डॉ मकरंद पिंपुटकर
☆ नीर क्षीर विवेक… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆
“विजय, अरे, हे काय? किराणा सामान कुठे आहे? ” दुकानातून रिकाम्या हाताने येणाऱ्या मुलाकडे आश्चर्याने आणि अविश्र्वासाने बघत अनसूयेने विचारले. अनसूयाच्या नवऱ्याचे निधन झाले होते. विजय तिचा एकुलता एक मुलगा. यंदा दहावीत होता. साधा – सरळ स्वभावाचा.
एका बिस्कीट फॅक्टरीत अनसूया पॅकिंग विभागात नोकरी करायची, आणि काटकसरीने संसार करायची. लेक सत्शील होता. आईला मदत करायचा, मनापासून अभ्यास करायचा. आज आईने महिन्याभराच्या सामानाची यादी आणि दोन हजार रुपये देऊन त्याला बाजारात पाठवले होते, आणि तो खाली हाथ परतला होता.
“आई, सोनादीदी भेटली होती, चेहरा रडवेला होता तिचा. तिच्या घरी तिच्या ताईच्या सासरची माणसं येणार आहेत, आणि तिचे पैसे हरवले म्हणत होती. ” विजय.
“तिनं सांगितलं, तू ऐकलंस आणि सगळे पैसे तिला देऊन टाकलेस? ” कपाळावर हात मारत अनसूया म्हणाली. “अरे, तू गेल्या वेळीही तिला असेच पैसे दिले होतेस, ते अजून तिने परत केलेले नाहीत, आणि तू आणखी देऊन बसलास! तू चल माझ्याबरोबर, आणि तुझ्या डोळ्यांनी बघ. “
अनसूया त्याचा हात धरून, त्याला जवळजवळ खेचतच सोना ज्या चाळीत रहात होती, तिथे घेऊन गेली. सोनाच्या घराबाहेर, व्हरांड्यात उभे राहून मायलेक कानोसा घेत होते. सोनाच्या घरातून पक्वानांचा दरवळ येत होता, आणि जोरजोराने हशाही ऐकू येत होता.
“सोना, तू तर अगदी जंगी पार्टीच दिलीस आज, मला तर वाटलं होतं गेल्या वेळसारखे वडापाव खायला घालणार तू. ” सोनाची मैत्रीण.
“काय सांगू अग तुला? तो बावळट विजय भेटला नसता तर वडापावसुद्धा देणं शक्य नव्हतं. पण मी दोन थेंब अश्रू ढाळले त्याच्यासमोर, त्याला खोटंच सांगितलं ताईच्या सासरकडची माणसं येत आहेत म्हणून. ते येडं विरघळलं अन् दोन हज्जार रुपये काढून दिले त्यानं. “
विजय गोरामोरा झाला.
“दुसऱ्यांना मदत करावी, पण नीट विचार करून करावी, बेटा. ” अनसूया हिरमुसल्या विजयला समजावत होती.
काही दिवसांनंतरची गोष्ट. पुढच्या आठवड्यापासून बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार होत्या, पण विजय काहीसा चिंतेत दिसत होता.
“काय झालं बाळा? परीक्षेचं टेन्शन आलंय का? ” आईने काळजीने विचारले.
“नाही ग आई, अभ्यास ठीक चालला आहे माझा. थोडी गणिताची भीती वाटते. तो रमेश म्हणाला की माझा भाऊ भन्नाट गणित शिकवतो. मी त्या भावाला भेटलो, तो म्हणाला – हजार रुपये दे, मी तुला स्पेशल शिकवतो. मी चार वेळा गेलोसुद्धा, पण काही ना काही कारण काढून त्याने मला काहीच शिकवलं नाही. आज गेलो, तर म्हणाला, तू बिनधास्त परीक्षा दे, मी तुझे मार्क वाढवतो. मला काहीच उमगत नाहीये, म्हणून मी गोंधळलो आहे, इतकंच. “
अनसूयेने पुन्हा एकदा कपाळाला हात लावला. “अरे, बोर्डाच्या परीक्षेत असे परस्पर कसे मार्क वाढवेल तो? तुझा पेपर कुठल्या गठ्ठ्यातून कोणाकडे तपासायला जाणार हे त्याला थोडीच कळणार आहे? त्याने फसवलं बाळा तुला.
तू पैसे द्यायच्या आधी मला विचारायचे तरी होतेस. आणि एवढे पैसे आले कुठून तुझ्याकडे? “
“आई, माझ्या पिगी बँकेतून घेतले होते. मस्त मार्क्स मिळवून तुला surprise द्यायचं होतं, म्हणून नव्हतं सांगितलं, ” विजयचा आवाज आणि चेहरा, दोन्ही पडला होता.
विजय मनाने खूप चांगला होता, पण त्याच्या या भोळसरपणाने या जगात त्याचा कसा निभाव लागणार हे त्याच्या आईला लागलेली मोठ्ठी काळजी होती.
यथावकाश विजयची बोर्डाची परीक्षा पार पडली. पेपर चांगले गेले होते. सध्या विजय आईबरोबर तिच्या कंपनीत प्रशिक्षणार्थी (apprentice) म्हणून काम करत होता. वेळ चांगला जाईल, चार पैसे गाठीशी लावता येतील हे तर हेतू होतेच, पण अनसूयेला त्या निमित्ताने विजयची दुनियेशी ओळख करून द्यायची होती, त्याला शहाणपणाच्या चार गोष्टी समजावून द्यायच्या होत्या.
आज तो कंपनीत कामाला येऊ लागला त्याला दोन महिने होऊन गेले होते. अचानकच आई विजयला म्हणाली, “विजय, बाळा, अरे त्या नलिनीला पैश्यांची गरज आहे रे. महिनाभरासाठी दहा हजार रुपये मागते आहे, काय करू रे? “
“अग आई, कालच नलूमावशी पेढे वाटत होती ना तिच्या मुलीचा पहिला पगार झाला म्हणून. तू जरा नीट चौकशी करतेस का? म्हणजे, खरंच काही अडचण असेल तर देच तू पैसे… “
अनसूयेच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं.
“तुझा रिझल्ट लागला की गणितासाठी लगेच तू त्या रमेशच्या भावाची शिकवणी लाव, म्हणजे ऐन वेळी धावाधाव नको, ” अनसूया विजयला सुचवत होती.
“कप्पाळ! अग, त्या रमेशला स्वतःलाच यंदा बोर्डाच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला कॉपी करताना पकडलं. त्याचा भाऊ गणित चांगलं शिकवत असता, तर रमेशवर ही पाळी का आली असती? उलट मीच त्याच्याकडून माझे हजार रुपये परत घेऊन आलोय. ”
हळूहळू अनसूया विजयबाबतीत निर्धास्त होऊ लागली होती. एवढ्यात शेजारच्या इमारतीतील सोनादीदी धावतच आली.
“काकू, मला जरा हजार रुपये उसने देता का? ताईच्या सासूबाई इथे घरी आल्या होत्या, त्यांना चक्कर आली आहे, डॉक्टरांनी औषधं आणायला सांगितली आहेत. ”
“हे बघ सोना, तू माझ्या विजयला दोनदा फसवलंस, पण मी नाही हो बधायची. तू इथून जा बघू कशी. ” अनसूयेने करडेपणाने सांगितले.
पाहिलं तर विजय मात्र शेजारी नव्हता. दहा पंधरा मिनिटांनी स्वारी घामाघूम होऊन आली. आईच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे बघून त्याने सांगायला सुरुवात केली.
“मला या वेळी दीदी खरंच घाबरलेली वाटली, म्हणून मग खात्री करून घ्यायला मी तिच्या घरी गेलो. तिच्या ताईच्या सासूबाई खरंच आल्या आहेत आणि त्यांना खरंच बरं नाहीये. मग मी डॉक्टरांची औषधाची चिठ्ठी घेतली.
केमिस्टकडे औषधं महाग पडतात, म्हणून मग मी पुढच्या चौकातील जेनेरिक केमिस्टकडे गेलो. तिथे तीच औषधं मला स्वस्त मिळाली. ती घेऊन मी दीदीच्या घरी गेलो, आजींना औषधं कशी घ्यायची ते समजावून सांगितलं आणि घरी परत आलो.
मी ते रमेशच्या दादाकडून माझे पैसे परत घेतले होते ना, आई, त्यातले वापरले मी पैसे. आणि आता दीदी परत आली ना, की मी तिला लांडगा आला रे आला गोष्ट सांगणार आहे, बरं का… ” विजय अव्याहतपणे बोलत होता.
आणि या निरागस बालपणाला नीरक्षीरविवेक बुद्धी आलेली पाहून माऊली सुखावत होती.
© डॉ. मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





