सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
पुस्तकावर बोलू काही
☆ “मी… गांधारी” — लेखक : श्री सुधाकर शुक्ल ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
पुस्तक: मी… गांधारी
लेखक: श्री सुधाकर शुक्ल
प्रकाशक: काॅन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
गांधारी… महाभारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे गांधारी! धृतराष्ट्राच्या सहवासात असून सुद्धा गांधारीने स्वतःच्या जीवनात धर्माला महत्त्व दिलं होतं! ती प्रज्ञावंत, पतिव्रता व सत्यप्रिय जशी होती तशीच ती धर्मनिष्ठ ही होती. पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांना शाप देण्याचे सामर्थ्य जिला प्राप्त झालं होतं ती पांडवांना शाप देऊन नष्ट करू शकली असती, पण तिने ते केले नाही. आधारमाला विरोध म्हणून गांधारीने धृतराष्ट्राशीही संघर्ष केला पण त्यातील अपयशी ठरली ही तिच्या जीवनाचे शोकांतिकाच आहे. धृतराष्ट्र हा जसा पुत्र मोहाने आंधळा झाला होता तशीच गांधारीही पुत्र प्रेमाने आंधळी झाली होती. पण धृतराष्ट्राजवळ विवेकाचा अभाव होता तर गांधारीचा विवेक जागृत होता. जिथे धर्म असतो तिथं विजय असतो हे मानणारी गांधारी पुत्राच्या यशाला विरोध करते हे विशेष होय. गांधारी ही नुसती एक स्त्री नव्हती तर शतपुत्रांची माता होती. पुत्रां बद्दलचे प्रेम असल्यामुळे तिने कुंती पुत्रांना विरोध केला. युध्दात कौरवांच्या विनाशा नंतर प्राप्त झालेल्या राजसत्तेचा त्याग करून गांधारीची सेवा करण्यासाठी कुंती वनवासात जाते हे तर अपूर्वच होतें. अधर्माशी प्रतिकार करताना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी सतत संघर्ष करावा लागला आणि त्यातूनच गांधारीची प्रतिमा उठून दिसली!
गांधारी ही एक थोर प्रतिव्रता होती, तशीच ती तेजाचे प्रतीक होती. पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर गांधारीला अलौकिक शक्ती प्राप्त झाली होती. पतीव्रतेचे व्रत म्हणजे एक कठोर तप होते. ते गांधारीने मनाने कधीच भंगू दिले नाही. अधर्माशी संघर्ष करूनही पति वरची निष्ठा तिने अभंग ठेवली, त्यामुळे तिच्या वाणीतून उमटणारा शब्द वरदान किंवा शाप होऊ शकत होता. याच सामर्थ्यावर भगवान श्रीकृष्णांना तिने कठोर शाप दिला. न्याय, नीती आणि धर्म यावर अढळ श्रद्धा ठेवणारी गांधारी तितकीच विशाल अंत:करणाची होती. पांडवांचा पक्ष तिने प्रत्यक्ष कधीच स्वीकारला नसला तरी पांडवाच्या ठिकाणी असलेल्या धर्माचा विजय व्हावा ही तिच्या मनाची साक्ष सर्वांना चकित करणारी अशीच आहे!
पांडवाच्या समवेत विदुर वानप्रस्थाश्रमासाठी जाण्यास निघणार होते तेव्हा त्यांनी गांधारीची भेट घेतली. आणि तिचा निरोप घेण्याचे ठरवले. विदुर गांधारीला म्हणाले की, ‘आज पर्यंत मी अधर्माची सोबत करत आलो. मी एक त्यांचा धाकटा भाऊ म्हणून हे करत आलो. कुरुकुलातील एक घटक या नात्याने कुरुकुलाचे हित पाहणे माझे कर्तव्य होते, म्हणून ते मी केले. कौरव पांडवांच्या मध्ये संघर्ष होऊ नये म्हणून मी प्रयत्न केले. त्यात मी अपयशी ठरलो. त्यामुळे आता मी पांडवांबरोबर वनवासाला जाणे योग्य ठरेल. ‘ गांधारीने विदुराला समजावून दिले की, कुरुकुलाने आज पर्यंत स्त्रीची प्रतिष्ठा जपली नाही उलट स्त्रीची विटंबनाच केली! गांधारी तत्त्वज्ञ होती, हुशार होती. ती जाणून होती की कौरव आणि पांडवांनी आपल्या प्रतिष्ठेसाठी द्रौपदीला पणाला लावले.. आणि त्यावेळी आपण काहीही बोलू शकलो नाही, प्रतिकार करायला आपण दुबळे ठरलो, या गोष्टीची गांधारीला खंत वाटत होती. डोळ्यावर बांधलेल्या पट्टीमुळे गांधारी स्वतःच्या पतीशी एकरूप झाली, पण त्यामुळेच ती हस्तिनापूर आणि कुरुकुल यामध्ये घडत असलेल्या संघर्षाला डोळसपणे सामोरी जाऊ शकली नाही!
गांधारीने आपले जीवन पती पुरतेच सीमित ठेवले पण त्यामुळे पुढे होणाऱ्या भीषण संघर्षाला तिला सामोरे जावे लागले. धर्माचे रक्षण करणारी प्रखरबुद्धी असूनही त्या शस्त्राचा उपयोग तिने केला नाही..
एक क्षत्रिय कन्या होती परंतु अधर्माच्या विळख्यात ती सापडली गेली, त्यातून ती बाहेर पडू शकली नाही.
गांधारी ने धृतराष्ट्राला समजावण्याचा प्रयत्न ही केला. , पण आता वेळ गेली होती.
गांधारीला पांडवांच्या बद्दल आदर होता. कारण पांडवांच्या मनात शत्रुत्वाची भावना तात्पुरती आहे आणि विश्वाचा जो आधार धर्म आहे तो युधिष्ठिर मानतो! यावर तिचा विश्वास होता. दुर्योधनाने द्यूताच्या वेळी जी वागणूक दाखवली होती त्याबद्दल गांधारीलाही खूप वाईट वाटत होते. महाभारताच्या शेवटी राजमहाल सोडून सर्वजण बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबर गांधारीही बाहेर पडली. कुंतीबद्दल तिने प्रेम व्यक्त केले. कुरुक्षेत्रा जवळून जाताना गांधारीने झालेल्या सर्व घटनांबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला, तेव्हा विदुराने तिची समजूत घातली, ‘गांधारी, पश्चात्ताप हा व्यर्थच असतो आणि पश्चातापानंतर येणारे ज्ञान निरुपयोगी असते.
‘शेवटी पश्चात्ताप दग्ध होऊन गांधारीने महर्षी व्यासांच्या आश्रमात धृतराष्ट्र, विदुर आणि कुंती यांच्यासह प्रवेश केला..
गांधारी ही महाभारतातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा होऊन गेली..
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





