श्री ‘दादासाहेब दापोलीकर

लेखक परिचय 

नाव – श्री सुमंत जुवेकर – ‘दादासाहेब दापोलीकर’ या प्रयुक्त नावाने लेखन.

शिक्षण व व्यवसाय – विद्युत अभियंता

लेखन –

‘दादर तें दादर’ हे चरित्रात्मक पुस्तक प्रकाशित

तसेच गृहलक्ष्मी, वसुधा, आहेर, ऋतुपर्ण, सज्जनगड, माहेर, धनुर्धारी, जनस्वास्थ्यरक्षक, सुभाषित, आरती, पर्ण अशा विविध मासिकातून, दिवाळी अंकातून सातत्याने विनोदी लेख, कविता, प्रवासवर्णन तसेच इतर स्फुट लेखन.

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “लेखनिका” – लेखक : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – श्री दादासाहेब दापोलीकर (सुमंत जुवेकर)  ☆

पुस्तक : लेखनिका

लेखक – डॉ. निशिकांत श्रोत्री

प्रकाशक – बुकगंगा प्रकाशन

पृष्ठ संख्या – १५०   

मूल्य – ₹ ५९९ 

माझी लेखनिका: एका नवरसपूर्ण, वाचनीय आणि संग्राह्य कथासंग्रहाचे रसग्रहण!!

कथा ही आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे, प्रसंगांचे सर्वसाधारणपणे अनुक्रमे केलेले परिणामकारक वर्णन असते. कथा म्हणजे नुसता प्रसंग नाही. कथा ही काही प्रसंगांची शृंखला असते. या शृंखलेमध्ये वाचकांना कथेच्या अंतापर्यंत बांधून ठेवण्याची, म्हणजे खिळवून ठेवण्याची शक्ती असेल तर ती कथा समर्थ म्हणायला हरकत नाही.

कथालेखकाला एखाद्या घटनेमध्ये कथाबीज सापडते. अचूक पात्रयोजना, परिणामकारी संवाद, अलंकार, म्हणी, कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती, अनुभवाचा वापर करून सिद्धहस्त लेखक खिळवून ठेवणारी कथा जन्माला घालतो. अशा दहा वाचनीय कथांचा हा कथासंग्रह- ‘माझी लेखनिका’ या नावाने डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी सादर केला आहें. महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील अनेक कथांचा शेवट वाचकांच्या अनुभवानुसार करण्यास वाव दिला आहें… पुढे काय घडलं असेल? या धाटणीचा प्रश्न कथेच्या शेवटी लेखक वाचकांना विचारून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन तेथेच थांबतो. कथानायक प्रथम पुरुषात बोलल्याने हा आपल्याशीच बोलत आहे असे वाटून वाचक आनंद घेऊ शकतो.

संवाद सहजता, विविध प्रसंगातून पात्राचे व्यक्तिमत्व उभे करीत लेखक वाचकाच्या मनात प्रवेश करतो. शृंगार, करुण, हास्य वगैरे नवरसांपैकी विविध रसांचा परिपोष लेखनामध्ये आढळतो. लेखकाने या नवऱसांचा उपयोग लेखनसौंदर्य वाढवण्यासाठी सहजतेने केला आहे. माझी लेखनिका -यांत संयत शृंगार रस, मोल या कथेत करुण रस, अपूर्ण राहिलेली गोष्ट मध्ये अद्भुत रस, अशी नवरसवंती वाचकांवर वर्षाव करत राहते.

ह्या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ बंगलोरच्या सुश्री अदिती नाईक यांनी काढले आहें. मोरपीस जसे तलम तंतूनी आकर्षक भासते. स्पर्श मुलायम असतो. त्याचा रंग, आकार मनाला मोहून टाकतो, तशा ह्या कथा लेखक, वाचक आणि त्यांचे अंतरंग यांत तलम धाग्याने एकरूप झाल्या आहेत. त्या मोरपीसाला झरणीचे रूप देऊन कथांचा श्रीगणेशा केला आहे. खूपच भावणारे, बोलणारे असे मुखपृष्ठ आहें.

१) माझी लेखनिका 

संवाद शैलीत लेखन असलेली ही कथा मनरूपी तरल भूमीचे द्योतक आहें. वाचकांसाठी असलेली भूमिका कथेतून स्पष्ट होते.

सौंदर्य माणसाच्या चेहऱ्यावर अवलंबून नसते.. आंतरिक सौंदर्य महत्वाचं. शारीरिक सौंदर्य कालांतराने संपुष्टात येतं. पण मानसिक सौंदर्य एकमेकांना जवळ आणतं. हाच प्रेमळ संदेश ही कथा आपल्याला देते. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मनात उमललेली ही प्रेमकथा अधिक भावते. काहीशी दीर्घरुपात असणारी पहिलीच कथा वाचकांना उर्वरित कथेबद्दल उत्सुकता निर्माण केल्याविना राहणार नाही हे नक्कीच…

२) अपूर्ण राहिलेली गोष्ट..

विचार ही जन्मत:च मिळालेली देणगी असते. जसा विचार करतो तसे घडते असे म्हटले जाते. विचार दिसत नाहीत पण विचारांचा परिणाम दिसतो. जेव्हा कथालेखक मनात योजिलेली घटनांची क्रमवार मालिका मांडतो तेव्हा त्या घटनांशी एकरूप झालेला असतो. जेव्हा कथेत घडलेल्या घटनांचा प्रत्यक्ष अनुभव येतो. तेव्हा मात्र त्याची कथा अपूर्ण राहते की पूर्ण? कथेतली नायिका आणि प्रत्यक्ष वास्तवातील नायिका सुशीला या एकच आहेत का? याच प्रश्नांची उत्तरं या कथेअंती मिळतील.

३) मोल

आपलं आयुष्य निसर्गातील घटक म्हणजे झाडं, मुकी जनावरं, आसपासचा परिसर याच्याशी जोडलेलं असतं. त्यांच्याविना आयुष्याला अर्थ उरत नाही. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करताना मनावर दगड ठेवून निर्णयही घ्यावे लागतात. तसंच काहीसं घडलं ‘मोल’ या कथेत. सोन्या आणि रुप्या दोन्ही जिराबताना पोटच्या पोराप्रमाणे सांभाळणारा मारुती, त्याला साथ देणारी पत्नी सुभद्रा. सतत तीन वर्षांच्या दुष्काळाने सर्वजण हतबल झाले असताना त्याची झळ मुक्या जनावरांनादेखील भोगावी लागत आहें. सध्याच्या काळात विस्मरणात जात असलेल्या शब्दांचा वापर आठवणीने केला आहें. उदा. जितराब. तसेच यात बोली भाषेत येणारे संवाद, म्हणी, वाक्प्रचार तसेच अनुप्रास अलंकाराचा अगदी सहजतेने केलेला वापर, ‘ते ढग जणू आकाशीची मृगजळेच ठरले होते’ अशी मनाचा ठाव घेणारी करुणामय वाक्यरचना अशी अनेक लेखन वैशिष्ट्ये यांत जाणवतात. म्हणूनच मोल ही कथा डोळयांत पाणी आणते….

४) मस्करी

‘मस्करी’ कथेची सुरुवातच उत्कंठावर्धक आहें. मित्र प्रकाशची दार उघडेपर्यंत कडी वाजविण्याची सवय माहित असल्याने कथानायक दार उघडण्यास उशीर करतो. परंतु प्रकाशचा भेदरलेला आवाज ऐकताक्षणी तातडीने दार उघडतो. त्या दोघांच्या संवादातून आदल्या दिवशी घडलेल्या पार्टीचा वृतांत समजतो. कथासूत्र लक्षात येतं असतानाच कथा अशा वळणावर येऊन ठेपते. त्यात वाचक हरवून जातो.

५) प्रामाणिक

‘प्रामाणिक’ कथेत निवेदन तंत्राचा उपयोग केला आहे. सुनिला, महेश आणि लता यांच्या प्रेमाचा त्रिकोण मनोगताच्या रूपाने वर्णिला आहें. मानवी मनाचा तळ अनेक भावनांच्या स्तराने व्यापला आहें. त्यात प्रेम ही सर्वात श्रेष्ठ भावना आहे. ह्याच पवित्र भावनेचा विकास सुनिला आणि महेश यांच्यात होत असताना लताने मात्र सुनिलाचा विश्वासघात केला. दोन जिवलग मैत्रिणी कायमच्या दुरावल्या आहेत. कोण कुणाशी प्रामाणिक राहतं? हे कथेच्या अंती समजते.

६) तोहफा

कथालेखक आपल्या कथेतून विनोदी, गंभीर, व्यंग्य अशा विभिन्न विषयास हाताळत असतो. असाच एक संवेदनशील विषय तोहफा या कथेत दिसून येतो. सुधा आणि सुलभा ह्या अल्लड स्वभावाच्या आहेत. त्यांना म्हणावी तेवढी समज नाही. सुधासोबत सुलभा हॉटेलचे खाण्यास सरावली आहें. त्याचवेळी सुधा एका मुलाच्या प्रेमात अडकली. त्याचा परिणाम म्हणून तिच्या घरच्यांनी विरोध केला की तिचे प्रेम मान्य केले? या संबंधाचा शेवट कसा झाला? सुलभाला या सर्वातून काय शिकायला मिळाले? यांची उत्तरे आपल्याला या कथेतून मिळतात. सामाजिक परिस्थितीशी संबंधित ही कथा मनाला विचारमय करते.

७) मी जिंकले, मी हरले

मी जिंकले, मी हरले ह्या कथेतील आई पराकोटींचा त्याग करते. खरेतर ही मायना नसलेल्या पत्ररूपात असलेली कथा म्हणजे त्या आईच्या मनाचं मोकळं होणं आहें. ‘जगात चांगली, भली माणसेसुद्धा खूप आहेत ग, फक्त त्यांच्याकडे शुद्ध नजरेने पहावयाची दृष्टी असावी लागते’ हा सुनेला दिलेला मोलाचा सल्ला किती महत्वाचा आहें हे संवादातून जाणवते. कथेच्या शेवटी ‘कुणीच कुणाची नसलेली मी’ यातून त्या कथेतील आईची कशातही अडकून न राहण्याची प्रवृत्ती सिद्ध होते.

८) बंद दार

डॉ. श्रोत्री यांची ‘बंद दार’ही कथा देखील वेगळ्या धाटणीची. बंद दाराआड लपलेले सौंदर्य नायकाच्या नजरेस पडते तेव्हा नायकाची होणारी मानसिक आंदोलने लेखकाने कल्पकतेने मांडली आहेत. लेखकांच्या मनोरम, उत्सुकतापूर्ण शैलीतील हेच दार वाचकांचे कुतूहल शमवते. म्हणूनच ही कथा तिच्या सौंदर्यासारखी मनात रेंगाळतं राहते..

९) गुरुकिल्ली

आपण दिवास्वप्नात अडकणारे आजूबाजूला पाहतो. झोपेत पडलेल्या स्वप्नाचा प्रत्यक्ष आयुष्याशी संबंध जोडणारा दिन्या थोडा विक्षिप्त आहें. मित्र बन्या आणि बायको मीना दोघेही दिन्याला प्रत्येकवेळी सावरून घेतात. इतकेच नव्हे तर दिन्याच्या साहेबालादेखील याची कल्पना देतात.

कथेच्या अखेरीस दिन्याला कोणता संदेश गुरूंकडून मिळतो, ज्यामुळे या कथेचे ‘गुरुकिल्ली ‘ हे शीर्षक सुसंगत ठरते.

१०) सूड

प्रेम ही मंगलमय भावना, तर सूड त्याविरोधी भावना. मनासारखे झाले नाही, फसवले गेलो आहोत अशी भावना मनात सूड निर्माण करते. अश्विन आणि दीपा ह्या दोन पात्रामार्फत लेखकांनी रंगविलेले प्रेमाचे दोन आयाम सूड कथेत वाचायला मिळतात.

डॉ श्रोत्री यांनी वयाच्या ८० व्या वर्षीदेखील लेखन जगतात दाखविलेला उत्साह स्तिमित करणारा आहें. वैद्यक व्यवसायामध्ये एमडी डीजी ओ आणि अशा अनेक पदव्या धारण करणारे डॉक्टर श्रोत्री साहित्याच्या प्रांतातही सहजतेने मुसाफिरी करतात. भगवद्गीता, वेद, शास्त्रे, पुराणे, उपनिषदे यांचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे. लेखनामध्ये हा प्रभाव सतत जाणवत राहतो..

एका छोट्याशा घटनेतून प्रतिभावंत लेखकाच्या मनामध्ये कथेचे बीच हळूहळू अंकुरते. त्यावर लेखक कल्पना, प्रतिभा आणि शब्दलक्ष्मीचे संस्कार करून त्या कथेचा विकास करतो. कथाबीजातून अशाप्रकारे जन्मणाऱ्या कथेमध्ये येत जात राहणारी पात्रे, त्यांचे मनोव्यापार, संबंधित घटनाची विलक्षण गुंफण करून लेखक वाचकांच्या मनावर अपेक्षित परिणाम करतो. यशस्वी कथेची ही सारी सूत्रे डॉ. श्रोत्री यांच्या कथेतून दृष्टोत्पत्तीस येतात.. रसिक वाचकांनी या कथासंग्रहाचा अवश्य रसास्वाद घ्यावा.

परिचय : श्री दादासाहेब दापोलीकर (सुमंत जुवेकर) 

https://dadasahebdapolikar. wordpress. com या ब्लॉगवर वाचनासाठी उपलब्ध आहें.

संपर्क – ९९६७८४०००५ ईमेल – dadasahebdapolikar@gmail. com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments