सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ !! जादूचे कार्यक्रम!! ☆ सुश्री शीला पतकी 

‘जाssदू’… असं म्हटलं की सगळ्यांनाच गंमत वाटते. या कलेचे सगळ्यांनाच आकर्षण असतं. जादू हा शब्दही आपण कितीतरी ठिकाणी वापरतो. उदाहरणार्थ ‘तिच्या बोलण्यात जादू आहे’, ‘त्यांच्या लेखनाची जादू वेगळी आहे’, ‘उसकी नजर मे जादू है! ’, ‘जादूss तेरी नजर’ हे गाणं तर खूपच फेमस झालं होतं. आपण अगदी लहान मुलाला सुद्धा डाव्या हातातील वस्तू उजव्या हातात पटकन घेऊन ‘बघ माझ्या हातातून वस्तू गायब झाली आणि ती मी आता हवेतून काढतो’ म्हणून हात वर करून लगेच दुसऱ्या हातातून पहिल्या हातात घेतो आणि ते पोर अचंबित होतं. ती खरं तर आपली हातचलाखी असते. मग या हातच्या चलाखिचीच पुढे ‘जादू’ नावाची कला झाली आणि ते करणारा जादूगार!!

आपल्या कल्पनेच्या पलीकडे एखादी गोष्ट करून आपल्याला अचंबित करणारा तो जादूगार. जादूचा कार्यक्रम म्हणलं कि लहान मुलं, मोठी माणसं सगळीच त्याकडे आकर्षित होतात. जादूगाराचा स्टेजवरचा वावर, त्या पाठीमागचं म्युझिक, त्याचे हातवारे, सगळे सुंदर असतं… आमच्या लहानपणी सर्वात प्रसिद्ध जादूगार होते.. ‘जादूगार रघुवीर! ’ जादूगार रघुवीर यांचे डोळे निळे होते. ते अतिशय गोरे पान असे कुठल्यातरी जादुई दुनियेतून आल्यासारखे दिसायचे. सोलापूरला त्यांचे थियेटर कार्यक्रम होत होते. ते माझ्या वडिलांचे मित्र. थियेटर कार्यक्रम संपले की ते आमच्या घरी राहायला येत. त्यापूर्वी ते लॉजला उतरत. ते आले की त्यांचं सगळं जादूचं सामान आमच्या घराच्या गॅलरीमध्ये लावलं जाई.

सोलापुरात त्यांचा कार्यक्रम असला की त्या दिवशी सकाळी डोळे बांधून फटफटीवरून गावात फेरफटका मारणे हाच त्यांचा पहिला कार्यक्रम असायचा. त्यांच्या मार्गावर दुतर्फा अनेक लोक जमलेले असायचे. डोळे बंद करून डोळ्यावर पट्टी बांधून ते ‘फटफटी’ म्हणजे आत्ताची ‘मोटरसायकल’ चालवताना आमच्या घरापाशी आले की थांबत. वडिल त्यांना तिथे हार घालत आणि मग पुढचा फेरफटका… या सकाळच्या कार्यक्रमामुळे त्यांचा सगळा शो फुल होत असे. त्यांच्या सामानात एक कळशी होती. एक कार्यक्रम झाला कि ती कळशी पालथी करायचे आणि म्हणायचे, ‘‘आता थोडा वेळ गंगेची प्रार्थना करूया, गंगेची प्रार्थना” असे म्हंटल्या बरोबर कळशीतून पाणी पडायचे. आमच्या घरी आल्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘तुला काय देऊ बेटा? ” मी म्हणाले, ‘‘तुमची कळशी द्या. आम्हाला खालून पाणी आणावे लागते. ” त्यावर ते इतके हसले आणि म्हणाले, ‘‘अगं बाळ ती जादूची कळशी आहे. तुला दिल्यावर मी कार्यक्रम कसा करू? तू माझ्याकडे जादू शिक. मग मी तुला ती देईन. ” तेंव्हापासून जादू शिकावी असे मला वाटू लागले.

पुढे इंद्रजीत नावाचे एक जादूगार आमच्या वडिलांसह कार्यक्रम करीत असत… त्यांनी मला काही जादूचे कार्यक्रम शिकवले आणि मी ते स्टेजवर अत्यंत सफाईने करत असे. पुढे वळसंगकर नावाचे सोलापुरातील एक सॅनिटरी इन्स्पेक्टर होते त्यांच्याकडे जादूचे सर्व सामान होते आणि ते कार्यक्रम करीत असत. त्यांनी मला जादूचे सर्व कार्यक्रम शिकवले आणि जादूचे सामानही दिले. पुढे मी त्याचा एक तास स्टेजवर कार्यक्रम करीत असे… त्यामध्ये रिकाम्या पिशवीतून वस्तू काढणे, रिकाम्या गोलातून वस्तू काढणे, आकडे ओळखणे असे बरेच कार्यक्रम होते. दोरी तोडून जोडणे…. या कार्यक्रमांमध्ये मी प्राविण्य मिळवले होते, माझे वक्तृत्व ही छान होते. कागद खाऊन पूर्ण कागद काढणे.. अशा कार्यक्रमांमुळे लोक अचंबित होत. माझे वडील आणि मी एक कार्यक्रम करत असू… माझ्या तोंडावरती पूर्ण पांघरूण असे. वडील स्टेजवर एका माणसाला बोलवून कोणताही आकडा लिहिण्यास सांगत. मग दोन अंकी, तीन अंकी, चार अंकी आकडा कोणताही असे आणि तो मी तोंडावर पांघरूण असताना ओळखून दाखवत असे… हा कार्यक्रम एका इलेक्शन प्रचारासाठी झाला. आठ उमेदवार उभे होते. आठही जणांच्या नावाने लोकांनी आकडे लिहिले. आठही बरोबर आले. दुसऱ्या दिवशी मतदान झाले. संपूर्ण पॅनल बहुमताने निवडून आले. त्यांनी आमचाच गावात मोठा सत्कार ठेवला…… अशी जादूच्या कार्यक्रमाची आठवण माझ्याकडे आहे…

मुख्य म्हणजे या कलेमुळे रेल्वे प्रवास करताना, कुठे एकत्र बसलो की सहज एक दोन कार्यक्रम करून लोकांना आकर्षित करून घेता येत असे. त्यामुळे अनेक मित्र भेटले, ओळखी वाढल्या! ….. पुढे मग मी ‘बी. एड’ झाले. शाळेत नोकरीला लागले आणि कार्यक्रम करणे बंद झाले. या गोष्टीला जवळजवळ २० वर्ष झाली होती. एके दिवशी एक जादूगार गृहस्थ कार्यक्रम करण्यासाठी शाळेत आले होते. कार्यक्रमाला परवानगी मिळावी म्हणून ते शाळेच्या सचिवांची वाट बघत होते आणि तिथे बसलेल्या लोकांसमोर त्यांनी एक जादूचा प्रयोग करून दाखवला होता…. ‘दोरीचे तुकडे करून जोडणे’… त्या चार-पाच बायका खूप आश्चर्यचकित झाल्या. इतक्यात मी तिथे गेले आणि मी त्यांना म्हणाले, ‘‘त्यात काय? मी सुद्धा करू शकते’’… मी खरं अगदी गमतीने म्हणाले होते परंतु त्यांना जरा राग आला. ते म्हणाले, ‘‘असं..! मग घ्या की दोरी आणि करून दाखवा”… मी दोरी हातात घेतली. ज्या बाईंना कापायला सांगितली होती त्यांच्याकडून ती कापून घेतली. एक मंत्र म्हणला आणि दोरी एकसंघ त्यांना उलगडून दाखवली…. सगळेच आश्चर्यचकित. म्हणजे तो जादूगार सुद्धा आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, ‘‘तुम्हाला कसं येतंय? ”… मी त्याला म्हणलं, ‘‘जिस स्कूल में आप अभी पढ रहे हो, उस स्कूल के हम प्रिन्सिपल रह चुके है! ” मग मी त्याला सांगितलं की, मी जादूचे प्रयोग कुणाकडे शिकले आणि असे अनेक कार्यक्रम मी स्टेजवर केले आहेत. आमच्या स्टाफला हे माहीत नव्हते. ते सगळेच आश्चर्यचकित झाले. ते जादूगार म्हणाले, ‘‘सॉरी मॅडम, मला खरंच वाटलं नाही तुम्ही असं काही कराल म्हणून”…. मी म्हणलं, ‘‘नाही तुम्हाला दुखण्याचा माझा हेतू नव्हता. आपण कलावंत आहात… केवळ गंमत म्हणून मी हे केले….! ”

जादूच्या कलेमध्ये पुढे हातचलाखी संपून अनेक यंत्रवत गोष्टींचा समावेश झाला. या क्षेत्रातही अनेक दिग्गज मंडळींनी काम केले. आता तर वाराणसीच्या गंगेमध्ये असंख्य दिवे एकावेळी लावणारा जादूगार मी पाहिला आहे. या क्षेत्रात अनेक दिग्गज काम करीत आहेत. जादूगार किती मोठा आहे, लहान आहे याला महत्त्व नाही. आपल्या प्रत्येकाला या छोट्या छोट्या कार्यक्रमाचेही आकर्षण असतेच आणि आपल्याला ते सगळेच कार्यक्रम आवडतात.

जादूच्या या कलेमध्ये माणसाच्या मनोरंजना बरोबर त्याचे कुतूहल जागृत करण्याची एक मोठी ताकद आहे, इतके मात्र खरे! या सगळ्यात एक गंमत म्हणजे जादूचे मंत्र फार छान असतात.. त्यातला एक मंत्र मला नेहमीच आवडतो ‘‘हाय अल्या रम्या कुल्हा फाट्या फुल्ला. आईदु जालदू आई बला तालदु छूssssss! ” आहे की नाही मस्त आणि सोपा सुद्धा. चला तर मग…. हा मंत्र नंतर पाठ करा आणि रोज सकाळी पाच वेळा म्हणण्याचा सराव करा. ‘जादू’ अपने आप हो जायेगा..!

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted