सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “लाह्या आणि गणंग…” ☆ सुश्री शीला पतकी 

श्रावणात सर्वात घाई असायची लाह्या फोडायची. आमच्या शेतातून ती ज्वारी यायची.. लाह्याची वेगळी असायची.. ती मग आई त्याचे उमले घालायची – म्हणजे काय ते आता मला नक्की सांगता येणार नाही पण ते भिजवून ते उपसून काढायचे.. ठेवायचे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी लाह्या फोडायचा शेगडी वरती निखारा असायचा बेताचा त्यावर लोखंडाची पाटी त्यामध्ये ते ज्वारीचे पसापसा दाणे टाकायचे त्याचे फाड फाड फाड फाड उडायचे एका दांडूला कापड बांधलेला… त्यात त्यांनी आई ते सगळं फिरवायची मग आम्ही आजूबाजूच्या सगळ्या पडलेल्या लाह्या गोळा करत असू बघता बघता लाह्याचा डबा गच्च भरून जायचा. डबा कसला पिप होते ते. सगळ्या वाड्यात त्या लाह्या वाटायच्या असायच्या… मग ते खाली गडंग उरायचे ते पुढे दळणात घालून आई त्याच काय काय करायची.

– – हे सगळं आठवायचं कारण म्हणजे श्रावण तर आहेच पण आमच्या शाळेमध्ये एक शिक्षण तज्ज्ञ आले होते लिमये नावाचे… शिक्षण क्षेत्राचा दांडगा अनुभव… एक दिवसभर आमच्याकडे होते… मला नोकरी लागून तेव्हा पाच सहा वर्ष झाली होती… माझी त्यांची चार-पाच तासात चांगली गट्टी जमली… ते माझ्या वडिलांसारखे होते… मी त्याना म्हणाले “ सर मी गणित खूप मेहनतीने शिकवते आणि मला असं वाटत असते सगळ्या मुलींना ते आलेच पाहिजे अगदी शेवटच्या मुलीला येईपर्यंत मी शिकवत राहते पट्टी हातात धरून…. पण तरीही काही मुलींना कितीही शिकवलं तरी येत नाही असं का? … ” त्यावर त्यांनी एक छान उत्तर दिलं होतं.

मला म्हणाले ” तू कधी लाह्या फोडताना पाहिल्या आहेत का? ” मी म्हणलं “हो पाहिलेत “.

“मग त्याच्यामध्ये सगळे दाणे फुटतात का? ” 

मी म्हणलं ‘ नाही ‘.

ते म्हणाले “काही दाणे पूर्ण फुटतात काही अर्धवट फुटतात आणि काही खाली गडंग राहतात – तसंच असतं विद्यार्थिनीच. आपण पहिल्यांदा शिकवतो तेव्हा काही विद्यार्थ्यांना लगेच समजतं. काही विद्यार्थीनिंना दोनदा शिकवावं लागतं. काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्गात गेल्यावर मग पहिलं चांगलं कळतं, आणि काहीना कितीही केलं तरी कळत नाही – ते म्हणजे हा ‘गणंग’ – मग आपल्या विषयाचा नाद सोडायचा, पण त्यांचा काही ना काहीतरी उपयोग होत असतो. ते अगदी वाया जात नाही. तेव्हा एवढा अट्टाहास तू करू नकोस “.

– – मला ते उदाहरण खूप छान पटलं. दरवर्षी लाह्या फोडताना मला त्यांची आठवण येते आणि त्यांच्याकडून मी शिकले – – काही गणंग असतात ते सोडून द्यायचे. त्यांच्या नशिबाप्रमाणे त्यांच्या आयुष्यात घडत असतं…. सर्वांनी सगळा भार आपल्यावर दिलाय असं कधी मानू नये.

शब्दांकन : सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted