सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ मक्याचं कणीस… ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

आषाढ -श्रावणाचा चिंब ओला दिवस..

आमच्या घराची कडी ठोठावली जायची..

घरी कुणी आलेलं आवडण्याचं ते वय नि तो काळ.. अगदी निरागस..

मी धावत जाऊन दार उघडायची..

” बाबा आहेत का? “.. भारदस्त आवाजातला प्रश्न.. सायकल भिंतीशी लावत विचारलेला..

गोरा रंग, पिंगट-घारे डोळे, भरपूर उंची, पांढरा पायजमा, पांढरा सदरा नि पांढरीच टोपी.. अशा वेशातील ती व्यक्ती म्हणजे आप्पाकाका.. आप्पाकाका खाडीलकर..

काही व्यक्ती खूप जवळच्या असतात.. पण त्यांचं नातं आपल्याला कधीच कळत नाही..

त्यातलेच आमचे आप्पाकाका..

ते आमच्या बाबांचे कसलेतरी भाऊ होते..

नात्याचं नाव काहीही असो पण संबंध जवळकीचे होते.. आपुलकीचे होते..

” वहिनी कणसं काढून घ्या.. ताजी आणलीयेत शेतातून.. ” म्हणत ते आईच्या हातात एक भलीमोठी जड पिशवी देत..

ती कणसं आम्ही पुढचे कितीतरी दिवस खात असू…

मनानं आप्पाकाकांची नि कणसांची जोडी नकळत जुळवलेली…

आजही मक्याचं कणीस म्हटलं की आप्पाकाकाच् डोळ्यासमोर येतात..

पिस्त्याच्या रंगाशी जवळीक साधणारी कणसाची सालं… क्रेपच्या कापडासारखी..

रंग डोळ्याला नि स्पर्श बोटांना सुखावणारा..

या पानांच्या आतले मऊ मुलायम सोनेरी केस..

पाश्चिमात्य गो-या सुंदरीच्या भु-या केसांशी स्पर्धा करणारे..

गालांना गुदगुल्या करणारे..

या केसांच्या आतल्या दंतपंक्ती. मोत्यासारख्या.. पांढ-याशुभ्र नाहीतर पिवळसर.. एका सरळ रेषेतल्या…

आभाळ गच्च भरून आलेलं. ढगांना न पेलवणारं पाणी अखंड बरसणारं.. सारा आसमंत सर्दाळलेला..

” कणसं सोलून द्या पोरांनो ” आईचा आदेश..

कणीस सोलणं हे फार आवडीचं काम..

त्याचे सोनेरी केस एकमेकांच्या गालावर फिरवणं..

त्याच्या मिशा लावून गडगडाटी हासणं..

सालांच्या बाहुल्या, फुलं बनवणं..

यांनी आमचं बालपण रम्य केलं..

कणीस सोलण्याआधी आईनं सालं बाजुला करून दाण्यात नख टोचून पाहिलेलं.. त्यातून टचकन् दूध बाहेर आलेलं.. कणसाच्या कोवळेपणाची ग्वाही देणारं..

कणसात लोखंडी उलथन्याचं टोक खुपसून आई गॅसवर कणसं भाजायची..

त्या कुंद वातावरणात तो खमंग वास घरभर भरून रहायचा..

आई कणसांना निगुतीनं साजुक तूप, मीठ, लिंबू लावून आम्हाला द्यायची..

आम्ही तिघं भावडं घराच्या पायरीवर बसून 

पावसाच्या रिमझिमीच्या पार्श्वसंगीताच्या नादात मन लावून ते कणीस खायचो..

नि काळं झालेलं तोंड, नाक पाहून मनसोक्त हसायचो…

थोडी कमी कोवळी कणसं आई हळद, मीठ घालून उकडायची..

कणसाच्या दाण्यापेक्षा त्यातलं ते मिठाळ पाणी जास्त आनंद देऊन जायचं..

जून कणसं किसून आई ” मक्याची उसळ ” नावाचा अद्वितीय पदार्थ बनवत असे..

मोहरी, जिरे, कढीपत्ता घातलेली नि पांढ-याशुभ्र ओल्या खोब-याने, हिरव्यागार कोथिंबीरीने नि लिंबाच्या फोडीने सजलेली ती पिवळीधम्म लुसलुशीत उसळ मर्मबंधातली ठेव…!!  

बालपण सरलं..

लग्नानंतरच्या मंतरलेल्या दिवसांत नव-याबरोबर महाबळेश्वरच्या वेण्णा लेकच्या काठावर गुलाबी थंडीत खाल्लेलं कणीस रोमॅंटिक.. अविस्मरणीय..

ते फक्त कणीस नव्हतं.. त्याच्या चवीत सगळा माहोल उतरलेला…

हाडात शिरणारी थंडी नि त्यात भर घालणारा डोंगरातला पाऊस.. महाबळेश्वरचाच..

कुशीत कुडकुडणारी सात-आठ वर्षांची लेक..

वेण्णालेकजवळच्याच ” बगीचा ” मधलं ” गरमागरम ” कॉर्न पॅटीस ” नि त्या नंतरची वाफाळती कॉफी.. पुन्हा पुन्हा महाबळेश्वरकडे खेचणारी..

कालौघात ” स्वीट कॉर्न ” नं खाद्यजीवनात प्रवेश केला, देशी कणसाला दूर लोटलं अन् अख्खं खाद्यविश्व काबीज केलं..

ढबू मिरची, व्हिनेगार, चिली-सोयासॉस यांच्या स्वादानं ब्रह्मानंदी टाळी लावणारं क्लिअरकॉर्न सूप….

कुरकुरीत नूडल्स, रसरशीत स्वीट कॉर्न नि टोमऍटोसॉसच्या चवीतली टॅंगीकॉर्न भेळ..

कॉर्नच्या सारणाला बटाट्याच्या मृदु आवरणात लपेटून भाजलेली चविष्ट 

कॉर्न टिक्की…

खुसखुशीत खमंगकॉर्न पराठा..

चीज च्या चवीत न्हाऊन निघालेला नि टचकन मक्याचे दाणे दाताखाली आणणारा कॉर्न राईस..

पिवळ्या मक्याच्या दाण्यांनी नटलेला कॉर्न पिझा…

खुमासदार बेक्ड कॉर्न व्हेजिटेबल्स..

मक्याचे दाणे, टोमॅटो आणि इतर पदार्थांनी बनलेलं रंगीबेरंगी कॉर्न सलाड…

… किती म्हणून नावे घ्यावीत?

” कॉर्न क्लब ” नावाची रेस्टॉरंटची अख्खी साखळी जिभेचे ” कॉर्नचोचले ” पुरवायला उभी होती..!!  

भारताला व्यापून टाकलेल्या ” चिनी खाद्यसंस्कृतीने तर मक्याच्या पिठालीही अन्नात घुसवलं.. नि ” सर्वात्मका ” करून सोडलं..!!  

पंजाब्यांची मकईकी रोटी… लोण्यानं मढलेली नि त्याबरोबरचा हिरवागार सरसोंका साग.. लाजबाब… जिभेचे चोचले पुरवणारा नि तब्येतीलाही जपणारा..!!  

बोटाच्या आकाराचं इवलुसं, नुकतच भुईतून डोकावणारं ते नाजुकसं ” बेबी कॉर्न “मात्रं पदार्थात पाहिलं की माझा जीव हळहळतो.. भूकच मरून जाते..

जिव्हालौल्यासाठी त्या कोवळ्या जीवालाही न सोडणा-या मानवजातीचा राग येतो.. नि मी चमचा खाली ठेवते!!  

बालपण कधीचच सरलं..

तारुण्यानंही बाय बाय केलय..

गाडी आता उताराला लागलीय…

गाडीचे पार्ट्स अधूनमधून कुरकुर करतात..

हॉटेलिंगचा कंटाळा येतो..

चायनीज पोटाला मानवत नाही..

घरचा वरणभात नि भाकरीभाजी बरी वाटते…

पावसाळ्याचा एखादा झिम्माड दिवस असतो… गरमागरम चटपटीत खावसं वाटतं.. जिओ मार्ट मधून दोनच कणसं मागवतो..

पन्नास रुपयांची ती दोन कणसं पाहून भडकणा-या महागाईवर चर्चा करतो..

.. तेव्हा घरची -शेतातली ताजी कणसं म्हणत् पन्नास कणसं एकही पैसा न घेता मायेपोटी देणारे आप्पाकाका आठवतात..

कणसाची हिरवी सालं नि रेशमी सोनेरी केस कच-याच्या डब्यात टाकताना…

केसांच्या लावलेल्या मिशा नि आम्हा भावंडाचे ते निरागस चेहरे डोळ्यांसमोर हसू लागतात…

कणीस खाताना रंगलेल्या गप्पा कानात गुंजतात…

.. आम्ही नवरा-बायको एका भाजलेल्या कणसाचे दोन तुकडे करतो नि कोसळणा-या पावसाला साक्षी करत रिचवतो…

कणीस छानच असतं पण दातात अडकलेली कणसाच्या दाण्याची सालं हैराण करून सोडतात..

टूथ पिकने ती सालं दातातून काढताना… मात्रं..

आप्पाकाका, केसांच्या मिशा, सालांची फुलं, एकमेकांवर कणसांची सालं नि केस फेकत केलेली पळापळी, आईच्या हातची ती स्वर्गीय मक्याची उसळ…

मलमली तारुण्यातला कणसाच्या साक्षीनं अनुभवलेला एकमेकांचा गुलाबी सहवास…

लेकीला कवेत घेत भरवलेलं महाबळेश्वरातलं कॉर्न पॅटीस…

मिरजेहून कोल्हापुरला जाताना बहिणीकडे ओढ घेणारं मन नि रस्त्यावरचं कणीस…

कितीकिती हळव्या आठवणी काळजात झिम्मा खेळू लागतात…

नि लक्षात येतं…

.. कणसापेक्षा त्याच्यासोबतच्या आठवणी जास्त चवदार आहेत..

आयुष्यभर जिभेवरच नाहीतर काळजात रेंगाळणा-या!!  

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted