सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “शिक्षक …” ☆ सुश्री शीला पतकी ☆
खूप जणांनी खूप व्याख्या केल्यात, खूप मोठी मोठी उदाहरणं समोर आहेत, शिक्षक कसा असला पाहिजे यासंबंधी अनेक चर्चा ऐकल्या, त्यानुसार वागण्याचा प्रयत्नही केला. खरंतर हे सगळं आतून असावं लागतं. हे सगळं वाचताना -ऐकताना -पाहताना असं वाटतं की शिक्षक म्हणजे फक्त शिक्षण देणारा नव्हे…आम्ही काय दहावीपर्यंत शिकवतो.. आमच्या पुढे उभे राहिलेले विद्यार्थी त्यापेक्षा ज्ञानी झालेले असतात… पण आमच्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर अपरिमित कृतज्ञता दिसते. अनेकांचे फोन येतात.. कोणी काही आठवणी सांगतात. दहावीपर्यंत शिकवायचं तरी काय असतं? खरं तर ते आपोआप शिकतच असतात आणि ते शिकवलेलं थोडंच त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतं… ऑक्सिजन + कार्बन डाय-ऑक्साइड
( a+b) = CO2, प्रमेय, मराठीच्या कविता, भूगोल हे सगळं विसरून जातं. पुढे फार उपयोगाला येतं असेही नाही. मग लक्षात काय राहतं असा विचार मी नेहमी करते आणि मग आता हळूहळू काही गोष्टी उलगडत गेल्या आहेत.
पाच सात वर्षाखालची गोष्ट आहे सकाळी साडेसहा वाजता एक फोन आला मी फोन उचलल्यावर पलीकडची मुलगी रडवेली झाली होती ती म्हणाली बाई मी अमुक अमुक माझी आई गेली आज सकाळी सोलापूरला मी पुण्यात असते मला काही सुचत नाही फक्त तुमची आठवण आली आणि ती रडायला लागली. मी तिला समजावले आणि म्हणाले आता तुम्ही निघणार असाल तर जपून या ती तिच्या आई-वडिलांची एकटीच मुलगी होती. तिचे पूर्ण अवसान गेलेले होते. ती म्हणाली “आम्ही निघालोय सोलापूरला यायला. नवरा ड्रायव्हिंग करतोय “
मग मी तिला सांगितले “थोडी धीट हो बाळा.. जीवनात या सगळ्या प्रसंगाला सामोरे जावंच लागतं त्याला इलाज नाही… तू रडायला लागलीस तर नवऱ्याचं ड्रायव्हिंगवरून लक्ष उडेल. प्रवास जपून करायचा आहे तेव्हा मनाला आवर घाल “.
तिच्या पुणे सोलापूर रस्त्यावर मी सातत्याने तिला तासातासाने फोन करत होते. ती सोलापुरात पोहोचली तिची चुलत भावंड वगैरे सोलापुरात होती त्यामुळे पुढचा कार्यभाग झाला.
या घटनेचा विचार करत होते…. ती माजी विद्यार्थिनी असल्याला बरीच वर्षे झाली होती पण अतिशय दुःखाच्या काळात तिला पहिल्यांदा माझी आठवण झाली कारण तिला माझा आधार वाटला. मी तिला भेटलेही नाही पण तिला त्या वेळी माझे शब्द धीर देणारे जाणवले.. आणि लक्षात आले शिक्षक असा असतो जो पाठीवर हात ठेवतो, शाबासकी देतो, धीर देतो, आधार देतो. या सगळ्या गोष्टी आपल्या शिक्षकाकडे आपल्याला मिळणार आहेत याची त्या विद्यार्थ्याला जाणीव असते, आणि अशी जाणीव ज्या शिक्षकाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असते त्यांनी त्या पुस्तकांपलीकडे त्याला काहीतरी शिकवलेलं असतं.
…… शिक्षण कुठे पुस्तकात असतं…ते पुस्तकापलीकडेच असत. अभ्यासक्रमाच्या पानाबरोबर जीवनाचे पान वाचायला शिकवणारे शिक्षक हे त्यांच्या कायम लक्षात राहतात हे मात्र नक्की, आणि असे काम ज्या ज्या शिक्षकाने केलेले आहे त्या शिक्षकांबद्दल विद्यार्थी जन्मभर कृतज्ञ असतात. आज असंख्य विद्यार्थ्यांचे फोन मेसेज येत आहेत. मी ज्यांना शिकवले त्या विद्यार्थ्यांचा आता वयोगट 28 ते 65 एवढा आहे. त्या सर्व वयोगटातले विद्यार्थी आपापल्या अनुभवासह एखादा शाळेतला अनुभव शेअर करून सांगतात.. माझ्याकडून काही मिळालं तेही सांगतात.
.. मला वाटतं हीच पावती असते शिक्षकाला त्याच्या शिकवण्याची आणि मग खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा होतो.
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






