सुश्री अरुणा मुल्हेरकर
मनमंजुषेतून
☆ श्रावण… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
सृष्टी राणीला आनंद झाला
हासत नाचत श्रावण आला.
आषाढ महिन्यातील पावसाचे तांडव शांत होत आले आणि श्रावणाचे वेध लागले.
ढगाआड दडलेल्या सूर्याने धरेशी आता लपंडाव खेळण्यास सुरुवात केली आहे.
श्रावणमास म्हटला की बालकवींच्या पंक्ति आठवतात,
.. श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे
– – नजरेसमोर हिरवागार, प्रफ्फुलीत, टवटवीत निसर्ग उभा राहतो. पाऊस चांगला झालेला आहे, वावरात शेतकर्यांनी लावण्या केलेल्या आहेत, रोपे मोठी होऊन शेतात डुलत आहेत.
मला चांगले आठवते, श्रावणी शनिवारी संध्याकाळी लवकर पाच वाजताच सकाळचा उपवास सोडण्यासाठी आम्ही जेवायला बसायचो. केळीच्या पानावरचा तो गरम गरम वाफेचा भात, वरण आणि त्यावर साजूक तुपाची धार! अहाहा! काय त्याची चव! सोबतीला हिरव्या मटारची उसळ, वालाचे किंवा मुगाचे बिर्ढे, अळूच्या वड्या आणि आजीने केलेले तांदळाच्या पिठाचे खोबर्याचा चव घालून केलेले घावणे. अगदी ब्रम्हानंद! जेवणं झाली की पप्पा आम्हाला कळव्याच्या पुलावर घेऊन जायचे आणि त्या पावसाळी कुंद वातावरणात दूरवर पसरलेली, डोलणारी भाताची शेते पाहून जो काही आनंद मिळायचा तो केवळ अवर्णनीय!
श्रावणमास म्हणजे सणांची रेलचेल आणि मिष्टान्नांचा रतीब!
नव्या नवर्यांनी नटून थटून, साज श्रृंगार करून सोमवारी शंकराला शिवामूठ वाहायची आणि सौभाग्याचे दान मागायचे,
मंगळवारी एकत्र जमून मंगळागौर पूजायची आणि झिम्मा फुगड्या असे खेळून रात्र जागवायची. आता काळ बदलला, मुली नोकरीसाठी बाहेर पडल्या, त्यांची वयेही मोठी असतात, त्यामुळे ह्या सणांचे स्वरूप बदलले असले तरी परंपरा आजही टिकून आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
नागोबाला दूध घेऊन वारूळाला जाणार्या माहेरवाशिणी दिसल्या नाहीत तरी घरोघरी पाटावर नागाचे चित्र काढून नागाची पूजा केली जाते, नागपंचमीचा सण साजरा होतो.
नारळी पौर्णिमा कोळी बांधवांचा मोठ्ठा सण! “दर्याला आयलंय उधाण” त्या खवळलेल्या सागराला श्रीफळ अर्पण करून शांत करायचे ही नारळी पुनवेची संकल्पना!
त्याचबरोबर रक्षाबंधन! भाऊ बहिणीचे अतूट नाते. बहीण भावाला राखी बांधून त्याला प्रेमाच्या धाग्याने जखडून ठेवते आणि भाऊ तिला तिचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो.
गोकुळाष्टमी. कृष्णजन्म! घरोघरी जन्माष्टमी साजरी केली जाते. बालगोपालांचा खेळ! दहीहंडी फोडण्यासाठी पथके तयार असलेली आपण पाहतो. ठिकठिकाणी उंच उंच बांधलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी ही पथके तयार असतात. सगळीकडे कसे उत्साहाचे वातावरण! पिठोरी अमावस्येने श्रावणाची सांगता होते.
दारी आलेल्या अतिथीचे रक्षण कर असे सांगून आई मुलाला दिव्याचे वाण देते. वंशाचा दिवा सतत तेवत राहो अशी यामागची भावना.
श्रावणातल्या या सगळ्या सणांच्या पुराणकथा आहेत, अतिशय मनोरंजक आणि उद्बोधक! बदलत्या काळातही त्या टिकून आहेत, आपण त्यांचे महत्व जाणतो आणि यथाशक्ति हे सण साजरे करतो यातच आनंद आहे, समाधान आहे.
कालचक्र हे असेच चाले
श्रावणात मन हिरवे झाले……
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈





