image_print

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग : लघुकथा – आंधळी वाट (भावानुवाद) ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

रात्रीची वेळ,दार खटखटण्याचा जोरदार आवाज आला. तो ऐकून मिस्टर आणि मिसेस वर्मा खडबडून जागे झाले. त्यानी आतूनच

विचारलं,  ‘कोण?’

‘पोलिस.दार उघडा.’

वर्मानी दार उघडलं. शेजारी त्यांची पत्नी कमलाही होती.त्यांनी प्रश्नांर्थक नजरेने पोलिसांकडे पाहिलं. डी.एस.पी. शर्मा त्यांना परिचितसे वाटले.

‘तुमचा मुलगा लोकेश ना? त्याला बोलवा जरा.’

‘शर्मा साहेब, लोकेशने काय केलं? तो तर इंजिनिअरिंच्या शेवटच्या वर्षाला आहे. रात्रंदिवस अभ्यास करत असतो.’

‘तुम्ही मला काय विचारता? आपल्या मुलालाच विचारा ना.’

तोपर्यत  लोकेश उठून आला. त्याच्या डोक्याला नि हाताला पट्टया बांधलेल्या होत्या. शर्मा साहेबानी इशारा केला. पोलिसांनी झटकन त्याला पकडला.

‘शर्मा साहेब, काय ते सांगा तरी.’

‘आपला मुलगा उपद्रवी विद्यार्थ्यांचा नेता आहे. गेल्या चार दिवसांत आपल्या मित्रांना घेऊन त्याने शासकीय संपत्तीचं खूप नुकसान केलय्. आगी लावल्या, गाड्यांची तोडफोड केली, पोलिसांवर दगडफेक केली.’

‘काय लोकेश, शर्मा साहेब काय सांगताहेत?’

‘हो. आम्ही स्वतंत्र भारताचे नवयुवक आहोत. घटनेचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अभिव्यक्ती  स्वातंत्र्यावर पहारे ठेवण आम्हाला पसंत नाही. आम्ही विरोध करणारच.’

‘वर्मा साहेब, ह्याला विचारा, ह्यांना कोणी भडकवलं? आम्हांला त्याचं नाव माहित आहेच. त्याने स्वतः भडकाऊ भाषणं करून, मुलांचा ब्रेनवाश करून दंगली मध्ये ओढलं आहे. आता तुम्ही कोर्टात लढत रहा. मुलाचं भविष्य तर बर्बाद झालंच, शासकीय नुकसानीची भरपाई तुम्हांलाच द्यावी लागेल.’

पोलिस लोकेशला घेऊन गेले. कमला रडायला लागली. वर्मानी  आपल्या ओळखीच्या वकिलाला चौधरीना फोन लावला. त्यांनी झोपेतच सांगितलं, ‘रात्री काही होऊ शकत नाही. सकाळी बोलू.’

‘मी खात्रीने सांगते, लोकेश अगदी साधा आहे. तो दंगा धोपा करूच शकत नाही.’

‘कमला, तू घरातल्या कामात असतेस, मी कालेजमध्ये. आपल्याला आपला मुलगा काय करतोय याचा पत्ताच नसतो. त्याची संगत, सवयी काहीच माहीत नसतं. त्याने जे जे मागितलं, ते आपण चौकशी न करता देत गेलो. आपल्या खोट्या, बेपर्वाईच्या संगोपनामुळेच आज ही वेळ आली आहे.’

‘त्या दंगा भडकवणाऱ्यांचा सत्त्यानाश व्हायला हवा. त्यांचं काही जात नाही, पण आमची उरलीसुरली उमेदही खचली.’

‘ह्यालाच म्हणतात, सुक्या बरोबर ओलंही जळणं. नेत्यांनी आपली नेतेगिरी चमकवली, लेकीच्या सासरच्या मंडळींचा सारखा फोन येतोय, ‘लोकेश कुठे आहे? त्याला काही झालं नाही ना?’ त्यांनी टीव्ही वर दंगलखोरांबरोबरच्या लोकेशला ओळखलंय. त्यांना काय उत्तर देऊ?

कमला, आपण दोघेही अयशस्वी आईबाप आहोत. आपल्या मुलावर आपण चांगले संस्कार केले नाहीत, आणि त्याची बिघडलेली वागणूक आपण ओळखू शकलो नाही.’

‘गरीब गायी सारखा नि शिकलासवरलेला आपला मुलगा आतून असा असेल असं कधी वाटलंच नाही. त्याला फार स्वातंत्र्य दिलं हे आपलं चुकलंच, पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि लँपटापसुध्दा नेलाय. त्यात आणखी काय काय आहे कोणाला ठाऊक.’

‘कमला, आता शांत हो. एकदा त्या सुरुंग लावलेल्या वाटेवर गेलेला, कोणी ही परत येऊ शकत नाही. सगळं त्या ईश्वरावर संपवूया. इथे प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशोब स्वतः लाच द्यावा लागतो. उद्या चौधरी वकिलांशी बोलतो.’

मूळ हिंदी लघुकथा-‘अंधी सुरंग’ – लेखक – श्री आनंद बिल्थरे

मो.79997858808

मराठी अनुवाद – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 vote
Article Rating

Please share your Post !

0Shares
0
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments