सौ. गीता वासुदेव नलावडे
मनमंजुषेतून
☆ रात्रशाळेतला गाडीवान… लेख क्र. ४ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆
“बाई, आत येऊ का? ” हे शब्द कानावर पडले. मी मान वर करून समोर पाहिले. समोर विक्रांत मोरे (नाव बदललेले) उभा होता. चार वर्षांपूर्वी नाईट हायस्कूलच्या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून गेले असताना तो भेटला होता. कार्यक्रम संपल्यावर बाहेर पडले, तर हा नमस्कार करण्यासाठी बाहेर उभा. त्याला बघून आश्चर्य वाटलं, कारण, आठवीपर्यंत तो आमच्या सन्मित्र शाळेत होता. म्हटलं, “अरे, तू इकडे कसा? ” तेव्हा म्हणाला, “बाबांची नोकरी सुटली, बाई. आई घरकाम करते. सगळी भावंडं शिकणारी. घर चालवणं फारच कठीण जात होतं. शेवटी शाळा सोडली आणि हे नाईट स्कूल जॉईन केलं. दिवसा एका गॅरेजमध्ये नोकरी करतो आणि रात्री शिकतो”.
१४-१५ वर्षांचं कोवळं पोर हे, पण किती विचारी आहे! घर चालवण्यासाठी आई-वडिलांच्या बरोबरीने नोकरी करतो. अकाली प्रौढपण आल्याने त्याचा चेहरा पार बदलून गेला होता.
मग मी थांबले आणि तिथेच त्याच्याशी गप्पा मारत बसले. घरची, भावंडांची चौकशी केली. म्हटलं, “काय रे, तुला ड्रायव्हिंग करायला आवडतं का रे? ” तर तो म्हणाला, “हो”.
मग लगेच माझे उपदेशाचे डोस सुरू झाले. विद्यार्थी दिसला की लगेच शिकवायला सुरुवात करायची, ही माझी सवय. त्याच्याकडे पाहिलं तर तोही गप्पा मारायला उत्सुक दिसला. त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हटलं, “गॅरेजमध्ये आहेस तर ड्रायव्हिंग शिकून घे की. हल्ली बँकेकडून कर्ज मिळतं, त्यातून स्वतःची गाडी घेऊन काही व्यवसाय सुरू कर, पण हे सगळं करताना शिक्षण मात्र सोडू नकोस”. रात्रीचे नऊ वाजून गेले होते तरीही माझ्याबरोबर गप्पा मारत मारत तो स्टेशनपर्यंत आला आणि त्याचा आनंदी चेहरा मला खूप समाधान देऊन गेला.
त्यानंतर चार वर्षांनी आज मला भेटत होता. मी विचारलं, “काय कसं चाललंय? “
तो लगेच म्हणाला, “खूप छान चाललंय, बाई. त्यादिवशी तुम्ही सांगितलंत, ते नीट लक्षात ठेवलं. लगेच ड्रायव्हिंग शिकायला सुरुवात केली. दोन वर्षांनी बँकेचे लोन घेऊन एक गाडी घेतली. गाडी भाड्याने देऊ लागलो. गाडीचा लोन फिटत आलं. महिनाभरापूर्वी इंडिका घेतली. शिक्षण पूर्ण करून गाडी चालवू लागलो. घर नवीन केलं. आईला सगळी कामं सोडायला लावली. मला महिंद्रमध्ये नोकरी लागली. सुट्टीच्या दिवशी मी भाडं घेऊन जातो. बाकी एरवीच्या दिवसांसाठी ड्रायव्हर ठेवलाय. खूप छान चाललंय. त्या दिवशी तुम्ही जर सांगितलंत ना, ते लक्षात ठेवून तसेच वागायचं ठरवलं. माझ्या मनातलं नैराश्य कुठच्या कुठे दूर पळून गेलं. काम करायला नवा हुरूप आला. आता आपल्या दोन-दोन गाड्या आहेत. तुम्हाला कुठे जायचं असेल, तर नक्की सांगा. ”
मी तुडुंब खुश. विचारलं, “काय रे, गाडी किती रुपये किलोमीटरने देतोस? ”
तो दोन मिनिटं थांबला आणि मग मला म्हणाला, “बाई, तुम्ही तुमच्या मुलाला हा प्रश्न विचारला असतात का? आम्हाला तुम्ही आपली मुलं म्हणता ना? मग असा प्रश्न का बरं विचारता? ”
त्याचे उत्तर ऐकून मन भरून आलं.
खरंच, काय देतो आपण या मुलांना? थोडंसं प्रेम आणि खूप मोठी स्वप्नं. पण, माझ्या बाईंनी माझी आस्थेवाईकपणे चौकशी केली, तू हे करू शकशील असं सांगितलं, मग मी हे करणारच! ही जिद्द त्याच्या मनात निर्माण होते. तुमचे प्रेमळ आश्वासक शब्द विद्यार्थ्यांचं आयुष्य बदलू शकतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण माझ्यासमोर होतं.
खूप खूप छान वाटलं.
असे जिद्दीचा पंख लावून आकाशात भरारी घ्या, यश तुमचंच आहे, यश तुमचंच आहे.
क्रमशः दर गुरुवारी…
© सौ गीता वासुदेव नलावडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






छान कथा