डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची…! – भाग -1” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
नेहमीप्रमाणेच मागच्या आठवड्यात अशाच एका रस्त्याच्या कडेला बसलो होतो…
संपूर्ण दवाखाना रस्त्यावर मांडला होता, औषधांचे डबे उघडून ठेवले होते, काही डबे एकावर एक रचून ठेवले होते. या डब्यांच्या शेजारी मी आणि माझ्या आजूबाजूला याचक आजी-आजोबांचा घोळका!
नुकताच पाऊस पडून गेला होता, रस्त्यावर चिखल झाला होता. पाणी आणि माती दोघंही आपापलं स्वतंत्र अस्तित्व सोडून एकमेकांत मनोमन मिसळून जातात, तेव्हा होतो तो चिखल!
…. ‘मी’पणा सोडून चिखल व्हायचं, यालाही धारिष्ट्य लागतच असेल की!
…. मग पाणी आणि माती का सोडत असतील आपापलं अस्तित्व?
त्यांनाही माहित असावं, नाजुक आणि मनमोहक फुलं चिखलातच फुलतात… फुलांना उमलू द्यायचं असेल तर कुणाला तरी चिखल व्हावंच लागतं!
…. आयुष्यात फुलणार्या प्रत्येकानं हे लक्षात ठेवावं… माझ्या फुलण्यासाठी कुणीतरी स्वतःचं अस्तित्व संपवलंय आणि ते पडले आहेत चिखल होऊन… तुमचं फुलणं पहात!
…… यापेक्षा भव्य दिव्य प्रेम कोणतं असू शकतं…???
तर, आमची रस्त्यावर नुसती गडबड सुरू होती. अशातच कुणीतरी एक व्यक्ती आली आणि सरळ माझ्या डब्यांवर पाय देऊन चालण्याचा प्रयत्न करू लागली. एकावर एक मांडलेले डब्बे कच्च्या बांधकामाच्या पुलासारखे कोसळले. आतल्या सगळ्या गोळ्या सांडून रस्त्यावर बेवारशासारख्या पसरल्या… पुरात कुटुंबं उध्वस्त होतात तश्या! डब्बे रस्त्यावरच पालथे पडले. त्यांची झाकणं वादळात छप्पर उडालेल्या घरासारखी उघडली गेली….. रस्त्यावर पडलेल्या एकेका गोळीत, आक्रोश करणारा चेहरा मला दिसत होता…
आणि मी नुसताच बघ्याची भुमिका घेत, सेल्फ्या काढणार्या मुर्दाडासारखा त्यांच्याकडे पहात होतो!
माझं खूप नुकसान झालं… मला राग आला चालणाऱ्या त्या व्यक्तीचा.
त्या व्यक्तीला मी रागानं म्हटलं,
“दिसत नाही काय रे तुला?”
…. ती व्यक्ती गडबडली, शरमली. आपल्या हातून काय झालंय ते त्या व्यक्तीला कळल्यावर हात जोडून माफी मागत म्हणाली,
“माफ करा सर, मी खरंच अंध आहे!”
त्याचं हे वाक्य ऐकून मलाच मेल्याहून मेल्यासारखं झालं. तो खरंच ठार आंधळा होता. हातात अंधांची काठी आणि डोळे पूर्ण बंद.
चूक खरं तर माझीच होती, मी रस्त्याच्या कडेला असा उघड्यावर बसलो होतो… चालणाऱ्यानं चालायचं कुठून? उठून मीच त्याची माफी मागत, त्याचा हात धरून त्याला वाटेला लावण्याचा प्रयत्न केला.
बिचारा तोही पडता पडता वाचला होता… त्याच्या निर्जीव काठीनं त्याला सावरलं होतं!
म्हटलं, “कुठं जायचंय भाऊ? नीट सांभाळून जा!”
यावर तो म्हणाला, “ते भीक मागणार्यांसाठी काम करतात, ते डॉक्टर इथंच कुठंतरी बसतात आजच्या दिवशी; असं मला समजलं, म्हणून मी त्यांना भेटायला आलो होतो. कुठं भेटतील ते?”
मला आश्चर्य आणि गंमत वाटली.
माझं नाव न सांगता मी म्हणालो, “काय काम आहे त्या डॉक्टरांकडे तुझं?”
तो म्हणाला, “मला थोडं बोलायचं होतं त्यांच्याशी…”
माझी उत्सुकता वाढली. काय बोलायचं असेल याला माझ्याशी?
माझी ओळख सांगून म्हणालो, “बोला, काय काम आहे माझ्याकडे?”
हातातलं काम आटोपून मग त्याच्याशी बोलायला सुरुवात केली…
जन्मापासूनच हा अंध!
रेल्वे आणि बस स्टॅन्डवर काहीबाही वस्तू विकायचा. अशाच एका अंध मुलीशी त्याचं लग्न झालं. कालांतरानं याला एक गोड मुलगी झाली. कुठल्याशा एका कंपनीमध्ये त्याची पत्नी पॅकिंगचं काम करायची.
तसं सुरळीत चालू होतं…
पण मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा कहर झाला. रेल्वे, एस.टी. बंद पडली आणि याचं कामही.
एकट्या बायकोच्या जीवावर कसातरी संसार चालू होता. पण मधल्या काळात ही छोटी कंपनीसुद्धा बंद पडली, आणि तिचाही जॉब गेला. पैशाची आवक सगळीकडून बंद झाली. उपासमार होऊ लागली.
ज्या रूममध्ये ते भाड्यानं राहत होते त्या रूमचं भाडं थकलं. ‘अंध’ म्हणून घर मालकानं दोन महिन्यांचं भाडं घेतलं नाही, परंतु त्या पुढच्या महिन्यात तडजोड करण्यास घरमालकानं नकार दिला आणि हात जोडून दुसरीकडे कुठंतरी व्यवस्था करायला सांगितलं.
…. अचानक कुठं करायची व्यवस्था? काही कळेना…तिघांनी जगायचं कसं? काही कळेना…खायचं काय? काही कळेना…१४ महिन्यांची मुलगी… तिला जगवायची कशी? काही कळेना…
आणि मग सगळे मार्ग थकल्यावर, अनेकांच्या डोक्यात येतो तोच विचार याच्याही डोक्यात आला…
‘भीक मागावी का…???’
दोन-चार ओळखीच्या लोकांमध्ये हा विचार त्यानं बोलून दाखवला… आणि यातच त्याला माझं नाव कुणीतरी सुचवलं.
“अमुक वारी, अमुक ठिकाणी डॉक्टर असतो, त्याला भेट…”
.. आणि म्हणून आज हा इथं!
“सर, मला आणि माझ्या बायकोला काहीतरी काम द्या हो… नाहीतर भीक मागावी लागेल आम्हाला.” तो हातातली काठी मुडपत म्हणाला.
माझ्या डोळ्यासमोर अंध बांधवांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आल्या.
म्हणालो, “काय काम करू शकशील तू? म्हणजे तुला दिसण्याचा त्रास आहे ना…?” मी चाचरत विचारलं.
माझ्या आवाजाच्या रोखानं माझ्याकडं अंदाजानं बघत तो हसला; म्हणाला,
“सर, काम करायचं असेल तर डोळ्यांची काय गरज…? मी आणि माझी बायको आम्ही हाती पायी धड आहोत. एकदा आम्हाला काम शिकवलं की ते आमच्या मनात फिट्ट बसतं… मग आम्हाला डोळ्यांची गरजच उरत नाही!”
…… सर्व काही असूनही रडत बसणाऱ्या लोकांना हा फार मोठा फटका होता.
त्याच्याशी बोलताना माझ्या मनात अनेक प्रश्नांची गर्दी झाली…
“एक विचारू…? तुला अज्जिबात दिसत नाही?”
“नाही सर, मी जन्मापासून अंध आहे.”
“तु हे जग कधीच बघितलं नाहीस? माणसं… जनावरं… डोंगर… नदी… कधीच पाहिली नाहीस? तुला पांढरा, हिरवा, निळा हे रंग माहित आहेत?”
“नाही सर, मी हे कधीही पाहिलं नाही… पण इतरांच्या सांगण्यावरून ते कसे दिसत असतील, याची कल्पना आहे मला. रंगांची नावं फक्त ऐकली आहेत. पण ते ‘दिसतात’ कसे हे माहित नाही मला.”
.. काठीशी बोटांचा चाळा करत तो पुढं म्हणाला, “सात रंगांची नावं मी ऐकली आहेत… पण मला एकच रंग आवडतो– काळा! कारण डोळ्यापुढं सतत तोच असतो.”
…… तो भकास हसला, तिसरीकडे पहात.
“तुझी काठी कोणत्या रंगाची आहे माहितीये?”
“त्यानं काय फरक पडतो सर? ती मला साथ देते हे महत्त्वाचं!”
“तसं तर मी माझ्या बायकोलाही पाहिलं नाही, पण ती सुद्धा साथ देते…माझ्या आयुष्यात दोन बाबी महत्त्वाच्या… ही काठी आणि ती जीवनसाथी!” अंगठ्यानं जमिनीवर काहीतरी उकरत तो म्हणाला.
“तुझी पत्नी कशी दिसत असेल, असं तुला वाटतं?”
“ती खूप सुंदरच असणार सर, दुसर्याला सावरणारी कोणतीच गोष्ट कधीच कुरूप नसते!”
…… काठीला छातीशी लावत तो कसानुसा हसला. मनगटावर पडलेला डोळ्यातला थेंब, मागं हात नेऊन त्यानं पँटला पुसला.
माझ्याही अंगावर शहारा आला!
– क्रमशः भाग पहिला
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : abhisoham17@gmail.com,
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




