सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)
मनमंजुषेतून
☆ माझी पहिली गिरनार यात्रा/वारी!! – लेखिका : सौ सारिका महेश कुलकर्णी, ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆
☆
श्री स्वामी समर्थ संजीवनतिथीच्या परमपवित्र दिवशी याविषयी लिहावेसे वाटले त्याबद्दल सर्वप्रथम श्री स्वामींना मनोभावे वंदन.
2021 च्या जानेवारीमधील पौर्णिमेला पहिल्यांदा गिरनारला जाण्याचा योग आला. नुकताच लॉकडाऊन संपल्यामुळे पुणे रेल्वे स्टेशनला आणि रेल्वेमध्ये अजिबातच गर्दी नव्हती.
सगळे नीट जमेल ना अशी थोडीशी धाकधूक मनामध्ये होती. पण माझ्या बरोबर अश्विनी कश्यप आणि अश्विन ब्रह्मे हे मित्र-मैत्रीण आधी दोनदा गिरनारला जाऊन आलेले असल्यामुळे, सर्व काही दत्तकृपेने छान होईल असा मनाला दिलासा मिळाला. योग असेल तर सगळ्या गोष्टी गुरुदेव दत्त जुळवून आणतात आणि निभावूनही नेतात याचा पुरेपूर अनुभव आला..
जुनागड रेल्वे स्टेशनला पोचल्यावर सर्वप्रथम आमच्या सगळ्या बॅग पूर्णपणे सॅनिटायझर मारून सॅनिटाइज करण्यात आल्या.
जुनागड स्टेशन हे छोटेसे पण अतिशय छान आहे. तिथून समोरच्याच बाजूला अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर हॉटेल लोटस नावाच्या ठिकाणी आम्ही गेलो व थोडेसे फ्रेश होऊन गिरनार पायथ्याला आलो.
रोपवे ला गर्दी नसल्याने लगेच रोपवेने अंबामातेच्या मंदिरापर्यंत जाऊन पोहोचलो.
रोपवेमुळे 5000 पायऱ्यांचे अंतर न चालता किती आरामात पार करून अंबामातेच्या इथे येऊन पोहोचलो असे वाटले. जानेवारी महिना असल्याने वातावरण अतिशय आल्हाददायक होते. अंबा मातेच्या इथे कापूर वात लावून चालत पुढचा प्रवास चांगला होऊ दे अशी मनोमन प्रार्थना केली. पावलोपावली जाणवत होते की आपण गिरनार वारी करत नाही तर दत्तगुरुच आपल्याकडून करून घेत आहेत. कारण आधीचा संपूर्ण कोविडचा काळ असल्याने गिरनार ला जायची तयारी करण्यासाठी व्यायाम किंवा चालण्याची तयारी केली आहे असे झाले नाही.
संध्याकाळची वेळ असल्याने हळूहळू वातावरणात अजूनच छान गारवा वाटायला लागला आणि दत्तशिखरापर्यंतचा प्रवास सुरू झाला. मध्ये मध्ये वाटेत काही साधू शांतपणे उपासना करत बसलेले दिसले. हळूहळू अंधार पडायला लागला आणि पौर्णिमेचा चंद्र दिसू लागला. चंद्र आणि चांदण्यांचा मंद उजेड, त्यातच दत्तशिखरावरती जाणाऱ्या शांत पायऱ्या, मध्ये मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे भजन गात दत्तशिखरापर्यंत कधी येऊ पोहोचलो ते कळलेच नाही.
बारा हजार वर्षांहून अधिक काळ श्रीदत्तगुरुंच्या तपश्चर्येचे व ध्यानाचे स्थान असलेल्या श्री गुरुदत्त चरण पादुकांसमोर नतमस्तक झाल्यावर क्षणभर काही कळेनासे झाले आणि आनंदाश्रू वहायला लागले
हाच तो परमतृप्तीचा व आनंदाचा क्षण अशी मनोमन खात्री झाली.
गर्दी नसल्याने तिथे शांतपणे दर्शन घेता आले व जणू काही हा आनंद पुन्हा पुन्हा घेण्यासाठी येत राहा असे दत्तगुरु खुणावत आहेत असे वाटले व गिरनारला अनेक वर्षे जाणारी मंडळी पुन्हा पुन्हा का बरे गिरनारला जात असावीत… त्यांना काय आनंद मिळत असेल याचे उत्तर मिळाल्यासारखे वाटले.
अतिशय छान अशा दर्शनानंतर कमंडलू तीर्थ पर्यंतचा प्रवास चालू झाला. कमंडलू तीर्थाच्या इथली अतिशय मनमोहक अशी दत्ताची मूर्ती डोळ्याचे पारणे फिटवणारी आहे.
इथले तीर्थ व रुचकर प्रसाद घेतल्यावर पुढचा पायऱ्या उतरून येण्याचा प्रवास करण्यासाठी अंगात आपोआप एक प्रकारचे बळ निर्माण झाले. उतरताना भगवान नेमिनाथ व अनेक जैन मंदिरे, काली माता मंदिर, शंकर पार्वती मंदिर, हनुमान् मंदिर आणि अनेक देवतांची छोटी छोटी सुंदर मंदिरे आहेत.
या सगळ्यांचे दर्शन घेत अंदाजे चार तासांमध्ये पुन्हा गिरनारच्या पायथ्याशी येऊन पोचलो व संपूर्ण वारी दत्तगुरूंच्या कृपेने पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले.
॥ श्री गुरुदेव दत्त॥
लेखिका : सौ सारिका महेश कुलकर्णी
कोथरूड, पुणे, मोबाईल -९३२५६४१३३८
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे, मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





