image_print

श्री चंद्रकांत बर्वे

 ☆ मनमंजुषेतून ☆ गप्पांची एक मैफिल संपली ☆ श्री चंद्रकांत बर्वे ☆ 

प्रसिद्ध पत्रकार, मुलाखतकार, लेखक, नाटककार आणि माझे मित्र अशोक शेवडे यांनी आता या जगातून एक्झिट घेतली आहे. पण त्याच्याबद्दल लिहिताना मी तसा इमोशनल नाही होणार, कारण त्याच्या आठवणी जर जागवल्या तर त्या सगळ्या आनंदी आहेत. त्याला कुणीही कधीही दुर्मुखलेल पाहिलं नसेल.

ही बातमी समजल्यावर मी जेव्हा त्याच्या मुलीला राखीला फोन केला तेव्हा ती म्हणाली आज पहाटे ते गेले पण काल रात्रीपर्यंत आम्ही बोलायचो तेव्हा ते कायम आनंदी असायचे.

मी १९८५ मध्ये आकाशवाणी मुंबईला आलो तेव्हा त्याचा आणि माझा प्रथम परिचय झाला. तो आकाशवाणी आणि दूरदर्शन मध्ये अनेक छोटेमोठे कार्यक्रम करायचा. कोणत्याही कामानिमित्त आला तर तो बाकी सर्व स्टाफशी देखील भेटणार गप्पागोष्टी करणार असा त्याचा स्वभाव आणि मी तर गप्पिष्टच त्यामुळे आमची मैत्री होणं अगदी स्वाभाविक होतं. आमचा चहा पिऊन झाल्यावर मी सिगारेट पीत असे, पण त्याने मात्र कधी सिगरेटला स्पर्श केला नाही. तो स्टेट बँकेत कॅशीअर होता आणि तरीही त्याचे वेगवेगळ्या पेपरमध्ये फिल्मी आणि ललित लिखाण वगैरे चालू होतंच. एकदा आल्या आल्या त्याने मला गंभीरपणे विचारले १०० रुपये आहेत का? मला वाटलं काही तरी त्याला अडचण असेल. मी लगेच त्याला एक नोट काढून दिली. त्याने लगेच मला हसत हसत एक रुपयाच्या १०० नोटांचे बंडल दिले. त्या काळात एकेक रुपया कायम छोट्या मोठ्या खरेदीला उपयोगी पडायच्या. त्यामुळे तो कधी ऑफिसात आला की बरेचजण त्याला एकच्या नोटांचे बंडल मागत. त्याला या सगळ्या गोष्टी जमतात कशा? तर त्यावर त्याचं उत्तर म्हणजे त्याचे पब्लिक रिलेशन्स. आमच्या आंबटगोड कार्यक्रमाचे रेकॉर्डिंगच्या दिवशी त्याचे स्क्रिप्ट वेळेवर त्याचा एक माणूस आणून द्यायचा. फोर्टात बँकेचे काम आणून देणारा माणूस जाता जाता आकाशवाणीत स्क्रिप्ट देऊन जायचा. त्याचा मित्र परिवार मोठा होता आणि वेगवेगळ्या शासकीय आणि निम शासकीय ऑफिसातून देखील होता. पत्रकार असल्यामुळे सगळे नाटकवाले आणि मराठी फिल्मी लोक त्याचे मित्र झाले होतेच. शिवाय मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे यांच्या सारखे बडे राजकीय नेते देखील.

नोकरी करून तो मला म्हणाला मी नोकरी सोडणार आहे पण पुढे फिल्मी डायलॉग मारला. ‘सही समय और सही मौका’ आनेपर. आणि पुढे त्याने त्याप्रमाणे नोकरी सोडली.

माझीही आकाशवाणीतून दूरदर्शन अहमदाबादला बदली झाली. पण आकाशवाणीच्या दिल्लीतील अधिकाऱ्यांनी माझ्या नावे मी एक आकाशवाणीच्या निर्मात्यांसाठी जनरल वर्कशॉप घ्यावे असे पूर्वीच ठरवले होते आणि त्याप्रमाणे माझ्यावर एक आठवड्याचे वर्कशॉप ची जबाबदारी आली. मीच वेगवेगळ्या विषयातील जाणकारांना घेऊन ते अहमदाबाद आकाशवाणीत कंडक्ट करायचे होते. मी त्यातला ‘मुलाखतीचे तंत्र’ हा विषय अशोकला दिला. हां पण इतर राज्यातील निर्माते सहभागी होत असल्याने हिंदी किंवा इंग्रजीतून सोदाहरण लेक्चर अपेक्षित होतं. अशोकने हिंदीतून आपले आपले सादरीकरण सुरु केले. पहिल्या पाच मिनिटात भरपूर हशा मिळाला, आणि मग त्याने मुलाखतीच्या किंवा भाषणाच्या सुरुवातीला श्रोते हसतील किंवा उत्सुकतेने ऐकू लागतील हा पहिला मंत्र सांगितला. एकूण त्याच्या शिकवण्यावर सर्व निर्माते एकदम खुश झाले. मलाही हा अन्य भाषिक मंडळींना देखील इम्प्रेस करू शकतो हे समजलं.

पुढे काही वर्षांनी माझी मुंबई दूरदर्शनला बदली झाली. मी जरी ‘असिस्टंट स्टेशन डायरेक्टर’ म्हणून आलेलो असलो तरी मी केंद्रात नवीन होतो आणि अशोक तर बरेचदा येजा करायचा. त्यामुळे सुरुवातीला त्यानेच माझी बऱ्याच जणांशी ओळख करून दिली. केंद्रातील काहीजण तर मला अशोक शेवडेचा मित्र म्हणून ओळखत होते. पुढे मी एक फिल्मी कार्यक्रम करायला घेतला ‘चंदेरी सोनेरी’ अशोक म्हणजे मराठी फिल्म्सच्या माहितीचा एक्का असल्याने मुलाखतीची जबाबदारी त्याच्यावर. त्याने ती आनंदाने स्वीकारली. त्यासाठी आमच्या स्टुडिओ ची तारीख या फिल्मी लोकांची तारीख मिळवणे, त्यांना भेटून मुलाखतीची प्रश्नोत्तरे तयार करणे, अनुषंगिक कोणते फिल्मी कट्स लागतील त्याची उपलब्धता वगैरे बरीच कामे असतात पण त्यात त्याचे संपूर्ण सहकार्य मिळे, नव्हे ते तो आनंदाने करे. तो कोणालाही भेटीची वेळ घेतल्यावर जाताना स्वतः बुके घेऊन जायचा, तो वेळेत गेला नाही असे कधीही घडले नाही. त्याचे घर डोंबिवलीत आणि पावसाळ्याच्या दिवसात कधी गाड्यांचा खोळंबा होण्याची शक्यता असते, पण त्यामुळे कार्यक्रमात अडचण येऊ नये म्हणून शूटींगच्या आदल्या रात्री तो माहिमला आपल्या मुलीकडे राह्यला जायचा. टीव्हीवर कार्यक्रम ही त्याची नेहमी टॉप प्रायोरिटी असे. तो फिल्मी पत्रकार, आमचा कार्यक्रम फिल्मी त्यामुळे पार्टीची निमंत्रणे येत असत. त्यात मद्यपान असतेच असते. तो शेकडो पार्ट्याना गेला असेल पण त्याने कधीही एक पेगही घेतला नाही. तो मला म्हणायचा की मी साधारणतः मराठी सिनेमा बद्दल जे वाईट जाणवेल ते निर्मात्याला सांगतो पण तसे शक्यतो लिहित नाही कारण मराठी सिनेमांना प्रोत्साहित करावे असे मला वाटते. आमच्या चंदेरी सोनेरी कार्यक्रमाचे शंभर एक कार्यक्रम झाले.

त्याने पुढे स्वतः प्राची देवस्थळी बरोबर ‘चंदेरी सोनेरी’ हा स्टेजशो सुरु केला. त्याचेही शेकडो कार्यक्रम झाले. एका कार्यक्रमात मी पाहुणा म्हणून गेलो होतो त्यावेळेस माझा परिचय करून देताना अशोक म्हणाला की मी त्याला १०० कार्यक्रम करण्याची संधी दिली. मी त्याला लगेच उत्तर दिले.

मी तुला फक्त एक कार्यक्रम दिला होता, पुढले कार्यक्रम तुला तुझ्या चांगल्या कामामुळे मेरिटमुळे मिळाले.

©  श्री चंद्रकांत बर्वे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

0Shares
0
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments