्सी चालक आहे. बहुतेक वेळा मी रात्रीची पाळी करतो. गेल्या आठवड्यात रात्री साधारण अकरा वाजता एक वयस्कर गृहस्थ माझ्या टॅक्सीत बसले. पांढ रा कुर्ता, धोतर, थकलेले डोळे—पण त्यांच्या आवाजात एक वेगळीच ठामपणा होता.
टॅक्सीत बसताच ते म्हणाले,
“आज रात्री तू मला पाच ठिकाणी घेऊन जायचे आहे. मी तुला ५००० रुपये रोख देईन. पण प्रवास संपेपर्यंत ‘का?’ असा एकही प्रश्न विचारायचा नाही.”
त्यांनी माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. त्यावर पाच पत्ते लिहिले होते.
पहिला थांबा
दक्षिण कोलकात्यातील एक जुने घर. मी गाडी थांबवली. ते खाली उतरले नाहीत. फक्त काच खाली करून त्या घराकडे शांतपणे पाहत राहिले. दहा मिनिटे गेली. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण आवाज नव्हता.
“चला… पुढच्या ठिकाणी जाऊया,” ते हळूच म्हणाले.
दुसरा थांबा
एक प्राथमिक शाळा. गेट बंद होते. आत अंधारात खेळाचे मैदान दिसत होते. ते गाडीतून उतरले आणि हळूहळू झोपाळ्याजवळ गेले. त्यावर बसून हलके हलके झोके घेऊ लागले. वीस मिनिटांनी ते परत आले.
ते म्हणाले, “इथे मी ४३ वर्षे शिक्षक म्हणून काम केले. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ इथेच गेला.”
तिसरा थांबा
एक छोटंसं जुने कॉफी हाऊस. ते आत गेले आणि चहाचा एक कप मागवला. एका कोपऱ्यात बसले, पण चहाला हातही लावला नाही. फक्त आजूबाजूला पाहत बसले. पंधरा मिनिटांनी हलकंसं हसत बाहेर आले.
ते म्हणाले, “इथेच मी पहिल्यांदा उमादेवीला भेटलो होतो… १९६९ साली.”
चौथा थांबा
निम्ताला स्मशानभूमी. ते खाली उतरले. एका स्मृतीफलकासमोर उभे राहून काहीतरी पुटपुटत होते—जणू प्रार्थना करत होते. अर्ध्या तासाने परत आले तेव्हा त्यांचे डोळे लाल झाले होते.
ते म्हणाले, “ती गेल्याला आता तीन वर्षे झाली.”
पाचवा थांबा
एक मोठे सरकारी रुग्णालय. त्यांनी गाडी थांबवायला सांगितले. मग माझ्याकडे पाहून म्हणाले,
“आता मी तुला कारण सांगतो. मला चौथ्या टप्प्यातील कॅन्सर आहे. डॉक्टर म्हणतात—काही आठवडे… कदाचित काही दिवसच उरले आहेत. म्हणून आज रात्री माझे संपूर्ण आयुष्य शेवटच्या वेळेस पाहून घ्यायचे होते.”
.. .. हे ऐकून मी स्टेअरिंगवर डोके टेकवून रडू लागलो.
ते शांतपणे म्हणाले—
“ते घर… जिथे मी माझी मुलं वाढवली.
ती शाळा… जिथे मला माझ्या आयुष्याचा उद्देश सापडला.
ते कॉफी हाऊस… जिथे मी प्रेमात पडलो.
ते स्मशान… जिथे मी माझ्या पत्नीला शेवटचा निरोप दिला.
आणि हे रुग्णालय… जिथे आज मी दाखल होणार आहे. मी पुन्हा घरी परतणार नाही.”
.. .. .. त्यांनी ५००० रुपये माझ्या हातात दिले.
“धन्यवाद. तू मला माझे आयुष्य पुन्हा एकदा पाहायला मदत केलीस. माझ्या आयुष्यातील शेवटचा अपरिचित माणूस—पण खूप माणुसकीने वागणारा.”
मी म्हणालो, “नको तात्या, हे पैसे मी घेऊ शकत नाही.”
ते म्हणाले, “घे. हे देण्यासाठी माझ्याकडे आता कोणी नाही. माझी मुलं माझ्याशी बोलत नाहीत. मित्रही उरले नाहीत. पण तू मला तीन तास दिलेस—तीन तास माणुसकीचे. त्याची किंमत पैशापेक्षा जास्त आहे.”
त्यांनी आपली छोटी बॅग घेतली आणि रुग्णालयात आत गेले.
दुसऱ्या दिवशी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला पाहून हलकंसं हसलं.
“तू आलास?”
मी म्हणालो, “तुम्हाला असंच सोडून येणं मनाला पटत नव्हतं.”
आम्ही दोन तास बोललो—त्यांच्या पत्नी उमादेवीबद्दल, त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल, आणि दूर गेलेल्या मुलांबद्दल.
मी रोज जाऊ लागलो. चहा घेऊन जायचो, त्यांना वर्तमानपत्र वाचून दाखवायचो. कधी कधी फक्त त्यांच्या शेजारी शांत बसायचो.
एकदा ते म्हणाले,
“मी एकटाच मरणार असं वाटत होतं. पण तू आता इथे आहेस. शेवटी एक अपरिचितच कुटुंबासारखा झाला—हेच माझं भाग्य.”
मी त्यांचा हात हातात घेत म्हणालो,
“तुम्ही एकटे नाही.”
दुसऱ्या दिवशी पहाटे ३:१७ वाजता त्यांचं निधन झालं. मी त्यांचा हात धरून तिथेच बसलो होतो.
त्यांचे शेवटचे शब्द होते—
“सगळ्यांना सांग… अपरिचित लोकांकडे लक्ष दे. आपण सगळे कुठेतरी निघालो आहोत. काहीजण जलद, काहीजण हळूहळू. पण वाटेत माणुसकी दाखवत जा. तू तसं केलंस… आणि माझे शेवटचे दिवस सुंदर केलेस.”
मॉनिटरचा आवाज थांबला… आणि सरळ रेषा दिसू लागली.
त्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त सहा लोक होते—
मी, तीन परिचारिका, एक वकील आणि त्यांचा एक जुना विद्यार्थी.
४३ वर्षांचे अध्यापन.
५२ वर्षांचा संसार.
८१ वर्षांचे आयुष्य… आणि शेवटी फक्त सहा माणसं.
त्या दिवशी मला एक मोठा धडा मिळाला—
प्रत्येक अपरिचित माणूस कोणाच्या तरी आयुष्याचं संपूर्ण जग असतो.
प्रत्येक प्रवाशामागे एक कथा असते.
प्रत्येक माणूस जगत असतो… आणि कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं, इतकीच त्याची अपेक्षा असते.
आजही ते ५००० रुपये मी खर्च केलेले नाहीत. ते माझ्या टॅक्सीतच ठेवले आहेत. कारण प्रत्येक प्रवासी कदाचित आपल्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासावर असू शकतो.
त्या एका शिक्षकाने मला शिकवले—
माणुसकी ही काही अतिरिक्त गोष्ट नाही; तीच खरं आयुष्य आहे.
चला… आपणही असा प्रयत्न करूया.
कदाचित आपल्याला भेटणारा एखादा अपरिचित माणूस त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासात असेल.
आपण त्याच्या आयुष्यात थोडासा का होईना, प्रकाश आणि माणुसकी देऊया.
माणूस म्हणून जन्माला आलो, तर माणुसकी विसरून कसं चालेल?
अनुवादक : डॉ. सुभाष भोसले
(हा एखाद्या टॅक्सी चालकाचा खरा अनुभव आहे की एखाद्या लेखकाची कल्पित कथा आहे, हे मला माहीत नाही. कोणीतरी हे इंग्रजीतून कन्नडमध्ये भाषांतर केले होते. मी ते कन्नडमधून मराठीत अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. वाचलेल्या मजकुरात थोडेफार बदल करून, चांगला संदेश देण्याच्या सद्भावनेने येथे शेअर करत आहे).
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



