सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ सोलापुरी गड्डा जत्रेतील रम्य आठवण… ☆ सुश्री शीला पतकी ☆
साधारणपणे मी पहिल्यांदा 1960 मध्ये टीव्ही मध्ये दिसले….
– – – वरील विधान वाचून तुम्हाला नक्की वाटेल की पतकी बाई धादांत खोटं बोलत आहेत 1960 साली सोलापुरात टीव्हीचे प्रसारण नव्हतं महाराष्ट्रात कुठेही नव्हतं मग मी 60 साली टीव्हीवर आली कशी ही बाई… त्याचीच गोष्ट ऐकूयात.. म्हणजे वाचूया.
साधारणपणे जानेवारी महिन्याचे दिवस असावे सकाळी थंडी असायची पण दुपारी रणरण ऊन शाळेला हुरड्यची सुट्टी होती त्या काळात सिद्धेश्वर जत्रेला धरून ती सुट्टी असायची… सिद्धेश्वर तळ पूर्णपणे आटलेलं होतं म्हणजे तिथे संपूर्ण तळ्याला भेगा भेगा पडलेल्या मला अजूनही आठवतात आणि मंदिरातून मार्केटमध्ये.. लक्ष्मी मार्केटमध्ये येण्यासाठी माणूस सहज चालत त्या मातीवरून येतो शेतात चालावं असं वाटत होतं चिखल वगैरे काय असेल पूर्वी तो वाळून वाळून गेलेला पूर्ण भेगा पडलेल्या आणि माणूस आरामात त्याच्यावरून चालत येत होता आणि मला ते स्पष्टपणे आठवते!
मी माझ्या आजीबरोबर सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते माझं वय तेव्हा 10 त्या 11 या दरम्यानच होतं आणि आजी आम्हाला देवळामध्ये मार्केटमध्ये भजनाला कीर्तनाला रथ बघायला चित्रपट बघायला तिला सिनेमाची खूप आवड होती त्यामुळे ती चित्रपट बघायला आम्हाला घेऊन जायची तिला चौफेअर ज्ञान होतं 19 व्या शतकाच्या शेवटाची बाई म्हणजे 1899 /98 चा जन्म असेल शिक्षण अजिबात नाही पण हुशार इतकी अफाट.. बघून बघून वाचायला शिकली आणि खूप पुस्तकं वाचत होती गोष्टी सांगायचं तिला छंद होता आणि सांगण्याची शैली पण होती आता आजीबद्दल जास्त सांगत नाही प्रसंगाबद्दल आपण बोलूयात तर ती मला सिद्धेश्वर च्या मंदिरात घेऊन गेली.. दर्शन वगैरे झालं.
आजी बरोबर जायचे त्यावेळेला कारण असं होतं की तिथून आम्ही लक्ष्मी मार्केटला जाणार होतो आणि त्या बाजूला गड्ड्याची दुकानात इथपर्यंत लागलेली होती तिथं आपल्याला आजी काहीतरी घेऊन देईल या विचाराने मी तिच्याबरोबर गेले होते. मंदिरामध्ये दर्शन घेऊन तळ्यातून वाट काढीत आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या समोर ओबडधोबड पायऱ्या होत्या.. त्याच्यावरून वर आलो होतो आणि थेट लक्ष्मी मार्केट. लक्ष्मी मार्केटच्या दोन्ही बाजूला आज जे लोक बसतात तिथेच लोक बसायचे तिथेच काहीतरी थोडेसे पाली वगैरे टाकलेले होत्या आणि त्याच भागांमध्ये काही चार दुकान भरलेली होती किंवा लागत होती आजी म्हणाली रस पिऊ यात का बारा वाजले आहेत उन्हात रस पिऊ नये इती.. मी..
तिथेच बाजूला एक स्टॉल होता एक पांढर कापड समोर खुर्ची टाकून एक माणूस बसलेला आणि तो ओरडत होता अपने खुद को टीव्ही पे देखो आपने को टीव्ही पे देखो तर आजीला ते जरा कुतूहल वाटलं काहीतरी नवीन होतं तर माझी म्हणाली काय आहे तर तो माणूस म्हणाला तुम्हाला टीव्ही वरती पाहता येईल म्हणून आम्ही आम्हाला दोघींना पाहता येईल का तुम्हाला नाही अकेला जायेगा और उसको दुसरा देखेगा पैसा कितना लगेगा तो म्हणाला चाराने कितना टाइम देखेगा तो मला दोन मिनिट आजी मला म्हणाली तू त्या टीव्हीच्या खोक्याच्या मागच्या बाजूला जा मशीन समोर उभे रहा मी तुला टीव्हीवर पाहीन मी म्हणलं काहीतरी काय मला तर मी दिसणार नाही तुला दिसून काय फायदा आहे तिचं उत्तर खूप छान होतं ती म्हणाली हे टीव्ही आपल्याकडे येईल पण तू मोठे झाल्यावर… तू हुशार आहेस त्यामुळे टीव्हीवर कुठेतरी दिसशील आहे त्यावेळेला मी कुठे असणार आहे? तेव्हा मी तुला आता डोळे भरून टीव्हीवर पाहते या इमोशनल ड्रामावर मला काहीच बोलता आलं नाही आणि मी खूप लहान होते. दहा अकरा वर्षाच्या मुलीला काय कळतंय? फक्त एवढं कळत होतं की चार आणे रक्कम खूप मोठी आहे, त्यात आपल्या घरची सगळ्यांची एक वेळची भाजी येते. पण तिचे हिशोब वेगळे होते तिने त्याला चार आणे दिले. मी त्या पडदा टाकला होता त्याच्या मागच्या बाजूला जाऊन उभी राहिली आणि समोर एक टीव्ही सारखं खोक होत तिथे आजी खुर्चीवर बसली आणि ती मला बघत होती. मग त्या माणसाने मला वेगवेगळ्या पोजेस घ्यायला सांगितल्या.. आपण फोटो काढताना घेत होतो तशा.. नाच म्हणाला, उड्या मार म्हणाला, मी त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आजीने मला डोळे भरून बघितलं आणि चार आणे त्याला दिले.
मग रस कॅन्सल केला, भाजी घेतली आणि आम्ही घरी आलो आणि आजीनं सगळ्यांना सांगितलं की तिने मला टीव्हीवर बघितलं. मग टीव्हीवर बघितलं ही सगळी कथा दिवसभर वाड्यामध्ये सांगत होतो आम्ही… सर्वात महत्त्वाचं काय तर तिने आल्यावर माझी दृष्ट काढली. तिला माझ्याबद्दल फार प्रेम होत… मी खूप धीट, हुशार, भाषण करणारी, स्टेजवर उभी राहणारी.. वडिलांबरोबर काम करत होते ना…! अगदी गणपती उत्सवात आमचे दहा दिवस कार्यक्रम असायचे तर ती आमच्या दारापाशी झोपलेली असायची आणि आम्ही आलो की पहिल्यांदा माझी दृष्ट काढून ती तिच्या घरात जाऊन झोपायची. मामा आणि आम्ही सगळे शेजारीच राहत होतो.
अशा तऱ्हेने माझ्या टीव्हीवरचा पहिला शो त्याचा एकमेव प्रेक्षक माझी आजी होती आणि त्याची किंमत मला चार आणे द्यावी लागली. नंतर आपल्याकडे वृत्तदर्शन सुरू झालं. अनेकांच्या मुलाखती सुरू झाल्या. स्थानिक चॅनेल वरती येण्याचा योग अनेकदा आला. मला आठवते एक मुलाखत सुनेत्रा पंडित यांनी घेतली होती, एकदा एक मुलाखत रामतीर्थकर मॅडमनी घेतली होती. एकदा माझ्या शाळेमध्ये म्हणजे तडवळकर ट्रस्टच्या नापास शाळेमध्ये माझी मुलाखत माझ्या एका विद्द्यार्थीनीने घेतली होती. असं अनेकदा मग टीव्ही वरती स्थानिक प्रक्षेपणात दिसायचं…
पण चार आणे खर्च करून मी टीव्हीवर दिसण्याचा किंवा मला टीव्हीवर बघण्याचं सुख माझ्या आजीने त्यावेळेला गड्ड्याच्या जत्रेत घेतलं होतं आणि तिचं ते वाक्य नेहमी मला आठवतं…. “ अग तू मोठी झाल्यानंतर खूप ठिकाणी टीव्ही असतील. कदाचित तू त्यात दिसशील, पण मी त्यावेळेला असणार नाही ना? ” – – म्हणून परिस्थिती नसताना त्या माऊलीने माझ्यासाठी चार आणे खर्च केले. ती चरख्यावर सूत काढून ते पैसे कमवत असे आणि एक पूर्ण सुताचा बिंडा तयार झाला की त्याचे दोन आणे मिळत. खादी भंडारमध्ये आम्हीच नेऊन घालत असू.. इतक्या कष्टाने मिळवलेले चार आणे तिने माझ्यासाठी खर्च केले. आज लाखो रुपये खर्च होतात.. कोणी करतो.. मी कोणावर तरी करते.. पण हे प्रेमच वेगळं होतं आणि त्याच्या मागचा विचारही खूप मोठा. माणसं गरीब होती, पैसा नव्हता, पण माया पोटात खूप होती आज अगदी सहजच आठवण झाली आजीची आणि त्या निमित्ताने मला तो अगदी विस्मृतीत गेलेला प्रसंग आठवला. अशी प्रेमळ आजी मला मिळाली.. ‘ परमेश्वरा तू ते भाग्य आम्हाला दिलंस.. ‘खूप प्रेम करणारी माणसं म्हणजे आपण खूप श्रीमंत हे लक्षात ठेवा….!
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





