मनमंजुषेतून
☆ “फुलोरा…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆
मान्य… माझं काहीच कर्तृत्व नाहीये यात. हे घर बाबांनी बांधलं. बंगल्यात रहायची माझी खरीच लायकी नाहीये.. नशीब… बंगल्यात रहायला मिळतंय यासाठी परमेश्वराचे आभार. आणि अर्थात बाबांचेही.
बंगल्यातल्या मोठ्या खोल्यांचं कौतुक नाहीये मला. मला वेड आहे अंगणाचं. अंगणातला प्रत्येक कोपरा, इंच न इंच मी वापरलाय. फुलं माझा जीव की प्राण. सकाळी मी लवकर ऊठतो. आंघोळून तैयार. फुलांची परडी घेऊन मी रोज सकाळी अंगणात येतो. मोगरा, सोनचाफा, प्राजक्त, जास्वंद, कुंद, जाई, तगर, कण्हेर, गुलाब, काटेकोरांटी… फुलंच फुलं.
अंगणी पारिजात फुलला. परडी ओसंडून वाहते नुसती. पुरून उरतील एवढी फुलं.
मग घरच्या देवांची पूजा. छान सोवळं नेसून. गंध फुलं. देवघरात फुलं वाहिली की नुसता घमघमाट. फुलांचा फक्त वास घ्यायचा नसतो. देवापुढे ती छान मांडली की एकदम भारी वाटतं. एखादवेळी गुहागरला जा. सकाळी सकाळी व्याडेश्वराच्या मंदिरात जाऊन बघा. चटकचांदणी, सोनचाफा, लाल जास्वंद.
काय अफलातून सजावट असते. मन करा रे प्रसन्न… प्रसन्न वाटतंच.
मी आपलं घरच्या बाप्पांना जमेल तेवढं फुलांनी सजवतो. पूजा झाली की अंगणात. झोपाळ्यावर घुटक घुटक खडा च्चमच चहा. पेपर वाचता वाचता समोर बघायचं. मस्त सिनेमा बघायला मिळतो दररोज.
.. तुम्हाला गंमत सांगतो.. आमचं कंपाऊंड जरा डिझायनर आहे. मधनं मधनं खिडक्या आहेत त्याला.
त्यातनं हात काय अगदी मुंडी सुद्धा आत घालता येते.
वही तो… हळू हळू या कंपाऊंडच्या खिडक्यांना हात फुटतात. क्वचित डोकीही. तशा आजूबाजूला बर्ऱ्याच बिल्डींगा.. आणि सतराशे साठ माणसं.
तसं मार्केट इथनं बऱ्यापैकी लांब. फिरणं आणि फुलं गोळा करणं. साथ साथ. मला काहीच प्राॅब्लेम नाहीये.
माझी पूजा सकाळी साडेसहाच्या आत उरकते. बाकीची फुलं कुणाच्या देवाला वाहिली गेली तर, मला आवडतंच ते.. फक्त फुलं तोडताना झाडांना इजा पोहचू नये. कळ्या तोडल्या जाऊ नयेत, एवढीच अपेक्षा.
तशा पुणेरी पाट्याही लावल्यात मी.
मेरे पास गाडी है, बंगला है,. आंगणभर फूलं है! मी नशीबवानच आहे.
तरीही फुलं वाटायला मला आवडतात. त्याहीपेक्षा फुलं अशी चोरीला गेलेली जास्त… फुलं तोडणाऱ्याला वाटतं की त्याला कुणी पहात नाहीये. चहा पिताना मात्र मला सगळं लाईव्ह दिसतं. एखादी मुंडी कंपाऊंड मधनं आत डोकावते. टपाटप फुलं वेचते. अचानक माझी नजरानजर. मुंडी एकदम कनफ्युजते. मी डोळ्यांनी रिलॅक्स म्हणतो आणि दिलसे हसतो. मुंडीच्या जीवात जीव.
…… दुसऱ्या दिवसापासून भीड चेपते.. आपलेपणाची निर्लज्ज भावना वाढीस लागते. वहिवाटीचा हक्क असल्याप्रमाणे, ताठ मानेनं फुलं तोडली जातात. चोरीची बोरं आणि चोरीची फुलं. देवाला काही फरक पडत नाही. वाहणाऱ्यानं निर्मळ मनानं अर्पणोमस्तु केलं की झालं…. चालायचंच… कंपाऊंडचा दरवाजा उघडून आत येत नाहीत हेच नशीब.
दोन महिन्यापूर्वीची गोष्ट. सकाळी पावणेसहा वाजता फुलं गोळा करायला अंगणात. मोक्यावरची फुलं गायब. कुणी तरी बिलंदर असावा. लवकर उठणारा.. … फुलं न्यायला हरकत नाही, किती न्यावीत?
नो लिमीट. खूप राग आला. मग विझला. बाप्पांची कृपा.
…. दुसऱ्या दिवशी एक चिठ्ठी लिहिली… “माझी घरची पूजा व्हायची असते. इतरांनाही फुलं हवी असतात… तुमच्यासाठी मी वेगळी फुलांची पिशवी ठेवत जाईन. “
.. सकाळी साडेपाच वाजता उठायला लागलो. माझी फुलं आणि त्याची फुलांची पिशवी. पिशवी कंपाउंड वाॅलवर ठेवून द्यायचो… वो आदमी समझदार था. प्राॅब्लेम संपला. मीही जरा लवकर उठायला लागलो.
मागच्या आठवड्यातली गोष्ट. मित्राच्या आईची तब्येत एकदम बिघडली. सकाळची वेळ. हॉस्पिटलं फुल्ल.
कुणी अॅडमिट करून घेईना… लग्नाच्या मुलीला प्रत्येक घरनं नकार मिळावा तसं झालेलं.
असंच एका हाॅस्पीटलमधे शिरलो. फुल्ल. एकदम हाक ऐकू आली.
” केळकर थांबा. अॅडजस्ट करतो. “
.. देव पावला. त्या देवदूताची ओळख लागेना. दहा दहा वेळा त्याला थँक्स म्हटलं.
” माफ करा. मी आपल्याला ओळखलं नाही. “
देवदूत हसला. मागे बोट दाखवलं… भिंतीवर देव्हारा. फुलांचा घमघमाट.
“साडेपाचची फुलांची पिशवी” ओळख पटली.
फुलं.. माझ्या अंगणातली फुलं.. एकदम देवाघरची फुलं झालेली.
© श्री कौस्तुभ केळकर नगरवाला
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




सुंदर पोस्ट!