image_print

सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

Image result for पुत्रकामेष्टि अनिल बर्वे

पुस्तकाचे नाव – पुत्रकामेष्टी (नाटक)

लेखक – श्री अनिल बर्वे

पॉप्युलर प्रकाशन

पृष्ठे – ८०

मूल्य – १२ रुपये

अमेज़न लिंक >> पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे

फ्लिपकार्ट लिंक >> पुत्रकामेष्टी (नाटक) … श्री अनिल बर्वे

 

पुत्रकामेष्टी (नाटक) – (एक आस्वादन)

पुत्रकामेष्टी हे अनिल बर्वे यांचं भन्नाट नाटक. मर्मस्पर्शी. मर्मस्पर्शी की मर्मभेदी ? बी.के. मोठ्या इंडस्ट्रीचा मालक. आहे. त्याचं आपल्या पत्नीवर, उर्मिलावर निरातीशय प्रेम आहे. पैशाने विकत घेता येणारी सारी सुखे त्यांच्यापुढे हात जोडून उभी आहेत. पैशाने विकत घेता न येणारे सुख म्हणजे आपत्यप्राप्ती. ते मात्र त्यांच्याकडे नाही. त्यासाठी उर्मिला वेडी-पिशी झालेली आहे. मूल न होण्याचं कारण? हनीमूनच्या वेळी त्यांच्या गाडीला झालेला अपघात आणि त्याचा परिणाम म्हणजे उर्मिलाचं गर्भाशय काढावं लागणं. ती बी.के.च्या मागे लागते की त्याने घटस्फोट घ्यावा आणि दुसरं लग्नं करावं. बी.के.ला ते मान्य नाही. तो उपाय सुचवतो, आंनाथश्रमातून मूल दत्तक घ्यावं, पण ते उर्मिलाला मान्य नाही. तिला बी.के.चं स्वत:चं मूल हवय. त्यासाठी उर्मिला उपाय सुचवते, एखाद्या वेश्येचा उपयोग करायचा. म्हणजे आपत्यप्राप्ती  हेही सुख पैशाने मिळवता येईल, याबद्दल तिला खात्री आहे. ती म्हणते, ‘थोड्याशा पैशासाठी वेश्या रात्रीपुरतं शरीर भाड्याने देते. आपण दीड-दोन वर्षांसाठी तिला भाड्याने घ्यायचं. ह्युमन इनक्युबेटर. तिच्या गर्भाशयात आपलं मूल वाढवायचं.’ ती मागेल तेवढे पैसे तिला द्यायचे. हा सौदा झाला. आपल्या इच्छेने ते तिच्या गर्भाशयात वाढेल.

बी. के. ला अर्थातच हे मान्य नाही. पण राजा युक्तिवाद करत, बी. के. ला हे मान्य करायला लावतो. राजा हा बी. के. इंडस्ट्रीचा लीगल अॅकडव्हायझर. त्या दोघांचा मित्र. उर्मिलाचा मानलेला भाऊ. तो एखाद्या अस्तरासारखा त्यांच्या आयुष्याला चिकटून आहे. नाटकात त्याची भूमिका बी. के.च्या पर्सनल अॅथडव्हायझरची. राजा आणि बी. के. अशा वेश्येचा शोध घेतात. तिथे त्यांची गाठ पडते. छंदिता… छंदाशी आणि इथे त्रिकोणाचा तिसरा बिंदू अवतीर्ण होतो.

छंदिताशी बोलण्यातून पुढे कळत जातं, ती मुरळी आहे. दहाव्या वर्षीच तिच्या आई-वडलांनी तिचे खंडोबाशी लग्नं लावून दिले आहे आणि तेव्हापासून तिला धंद्याला लावले आहे. बी. के. तिला स्पष्टच सांगतो, त्याला तिच्यापासून मूल हवे आहे. त्यासाठी तो वाटेल तितके पैसे तिला द्यायला तयार आहे, पण तिने मुलावर कोणताच हक्क सांगता कामा नये. दोन लाख रुपयांच्या बदल्यात ती हे काम करायला खुशीने तयार होते.

बी.के.आणि राजा छंदिताला घेऊन पाचगणीला येतात. इथे पाहुणीच्या सोबतीसाठी आणि लक्ष ठेवायला बहाद्दूर आणि माळीण आहे. उर्मीलाही इथेच येऊन रहाते. बी.के. ला झालेलं मूल उर्मिलाचं आहे, असं जगाला भासवायचय म्हणून तो तिचं  बाळंतपण स्वित्झर्लंडला करायचं ठरवतो. छंदाला सहा महीने होतात. बाळ पोटात गडबड करू लागतं आणि छंदाचं ममत्व एकदम जागं होतं. तिच्या स्वभावात , विचारात बदल होतो. बी. के. च्या इच्छेप्रमाणे, कल्पनेप्रमाणे ती केवळ मानवी इनक्युबेटर रहात नाही. तिच्या भावना, तिचं वात्सल्य जागृत होतं. बाळ दोन माहिन्याचं होतं. बी.के. तिला हाकलून देतो. बाळाचा ताबा मिळवण्यासाठी ती कोर्टात जाते. एरवी बी.के.ची सतत पाठराखण करणारा राजा इथे मात्र वकील म्हणून छंदीताच्या बाजूने उभा आहे. प्रेक्षकच न्यायाधीश आहेत. निकाल छंदाच्या बाजूने लागतो. ती मुलाला घेऊन जाऊ लागते. म्हातार्यान माळिणीला मात्र वाटतं, असे गुंते कोर्टात सुटत नाहीत. एका झाडाचं कलम दुसर्याा झाडावर करायचं, तर ते हलक्या हाताने, मायेने करायला हवं. ती छंदिताशी बोलते. तिच्या बोलण्यातून छंदिताला जाणवतं, बाळाला चांगल्या रीतीने वाढवणं, त्याचं नीट पालन-पोषण करणं कसं अवघड आहे, नव्हे अशक्य आहे. ती बाळाला ठेवून जाते. उर्मिलाने दिलेले दोन लाख रुपयेही ठेवून जाते. बी.के. शक्तिपात झाल्यासारखा कोचावर बसतो आणि ओक्साबोक्षी रडू लागतो. नाटक संपते.

नाटक शोकांत आहे, पण यात रूढार्थाने कुणी खलनायक वा खलनायिका नाही. असलीच तर नियती खलनायिका आहे. सार्या  शोकांतिकेचे मूळ उर्मिलेच्या मुलाविषयीच्या असोशीतव आहे. तिला मूल हवाय, पण ते अनाथाश्रमातलं नकोय. त्याचे कारणही तिच्या बालपणीच्या आठवणीत आहे. राजा तिला सख्खा भाऊ वाटत असतो, पीएन राजाला जेव्हा कळतं की तो आश्रित आहे. तेव्हा त्याचं वागणं एकदम बदलतं आणि तो ‘मानलेला’ भाऊ होतो. तिला वाटतं दत्तक मुलाला मोठा झाल्यावर वस्तूशिती कळली आणि तोही असाच बदलला तर? म्हणून तिला ते नकोय. ती आग्रह धरते, कुणा वेश्येचा यासाठी वापर करावा. ह्युमन इनक्यूबेटर. त्याप्रमाणे छंदीता ही वेश्या दोन लाख रुपयाच्या मोबदल्यातत्या घराण्याला वारस द्यायचं कबूल करते. पुढे तिला दिवस रहातात.

एकदा घरातली वयस्क माळीण, उर्मिला आणि छंदीता बोलत असतात. बोलता बोलता माळीण म्हणते,’ निपुत्रिक होता म्हणून राजा दशरथाने ‘पुत्रकामेष्टी’ यज्ञ केला… तुम्हीदेखील असाच यज्ञ करताय ग… अग यज्ञ करायचा झाला, म्हणजे हवन करावं लागतं. बळी द्यावा लागतो. … तुम्ही तिघंही गुणी लेकरं ग. … तुमच्यापैकी कुणाचा बळी जाणार, काळजी वाटते. भीती वाटते मनाला.’ तिचं बोलणं म्हणजे भविष्यातील घटनेचं सूचनाच आहे.

यातील व्यक्तिरेखा लेखकाने अतिशय कुशलतेने विकसित केल्या आहेत. बी. के. मोठा उद्योगपती. धांनवंत. यशवंत. त्याचे उर्मिलेवर हिरातीशय प्रेमाहे. तो व्यवहारीही आहे. उर्मिला मुलासाठी वेदी-पिशी झालेली आहे. ती वेद लागण्याची सीमा गाठू शकते, हे जेव्हा त्याला कळतं, तेव्हा तो तिचा अव्यवहार्य हट्ट पुरवतो. छंदिताला तो मानवी इनक्यूबेटर मानतो. त्याला तिच्याबद्दल सहानुभूती आहे, कणव आहे, हे त्याच्या वेळोवेळी बोलण्यातून जाणवतं, पण त्याला तिची भावनिक गुंतवणूक नकोय. ती मुलाचा ताबा द्यायला नकार देते, तेव्हा तो तिच्याबद्दल अतिशय जहरी उद्गार काढतो. रांड, बाजारबसवी, हरामजाडी… वगैरे.. वगैरे… जेव्हा त्याला कळतं, ती मुलाला ठेवून गेलीय, पैसेही न घेता गेलीय, तेव्हा तो पराभूत होतो. कोचावर बसतो आणि ओक्साबोक्शी रडू लागतो.

उर्मिलेचे बी. के. वर अतिशय प्रेम आहे. ती सरळ स्वभावाची आहे. छंदिताशी ती माणुसकीने, मायेने वागते. राजा कंपनीचा लीगल अॅहडव्हायजर. तो बी.के. आणि उर्मिलेच्या जीवनाला अस्तरासारखा चिकटलेला आहे. वृद्धा माळीणीने जग पाहिलाय. ती शहाणपणाचं बोलते.

नाटकातले संवाद मोठे रेखीव आणि नेटके आहे. जी ती पात्रे आपापल्या भाषेत बोलतात, लेखकाच्या भाषेत नाही.   छंदिताला मुलाचा ताबा मिळालाय आणि ती घर सोडून निघालीय.  आता माळीणाबाई आणि तिच्यातला संवाद बघा-

माळीण- छंदा पोरी, चांगलं झाला हो…तुला तुझं बाळ मिळालं. पण बाळाचं घर गेलं ग…   बाळाचं घर गेलं. कुठं जाणार तू आता? … पुन्हा कोठयात?

छंदा- नाय

माळीण- नकोच जाऊस हो. नकोच जाऊस. कोणत्याही पोराला ‘रांडेचा’ म्हटलेलं आवडायचं नाही. … मग जाणार कुठे तू आता?

छंदा – देवाच्या जगात कुठेही.

माळीण- जग देवाचंच ग .. पण देव दगडाचा … उखाण्यात सांगायला गोड वाटतं… आभाळाचं  छ्प्पर! पण त्याच्याखाली राहाता येत नाही हो. राहाता येत असतं, तर टिनाची छपरं कशाला बांधली असती माणसांनी? ( छंदा निरुत्तर ) कामधंदा काय करणार?

छंदा – कुठं तरी मोलमजुरी

माळीण- चांगली हो. घामाची कष्टाची भाकरी खूप चांगली. पण छंदा पोरी… घाम गाळून  पोटापुरती भाकरी भाकरी मिळेल, बाळापुरतं दूध नाही मिळणार. … दूध खूप महाग असतं. तू असं कर. … भाताची पेज देत जा त्याला….

छंदा – अं?

माळीण- आता भाताच्या पेजेत दुधाचं बाळसं कुठलं असायला? बाळ हडकेल जरासा. .. पण जीवंत राहील हो. जीवंत राहील.

राजाने कोर्टात केलेले भाषण म्हणजे तर मास्टर पीस म्हणावा लागेल. भावी काळात निर्माण होऊ शकणार्यान समस्येकडे तो संकेत करतो. छंदीताने 2 लाख रुपयांच्या मोबदल्यात मानवी टेस्ट ट्यूब म्हणून काम कारायचे, बी. के. च्या मुलाला जन्म द्यायचे कबूल केलेले असते. पण नंतर ती त्या मुळावर हक्क सांगते. राजा म्हणतो, ‘भावी काळात टेस्ट ट्यूबचा प्रयोग यशस्वी झाला, तर निर्जीव टेस्टट्यूबज तुमच्यापुढे तुमच्यापुढे येणार नाहीत. मग?

मग न्यायाधीश महाराज त्या टेस्टट्यूबजचा वापर फक्त बी.के. ऊर्मिला सारखी निपुत्रिक जोडपीच वात्सल्यपूर्तीसाथी करणार नाहीत…. तर प्रत्येक चांगल्या शोधाचा स्वार्थासाठी दुरुपयोग करणार्याा दुष्टशक्तींचाही वापर करतील स्मगलर, गुंड, व्यापारी, सावकार, जमीनदार… तरुण मुला-मुलींकडून रक्त विकत घेतल्याप्रमाणे त्यांची बीजं विकत घेतील. टेस्टट्यूबमधून मुलं काढतील… ज्या मुलांना नसेल आई.. नसेल बाप… असेल फक्त मालक! गुलामांच्या पिढ्यांच्या पिढ्या तयार होतील.’

भावी अनर्थाचे अंगावर शहारा उमटवणारे भीषण चित्र तो पुढे उभे करतो.

तो म्हणतो, ‘मूल विकत घेतलं काय आणि मुलाला जन्म देणारी आई भाड्याने घेतली काय, या व्यवहारात खरदी-विक्री अंतर्भूत आहेच.’

न्यायाधीशाने कोणताही निर्णय दिला तरी तो क्रूरच असणार आहे. राजा म्हणतो, ‘तरीपण असा क्रूर निर्णय द्या – फक्त यांच्याताला कोणीही बळी जावो… पुढल्या पिढ्या बळी जाणार नाहीत…. समाजाचं भवितव्य धोक्यात येणार नाही.’

निर्णय होतो. मुलाचा ताबा छंदाला मिळतो. वैयक्तिक समस्येपासून सुरू झालेलं नाटक एका अनर्थ करू शकणार्यार विलक्षण आशा सामाजिक समस्येचं सूचन करतं. प्रेक्षक – वाचक यात गुंतत जातो. 

अगदी आवर्जून बघावं निदान वाचावं असं आहे ‘पुत्रकामेष्टी’ नाटक.

परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments