श्री सुहास रघुनाथ पंडित
पुस्तकावर बोलू काही
☆ “आनंदाच्या वाटेवर” – लेखिका : सौ ज्योत्स्ना तानवडे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तक : आनंदाच्या वाटेवर
लेखिका : सौ ज्योत्स्ना तानवडे
९४२३४००४९२
प्रकाशक : अमित प्रकाशन
पुणे ०२०-२५६६०५६६
मूल्य : रु. ३५०/
सौ ज्योत्स्ना तानवडे
☆ संपन्न जीवनाचा मार्ग—आनंदाच्या वाटेवर ☆
‘आनंदाच्या वाटेवर ‘ हा सौ. ज्योत्स्ना तानवडे यांचा ललित लेख संग्रह! . एकंदर पस्तीस लेखांचा हा संग्रह संपूर्ण वाचनानंतर मनाला आनंद देऊन जातो. वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले लेख असले तरी प्रामुख्याने एक गोष्ट जाणवते. ती म्हणजे हे लेख प्रामुख्याने कुटुंबसंस्था, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी या तीन मुख्य विषयांशी निगडित आहेत. या तीनही विषयात सौ. तानवडे यांना स्वारस्य असल्यामुळे व उक्ती आणि कृती यांची सांगड असल्यामुळे लिखाणात कृत्रिमपणा जाणवत नाही. परंपरा आणि विज्ञान यांची सांगड घालून समाजभान असणा-या चिंतनशील मनाचे लेखन असेच या संग्रहाविषयी म्हणावे लागेल.
प्रत्येक लेखाची योग्य ती दखल घेतल्याशिवाय पुढे वाचत जाणे उचित ठरणार नाही. म्हणून वाचताना लेखांविषयी जे वाटले ते असे -:
चला हसू या – माणसं जोडण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपलं हास्य. आपल्याजवळचा हा ठेवा इतरांसाठी वापरून आपण आपला आनंद कसा वाढवू शकतो हे सांगणारा लेख.
आनंदाचा झरा – कुटुंबातील एकोप्याची भावना हाच कुटुंबाच्या आनंदाचा खरा झरा आहे. दुस-यांच्या आयुष्यात आनंद फुलवताना आपल्या कुटुंबातील आनंदाचा झरा अधिक प्रवाहित होत जातो आणि तो पुढच्या पिढ्यांनाही समृद्ध बनवतो. म्हणून ‘ मनाची मनाशी मैत्री ‘ जोडणे आवश्यक आहे असे लेखिका आवर्जून सांगतात.
रेशीमगाठी – कशाच्या आहेत या रेशीमगाठी? या रेशीमगाठी आहेत नात्यांच्या. भारतीय समाजातील एकत्र कुटुंब पद्धती कडून विभक्त आणि त्याहीपुढे एकल कुटुंब पद्धतीकडे होणारी वाटचाल हा चिंतेचा विषय आहे. पण त्यातून मार्ग कसा काढायचा यांचा कानमंत्र देणारा हा लेख.
गंध नात्यांचा गहिरा – काव्य पंक्तींची पेरणी करत स्नेहाच्या बंधनातून निर्माण झालेल्या नात्यांचा गंध किती गहिरा असतो हे दाखवताना लेखिकेने या लेखात सर्व नात्यांची आठवणीने दखल घेतली आहे. सगळी नाती जपायची असतील तर नेमकं काय केलं पाहिजे, आनंदाचं गुपीत काय आहे हे कळण्यासाठी लेखच वाचायला हवा.
अमृत भरारी – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लिहीलेल्या या लेखात लेखिकेच्या मनात आपल्या देशाविषयी असलेले प्रेम, अभिमान आणि उज्वल भविष्याची तळमळ स्पष्टपणे दिसून येते. लेखाच्या प्रारंभीच त्यांनी तिरंगा ध्वजाचे त्यांनी केलेले वर्णन विचारांचे वेगळेपण दाखवून देते. हक्क आणि कर्तव्य दोन्ही समजून घेऊन सजग नागरिकाचे वर्तन कसे असावे याविषयीही त्यांनी लिहीले आहे.
आदर्श मंत्र –आरोग्याचा जागर करणारा हा लेख. निरोगी शरीर हा सुखी आयुष्याचा पाया आहे. पण शरीर निरोगी राखण्यासाठी आवश्यक असणारी जागरुकता मात्र दिसून येत नाही. प्रत्येकाने आपल्या व कुटुंबाच्या आरोग्याची आजार होण्यापूर्वीच काळजी घ्यावी असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.
सखासोबती निसर्ग – माणसाचे आणि निसर्गाचे नाते अतूट आहे. आधुनिक जगात पर्यावरणाचा तोल ढासळत असला तरी माणसाची निसर्गाविषयीची ओढ काही कमी होत नाही. माणूस निसर्गाशी कसा जोडला गेला आहे, हे सांगणारा हा लेख आहे.
पुढचे पाऊल – काळाचे पुढचे पाऊल म्हणजे उगवणारे नवे वर्ष! सरत्या वर्षाचा ताळेबंद मांडून नव्या वर्षाचे स्वागत करताना आठवणी आणि अनुभव यांची पुंजी बरोबर घेऊन पुढे जायचे असते. प्रत्येक नव्या वर्षात, वैयक्तिक प्रगती बरोबरच कौटुंबिक आणि पर्यायाने सामाजिक प्रगती कशी साधता येईल याचा विचार झाला पाहिजे असा नवा दृष्टिकोन त्यांनी आपल्या समोर ठेवला आहे.
विसाव्याचा थांबा – सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र असण-या माणसाच्या फक्त शरीराला नव्हे तर मनालाही विश्रांती हवी असते. असं थोडंसं थांबून ताजतवानं होण्यासाठी रोजच्या जगापासून दूर जावं असं सगळ्वायांनाच वाटत असतं. हा निवांतपणा पाहिजे असेल तर एखाद्या छोट्या पण सुरक्षित ठिकाणी, निसर्गाच्या सान्निध्यात जाणं यासारखं सुख नाही. आपल्या कुटुंबायां समवेत अशी विश्रांती घेणं म्हणजे मनाला उभारी देणं असतं. अशा ‘ आफ्टर द ब्रेक ‘ नंतर आपण पुन्हा नव्या जोमाने आपल्या रोजच्या जीवनात उत्साहाने रमून जाऊ शकतो.
सुख येई जळासवे – जल हेच जीवन हे सर्वांना माहित असलं तरी या ‘ जीवना ‘ कडं आपण कसे पाहतो हे दाखवून देणारा हा लेख. पाणी प्रश्नाचा सर्व बाजूंनी विचार करुन काही उत्तरेही लेखिकेने सांगून ठेवली आहेत. भूजल म्हणजे आपल्या सर्वांची जमिनीखालची पाण्याची टाकी ही उपमा खूपच समर्पक आहे.
सेल्फी पॉइंट –शिर्षकावरुन लेखाचा विषय लक्षात येत नाही. निसर्ग प्रेम व संवर्धन हा विषय यात हाताळलाय.
स्वतःच्या बागेतील वृक्षच वसुधाशी बोलू लागतात ही कल्पना खूप काव्यात्मक आहे.
दुस-यासाठी जगलात – जगलो खूप. पण कुणासाठी?
ते सर्वात महत्त्वाचे आहे. केवळ दीर्घायुषी होण्यापेक्षा आपलं जगणं इतरांसाठी, समाजासाठी कारणी लावणं जास्त महत्त्वाचं आहे.
सुखाचे हे सुख – सुख म्हणजे नेमके काय आणि ते कसे मिळवायचे असते या प्रश्नाच्या उत्तरावर केलेले मुक्त चिंतन म्हणजे हा लेख. साध्या साध्या गोष्टींतूनही सुख कसे मिळते ते समजून घेण्यासारखे आहे.. प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात. आपण सुखाचा एक धागा शोधायचा की दु:खाच्या शंभर धाग्यात गुरफटून जायचं हे आपल्या दृष्टीवर अवलंबून आहे.
यज्ञकर्म – खाणे हा विषयच सर्वांच्या जिव्हाळ्याचा! घरचे खाणे आणि बाहेरचे खाणे हा खूप चर्चेचा विषय.
आजच्या जीवन पद्धतीमुळे बाहेरचे खाणे टाळता येत नसल्यामुळे कोणती काळजी किंवा दक्षता घेतली पाहिजे ते लेखिकेने सांगितले आहे. पण त्याहीपेक्षा घरचे पदार्थ चांगले का हे त्यांनी पटवून दिले आहे.
फिक्स्ड डिपॉझिट – माणसं जोडत गेलं की आपल्याला शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद यांची ठेव मिळत जाते. ही आयुष्यभराची ठेव आपल्याला जगण्यासाठी
उर्जा देते. आपणही अशी ठेव दुस-याला द्यावी आणि मनाची श्रीमंती वाढवावी असं सांगणारा हा लेख.
लुटू या प्रेमाचा खजिना – संक्रांत सणाला हळदीकुंकूवाच्या निमित्ताने काही ना काही लुटण्याची पद्धत आहे. काळानुसार लुटण्याचा वस्तूही बदलल्या. मग आणखी थोडा बदल करून प्रेम, आपुलकी का लुटू नये?
शिवाय गरजू व्यक्ती किंवा संस्थांना उपयुक्त वस्तूही लुटता येतील. असा नवा विचार या लेखात मांडला आहे.
उजळू आपुली नाती – सणांच्या निमित्ताने एकत्र येणे हे नात्यांना टिकवून ठेवण्यासाठी, उजाळा देण्यासाठी उत्तम माध्यम आहे. शिवाय अशा एकत्र येण्यामुळे कुटुंबातील सदस्यांना एक व्यासपीठ मिळते आणि त्यातून कलागुणांना वाव मिळतो.
झुळझुळे कलेची सरिता – प्रत्येक माणसाच्या अंगी कोणती ना कोणती कला असतेच. आपण त्याचा शोध घेत नाही. पण तो घेतलाच पाहिजे. कारण कला आपल्या बरोबरच दुस-यांनाही आनंदी बनवते, समाधान देते. आपल्या शेवटापर्यंत साथ देणारी ही कला खरोखरच आपला मित्र असते. कलेची महती आणि तिचे महत्वाचे स्थान विषद करणारा हा लेख.
नात्यांचा गुंफू गोफ – आपल्या काळातील बालपण आणि आजच्या मुलांचे बालपण यात खूप फरक पडला आहे. तरीही कुटुंबातील मुले एकत्र आलीच पाहिजेत. त्याशिवाय पुढच्या पिढीपर्यंत नाती टिकणार नाहीत. यावर कोणता पर्याय काढला आहे ते लेख वाचल्यावरच समजेल.
आजीचा अकाऊंट – आजीचा अकाऊंट कोणत्याच बॅंकेत नाही याचं नातवाला आश्चर्य वाटतं. पण आजीच्या माणुसकीच्या खात्यातील जोडलेल्या नात्यांची भरगच्च ठेव पाहून तो थक्क होतो. कशी वाढवायची ही ठेव? लेख वाचला की आपोआपच समजेल.
गंगाजळी – पाण्याची गंगाजळी कायम शिल्लक राहण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगणारा हा लेख. पाण्याचे महत्व, आपली बेफिकीर वृत्ती, भावी पिढ्यांच्या विचार, जलसंपदेचे जतन आणि संवर्धन अशा विविध मुद्यांवर प्रकाश हा लेख प्रकाश टाकतो.
तू आहेस खास – स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव करून देणारा लेख. आरसा समोर ठेवून स्वतःच्या प्रतिबिंबाशी संवाद साधण्याचा एक यशस्वी प्रयत्न.
जाता जाता, ‘ज्या वेदनांचे फळ आनंददायी असते त्या वेदनांचे दु:ख कधी करायचे नसते’ असा संदेश ही त्यांनी अगदी सहजपणे दिला आहे.
ऐका गणेशा तुमची कहाणी – असे म्हटले असले तरी या निमित्ताने लेखिकेने माणसाचीच कहाणी सांगितली आहे. पर्यावरण विषयक त्याने केलेल्या चुका त्यांच्या गळी उतरवून, झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, उलट
वागण्यात सुधारणाच होईल असेही त्यांच्याकडून वदवून घेतले आहे.
स्फूर्ती देवता - आपले व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये आपल्या आईवडीलांचा सिंहांचा वाटा असतो. लेखिकेने या लेखात आपले आईवडील याच आपल्या स्फूर्ती देवता कशा आहेत ते अगदी मनापासून सांगितले आहे. आईवडीलांविषयी त्यांच्या मनात असणारी श्रद्धा, प्रेम व आदर प्रत्येक वाक्यातून दिसून येतो. खूप आत्मियतेने केलेले व्यक्तीचित्रण!
अनुभूति – धावपळीच्या जीवनात मनाला श्रांत करण्यासाठी थोडी विश्रांती घेणे आणि त्यासाठी निसर्गाशी जवळीक साधते यासारखा उत्तम मार्ग नाही. पंचतत्वांच्या सहवासात मिळणारा अलौकिक आनंद हा प्रत्यक्ष अनुभूती घेतल्याशिवाय समजणारच नाही.
फिरुनी उगमाकडे – कान्हा या पात्राभोवती थोडेसे कथानक रंगवून, संवादातून नदी स्वच्छता मोहीमेचे महत्त्व या लेखातून सांगितले आहे. जल जागृती साठी असे संवादात्मक लेख नक्कीच उपयोगी ठरतील.
वरदहस्त – आस्तिक की नास्तिक? लेखिकेने सुरुवातीलाच सांगितले आहे की आपले कुटुंब हे पूर्णपणे आस्तिक आहे. पण ही श्रद्धा डोळस आहे. सद्वर्तन आणि सदाचार यावर भर देणारी आहे. पेराल तसे उगवेल हा नियम अंगी बाणणारी आहे. आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या दोन तीन प्रसंगांचा दाखला देऊन त्यांनी ‘ त्याचा ‘ वरदहस्त केव्हा आणि कसा मिळतो हे दाखवून दिले आहे.
तमसो मा ज्योतीर्गमय – अंधत्वाची कारणे, नेत्रदानाचे महत्व, त्याविषयी असणारे गैरसमज, नेत्रदान करण्याची पद्धत अशा विविध मुद्यांवर चर्चा करुन ‘ मरावे परी नेत्ररुपी उरावे ‘ असा संदेश देणार हा माहितीपूर्ण लेख महत्वाचा वाटतो.
खुलभर दूध – आपल्या पारंपारिक किंवा धार्मिक गोष्टींतून खूप मोठा संदेश दिलेला असतो. सोमवारची कहाणी
प्रथम कथन करुन पुढे लेखिकेने सत्पात्री दान, परोपकार, समाजसेवा, समाधानी वृत्ती, यांचे महत्त्व समजावून दिले आहे.
निसर्ग आपला गुरु – बिनभिंतीच्या शाळेमध्ये डोळे आणि कान उघडे ठेवून शिकायचे असेल तर निसर्गासारखा गुरू नाही. निसर्ग काय काय शिकवतो, त्यांच्याकडून कसं शिकता येईल, याच विवेचन करत करत निसर्गाप्रमाणे आपणही दुस-यांच्या आयुष्यात आनंद फुलवू शकतो असा विश्वास लेखिकेने व्यक्त केला आहे.
दीप नव्या जाणिवांचे – दीपावलीला सुरु होणा-या नववर्षाच्या निमित्ताने स्वतःच्या अंतरंगातील दीप उजळावेत ही जाणीव करून देणारा हा लेख. मौजमजा, झगमगाट, लखलखाट याबरोबरच सरलेल्या वर्षांचा आढावा घेऊन नव्या वर्षात वैयक्तिक प्रगती बरोबरच सामाजिक जबाबदारी कशी पेलावी हे या लेखातून सुचवले आहे.
मला भावलेला श्रीकृष्ण – कोणताही मोह नसलेला पण सर्वांना मोहवून टाकणारा, तो मनमोहन! त्यांच्याशी साधलेला हा संवाद. तो आपल्याला का भावला हे सांगून शेवटी पुन्हा एकदा ‘ धर्म संस्थापना ‘ व्हावी अशी अपेक्षा लेखिकेने व्यक्त केली आहे.
फॅमिली डॉक्टर – फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. पण बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे कुटुंबे एकाकी पडत चालली आहेत. वेगाच्या या युगात डॉक्टरनाही थांबायला सवड नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे आता परत एकदा फॉमिली डॉक्टर ची आवश्यकता आहे असे लेखिकेला वाटते.
अवघे धरू सुपंथ – सामाजिक परिस्थिती व त्यातून निर्माण होणारे प्रश्न यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. पण मार्ग मात्र काढू शकतो. त्यासाठीच परस्पर सहकार्याचा मार्ग लेखिकेने दाखवून दिला आहे. परस्पर सहकार्यामुळे बलवान समाजाची निर्मिती होऊ शकते.
असा पस्तीस लेखांचा हा संग्रह अथ पासून इति पर्यंत वाचनीय. सोप्या भाषेत, मोकळेपणाने कसे लिहावे हे या पुस्तकाच्या वाचनामुळे समजू शकेल. असेच आणखी लिहीत रहावे यासाठी सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना हार्दिक शुभेच्छा!
पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈








