सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ ज्योत से ज्योत… लेख क्र. ५ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

शाळेत नवीन शिक्षिका घेण्यासाठी मुलाखती होत्या. मुलाखती चालू असताना त्यांचे चेहरे वाचायला मला खूप आवडतं. सगळ्यांमध्ये वाचनाची आवड फार अभावानेच आढळली. एकीने तर “मृत्युंजय”च्या लेखनाचं श्रेय रणजीत देसाईंना देऊन टाकलं. एकंदरीत उत्तरंही फारशी आशादायक नव्हती.

“प्रेमा मोरे” (नाव बदललेले आहे) या नावापुढे असलेल्या शैक्षणिक पात्रतेवर माझी नजर गेली. बारावी सायन्स ७८% गुण, डीएड ७८% टक्के गुण.

माझ्या समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितल्यावर ती बसली. सगळेजण प्रश्न विचारत होते. मी मात्र तिचं निरीक्षण करत होते. शांत व सोशिक चेहऱ्यामागे काहीतरी दडलंय हे जाणवत होतं.

मी एकदम तिला म्हटलं, “तू स्वखुशीने या पेशाकडे वळली नाहीस. हो ना? “

त्यावेळी तिचे डोळे पाण्याने भरून आले. माझा कयास बरोबर होता. तिला शास्त्र शाखेतच, विशेषतः गणितात संशोधन करण्याची इच्छा होती.

परंतु घरच्यांचे म्हणणे – “आपल्या खानदानात मुली जास्त शिकल्या नाहीत. जास्त शिकून काय करायचंय? त्यापेक्षा शिक्षिका हो. हीच नोकरी बरी शिकण्यात उगाच वर्षे कशाला वाया घालवायची?”

त्या मुलीचा कावराबावरा चेहरा, तिची होणारी घुसमट, शिक्षणाची तिला असलेली आस – सगळी सगळी मला जाणवत होती.

मी तिला म्हटलं, “अग, तुला शिकायचंय ना? मग थोडा आग्रह धर, हट्ट कर. तुझं मत बाबांना पटवून दे. तू अजून वीस वर्षाचीसुद्धा नाहीस. उगाचच नोकरी आणि पैशाच्या मागे लागू नकोस. तुमच्या खानदानात इतकं कोणी शिकले नाही म्हणतेस, तर खूप शिकण्याचा पहिला मान तू पटकव. इतर मुलींसाठी तू नवीन वाट तयार कर. कोणी काहीही म्हटलं, तरी तुला काय वाटतं ते ठामपणे मांडायला शिक. एक स्त्री असलीस, तरी तुलाही तुझी मते मांडण्याचा अधिकार आहे, हे विसरू नकोस. आगाऊपणा कर असं म्हणणार नाही मी, पण नम्रपणे स्वतःचा विचार तर मांडायला शिक. “

माझं बोलणं चालू होतं आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तिने काही न बोलताही तिच्यातील असहाय्यता मला जाणवत होती.

“काही आर्थिक अडचण असेल तर मी तुला मदत करते. त्यासंबंधी हवं तर मी तुझ्या वडिलांशी बोलते. पुढील शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असेल तर त्याचीही सोय करते, ” असे अनेक पर्यायाने तिच्यासमोर ठेवले.

“बाई, मी तुम्हाला नंतर येऊन भेटते, ” असं म्हणून ती गेली.

नवीन शैक्षणिक धोरणात आम्हाला अभ्यासाला असलेले “महिला सबलीकरण”, “महिला सक्षमीकरण” असे विषय नजरेसमोर आले. खरंच आहेत का आजच्या महिला सक्षम? आहेत का महिला सबला? आजच्या सुशिक्षित समाजातही जर असे चित्र असेल तर निरक्षरांच्याबद्दल तर विचारच करायला नको.

मुलांच्या प्रवेशाच्या वेळी असे अनेकदा आढळून येते की “मुलगा आहे ना बाई, म्हणून त्याला इंग्रजी माध्यमात घातलाय. पण ही मुलगी आहे ना, म्हणून तिला इथे मराठी माध्यमात प्रवेश घेतोय”. अशा पालकांशी माझे नेहमीच वादविवाद होतात. कुठे गेली ती स्त्री पुरुष समानता? अशा वेळी कितीही शांत राहायचा प्रयत्न केला तरी ते काही शक्य नसतं.

नंतर काही दिवसांनी मात्र प्रेमाचा फोन आला. तिने साठे कॉलेजला ऍडमिशन घेतली होती. ती पुढे शिकणार होती. हे सर्व तिने वडिलांना व्यवस्थित पटवून दिले होते आणि हे सर्व माझ्यामुळे घडले असं तिला वाटत होतं म्हणून धन्यवाद देण्यासाठी तिने मला फोन केला होता.

पण खरं सांगू का? प्रत्येकात असा निखरा राखेखाली दडलेलाच असतो. फुंकर घालण्याचं काम फक्त आपण करायचं.

खूप बरं वाटलं. माझ्या बोलण्यामुळे का होईना, ती धीट झाली, स्वतःला जे वाटतं ते बोलू शकली. “खूप शिक आणि इतरांनाही अशीच धीट बनव”, असं फोनवर सांगितलं आणि माझे डोळे टिपले.

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted